नमस्कार देवा……

नमस्कार देवा तुला आमुचा हा
करी आमुची मायभूमी महा॥ध्रु.॥

हिचे रूप चैतन्यशाली दिसावे
जगाला कळावी हिची थोरवी
स्मरूनी हिच्या त्या कथा अन्‌‍ व्यथाही
हिला न्यायचे रे पुन्हा वैभवी
अशा सर्व स्वप्नास सामर्थ्य यावे
म्हणूनीच देवा नमस्कार हा॥१॥

जनांचा प्रवाहो इथे चाललेला
सदा संस्कृतीच्या मुळापासुनी
पिढ्या नांदती भोवती बांधवांच्या
अम्ही भिन्न ना त्यांचियापासुनी
तयांच्या कळा जाणवाव्या अम्हाला
तयांच्या सुखाचीच लागो स्पृहा॥२॥

स्फुरो कल्पनाशक्ती अभ्यास यत्ने
बनो शुद्ध बुद्धी हि तेजस्विनी
शरीरास आरोग्य संकल्प चित्ती
नि आत्म्यास इच्छा शुभाकांक्षिणी
पदी धैर्य बाहूत शौर्य स्फुरावे
घडावी विवेकी कृती ध्यास हा॥३॥

प्रभो तू चिदानंदरूपी असोनी
अणुरेणु ब्रह्मांड तू व्यापिले
तुझे अंश आम्ही तुझ्या पूजनाचे
पहा दिव्य हे ध्येय स्वीकारले
पुन्हा जन्म घेऊ स्वराष्ट्रास ध्याऊ
प्रतिज्ञेस या तूचि साक्षी रहा॥४॥