स्त्री-पौरोहित्य : एक परिवर्तन
लेख क्र. ३३ ०७/०७/२०२५ मागील लेखात आपण ज्ञान प्रबोधिनीच्या धार्मिक विधींमागील तात्त्विक भूमिका समजून घेतली, पौरोहित्य उपक्रमातील सार्थता, सामूहिकता, शिस्तबद्धता ही तीन सूत्रे समजून घेतली. परंतु, या उपक्रमातील आणखी एक विशेष म्हणजे स्त्री-पौरोहित्य. समाजात आजही अनेकांना स्त्रियांनी पौरोहित्य करणे, यज्ञात सहभागी होणे निषिद्ध वाटते. परंतु, प्राचीन काळी स्त्रिया यज्ञात सहभागी होत होत्या व आता ज्ञान प्रबोधिनीच्या पौरोहित्य उपक्रमामुळे पुनश्च स्त्रिया पौरोहित्य करू लागल्या आहेत. हा बदल संत्रिकेत यापूर्वी कार्यरत असलेल्या संशोधिका, पौरोहित्य वर्ग प्रशिक्षिका डॉ. आर्या जोशी यांनी लेखरूपात मांडला होता. त्यांचा हा लेख निश्चितच बदलाला प्रेरित करणारा आहे. तसेच, या बदलात सहभागी झालेल्या काही स्त्री-पुरोहितांचे अनुभवही येथे देत आहोत. सध्याच्या चालू काळात आपले मा. राष्ट्रपती ‘व्हिजन २०२०’ चे स्वप्न पाहत असतानादेखील धार्मिक क्षेत्रात ‘पुरोहित’ या रूपात स्त्रीचा स्वीकार संपूर्णपणे केला जात नाही. ‘स्त्री’चे पौरोहित्य नाकारून पुरुष पुरोहितांचाच आग्रह अजूनही धरला जातो. घरातील स्त्रिया ह्याच मोठ्या प्रमाणावर ‘स्त्री’चे पौरोहित्य स्पष्टपणे नाकारतात व ‘घरातील ज्येष्ठांची मानसिकता’ अशी सबबदेखील आपल्या मताच्या पुष्टीसाठी देतात ! आश्चर्य आहे! मंत्रपठनाचा अधिकार – संहिताकाळ हा स्त्रियांच्या एकूणच स्थानाबद्दल गौरवासाठीच प्रसिद्ध आहे. यज्ञाचे पौरोहित्य करणारी विश्ववारा आपल्याला ऋग्वेदात भेटते. घोषा, रोमशा, विश्ववारा, अपाला इ. एकूण २७ स्त्रियांना वैदिक रचनेत सहभागी होता आले व त्यांची मते काव्यरूपाने संहितांमध्ये नोंदली गेली ही अत्यंत लक्षणीय गोष्ट आहे. या २७ स्त्रियांनी रचलेल्या सूक्तांचा समावेश ऋग्वेदामध्ये आढळतो. जुहु ही वेदकालीन ब्रह्मवादिनी असून वैदिक संहितांचे अध्ययन अध्यापन करून तिने स्वतःचे जीवन व्यतीत केले. संहिताकाळात मुलींचे उपनयन करून त्यांना वेदाध्ययनाचा व गायत्री मंत्र म्हणण्याचा अधिकार होता. पुराकल्पे कुमारीणां मौञ्जीबन्धनमिष्यते । अध्यापनं च वेदानां सावित्रीवाचनं तथा ।। (वीरमित्रोदय, संस्कारप्रकाश). ब्राह्मण-काळात यज्ञामध्ये पत्नीचा सहभाग अपरिहार्य मानला जाई. विदुषी म्हणून विख्यात अशा गार्गी मैत्रेयी यांनी उपनिषदांचा काळ गाजविलेला दिसतो. सूत्रकालखंडातील स्त्रिया आचार्यपद भूषवून मीमांसा, व्याकरण इ. विषयांचे अध्यापन पुरुषांसाठीदेखील करीत असत. श्रीराम व लक्ष्मण यांना विश्वामित्रांबरोबर पाठविण्यापूर्वी त्यांचे मंत्रसहित स्वस्त्ययन करणारी कौसल्या आपल्याला रामायणात भेटते. राम व लक्ष्मण यांसह सीता नित्य संध्या करीत असे. तात्पर्य, प्राचीन काळी स्त्रियांना मंत्रपठणाचा अधिकार होता हे यावरून स्पष्ट होते. यज्ञात सहभाग – विश्ववारा हिने संहिता काळात स्वतः यज्ञाचे पौरोहित्य केले व तसे करण्यास इतर स्त्रियांनाही उपदेश केला. तत्कालीन स्त्रियांना यज्ञसंस्थेच्या प्रत्येक अंगाची पूर्ण माहिती होती. यज्ञीय वेदीच्या निर्मितीमध्ये कुशल स्त्री ऋग्वेदात आढळते. स्कंदपुराणातील प्रभासखंडात सावित्रीचे जे चरित्र आले आहे तेथेही ती मंत्रपूर्वक अग्नीला आहुती देत आहे. स्त्रीचे धार्मिक क्षेत्रातील स्थान व महत्त्व अजोड आहे हे या उदाहरणांवरून स्पष्ट होईलच. मासिक धर्म – स्त्रीचा मासिक धर्म ही पौरोहित्याची अडचण ठरू शकते. पण गृह्यसूत्रात सांगून ठेवले आहे – स्नाता रजस्वला या तु चतुर्थे अहनि शुध्यति । कुर्याद् रजोनिवृत्तौ तु देवं पित्र्यादि कर्म च ।। रजस्वला काळाचे ३ दिवस अशौच पाळून चौथ्या दिवशी स्नान करून स्त्री देवकार्य, पितृयज्ञ इ. करू शकते. आयुर्वेदाच्या अभ्यासकांच्या मतेही रजस्स्राव थांबल्यानंतर स्त्रीने धार्मिक कृत्य करण्यास हरकत नाही. सुरक्षितता व प्रतिष्ठा – वैदिकोत्तर काळात शक, कुशाण, बर्बर इ. च्या आक्रमणांनी सारे आर्यावर्त ढवळून निघाले स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने स्त्री बंदिस्त झाली. स्मृतिकारांनी देखील स्त्रीला शूद्राइतकेच गौण स्थान दिले व स्त्रीची प्रतिष्ठा कमी होत गेली. सुपरिवर्तनाचा प्रारंभ – आधुनिक काळात स्वामी दयानंद सरस्वतींनी स्त्रियांना पौरोहित्याची दीक्षा दिली, साकुरी येथील श्री. उपासनी महाराज यांनी स्त्री पौरोहित्याची परंपरा नव्याने सुरू केली. कै. शंकरमामा थत्ते यांनी स्त्रियांना पारंपरिक पौरोहित्याचे प्रशिक्षण दिले. या भगिनी आज समाजात प्रतिष्ठेने पौरोहित्य करतात. १९९० पासून ज्ञानप्रबोधिनीनेही पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही पौरोहित्याचे प्रशिक्षण दिले व या स्त्रिया अन्त्येष्टीसह सर्व संस्कार उत्तमपणे करतात. काही महिला पुरोहितांचे अनुभव सारांशरूपात विशद करतो. सौ. सुनंदा जोशी यांनी त्यांची पौरोहित्याची सुरुवात हिंदूकरण विधीने केली. एका मुलीने मुसलमान मुलाशी प्रेमविवाह केला आणि ती मुस्लिम झाली. पण काही काळाने तिला समजले की तिची फसवणूक झाली आहे. तेव्हा त्या त्रासातून सुटून तिला पुन्हा हिंदू व्हायचे होते, तिची आईसुद्धा तिच्या पाठीशी उभी होती. तेव्हा सौ. सुनंदा जोशी यांनी श्री. म्हसकर गुरुजींच्या मदतीने हा विधी पार पाडला आणि त्या मुलीला घुसमटीतून मुक्त केले. या विधीनंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि बजाजी निंबाळकर यांची आठवण झाली. शिवरायांनी बजाजी निंबाळकरांना पुन्हा हिंदू धर्मात आणून आपली कन्याचा निंबाळकर घराण्यात विवाह लावून दिला. सुनंदा ताईंनी हिंदूकरण विधी करून नवीन पायंडा पाडला. सौ. सीमा दहिवतकर यांचा अनुभवही रोमांचक व समाजाला वेगळी दिशा देणारा आहे. या पुरोहिता श्री. कुलकर्णी गुरुजींसह एका गृहस्थाच्या मातोश्रींचा एकोद्दिष्ट विधी करायला गेले होते. नंतर काही महिन्यातच त्या गृहस्थाच्या पत्नीच्याही एकोद्दिष्ट विधीसाठी त्यांना जावे लागले. आधीच्या विधीच्या वेळी दोघांनी गृहस्थाच्या सूनेला मंगळसूत्र व कुंकवात बघितले होते. पत्नीचे विधी करायची मानसिकता गृहस्थात नव्हती. तेव्हा विधी कोण करेल असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा त्यांना समजले की यजमानांच्या मुलाचेही आधीच निधन झाले आहे. यावर त्यांच्या सुनेने स्पष्टीकरण दिले त्यातून सगळ्यांनाच शिकवण मिळेल. ती म्हणाली,”माझ्या सासर्यांनीच कुंकू लावण्याची परवानगी दिली आहे. तसेच, कोणाला सहज दिसणार नाही अशा पद्धतीने मी मंगळसूत्रही घालते.” तिचे हे उत्तर ऐकून पुरोहित यजमानांना म्हणाले,”धर्माला एक नवीन अधिष्ठान देणारी, आम्हां पुरोहितांनाही शिकवणारी तुमची सून तुमच्या सवाष्ण पत्नीचं एकोद्दिष्ट श्राद्ध करणार आहे.” स्त्री पुरोहित व यजमानही स्त्री असे अपरिचित चित्र आता समाजात स्वीकारले गेले आहे. असे अनेक अनुभव महिला पुरोहितांनी त्यांच्या मनात संग्रहित केले आहेत. आजच्या काळात अगदी दाहकर्मसुद्धा महिला पुरोहित करतात. ह्याला कारण निश्चितच ज्ञान प्रबोधिनी आहे. १९९० साली पौरोहित्य उपक्रम सुरु झाला तेव्हा महिलांची संख्या जेमतेम ५ आणि पुरुषांची संख्या ३० च्या वर होती. आता हीच परिस्थिती बदलली आहे. महिला पुरोहितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी विभागात दूरभाष आला की पुरुष पुरोहित आहेत का असे स्पष्ट विचारले जाई. तर आता महिला पुरोहित मिळतील का असे आवर्जून विचारले जाते. परिवर्तनाचा मार्ग बोलण्यापेक्षा कृतीतून अधिक वेगाने होतो हेच खरे!
स्त्री-पौरोहित्य : एक परिवर्तन Read More »