भारताचे राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व

वाच. गिरीश श्री. बापट

संचालक

ज्ञान प्रबोधिनी

(केवळ अंतर्गत वितरणासाठी)

सध्याच्या काळात हिंदुत्व या शब्दाभोवती आणि संकल्पनेभोवती समज-गैरसमजांच्या अनेक वावटळी उठत आहेत. स्वामी विवेकानंद किंवा अरविंद यांच्या काळात या शब्दाला एवढे रंग आणि अर्थ प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी या शब्दाचा उपयोग मोकळेपणाने केला आहे. परंतु आजच्या काळात प्रबोधिनीच्या संस्थापकांना आणि संस्था म्हणून ज्ञान प्रबोधिनीला या शब्दातून काय अभिप्रेत आहे हे जाणून घेण्याची आवश्यकता आज अनेकांना वाटत आहे. त्या दृष्टीने सौर वैशाख १९ शके १९३७ (९ मे २०१५) ला ज्ञान प्रबोधिनीच्या हराळी केंद्रात कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात प्रबोधिनीचे संचालक माननीय वाचस्पती गिरीशराव बापट यांनी मांडणी केली. त्या भाषणाच्या टिपणांवरून हा लेख तयार केला आहे. 

भारताचे राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व

सत्य एक, नावे वेगवेगळी

ज्ञान प्रबोधिनीच्या तत्त्वज्ञानाचे आणि कार्याचे स्वरूप स्पष्ट करणारे चार खंड आपण प्रकाशित केले आहेत. त्यातल्या दुसऱ्या खंडात ‘भारताचे राष्ट्रीय संत’ या शीर्षकाचा एक इंग्रजी लेख आहे. त्याच्या समारोपात प्रबोधिनीचे संस्थापक मा. आप्पा पेंडसे यांनी म्हटले आहे की “सत्य एकच आहे. जाणते लोक त्याला वेगवेगळी नावे देतात, या वैदिक उक्तीप्रमाणे आपल्या देशात राहणाऱ्या लोकांना हिंदू, हिंदुस्थानी, हिंदी, भारतीय, इंडियन अशा वेगवेगळ्या नावांनी जगातले लोक ओळखतात.” आपल्या दोन कार्यकर्त्या सुवर्णाताई आणि अनघाताई या तुर्कस्थानमध्ये एका परिषदेला गेल्या होत्या. “तुम्ही कोणत्या देशातून आला आहात? कोण आहात?” असे त्यांना विचारल्यावर त्यांनी प्रथम आम्ही ‘इंडियन’ आहोत असे सांगितले. परंतु ते लक्षात येत नाही असे कळल्यावर त्या म्हणाल्या की आम्ही ‘हिंदू’ आहोत. हे ऐकल्यावर ऐकणाऱ्याला एकदम उलगडा झाला. चिनी भाषेत ‘इंडियन’ या इंग्रजी शब्दाला समानार्थी शब्द ‘यिन्तूरन्’ असा आहे. आपल्याला वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी नावे दिली तरी आपण आशयाला महत्त्व देऊया. तो आशय काय? ते या लेखात आपण पाहाणार आहोत. 

कोणत्या नावात प्रेरणा आहे ?

आपण जगात भिन्नभिन्न नावाने ओळखले जात असलो तरी राष्ट्रीयत्वाची खूण म्हणून आपल्याला एखादे नाव विशेष प्रिय असते. ज्या नावाने हाक मारली असता लगेच ‘ओ’ द्यावीशी वाटते, ते नाव आपल्या सवयीचे असते. त्या नावामध्ये प्रेरणा निर्माण करण्याचे सामर्थ्य असते. स्वामी विवेकानंदांनी अडीच वर्षे भारताची परिक्रमा केल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की या झोपलेल्या आणि आत्मविश्वास हरवलेल्या देशाला आणि इथल्या लोकांना जागे करायचे असेल तर ‘हे हिंदुराष्ट्रा, ऊठ!’ अशीच हाक त्याला मारावी लागेल. या नावात ऋषिकालापासून आजपर्यंत या देशातील आपल्या बांधवांनी घडवलेला इतिहास, विविध क्षेत्रांत केलेले पराक्रम आणि सर्वांना मार्गदर्शक असे कला व शास्त्रांमधील कर्तृत्व यांची आठवण आणि अभिमान आहे. आपणही त्यांना साजेसे काही केले पाहिजे अशी प्रेरणा आहे. वर्तमान काळातल्या देशप्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ही प्रेरणा महत्त्वाची असते. 

स्वामीजींचे आवाहन

अमेरिकेतून परत आल्यानंतर कोलंबो ते अल्मोरा अशी स्वामी विवेकानंदांची विजययात्रा झाली. त्यानंतर ते पंजाबमध्येही गेले. पंजाबमध्ये आर्य समाजी लोकांची मोठी संख्या होती. स्वामीजींचे स्वागत आणि सत्कार करण्यात ते उत्साहाने सहभागी झाले होते. पण आर्य समाजाला ‘हिंदू’ या शब्दाचे वावडे होते. अरबी आणि फारशी भाषेत ‘हिंदू’ हा शब्द गुलाम/दास या अर्थी वापरलेला आहे. म्हणून आर्य समाजाने ‘हिंदू’ हा शब्द टाकून ‘आर्य’ हे नाव घेतले. स्वामीजींची व्याख्याने ऐकायला येणाऱ्या श्रोत्यांमध्ये आर्य समाजीही मोठ्या संख्येने असल्यामुळे त्यांचे नाव न घेता स्वामीजींनी लाहोरच्या एका सभेत पुढील उद्गार काढले आपण हिंदू आहोत. ‘हिंदूया शब्दातून मला कोणताही वाईट अर्थ ध्वनित होऊ द्यायचा नाही. त्यामध्ये काही वाईट अर्थ आहे याच्याशी मी सहमत नाही. भूतकाळामध्ये सिंधू नदीच्या अलीकडच्या बाजूला राहणारे ते हिंदू एवढाच अर्थ होता. जे आपला द्वेष करत आले त्यांनी या शब्दाला वाईट अर्थ चिकटवला असेल, पण त्याचे काय? हिंदू या शब्दाने जे उज्वल आहे, जे आध्यात्मिक आहे, त्याचा निर्देश होतो की जे लज्जास्पद आहे, पायदळी तुडवले गेलेले आहे, जे भिकारडे आहे, त्याचा बोध होतो हे आम्हावरच अवलंबून आहे. आज हिंदू शब्दाने काही वाईट अर्थ उत्पन्न होत असेल तरी हरकत नाही. कोणत्याही भाषेतील अधिकात अधिक गौरवपूर्ण अर्थ आपल्या कृतींनी या हिंदू शब्दाला आणून देण्यासाठी आपण सिद्ध होऊया.’ (मूळ इंग्रजी The Complete Works of Vivekananda Vol. III आवृत्ती नववी (सप्टेंबर १९६४) पान ३६८, मराठी भाषांतर- वि. वि. पेंडसे, विवेकानंदांचा राष्ट्रधर्म, आवृत्ती चौथी, पान १६)

हे हिंदुराष्ट्र आहे तरी कसे?

कोणीतरी चिडवते किंवा तुच्छ लेखते म्हणून आपण आपले नाव टाकणे म्हणजे आपल्या पूर्वजांविषयी कृतघ्न असणे होय. त्यांचा आणि आपल्या स्वतःचा गौरव वाढविण्यासाठी आपल्या कर्तृत्वानेच हिंदू या शब्दाला गौरव प्राप्त करून देऊया, असे स्वामीजी म्हणतात. आपला समाज, संस्कृती आणि राष्ट्र यांना उद्देशून भगिनी निवेदितांनी हाच शब्द वापरला. सावरकरांनी हाच शब्द वापरला. सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या सेनेला ‘आझाद हिंद सेना’ असेच नाव दिले. कै. आप्पा पेंडसे यांनीही या देशाला हिंदुराष्ट्र म्हणावे असे आग्रहाचे प्रतिपादन ‘विवेकानंदांचा राष्ट्रधर्म’ या पुस्तकात केले आहे. ते म्हणतात, हे हिंदुराष्ट्र कोणत्याही जुन्या निरुपयोगी किंवा बलात्कारी रूढींशी बांधलेले नाही. (काही लोकांना वाटते त्याप्रमाणे) ‘हिंदुराष्ट्र म्हटले म्हणजे त्यात जमीनदारी असलीच पाहिजे, त्यात गरीबांवर अन्याय झालाच पाहिजे, त्यात लोक पिळले गेलेच पाहिजेत, तिथे समान संधी असणारच नाही अथवा स्त्रीला सन्मानाचे स्थान मिळणारच नाही; तिथे स्वच्छता, सुधारणा, आधुनिकता येणारच नाही, तिथे शास्त्रज्ञानाकडे पाठ फिरवलेलीच असणार, तिथे लोकशाही असूच शकणार नाही, तिथे जुलमी राजसत्ता अथवा अधोगतीला गेलेली हुकुमशाहीच असणार, तिथे मतवैचित्र्य असायला बंदीच असणार; भाषणस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य यांना तिथे काळिमा फासला जाणार! ….. असे कोणी हेकटपणे म्हणू लागले तर त्याची कीव करण्यावाचून गत्यंतर नाही. ….. या राष्ट्रातील आम्ही हिंदू येथील राष्ट्रजीवनाची राष्ट्रवैभवाची जशी निर्मिती करू तसे ते होणार आहे.’ (वि. वि. पेंडसे, विवेकानंदांचा राष्ट्रधर्म, आवृत्ती चौथी, पान ९०, ९१)

इतरांनी कोणतेही नाव वापरावे पण त्यांच्या मनातला आणि आपल्या मनातला आशय एक आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. खिश्चन, इस्लामी, ज्यू, पारशी, कन्फ्यूशिअसवादी, ताओवादी किंवा शिंतोमार्गी असे जगातील विविध पंथ आणि त्यांचे उपासक अस्तित्वात येण्यापूर्वी भारतात वेद आणि उपनिषदे हे आध्यात्मिक वाङ्मय निर्माण झाले. आजही सर्व जगाला जीवनाचे खरे स्वरूप कळण्यासाठी हे वाङ्मय मार्गदर्शक वाटते. भारतात राहणाऱ्या सर्वांचाच हा राष्ट्रीय वारसा आहे. जगदीशचंद्र बसूंचे वैज्ञानिक संशोधन हा सुद्धा आपला राष्ट्रीय वारसाच आहे. वनस्पतींना आपल्यासारख्याच संवेदना असतात हे त्यांचे संशोधन तुकाराम महाराजांच्या ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ या उद्गाराशी किंवा ऋषींच्या ईशावास्य उपनिषदातल्या ‘ईशावास्यम् इदं सर्वम्’ या अनुभवाशी नाते सांगणारे आहे. कोणत्याही धर्मपंथाच्या भारतीयांना जगदीशचंद्रांच्या संशोधनाएवढेच तुकाराम महाराजांचे अभंग आणि ईशावास्य उपनिषदातील मंत्र हा आपल्या राष्ट्रीय वारशाचा भाग आहे हे समजले पाहिजे. एक ख्रिस्ती संन्यासी प्रकटपणे असे म्हणाले होते की रामायण आणि महाभारत हे ग्रंथ भारतीय ख्रिश्चनांसाठी जुना करार (Old testament) म्हणून स्वीकारला पाहिजे. अशा खिश्चनांनी स्वतःला भारतीय खिश्चन किंवा इंडियन ख्रिश्चन म्हणवून घेतल्याने जो आशय व्यक्त होतो तोच हिंदू खिश्चनम्हणवून घेतल्याने व्यक्त होईल अशी प्रबोधिनीची भूमिका आहे. आपल्या देशातील नामवंत मुस्लिम विचारवंत नेत्यांनीही आपण सांस्कृतिकदृष्ट्या हिंदूच आहोत हे आनंदाने नमूद केले आहे. माजी उपराष्ट्रपती न्यायमूर्ती हिदायतुल्ला प्रबोधिनीत गणेश प्रतिष्ठापनेला आले होते. तेव्हा त्यांनी महाविद्यालयातील गणपती विसर्जनाला ते स्वतः डोक्यावर मूर्ती घेऊन कसे जायचे हे सांगितले होते. अशा मुसलमानांनी स्वतःला भारतीय मुस्लिम किंवा इंडियन मुस्लिम म्हणवून घेतल्याने जो आशय व्यक्त होतो तोच हिंदू मुसलमानम्हणवून घेतल्याने व्यक्त होईल अशी प्रबोधिनीची भूमिका आहे.

विकसनशील समाजगटांमधील नेतृत्व आणि कर्तृत्व

आपल्या राष्ट्रीय वारशामधील चांगल्या गोष्टींचा ज्यांना अभिमान वाटतो आणि आज चुकीच्या वाटणाऱ्या गोष्टींबद्दल खेद वाटतो ते आपल्या राष्ट्राचे एक घटक आहेत. हे राष्ट्राचे जिवंत घटक प्रवाहाबरोबर जाता जाता प्रवाहाला दिशा आणि गती देण्याचेही काम करतात. आपल्या समाजातील विकसनशील गटांमधून पुढे आलेल्या कर्तृत्ववान आणि प्रतिभावान व्यक्तींचे गुणग्रहण आपण किती करतो यावरून आपण आपल्या विराट समाजाशी किती एकरूप झालो आहोत हे लक्षात येते. ब्रिटिशांचे राज्य आल्यावर त्यांच्या राज्यपद्धतीमुळे आणि शिक्षणपद्धतीमुळे आजवर विकासाची संधी न मिळालेल्या आपल्या समाजातील घटकांना त्यांचे गुण प्रकट करण्याची संधी मिळाली. स्वातंत्र्ययोद्धे, समाजसुधारक आणि कर्तृत्ववान लोकांची ठराविक नावे पुन्हा पुन्हा घेतली जातात. परंतु उमाजी नाईक, लहुजी वस्ताद, रखमाबाई शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, क्रांतिसिंह नाना पाटील, दादासाहेब गायकवाड, अण्णाभाऊ साठे हे तेजस्वी तारे सर्वांच्या दृष्टीपुढे असतात असे नाही. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे की समाजात शिक्षणाचा जेवढा प्रसार होईल तेवढ्या प्रमाणात नेतृत्व आणि कर्तृत्व प्रकट करणाऱ्या स्त्री-पुरुषांची संख्या वाढेल. राष्ट्राच्या विकासासाठी बोटावर मोजण्याइतके कर्ते आणि नेते पुरत नाहीत तर त्यांची एक मोठी परंपराच उभी राहावी लागते. नव्या नव्या समाजगटांमधून आता कर्ते लोक पुढे येण्याचे प्रमाण वाढते आहे. या नव्या परंपरा सर्वांनाच आपल्या वाटल्या पाहिजेत.

राष्ट्रीयत्वाची व्यापक भावना

नव्याने शिक्षण संधी मिळालेल्या समाजगटांमध्ये आपल्या गटाची अस्मिता मोठी असते. हे न कळल्यामुळे प्रतिक्रिया म्हणून ज्यांना आधी विकासाची संधी मिळाली आहे असे समाजगटही आपापल्या अस्मिता बळकट करण्याच्या मागे लागतात. परंतु ज्यांना राष्ट्रघडणीचे व्यापक कार्य करायचे आहे त्यांना कोणा एकाच समाजगटाशी बांधून घेता येणार नाही. कर्तृत्ववान व्यक्तींच्या निवडीचे क्षेत्र व्यापक होत असताना आपलेपणाच्या भावनेचे क्षेत्रही समाजगटाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण समाजाएवढे मोठे झाले पाहिजे. जात, धर्म, प्रदेश, भाषा यांच्या निरपेक्ष भारतातील सर्व लोक आपले वाटणे म्हणजे राष्ट्रीयत्वाची व्यापक भावना. अशा राष्ट्रीयत्वाला स्वामी विवेकानंदांनी हिंदुत्व असे म्हटले आहे. प्रबोधिनीची भूमिका या बाबतीत विवेकानंदांप्रमाणेच आहे.

समाज आणि संस्कृती यांची एकरूपता

राष्ट्रीयत्वाच्या भावनेमध्ये राष्ट्रीय वारशाची जाणीव आणि विविध समाजघटकांबरोबरची एकरूपता हे भाग येतात. तसेच समाजाच्या दैनंदिन आचरणात असलेली संस्कृतीही येते. समाज आणि संस्कृती यांच्या एकरूपतेमुळे राष्ट्राची वेगळी ओळख निर्माण होते. भारतीय समाज आणि संस्कृती यांच्या गाभ्यात असलेली गोष्ट म्हणजे अध्यात्म-विचार. प्रबोधिनीच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थी, निगडीतील कर्मचारी सदस्य, पुण्यातील युवक गटांचे मार्गदर्शक आणि वेल्ह्यामधील बचतगटातील महिला अशा वेगवेगळ्या गटांशी उपासनेबद्दल बोलताना मी ‘पसायदान’ म्हणत सुरुवात केली होती. कारण पसायदानाशी आपली सर्वांचीच जिव्हाळ्याची ओळख आहे. मी पसायदान म्हणायला सुरुवात केल्यावर बहुतेक जण माझ्याबरोबर त्यातील ओव्या पुटपुटू लागायचे. ‘आता विश्वात्मके देवे’ पासून सुरुवात करून ‘विश्व स्वधर्मसूर्ये पाहो’ इथपर्यंत येईतो बहुतेक सर्वांना या ओव्यांची आठवण झालेली असायची. मग मी सांगत असे की ‘विश्व स्वधर्मसूर्ये पाहो’ म्हणजे विश्वातल्या साऱ्यांना आपला अंगभूत स्वभाव आणि कर्तव्याची जाणीव होवो. म्हणजेच ‘परब्रह्मशक्ती स्फुरो विश्वामध्ये’. महाराष्ट्रात कुठेही अनुभव येतो की कुणी एक पसायदान म्हणू लागला की सर्वांना ते सहज आठवते. म्हणजेच समाज आणि संस्कृती एकरूप झालेली आहे. पसायदान हे विश्वात्मक देवाला मागणे आहे. ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ असे होण्यासाठी ‘विश्व स्वधर्मसूर्ये पाहो’ असे झाले पाहिजे. हाच विश्वात्मक देव आपल्या मातृभूमीच्या रूपात देखील आहे. सारा ‘भारतीय समाज स्वधर्मसूर्ये पाहो’ म्हणजेच ‘हिंदुत्व स्वधर्मसूर्ये पाहो’. भारतीय समाजाचा असा स्वधर्म म्हणजे व्यापक हिंदुत्वाची आंतरिक जाणीव. ‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ म्हणजे या व्यापक आंतरिक जाणीवेचा परमात्मशक्तीशी धागा जुळो, सूर जुळो, स्पंदन जुळो.

स्वधर्म : भारतीयांचे खास योगदान

‘स्वधर्म’ ही खास भारतीय संकल्पना आहे. या संकल्पनेचे काही पैलू विविध विकसित देशात आपल्याला आढळतात. उदा. आपल्या उपजीविकेचे काम प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने करणे, सामाजिक जबाबदारी पार पाडणे, पर्यावरण रक्षण करणे, सांस्कृतिक परंपरा समृद्ध करणे हे सारे औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणाचे भाग असतात. परंतु स्वधर्म संकल्पना सांगते की हे सर्व ईश्वरार्पण बुद्धीने करायचे. आपल्या क्षमतांनुसार, भोवतालच्या परिस्थितीनुसार आपल्या वाट्याला जे कर्म आले ते उत्साहाने आणि उत्तम रीतीने करणे, परंतु हे मी केले, माझ्यामुळे झाले असा भाव न राहता मी परब्रह्मशक्तीच्या हातीचे साधन आहे असा भाव ठेवणे म्हणजे ईश्वरार्पण बुद्धीने काम करायचे. असे झाले म्हणजे स्पर्धा, ईर्ष्या, असूया यांना स्थान राहात नाही. सर्व कर्मामधून, संपूर्ण जीवनातून इतरांच्या हित आणि सुखामध्ये माझे हित आणि सुख आहे अशी निःस्वार्थ प्रेरणा प्रकट होते. असे झाल्यामुळे त्या व्यक्तीला जीवन आनंदमय वाटते आणि ज्या राष्ट्रात अशा व्यक्ती मोठ्या संख्येने असतात ते राष्ट्रही अन्य मानवसमूहांना मार्गदर्शन करण्याच्या योग्यतेचे होते. ‘कृण्वन्तो विश्वम् आर्यम्’ याचा अर्थ विश्वात सर्वत्र स्वधर्मपालन करणाऱ्या, स्वयंशासित, आणि ईश्वरी शक्तीने प्रेरित अशा व्यक्ती कार्यरत असोत. पसायदानातील ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’ ती हीच होय.

अखंड आणि अजिंक्य मातृभूमी

उन्नत आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी व्यावहारिक परिस्थितीही वेळोवेळी अनुकूल करून घ्यावी लागते. प्रबोधिनीच्या प्रार्थनेमध्ये आमचा देश अखंड, अजिंक्य, विश्वविजयी व्हावा असे म्हटले आहे. भारताला सैन्यबळावर, अर्थबळावर किंवा केवळ मुत्सद्देगिरीच्या बळावर विश्वविजय करायचा नाही. या सर्व आघाड्यांवर भारताने समर्थ असावेच. परंतु विश्वविजय करायचा तो अध्यात्मबलावर. साऱ्या जगालाच निःस्वार्थपणे आणि कर्तव्यबुद्धीने काम करण्याचा मार्ग आपल्याला दाखवायचा आहे. स्वामी विवेकानंदांनी फार हृद्य उदाहरणाने हा विश्वविजय वर्णन केला आहे. पहाटेच्या वेळी जितक्या अलगदपणे दवबिंदू सारी भूमी चिंब करतात तितक्या अलगदपणे आपण जग जिंकलेच पाहिजे. सोलापूर जवळील माचणूरचे संत बाबामहाराज आर्वीकर यांनी याला संतधर्म म्हटले. यालाच कोणी आर्यधर्म, मानवधर्म, सनातन धर्म किंवा भारतीय राष्ट्रधर्म म्हणतात. याच धर्माची स्थापना आपल्याला करायची आहे असे आपण प्रबोधिनीत म्हणतो. विनोबाजी भावे यांनी याच अर्थाने धर्मस्थापना झाली पाहिजे असे म्हटले आहे. (महाराष्ट्रात विनोबा : भाग ४, पृष्ठ १, परंधाम विद्यापीठ प्रकाशन, आवृत्ती पहिली, ऑक्टोबर १९५९).

देशाचे अखंडत्व कशात आहे?

अध्यात्मशक्तीच्या बलावर विश्वविजय करणे हे ध्येय समजू शकते. सामूहिक आणि सर्व प्रकारच्या बलोपासनेने हा देश अजिंक्यही होऊ शकेल पण प्रबोधिनीच्या प्रार्थनेत हा देश ‘अखंड’ व्हावा असेही आपण म्हणतो. पूर्वी बृहत्तर भारतात असलेली अनेक छोटी, मोठी राज्ये पुन्हा राजकीय दृष्टीने एकत्र होऊ शकतील का? तसे करणे म्हणजे देश ‘अखंड’ करणे आहे का? तसे नसेल तर सर्वांना जोडणारे एकात्मतेचे सूत्र कोणते? दक्षिण आशियातील सर्व देश राष्ट्रराज्य म्हणून स्वतंत्र राहूनही त्यांचे सांस्कृतिक ऐक्य पुन्हा स्थापित होऊ शकेल असे प्रबोधिनीला वाटते. शिवकालात तीनशे वर्षांच्या परकीय संस्कृतीच्या वर्चस्वानंतर महाराष्ट्रात स्वराज्य आले. काश्मीरमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी महाराणा रणजितसिंहांनी पाचशे वर्षांचे परकीय संस्कृतीचे वर्चस्व संपविले. स्वत्वाची जाणीव प्रखर झाली की तीनशे किंवा पाचशे वर्षांचा अंधारही पळून जातो, हा इतिहास आहे. त्यामुळे केवळ पासष्ट-सत्तर वर्षांची फाळणी आता अंतिम झाली असे मानायचे कारण नाही. स्वत्वाची जाणीव मंद झाली की फाळणी ‘अपरिवर्तनीय’ वाटू लागते. राष्ट्रीय सत्त्व जागे झाले तर अखंडत्व, अजिंक्यत्व, विश्वविजेतेपण हे प्रयत्नसाध्य वाटू लागते. भारत किंवा इंडिया हे शब्द अजिंक्य होण्याची प्रेरणा जागवू शकतात. पण हिंदुराष्ट्र या शब्दात देशाचे अखंडत्व आणि विश्वविजेतेपण यांची प्रेरणा निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे असे देशात ठिकठिकाणी हिंडले की अनुभवास येते.

विवेकानंदांच्या मार्गाने जाऊ असे म्हणणारे कै. आप्पा हिंदुत्व, हिंदुराष्ट्र या शब्दांचे सामर्थ्य ओळखत होते. या शब्दांना राजकीय रंग येत आहे, चुकीचे अर्थ चिकटवले जात आहेत याची त्यांना जाणीव होती; परंतु आपल्या सामूहिक पुरुषार्थाने हे चुकीचे अर्थ आपण पुसून टाकूया, असे आवाहन ते करत.

तनूमनात, एक ध्यान प्रिय महान हिंदुस्थान,

हिंदुस्थान, हिंदुस्थान, हिंदुस्थान, हिंदुस्थान

असा जप आपल्या पद्यगायनातूनही होईल असे त्यांनी पाहिले. भगवद्गीतेमध्ये बुद्धी श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ, संन्यास श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ, मूर्तीशिवायची उपासना श्रेष्ठ की मूर्तीची उपासना श्रेष्ठ अशा अर्जुनाच्या प्रश्नांना श्रीकृष्णांनी उत्तर दिले आहे की सर्व श्रेष्ठच आहेत, कारण त्याद्वारे एकच ध्येय साधले जाते. पण बहुसंख्य लोकांना कर्म आणि त्यातून मूर्तीची उपासना जास्त सुलभ वाटते. जास्तीत जास्त लोकांना सामावून घेणारे म्हणून ते श्रेष्ठतर आहे. त्याच प्रमाणे भारतीय, इंडियन, हिंदुस्थानी ही नावे ही चांगलीच. पण हिंदू हे नाव जास्तीत जास्त लोकांना प्रेरणा देणारे म्हणून ते नाव चांगले आणि आग्रहाने वापरावे असे आहे. राष्ट्रघडण ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. तिचा वेळ कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचा सहभाग हवा. तो हिंदू या नावाने होईल असा विश्वास हवा.

एकत्वाचे आणि अखंडत्वाचे धागे

समाज आणि संस्कृती कशी एकजीव होऊन गेली आहे याचे काही व्यक्तिगत अनुभव सांगतो. जिथे या वर्षीचे साहित्य संमेलन झाले त्या घुमानला तर संत नामदेवांच्या नावाचा गुरुद्वारा आहेच. परंतु पंजाबप्रमाणेच गुजरात, ओरिसा, दिल्ली आणि चेन्नईमध्ये सुद्धा ‘तुम्ही नामदेवांच्या मुलखातले म्हणजे आमचेच’ असे म्हणणारे लोक भेटतात. मी काश्मीरमध्ये गेलो होतो. छोट्या- छोट्या गावांमध्ये मुस्लिमांच्या घरी राहिलो. मी त्यांना संत लल्लेश्वरीबद्दल विचारले तेव्हा त्यांना फार आनंद झाला. त्यांना लल्लेश्वरीची वचने पाठ होती. आपल्या कार्यकर्त्यांना काश्मिरच्या दौऱ्यात तेथील गावकऱ्यांनी त्यांच्या गावात वहिवाट नसलेली परंतु सुरक्षित ठेवलेली देवळे दाखवली. महाराष्ट्रातल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नावाचा गजर मला आंध्र प्रदेशात समुद्र किनाऱ्यावर ऐकायला मिळाला. देशात अनेक ठिकाणी गायली जाणारी ‘हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे’ ही धून मला आंध्र प्रदेशातल्या त्या गावात आणि मध्य प्रदेशात नर्मदेजवळ असलेल्या एका छोट्या गावात एकाच चालीत ऐकायला मिळाली. डॉ. राममनोहर लोहिया म्हणत की रामायण आणि महाभारत हे भारतीय जीवनाच्या महावस्त्राचे ताणेबाणे आहेत. आशियातील सतरा भाषांमध्ये रामायणाचे अनुवाद झाले आहेत. पंजाबात ज्ञानेश्वरीचा उर्दू अनुवाद झालेला आहे. ज्ञानेश्वरी आणि गीताई यांचे अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. संस्कृतीचे असे सर्वदूर पसरलेले दृढ धागे पाहिले की समाज आणि संस्कृती यांच्या एकरूपतेतून राष्ट्रघडण होते याचा प्रत्यय येतो. भारतीय संस्कृती एकात्म आहे हे प्रांतोप्रांती संत एकच भाषा बोलतात, सारखीच उदाहरणे देतात यावरून कळून येते.

स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् ….

आमच्या देशात रामकृष्णादि पराक्रमी पुरुष निर्माण झाले. दक्षिणेच्या तिरुवल्लवरांपासून काश्मीरच्या लल्लेश्वरीपर्यंत मोठी संत मांदियाळी होऊन गेली आहे. यांनी शब्दांनी तर शिकवले आहेच. पण त्याहून अधिक आचरणातून शिकवले आहे. चारित्र्याचे उत्तुंग आदर्श या सर्वांनी उभे केले आहेत. आताच्या मानवांतून देवत्वाकडे म्हणजे विकसित मानवत्वाकडे प्रवास करणारे उद्याचे मानवसंघ निर्माण व्हायला हवे आहेत. या मार्गावरचे मार्गदर्शक आणि प्रतिनिधी म्हणजे आपले संत. या दिशेने जाणारे सर्व मार्ग हिंदुत्वात येतात. हिंदु संस्कृती या सर्व मार्गांना सत्य मानते. देवत्वाच्या दिशेने जाणाऱ्या संत आणि वीर पुरुषांची परंपरा जो मानतो तो हिंदु समाज आहे.

मानवातील दिव्यत्वाचे प्रकटन

स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी अभिमानाचे असे उद्गार काढले आहेत की भारताने संत निर्माण केल्याशिवाय गेली शतकानुशतके आणखी काय केले आहे? आजच्या मानवजातीहून विकसित मानव किंवा देवमानव निर्माण करणे हे आमच्या राष्ट्राचे उद्दिष्ट आहे. ‘शांततामय सहजीवन’ आणि ‘धारणाक्षम विकास’ इथपर्यंतची उद्दिष्टे बाकी देशांना सापडलेली आहेत. परंतु, ‘मानवातले दिव्यत्व प्रकट करणे’ हे त्याहून कितीतरी पुढचे उद्दिष्ट आहे. ते केवळ हिंदू राष्ट्रालाच फार पूर्वी सापडलेले आहे. हे दिव्यत्व प्रकट करण्याचे विविध मार्ग हिंदु धर्मात (भारतीय आध्यात्मिक जीवनपद्धतीत) आणि अन्यत्रही आहेत. हे सर्व मार्ग सत्य आहेत असे मनाने स्वीकारणे आणि प्रत्येकाला आपापल्या मार्गाने जाण्याचे स्वातंत्र्य खळखळ न करता देणे, ही हिंदू संस्कृती आहे. हा धर्म आणि ही संस्कृती टिकवण्याऱ्यांची, वाढविण्याऱ्यांची परंपरा जो आपली मानतो तो हिंदू समाज. हिंदू धर्म (भारतीय आध्यात्मिक जीवनपद्धती), हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज म्हणजेच आपले राष्ट्र. त्याची आजीवन सेवा करण्याचे व्रत आपण प्रबोधिनीच्या प्रथम प्रतिज्ञेत घेत असतो. 

माती एकच आकार वेगवेगळे

माती आणि तिच्या गोळ्याला दिलेले विविध आकार असे उदाहरण घेतले तर आपला समाज हा जणू माती आहे आणि एकेक संप्रदाय किंवा विचारप्रवाह म्हणजे या मातीच्या गोळ्यातून निर्माण झालेले वेगवेगळे आकार आहेत. भारतीय मातीला उद्देशून आपण हिंदू, हिंदुस्थानी, इंडियन असे शब्द वापरतो. या मातीतून अनेक संप्रदायांचे आकार निर्माण झाले. आणखी काही आकार या पुढे निर्माण होणार आहेत. आजसुद्धा सर्व माती कुठल्यातरी आकारात बंदिस्त आहे असे नाही. सर्व संप्रदायांच्या प्रार्थना आवडीने म्हणणाऱ्यांना कोणत्या आकारात बसवणार? आणि कोणतीच प्रार्थना करायला तयार नसणाऱ्यांना कोणत्या आकारात बसवणार? अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करणाऱ्यांचा एक आकार आहे. अंधश्रद्धा पकडून बसणाऱ्यांचा आणखी एक आकार आहे. तरीही एक लक्षात ठेवले पाहिजे की एखाद्या संप्रदायाचा, पक्षाचा, जातीचा किंवा संघटनेचा आकार स्वीकारला म्हणजे मातीचे गुण सोडले पाहिजेत असे नाही. आणि एखादा आकार मोडला तरी मातीचे गुण नाहीसे होत नाहीत. ‘मृत्तिका एव सत्यम्’ असे उपनिषदांनी म्हटले आहे. म्हणजे मातीच खरी आहे. राष्ट्राचे गुणधर्म हेच खरे सत्य आहे. संप्रदाय हे त्याच्या पोटात येतात.

ओळख आत्मस्वरूपाची

विविध देशांच्या संस्कृतींमधून नीति-अनीति, सौंदर्य, कुरूपता याबाबतच्या त्यांच्या कल्पना लक्षात येतात. हिंदू संस्कृतीतही त्या आहेत पण नीतिबोध आणि सौंदर्यबोधाबरोबर आत्मबोधाचीही कल्पना आहे. इंद्रिय, मन आणि बुद्धी यांचे नियंत्रण करणाऱ्या स्वतःमधील केंद्राचा शोध लागणे म्हणजे आत्मबोध. आणि त्या केंद्राची अनुभवातून ओळख होणे म्हणजे आत्मसाक्षात्कार. हे हिंदु संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. विवेकानंद जेव्हा ‘हिंदुत्व’ शब्द वापरतात तेव्हा त्यांना अध्यात्मप्रधान हिंदुत्व अभिप्रेत असते. त्याला विज्ञानाचे वावडे नाही. उलट त्याच्या समग्रतेत विज्ञानाला महत्त्वाचे स्थान आहे. हेच ज्ञान प्रबोधिनीला अभिप्रेत असलेले हिंदुत्व आहे.

हिंदुत्वाच्या आणखी काही प्रचलित छटा

आपल्या देशातील काही प्रवाह प्रकट किंवा अप्रकट रितीने हिंदुत्वाची मांडणी करतात. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचे हिंदुत्व हे राजकीय हिंदुत्व आहे. सावरकरांच्या हिंदू महासभेचे हिंदुत्व हेही राजकीय हिंदुत्व होते. त्यांच्या हिंदुराष्ट्र मांडणीचा अर्थ एतद्देशीय म्हणजेच स्वदेशात निर्माण झालेल्या संस्कृतीच्या पायावर उभे असलेले राष्ट्र असा होता. परंतु त्या पक्षांच्या सर्वसामान्य सदस्यांच्या तोंडी जेव्हा हिंदुराष्ट्र हा शब्द येतो तेव्हा अनेकांच्या बोलण्यातून हिंदू धर्माचे राष्ट्र किंवा हिंदुधर्माच्या चालीरीतींना पुढावा देणारे राष्ट्र असा अर्थ ध्वनित होतो. स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लीम लीगला आणि स्वातंत्र्योत्तर काळात जमात- ए-इस्लामी, मुस्लीम लीग, M. I. M. इ. पक्षांना प्रतिक्रिया म्हणून आणि धर्मवेड्या किंवा अशिक्षित मुसलमानांच्या अनुनयाच्या काँग्रेस व अन्य पक्षांच्या धोरणाला प्रतिक्रिया म्हणून हे राजकीय हिंदुत्व आलेले आहे. परंतु भारतीय संस्कृती संमिश्र आहे की एकात्म, गतिशील आणि विजिगीषु आहे हे मानणाऱ्यांमध्ये खरा संघर्ष आहे.

ख्रिस्ती आणि मुस्लिम यांच्या धार्मिक आक्रमणांना तोंड देण्यासाठी विश्व हिंदु परिषद निर्माण झाली. धार्मिक सुधारणा आणि धर्माभिमान जागृत करणारे हिंदुत्व ती मांडते. धार्मिक रीतीरिवाजांमध्ये स्थळ-काळानुसार बदल करायला लागतात. याची पुरेशी दखल हे सांप्रदायिक (रिलीजिअस सेक्टेरिअन) हिंदुत्व घेत नाही.

महात्मा गांधी आणि विनोबाजी यांना आध्यात्मिक हिंदुत्वाची सखोल जाण होती. गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू म्हणावयाचे. वर्णाश्रमधर्म, रामनाम, गोमाता ही प्रतीके आणि आचार ते मानायचे. परंतु आध्यात्मिक मूल्यांच्या आधारावर म्हणजेच सर्व मानवांमध्ये एकच ईश्वरीतत्त्व आहे किंवा आत्मतत्त्व आहे, या श्रद्वेच्या बळावर ते समाजाला आणि राष्ट्राला हितकारक असे बदलही आचारधर्मामध्ये सुचवायचे. एकादश व्रते, रचनात्मक कार्यक्रम, सर्वोदय आणि स्वतः निर्मिलेल्या विधायक संघटनांच्या नियमांचे स्वयंस्फूर्त पालन यातून महात्मा गांधींनी आधुनिक भारतीय राष्ट्रीयत्वाचे निकषच मांडले. या आधुनिक राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेमध्ये समाजाच्या अर्थकारणाचा समावेश करण्याची जाण गांधीजींकडे होती. त्यांनी खादी ग्रामोद्योग, ग्रामस्वराज्य, विश्वस्त संकल्पना यांची गरज मांडली व प्रयोग केले. विनोबांनी त्यात भूदान, ग्रामदान व संपत्तीदानाच्या कल्पनांची भर घातली. हे गांधी-विनोबांचे आध्यात्मिक पायावर आधारित आर्थिक हिंदुत्व होते.

राजकीय हिंदुत्व मांडणाऱ्या पक्षांना काही सामाजिक सुधारणा करायला लागताच, धार्मिक हिंदुत्व मांडणाऱ्या विश्व हिंदू परिषदेला स्पृश्यास्पृश्य सर्व हिंदू ‘सहोदर’ म्हणजे बंधुत्वाचे नाते असणारे असा ठराव करणे आवश्यक वाटले. गांधी-विनोबांच्या आर्थिक सुधारणा समाज-सुधारणेसाठीच होत्या. आर्य समाजाने हिंदू हे नाव वापरण्याचे टाळले. परंतु हिंदू समाजातील स्त्रिया आणि अस्पृश्य यांच्यावर होणारा सामाजिक अन्याय लक्षात घेऊन त्यांनी तो दूर करण्याचा प्रयत्न केला. जातीप्रथाही त्यांनी नाकारली. सर्व जातींच्या स्त्री-पुरुषांना उपनयनाचा व वेदाध्ययनाचा अधिकार दिला. साप्ताहिक हवनाच्या रूपाने सामूहिक उपासना हिंदू समाजासाठी पुरस्कृत केली. हे सामाजिक हिंदुत्वच होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांस्कृतिक हिंदुत्वाला आवाहन केले. प्रातःस्मरणातून हिंदू संस्कृतीचा वारसा उज्ज्वल करणाऱ्यांची स्मरणसाखळी तयार केली. संघटित हिंदुत्वाचा आविष्कार केला. संघटितरित्या हिंदू संस्कृतीच्या अनेक अंगांबद्दलचा अभिमान जागृत केला. वनवासी, भटक्या जमाती, गिरीजन, कुष्ठरुग्ण यांच्यामध्येही आपण एकाच विशाल समाजाचे भाग आहोत व एकाच अध्यात्मप्रधान संस्कृतीचे वारस आहोत याची जाणीव निर्माण केली.

हिंदुत्वाच्या गाभ्याच्या आध्यात्मिक धारेपासून हे सर्व हिंदुत्व प्रकार कमी-अधिक अंतरावर उभे आहेत. स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद यांनी व्यक्तिकेंद्रित अध्यात्माला राष्ट्रकेंद्रित बनवण्याचा प्रयत्न केला. दयानंदांनी त्याला आर्य समाजाच्या रूपाने सामाजिक न्यायाची पार्श्वभूमी दिली. महात्मा गांधी व विनोबांनी या हिंदुत्वामध्ये आणखी लौकिक स्तरावरती त्यांच्या काळच्या कृषिप्रधान संस्कृतीला अनुरूप असा आर्थिक आशय भरायचा प्रयत्न केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या हिंदुत्वाला संघटनात्मक व सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचे रूप दिले. विश्व हिंदू परिषद आणि भा. ज. प. हे अधिक लौकिक अशा सांप्रदायिक (रिलीजिअस सेक्टेरिअन) धार्मिक व राजकीय पातळीवर प्रतिक्रियात्मक आणि प्रतिसादात्मक हिंदुत्व मांडत आहेत. या सर्वांच्याच रूपाची सविस्तर चिकित्सा करणे या लेखात शक्य होणार नाही. योगी अरविंदांनी वैचारिक पातळीवर आणि स्वामी विवेकानंदांनी कार्यदिशांचे दिग्दर्शन करून वरील सर्व छटांची शक्तिस्थाने एकत्र मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांचे अनुसरण करायचा प्रयत्न प्रबोधिनी करत आहे.

प्रबोधिनीला अभिप्रेत असलेले हिंदुत्व

प्रबोधिनीचे आद्य संचालक डॉ. आप्पा पेंडसे यांनी ‘विवेकानंदांचा राष्ट्रधर्म’ या पुस्तकात अशी मांडणी केली आहे की १) आपल्या लौकिक जीवनाची समृद्धी आणि उन्नती व २) आपल्या आत्मस्वरूपाची ओळख आणि तोच आत्मा सर्वत्र नटलेला आहे याची जाण, याची हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्म (भारतीय आध्यात्मिक जीवनपद्धती) अशी दोन अंगे आहेत. आत्मस्वरूपाची ओळख करून घेणे हे ध्येय समोर ठेवून चाललेले समाजाच्या भौतिक व नैतिक समृद्धीसाठीचे प्रयत्न म्हणजे हिंदू संस्कृती. समाजाच्या भौतिक व नैतिक समृद्धीचा पाया अत्यावश्यक मानून व्यक्तिशः आत्मस्वरूपाची ओळख पटावी यासाठी प्रयत्न करायला सांगतो तो हिंदू धर्म (भारतीय आध्यात्मिक जीवनपद्धती). वेदकालापासून आजपर्यंत या दोन्ही अंगांचा परिपोष करणारे वीर स्त्री-पुरुष आणि आत्मज्ञानी संत स्त्री-पुरुष यांची एक महान परंपरा हिंदू राष्ट्राला लाभली आहे. हिंदू राष्ट्राचा हा वारसा म्हणजे हिंदुत्व. हा वारसा कालोचित रीतीने पुढे नेणे हे हिंदुराष्ट्राचे जीवित कार्य. यालाच प्रबोधिनीच्या प्रार्थनेत आपले राष्ट्र अखंड, अजिंक्य आणि विश्वविजयी करायचे आहे असे म्हटले आहे.

अध्यात्मप्रधान हिंदुत्व आणि विज्ञानावर आधारित व्यवहार यांची सांगड प्रबोधिनीला घालायची आहे. पण अशी सांगड घालण्याचे प्रयत्न पुरेसे नाहीत. विवेकानंद, अरविंद आणि दयानंद यांचे तात्त्विक विचार शाश्वत असतील. परंतु त्यांनी सुचवलेले कार्यक्रमही कालानुरूप करून घ्यायला लागतील. गांधी विनोबांचे अर्थकारण कृषिप्रधान भारत डोळ्यासमोर ठेऊन मांडलेले आहे. यंत्रयुगात गेलेल्या, माहितीयुगात जाणाऱ्या जैव तंत्रज्ञानयुगात जाऊ इच्छिणाऱ्या भारतासाठी नवे अर्थकारण मांडायला लागेल. सांस्कृतिक हिंदुत्वामध्ये विज्ञानाच्या बरोबर प्रतिभेला आणि समाजाच्या संघटनाबरोबर समाजातील नेतृत्वविकसनालाही प्रयत्नपूर्वक पुढावा द्यायला लागेल. हे सगळे करण्यासाठी विचारप्रबोधन व कार्यप्रबोधन अनेकांनी केले आहे व आजही करत आहेत. देशाचे भौतिक रूप पालटण्याचे कामही अनेकांनी केले आहे व आजही करत आहेत. युरोपात भारताच्या तीन शतके आधी पुनर्जागरणाचे (रेनेसान्सचे) आणि नवचैतन्य-निर्माणाचे (enlightenment) युग येऊन गेले. हे सगळे तिथे सोळाव्या ते अठराव्या शतकात झाले. भारतात २१व्या शतकात कुठल्या स्वरूपातले पुनर्जागरण (रेनेसान्स) आणि कुठल्या स्वरूपाचे नवचैतन्यनिर्माण (enlightenment) होण्याची गरज आहे? हा खरंतर अनेक संघटनांनी प्रयोग करत शोधण्याचा विषय आहे. ज्ञान प्रबोधिनीला अभिप्रेत असलेलं हिंदुत्व असे अध्यात्मप्रधान, समग्र, विकसनशील आणि प्रयोगाधारित आहे. ज्ञान प्रबोधिनी त्याच हेतूने मनुष्यघडणीच्या शिक्षणाद्वारे राष्ट्रघडणीचा प्रयोग करत आहे. 

साने गुरुजींचे एक गीत पसायदानासारखेच आहे. महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना त्याची एक ओळ ऐकली की पुढच्या ओळी आठवू लागतात. त्यात म्हटले आहे – 

बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो ।।धृ।।

ही माय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल

जगतास शांति देईल

तो सोन्याचा दिन येवो ।।

तो सोन्याचा दिवस येण्यासाठी राष्ट्र उभारणीचे समान ध्येय असणाऱ्या ज्ञान प्रबोधिनीसह देशातल्या अनेक आणि विविध विचारसरणी मानणाऱ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांना सामूहिक आणि पसस्पर समन्वय करत ‘तप’ करावे लागणार आहे. “भाग्यासी काय उणे? वीर-तत्त्वज्ञ कार्यकर्त्यांवाचून राहिले” असे कै. आप्पा पेंडसे म्हणत असत. ती वीर-तत्त्वज्ञ कार्यक्त्यांची परंपरा येणाऱ्या अनेक दशकांमध्ये वाढती राहिली तर हिंदू, हिंदुत्व, हिंदू संस्कृती, हिंदू राष्ट्र या शब्दांना गौरव प्राप्त होणार आहे.

तो सोन्याचा दिन येवो !