द्वितीय प्रतिज्ञेमध्ये राष्ट्रसेवा आणि धर्मसंस्थापना या ध्येयांसाठी संघटनेचा घटक म्हणून आयुष्यभर काम करण्याचा संकल्प करायचा असतो. असे काम करायचे झाले तर दिवसाचे काही तास या ध्येयासाठी काम करायचे आणि इतर सर्व वेळ आपल्या आवडी-निवडीनुसार कौटुंबिक आणि व्यक्तिगत जीवनात घालवायचा असे करून चालत नाही. संघटनेतील जीवन दिवसाच्या काही तासांचे असू शकेल. संघटनेतील काम आणि आपले उदरनिर्वाहाचे काम यातून आणखी काही तास राष्ट्रसेवा होऊ शकेल. पण धर्मसंस्थापनेसाठी काम म्हणजे व्यक्तिगत, कौटुंबिक, व्यावसायिक, संघटनेतील आणि त्याशिवायचे सार्वजनिक असे आपले सर्वच जीवन व्यापणारे होते. त्यासाठी शाश्वत तत्त्वांना अनुकूल अशी आपली सगळी जीवनशैली बनवावी लागते.
विशेष प्रबोधिनीपणामध्ये ज्या पाच अभिमुखता सांगितल्या आहेत त्यातून अशी जीवनशैली बनायला सुरुवात होते. स्वतःचा विकास की कार्याचा विकास ? असा प्रश्न पडल्यावर कार्याच्या विकासाला आपल्याला प्राधान्य द्यावेसे वाटले की आपण संघटनाभिमुख झालो. संघटना करायची ती समाजात बदल घडवण्यासाठी. समाजातील आवाज मोठा असणाऱ्या व्यक्ती किंवा गटांच्या मागण्यांसाठी काम करायचंय की समाजातील मूक गटांच्या गरजांसाठी काम करायचंय? असा प्रश्न पडल्यावर मूक गटांच्या गरजांना प्राधान्य द्यावेसे वाटले की
आपण समाजाभिमुख झालो.
समाजातल्या व्यक्तींच्या रोजच्या गरजा अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या असतात. आपत्कालीन गरजा, आरोग्य आणि सुरक्षिततेच्या असतात. दीर्घकालीन गरजा शिक्षणाच्या आणि उपजीविकेच्या असतात. आणि त्या पलीकडच्या गरजा मानसिक शांती, समाधान, आनंदाच्या असतात. फक्त तत्कालीन, आपत्कालीन किंवा दीर्घकालीन गरजा पूर्ण करणे हे आपले काम आहे की त्याबरोबर लोकांची शाश्वत शांती, समाधान, आनंदाची गरज देखील पूर्ण करण्याचे आहे? असा प्रश्न पडल्यावर तात्पुरत्या गरजांपासून शाश्वत गरजांपर्यंत सर्व गरजा पूर्ण करणे हे आपले काम आहे असे वाटू लागले की आपण उपासनाभिमुख झालो.
आपण नेहमीच लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम करायचं की लोकांना आपल्या गरजा पूर्ण करण्याची शक्ती मिळवून द्यायची? असा प्रश्न पडल्यावर लोकांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वावलंबी बनवणे हे आपण प्राधान्याने केले पाहिजे असे वाटू लागले की आपण भविष्याभिमुख झालो. या चार अभिमुखता आपल्यामध्ये आल्यानंतर आपली जीवनशैली राष्ट्रयोगाचे आचरण करायला अनूकुल झाली असे म्हणता येईल. ‘योगः कर्मसु कौशलम् अशी योगाची एक व्याख्या आहे. राष्ट्रयोग आचरताना तो अधिकाधिक उत्तम व्हावा यासाठी सतत आपल्या कामाची प्रत सुधारत नेण्यासाठी वैज्ञानिक वृत्तीची आवश्यकता असते. प्रत्येक बदलामधला कार्यकारण संबंध शोधून, कारणावर जास्तीत जास्ती नियंत्रण आणायचा प्रयत्न केला पाहिजे, असे आपल्याला वाटू लागले म्हणजे आपण विज्ञानाभिमुख झालो.
आजपर्यंत दिलीय प्रतिजेसंबंधी विशेष प्रबोधिनीपणाची लक्षणे मांडन त्याला अनुकूल जीवनशैली आवश्यक आहे एवढीच मांडणी केली होती. धर्मसंस्थापनेसाठी आपण उपासनाभिमुख होणे अतिशय आवश्यक आहे. राष्ट्रसेवेसाठी आपण समाजाभिमुख आणि भविष्याभिमुख होणे ही प्राथमिक अट आहे. संघटनेचा कार्यक्षम घटक होण्यासाठी आपण संघटनाभिमुख आणि विज्ञानाभिमुख झाले पहिजे. प्रतिज्ञेतील उद्दिष्टे आणि अभिमुखतांची अशी सांगड घातली तरी ती केवळ विचाराच्या स्तरावर झाली. त्यासाठी आपली जीवनशैली घडवणारा दिनक्रम कसा असावा हे ठरवण्याचा विचार सुरू केला तर त्याच्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाच्या पंचकोशाधारित विकासाचा विचार लक्षात घ्यावा लागतो. संघटना या उद्दिष्टासाठी उदाहरणार्थ —
१. अनेक प्रकारची शारीरिक ताकद असावी लागते. दीर्घकालासाठी शरीरशक्ती सदैव ताजी असणे ही आवश्यक असते. (अन्नमय कोश)
२. संवाद, गटबांधणी, वक्तृत्व, इ. विविध प्रकारची संघटन कौशल्ये वापरावी लागतात. (प्राणमय कोश)
३. संघटनेची बांधणी होण्यासाठी गटातील सदस्यांविषयी आपलेपणा, ऐकून घेता येणे, इ. अनेक प्रकारची भावनिक, मानसिक क्षमता असावी लागते. (मनोमय कोश)
४. संघटना का बांधायची हे समजणे तितकेच महत्त्वाचे. त्यामुळे संघटनेच्या उद्दिष्टांचा, कार्यपद्धतींचा विचार करता येणे, तो विचार नेमकेपणाने मांडता येणे, आवश्यक तर नव्या कार्यपद्धती निर्माण करता येणे, गटातील प्रश्न सोडविता येणे, इ. साठी बुद्धीचे विविध पैलू वापरावे लागतात. (विज्ञानमय कोश)
नित्य दिनक्रमाच्या आचरणातून मिळत जाणारे सामर्थ्य हे केवळ साठवून ठेवायचे सामर्थ्य नाही. हळूहळू ते सामर्थ्य योग्य ठिकाणी वापरण्याची बुद्धी तयार होत जाते. व्यक्तिमत्त्वाचा विकास कशासाठी करायचा हे समजत जायचे, हा विचार अधिक पक्का होण्यासाठी विविध प्रकारे विचार करण्याची, अनुभव घेऊन बघण्याची तयारी होत जाणे हे विज्ञानमय कोशाचे विकसन आहे.
५. गटातील सर्व सदस्य हे आहेत तिथून वरच्या पातळीवर गेले पाहिजेत, ते केवळ संघटनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे एक साधन आहेत असा विचार न करता त्यांच्याकडे परमेश्वरी शक्तीची रूपे आहेत असा दृष्टिकोन तयार होत जाणे ही एक प्रकारची ताकद आहे. प्रसंगी संघटनेतील सदस्यांच्या सुप्त रुपात असलेल्या शक्तीवर साठलेल्या धुळीवर फुंकर घालण्याचे काम करायचे, म्हणजे नेतृत्व करायचे आहे असे प्रत्यक्ष उमजण्याची ताकद निर्माण व्हावी लागेल. (आनंदमय कोश)
अशा विचारातून तयार होत गेलेले आचरण हे मानवी जीवनातील आध्यात्मिकतेच्या पायाची जाणीव स्पष्ट जाते. त्यातून माणसाला सृष्टीविषयी अधिक व्यापक दृष्टिकोन मिळतो. असा दृष्टिकोन घडत जाणे हेच आनंदमय कोशाचे विकसन असते.
राष्ट्रसेवा आणि धर्मसंस्थापना या उद्दिष्टांचा असाच पाच प्रकारे विचार करता येईल. असे केल्याने व्यक्तिविकास हा कार्यविकासासाठी करायचा विचार पक्का होत जाईल. द्वितीय प्रतिज्ञा घेतलेल्या सदस्यांनी वरील उद्दिष्टासाठी मी रोज काय केले पाहिजे असा विचार करून व्यक्तिगत कार्यसंकल्पात त्याप्रमाणे संकल्प करत जाणे अधिक उपयुक्त ठरेल. त्यातून आचरण काय करावे असा विचार सुचत जाईल. या सगळ्या प्रक्रिया एकामागे एक अशा घडत नसून एकाच वेळी कमी अधिक तीव्रतेने घडत असतात. त्यामुळे सर्व कोशांच्या विकसनाची साधना कायमच चालू ठेवावी लागेल. त्यासाठी नियमित दिनक्रमाचा आग्रह, आचरणशक्तीचे महत्त्व आपल्या आयुष्यात अधोरेखित केले पाहिजे.