७. प्रथम ते द्वितीय प्रतिज्ञेचा प्रवास

प्रथम प्रतिज्ञेनंतर द्वितीय प्रतिज्ञेची आवश्यकता का आहे?

प्रथम प्रतिज्ञा आजीवन राष्ट्रसेवा करण्याची आहे. राष्ट्रसेवा कशी करायची याचा निश्चय त्यात नाही. राष्ट्रसेवेचे अनेक मार्ग आहेत. ते हळूहळू कळत जातात. त्यात आपल्या स्वभावाला अनुकूल असा मार्ग त्यानंतर लक्षात येतो. काही जणांना आपले कार्यक्षेत्र सापडते. कार्यक्षेत्र सापडले तरी त्यात काम करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक व्यक्तिशः काम करण्याची आणि दुसरी संघटनेचा घटक म्हणून काम करण्याची. कार्यक्षेत्र सापडले किंवा अजून सापडले नसले तरी एकट्याने काम करायचे की संघटनेत राहून काम करायचे हे ठरवावे लागते.

प्रबोधिनीची भूमिका संघटनेत राहून काम करणे जास्त उपयुक्त अशी आहे. ज्यांना ही भूमिका योग्य वाटेल त्यांनी कोणत्या तरी संघटनेचा घटक होण्याचे ठरवावे लागेल. प्रबोधिनीचा राष्ट्रसेवेचा मार्ग ज्यांना समजला आहे किंवा जिथे आपण राष्ट्रसेवेची प्रथम प्रतिज्ञा घेतली त्याच संघटनेत राहून आपण काम करावे असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी द्वितीय प्रतिज्ञेची योजना केली आहे.

प्रबोधिनीत औपचारिक नियुक्ती होऊन काम करणाऱ्यांनी द्वितीय प्रतिज्ञा घ्यावी का?

औपचारिक नियुक्ती होऊन काम करणाऱ्यांनाही नियुक्त कामाच्या वर्णनापलीकडे आणि त्याच्या निरपेक्ष प्रबोधिनीशी आपले कसे नाते असावे हे ठरविण्यासाठी द्वितीय प्रतिज्ञेचा उपयोग होऊ शकेल. तिचे पालन सेवामुक्तीनंतर / निवृत्तीनंतरही करायचे आहे.

जे दैनंदिन काम करू शकत नाहीत त्यांनी द्वितीय प्रतिज्ञा घ्यावी का?

द्वितीय प्रतिज्ञा हा एका अर्थी सलोकतेकडून समीपतेकडे प्रवास आहे. सध्या करतो त्यापेक्षा अधिक काम करायचे ठरवून प्रतिज्ञा घ्यावी. किंवा प्रतिज्ञा घेतली म्हणून प्रयत्नपूर्वक अधिक काम करायला लागावे.

भौगोलिक अंतर किंवा कामाच्या प्रकारातले अंतर वाढू नये म्हणून, आणि ‘माझ्या क्षमतेप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे काम करता येत नाही’, असे म्हणायची परिस्थिती येऊ नये म्हणून आपले जीवन प्रबोधिनीला अनुकूल बनविण्याचे ठरविण्यासाठी द्वितीय प्रतिज्ञा घ्यायची आहे. प्रबोधिनी आणि आपण यातले द्वैत कमी करण्यासाठी द्वितीय प्रतिज्ञा घ्यायची आहे. प्रबोधिनीशी कोणत्याही प्रकारे सुरू झालेले नाते आयुष्यभराचे व्हावे यासाठी द्वितीय प्रतिज्ञा घ्यायची आहे.

आपल्याला जे जे करावेसे वाटते ते प्रबोधिनी द्वारेच करावे व प्रबोधिनी जे जे करते तेच आपल्याला करावेसे वाटणे अशी स्थिती यावी म्हणून द्वितीय प्रतिज्ञा घ्यायची आहे.

द्वितीय प्रतिज्ञा घेऊन त्याप्रमाणे कृती करता आली नाही तर काय करायचे ?

प्रतिज्ञा घेताना याचा विचार करू नये. आज करतो त्यापेक्षा अधिक चांगले काम करता येण्यासाठी प्रतिज्ञा घ्यायची आहे. हे स्वतः स्वीकारलेले बंधन असल्याने पुढे काही प्रसंग आलाच तर तृतीय/चतुर्थ प्रतिज्ञित ज्येष्ठ सदस्यांशी बोलून कामाचे किंवा सहभागाचे स्वरूप ठरवावे.

द्वितीय प्रतिज्ञेच्या आधी पूर्वतयारी काय करावी?

प्रथम प्रतिज्ञेनंतर किमान एक वर्षाच्या अंतराने द्वितीय प्रतिज्ञेचा विचार करावा. द्वितीय प्रतिज्ञेचा संकल्प करण्यापूर्वी काही वाचन ठरवून करावे. सामान्य आणि विशेष प्रबोधिनीपण आपल्यात किती उतरले आहे? आणखी किती उतरायला हवे? याचा आढावा घ्यावा. त्यापैकी एखादी गोष्ट आचरणात आणण्याचा महिना-दोन महिने प्रयत्न करावा. संकल्प-पत्र लिहून प्रतिज्ञा देणार्यांरशी किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी त्यावर चर्चा करावी. प्रतिज्ञेनुसार बाकीचे सर्व आचरण प्रतिज्ञा घेतल्यानंतरच सुरू करायचे आहे.

*****

प्रबोधिनीचा राष्ट्रसेवेचा आणि धर्मसंस्थापनेचा मार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे हे कसे ठरवायचे?

कोणतेही काम यशस्वीपणे पूर्ण करताना धरसोड वृत्ती चालत नाही. त्या कामाचे उद्दिष्ट, कार्यपद्धती आणि कामाची साधने याबाबतीत व ते काम पूर्ण होईपर्यंत अनन्यता या शिवाय दुसरे नाही अशी वृत्ती – लागते. त्या करिता जगाच्या दृष्टीने हा मार्ग कसा आहे याचा विचार न करता माझ्या दृष्टीने हा मार्ग सर्वश्रेष्ठ आहे असे ठरवावे लागते. एकदा आपण संघटनेचा मार्ग सर्वश्रेष्ठ म्हणून स्वीकारला व आपण त्याचे प्रतिज्ञित घटक झालो की तो आपला मार्ग होतो. आपला मार्ग आपण कधीही अधिक चांगला करू शकतो. माझा मार्ग माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे अशी प्रतिज्ञा करायची आहे. इतरांचे मार्ग कसे आहेत याबाबत काही म्हणायचे नाही. त्यांचा मार्ग त्यांच्यासाठी सर्वश्रेष्ठ असूही शकेल. स्वतःचा निश्चय आणि निष्ठा बळकट करण्यासाठी प्रतिज्ञा घ्यायची असते. इतरांना दाखविण्यासाठी किंवा शिकविण्यासाठी नाही.