१७ : इंग्रजीशिवाय अन्य परदेशी भाषा शिकण्या-शिकवण्याबाबत प्रबोधिनीची भूमिका काय आहे ?
उत्तर :- कोणतीही नवीन भाषा शिकली की ती भाषा बोलणाऱ्यांशी संवाद करता येतो. संघटनेमध्ये अधिकाधिक लोकांशी संवाद करायचा असतो. त्यामुळे नवीन भाषा येणे उपयुक्तच आहे. प्रबोधिनीचे एक खूप जुने माहिती-पत्रक फ्रेंच व जर्मन भाषांमध्ये छापलेले आहे. व्यक्तिशः कोणी परदेशी भाषा शिकत असेल तर त्यांचे स्वागतच केले पाहिजे. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी संत्रिकेत तिबेटी भाषेचे वर्ग चालवण्याचा प्रयत्न झाला होता. नवनगर विद्यालयात पूर्वप्राथमिक विभागात जर्मन संभाषण शिकवण्याचा प्रयोग चालू आहे. सोलापूरलाही जर्मन भाषेचे काही वर्ग झाले. पुण्यात इ. ११, १२ वीचे वर्ग चालू होते तेव्हा तिथेही जर्मन भाषा शिकवण्याची सोय केली होती. परदेशी भाषा शिकल्याने वेगळ्या संस्कृतीचा परिचय होऊ शकतो. समग्रतेच्या दिशेने एक पाऊल पुढे पडते. अन्य उद्दिष्टांना बाधा येणार नसेल तर प्रबोधिनीच्या केंद्रांवरही संख्या-शुल्क-मानधन-वेळापत्रक इ. व्यावहारिक गोष्टी पाहून परदेशी भाषा शिकवण्याची सोय जरूर करावी. मात्र त्या सर्व वर्गांना येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रबोधिनीपण शिकवण्याची व्यवस्था त्याबरोबर अवश्य करावी.