प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक १५

१५ :प्रबोधिनीचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इतर संस्था किंवा सरकारचे साहाय्य घ्यावे का ?

उत्तर :- सर्व परवाच एक जुने टिपण मला सापडले. ‘बऱ्याच वेळा मोह कर्तव्याचे रूप घेऊन येतो. त्यापासून सावध राहिले पाहिजे.’ अशा स्वरूपाचे वाक्य त्यात होते. संदर्भ वेगळा होता. पण या प्रश्नाला ते बरोबर लागू पडते. कार्यक्रम यशस्वी करणे म्हणजे काय ? कार्यक्रम योजताना आपल्या मनात काय उद्दिष्ट होते? बऱ्याच वेळा आपल्याला कार्यक्रम आधी सुचतो. मग आपण त्यासाठी उद्दिष्ट शोधतो. अशा वेळी कार्यक्रमाची भव्यता, व्याप्ती, उपस्थितांची संख्या, प्रसिद्धी यापैकी काहीही वाढण्यासाठी इतर बिनसरकारी, निमसरकारी किंवा सरकारी संस्थांचे साहाय्य होईल असे वाटले की ते घेण्याचा आपल्याला मोह होतो. मग ते घेणे आपले कर्तव्यच आहे असे वाटायला लागते. जो कार्यक्रम संघटना वाढण्यासाठी, कार्यकर्ते वाढण्यासाठी तेच उद्दिष्ट समोर ठेवून योजला आहे तो स्व-सामर्थ्याने, स्व-बळावर, स्वावलंबनानेच करावा.