प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक ३

३ : ज्ञान प्रबोधिनीचे वर्णन सामाजिक संघटना म्हणून करावे की शैक्षणिक संस्था म्हणून करावे ?

उत्तर :- आपल्या मनात आपले उद्दिष्ट स्पष्ट राहावे या साठी प्रबोधिनीचे वर्णन सामाजिक संघटना म्हणूनच करावे असे मला अलीकडे जास्त तीव्रतेने वाटते आहे. एखाद्या समविचारी गटाने केवळ आपल्या उमेदीच्या काळात सामाजिक कार्य करणे पुरेसे नाही. सामाजिक कार्याचा वसा त्या गटाने कार्यकर्त्यांच्या पुढच्या फळीकडे किंवा पिढीकडे हस्तांतरित केला तर त्या गटाचे सामाजिक कार्य सातत्याने चालू राहील. सामाजिक जाणिवेचे कार्यकर्ते समाजात सहजपणे आढळत नाहीत. म्हणून असे कार्यकर्ते घडवले पाहिजेत असे प्रबोधिनीच्या संस्थापकांनी ठरवले. कार्यकर्ते -घडण हा सामाजिक कार्याचाच भाग आहे असे प्रबोधिनी मानते. कार्यकर्ते घडण्यासाठी समाजातील व्यक्तींचे औपचारिक, अनौपचारिक, अनुभवातून आणि परस्पर-व्यवहारातून शिक्षण करावे लागते. ‘रूप पालटू देशाचे’ ही आधी समाजाची जबाबदारी आहे, नंतर शासनाचे काम आहे. प्रबोधिनीचे ध्येय ‘रूप पालटू देशाचे’ हेच असल्याने प्रबोधिनी एक सामाजिक संघटना आहे. आपल्या सामाजिक कार्याचा भाग म्हणून ‘कार्यकर्ते-घडणीसाठी सर्व प्रकारचे शिक्षण देणारी सामाजिक संघटना’ असेच प्रबोधिनीचे वर्णन केले पाहिजे.