प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक ६

६ : प्रबोधिनीने India मधल्या लोकांसाठी काम करावे की भारतातल्या लोकांसाठी काम करावे ?

उत्तर :- शेतकरी संघटनेचे संस्थापक श्री. शरद जोशी यांनी शेतकऱ्यांना शेतीतील उत्पादनाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी जी आंदोलने केली त्या काळातील प्रचारामध्ये त्यांनी आपल्या देशाची India व भारत अशा दोन भागांमध्ये विभागणी केली. India म्हणजे शहरात राहणारे लोक व भारत म्हणजे खेडेगावांमध्ये राहणारे लोक. प्रचारासाठी वापरलेली शब्दयोजना चटपटीत, लक्षवेधक व सहज लक्षात राहणारी असते. त्यांच्या चटपटीतपणामुळे हे शब्द अनेकांच्या लक्षात राहिले.

जात/प्रांत/भाषा/लिंग/प्रादेशिकता या भेदांवर भर दिला तर राष्ट्रीय ऐक्याला तडे जातात. शहरे-खेडी किंवा India – भारत ही शब्द योजना देखील भेदांवर भर देणारी आहे. प्रबोधिनीच्या सदस्यांनी या भाषेत विचार करू नये. निदान प्रबोधिनीची भूमिका या भाषेत मांडू नये असे मला वाटते. या बाबतीत तरी भारताच्या राज्यघटनेतील India that is Bharat या शब्दयोजनेला आपण चिकटून राहावे.

शहरांतील लोकांसाठी त्यांच्या सह त्यांच्या प्रश्नांवर प्रबोधिनीने काम केले पाहिजे. गावांतील लोकांसाठी त्यांच्या सह त्यांच्या प्रश्नांवर प्रबोधिनीने काम केले पाहिजे. दोन्ही ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या प्रश्नांवर काम करता करता एकत्रितपणे राष्ट्रघडणीचे काम करणाऱ्या सदस्यांची एकजीव संघटना आपल्याला निर्माण करायची आहे