७ : महत्त्वाच्या निवडणुकांच्या वेळी तरी प्रबोधिनीने राजकारणाबाबत काही निश्चित भूमिका मांडायला नको का ?
उत्तर :- : प्रत्येक निवडणूक त्या त्या वेळी महत्त्वाचीच वाटते. या निवडणुकीत (लोकसभा २०१४) केंद्र सरकारमध्ये सत्ताधारी पक्ष बदलावा किंवा बदलणार आहे अशी अनेकांची अपेक्षा आहे. मतदानाचा अधिकार असलेल्या व्यक्तींना, राजकीय पक्षांना किंवा निवडणुकांबाबत समाजप्रबोधन करणाऱ्या संस्था/संघटनांना या निवडणुकीबाबत काही निश्चित भूमिका घ्यावी लागेल. नोंदणीकृत सार्वजनिक संस्था म्हणून प्रबोधिनीला आपल्या संस्था-स्थापना-लेखातील उद्दिष्टांनुसार काम करावे लागते. त्या उद्दिष्टांमध्ये राजकारण किंवा निवडणुका हे उद्दिष्ट नाही. त्यामुळे संस्था म्हणून प्रबोधिनीने राजकारणाबाबत निश्चित भूमिका घेणे किंवा मांडणे अपेक्षित नाही.
देशाचा कायापालट करण्याचे समान ध्येय असलेल्या, त्यासाठी देशस्थितीचा अभ्यास करणाऱ्या कार्यकर्त्यांची संघटना म्हणून, प्रबोधिनीची भूमिका डोळसपणे घटनांचा वेध घेत राहण्याची आहे. त्या साठी काही जण निवडणूकपूर्व वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी दौरा आखू शकतील. काही जण विविध पक्षांच्या प्रचारतंत्रांची व निवडणूक व्यवस्थापनाची ओळख करून घेण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांसाठी नित्य कामातून रजा घेऊन व्यक्तिशः तात्पुरते काम ही करू शकतील.
सत्तेसाठी निवडणुकांच्या राजकारणातून समाजमन तात्पुरते बदलते, मुळापासून बदलत नाही असा अनुभव आहे. प्रबोधिनीचे काम समाजमन मुळापासून बदलण्याचे आहे. त्यालाच आपण देशकारण म्हणतो. देशकारण करणे हीच प्रबोधिनीची संघटना म्हणून निश्चित भूमिका आहे. निवडणुकांचे राजकारण म्हणजे फळधारणा होण्यापूर्वीच फुले तोडण्यासारखे आहे. देशकारण म्हणजे मुळाशी खत, पाणी देऊन फळे येण्यासाठी पाच-पाच वर्षांनी येणाऱ्या काही निवडणुका पुरत नाहीत, तर काही पिढया वाट पाहावी लागते.