८ : संघटनेला राजकारण नेहमीच वर्ज्य असते का ?
उत्तर :- : संघटनेचे ध्येय काय आहे यावर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे. राजकीय पक्ष म्हणजे सुद्धा एक संघटनाच आहे. अशा संघटनेचा प्राणच राजकारणात आहे. अनेक ज्ञाति-संघटना, विशिष्ट भाषिकांच्या संघटना, व्यावसायिकांच्या संघटना आपापल्या सदस्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याचे काम करतात. हितसंबंधांना धक्का बसत असेल किंवा हितसंबंधांना बळकटी येणार असेल तर अशा संघटनाही राजकारणाचा आधार घेतात. विस्कळीत समाजाचे रूपांतर संघटित समाजात म्हणजेच राष्ट्रामध्ये करू इच्छिणाऱ्या संघटनेचे उद्दिष्ट राष्ट्रकारण (म्हणजे राष्ट्र घडवणे) हे असते. राजकारण हा समाजजीवनाचा फक्त एक हिस्सा आहे. राजकीय मते, राजकीय भूमिका, राजकारणाच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी या सर्व राजकारण्यांच्यामध्ये राष्ट्रनिष्ठा व राष्ट्रीय चारित्र्य वाढवणे म्हणजे राष्ट्रकारण करणे. त्यामुळे राष्ट्रकारण हे उद्दिष्ट असलेल्या संघटनेला राजकारण करणे म्हणजे विशिष्ट राजकीय मत, भूमिका व राजकारणाची पद्धत स्वीकारणे हे वर्ज्य मानावे लागते. कारण तसे मानले नाही तर तुम्ही समाजाच्या एकाच राजकीय गटाशी जोडले जाता व त्यामुळे इतर राजकीय गटांमधील लोकांना संघटित करणे अवघड जाते. प्रबोधिनीला राष्ट्रकारण करायचे असल्यामुळे सत्तेसाठी पक्षीय / अपक्षीय राजकारण प्रबोधिनीला वर्ज्य आहे.