९ : उत्तमता व कामाच्या ठिकाणची परिस्थिती यांचा मेळ कसा घालावा ?
उत्तर :- जमशेदपूरला टाटा स्टीलचा कारखाना सुरू झाला तेव्हा आजूबाजूच्या वनवासींची परिस्थिती पालटेल असे अनेकांना वाटले होते. प्रत्यक्षात कारखान्यातील उत्पादकता आणि तेथील पोलादाची गुणवत्ता टिकवण्यासाठी बहुसंख्य कामगार व अधिकारी बाहेरून आणायला लागले. झारखंडच्या जंगलात उत्तमतेचे बेट तयार झाले. परंतु ऐंशी वर्षे झाली तरी वनवासी तसेच राहिले.
प्रबोधिनीने शिवापूरला यंत्रशाळा सुरू केली. तिथे २५ गावातले तरुण कामाला आले. त्यातल्या २० जणांनी स्वतःचे लघु उद्योग सुरू केले. तेथील सदस्यांची पतसंस्था आजूबाजूच्या गावांना आदर्श झाली. यंत्रशाळेतील अनेक उपक्रमांमुळे कामाच्या ठिकाणची व भवतालची परिस्थिती पालटली. परंतु यंत्रशाळेची उत्पादनक्षमता व उत्पादनाच्या गुणवत्तेचे प्रश्न निर्माण झाले. यंत्रशाळा बंद करावी लागली.
आणंदला अमूल डेअरीला उत्पादनक्षमता, उत्पादनाची गुणवत्ता आणि कामाच्या ठिकाणच्या व भवतालच्या परिस्थितीचा टवटवीतपणा दोन्ही सांभाळता व वाढवता आले. दोन्हीचा मेळ घालण्यासाठी ‘हे शक्य आहे’, यावर प्रथम विश्वास हवा. उत्तमतेचे बेट बनायचे नसेल तर सामाजिक नातेसंबंध जोपासायला हवेत. ते ज्या प्रमाणात बळकट होतील त्या प्रमाणातच कामातील उत्तमता वाढवत गेले पाहिजे. आजूबाजूच्या लोकांची फिकीर न करता केवळ कामाची उत्तमता वाढावी असे निदान प्रबोधिनीत तरी नको.