प्रबोधिनीचे अंतिम ध्येय म्हणून धर्मसंस्थापना हा शब्द प्रबोधिनीचे पहिले वैचारिक मूलतत्त्व म्हणून तत्व स तप्त लेखामध्ये मांडले आहे. धर्मसंस्थापना हा शब्द सर्व प्रथम भगवद्गीतेमध्ये आलेला आहे. त्यामुळे तो प्रबोधिनीला प्रिय आहे. आधुनिक काळात धर्म या शब्दाचे भाषांतर religion आणि religion या शब्दाचे भाषांतर धर्म असे व्यवहारात रूढ झाले आहे. त्यामुळे धर्मसंस्थापना असे म्हणल्यावर कोणत्या धर्माची संस्थापना किंवा कोणत्या religion ची संस्थापना प्रबोधिनीला करायची आहे असे वरवरचे विचार करणाऱ्यांना वाटते. धर्म या शब्दाचा मूळ अर्थ समजावून सांगितला तर धर्म म्हणजे religion नाही हे समजून घेण्याची इच्छा असणाऱ्याला समजू शकते. परंतु बाहेरील व्यावहारिक, राजकीय आणि प्रसार माध्यमांमधील चर्चेमुळे अनेकांचे समजल्याचे समाधान थोडा काळच टिकते. पुन्हा त्यांच्या मनात वैचारिक गोंधळ निर्माण होतो. यावर उपाय म्हणून प्रबोधिनीच्या संस्थापकांनी धर्मसंस्थापना हा शब्द प्रिय असला तरी त्या ऐवजी समाजसंस्थापना या शब्दाचा वापर अधिक श्रेयस्कर होईल असा विचार केला. सध्या प्रबोधिनीमध्ये अनेक सदस्य बाहेरील वातावरणामुळे धर्मसंस्थापना हा शब्द वापरायला कचरतात. आणि समाजसंस्थापना म्हणजे काय हे स्पष्ट न झाल्यामुळे त्या शब्दाचा वापर अजून रूळलेला नाही.
भगवद्गीतेमध्ये पाहिले तर धर्मसंस्थापना म्हणजेच समाजसंस्थापना. आणि धर्मसंस्थापना म्हणजे कोणत्याही religion ची संस्थापना नाही हे कळू शकते त्यासाठी भगवद्गीतेतील चौथ्या अध्यायातील आठव्या श्लोकापासून पंधराव्या श्लोकापर्यंतच्या आठ श्लोकांचा अर्थ नीट समजून घेतल्याचा उपयोग होईल. एकदा तो समजला की मग तो आधुनिक परिभाषेमध्ये मांडणे सोपे होऊ शकेल.
सातव्या श्लोकामध्ये धर्माला ग्लानी आली आणि अधर्माला जोर आला की मी जन्म घेतो असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. आठव्या श्लोकात अधर्माचा जोर कमी करण्यासाठी म्हणजे सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो असे म्हणले आहे. त्याच प्रमाणे धर्माची ग्लानी दूर करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा धर्म स्थापन करायला जन्म घेतो असे म्हणले आहे.
आधुनिक भाषेत सांगायचे झाले तर मानवी समाजात घडणाऱ्या घडामोडींना जी कुठली शक्ती कारणीभूत आहे तिला भगवंताचा मानवी रूपात जन्म होतो असे रूपक मांडले आहे, असे म्हणता येईल. समाजातील दुस्थिती आणि सुस्थिती या घडामोडींच्या पलीकडे एक स्थिर शक्ती आहे असे जाणणे यालाच नवव्या श्लोकामध्ये भगवंताचा दिव्य जन्म आणि दिव्य कर्म नीट ओळखणे असे म्हणले आहे. दुस्थिती आली की भगवंताचा जन्म होतो आणि तो जे काम करतो त्यातून सुस्थिती येते असे हे रूपक आहे असे आधुनिक भाषेत म्हणता येईल.
जो या समाजातील सुस्थिती आणि दुस्थिती यांना नीट जाणतो तो त्यामुळे अतिशय उल्हासित ही होत नाही आणि अतिशय निराश ही होत नाही. कारण या घडामोडी चालूच राहणार हे त्याला कळले असते. या कळण्यालाच नवव्या श्लोकामध्ये भगवंताला जाऊन मिळणे किंवा त्याच्याशी एकरूप होणे असे म्हणले आहे. कारण भगवंत समाजाच्या सुस्थिती किंवा दुस्थितीमुळे विचलित होत नाही.
समाजातील घडामोडींमुळे आपण विचलित व्हायचे नाही कारण ते समुद्राच्या भरती ओहोटीसारखे आहे. ते अखंड चालू राहणार आहे हे कळण्यासाठी आणि त्याप्रमाणे वागता येण्यासाठी काय करायला हवे ते दहाव्या श्लोकामध्ये सांगितले आहे.
ज्याला कुठल्याही गोष्टीची हाव सुटलेली नाही, जो कशाला ही घाबरत नाही आणि ज्याला अपेक्षाभंग किंवा मानभंग झाल्याचा राग येत नाही असे प्रथम व्हावे लागते. त्यासाठी विशालत्व घडामोडींचे ज्ञान व्हावे लागते आणि सुखदुःखे सहन करण्याचे तप करावे लागते. असे तप करून जो समाजातील व्यक्तींच्या आणि समूहांच्या सेवेत स्वतःला विसर्जन जाऊ शकतो तो जणू काही समाजातील घडामोडींच्या आधार असणाऱ्या तत्त्वाशीच एकरूप होतो. त्यालाच रूपकाच्या भाषेत तो भगवंताला जाऊन मिळतो असे म्हणले आहे.
तुम्ही स्वतःला विसरून काम करू शकता किंवा या कामातून मला काय मिळते किंवा माझे काय जाते यावर लक्ष ठेवून काम करू शकता. तुम्ही स्वतःच्या वाभाहानीचा हिशोब करून अचूकपणे काम केले तर तुम्ही जे अपेक्षिलेले आहे ते मिळण्याची शक्यता वाढत जाते. तुम्ही स्वतःला विसरून काम केले तर लौकिकदृष्ट्या तुम्हाला काही मिळत नाही किंवा तुमचे काही जात नाही परंतु ज्यांना ज्यांना काही मिळाले किंवा ज्यांचे दुःख दूर झाले त्यांचे समाधान पाहून तुम्हालाही समाधान मिळते. याचेच वर्णन अकराव्या श्लोकात जो भगवंताशी ज्याप्रमाणे वागतो तसा भगवंत त्याच्याशी त्याप्रमाणे वागतो असे रूपकात म्हणले आहे. स्वतःला काही मिळावे असे धरून काम करणे हा भगवंताकडे जायचा लांबचा मार्ग आहे. लौकिक सुखदुःखे क्षणिक असतात हे अनुभव घेत कळत जाते आणि नंतर माणूस लौकिकापलीकडच्या सुखाचा शोध घेऊ लागतो. जे केवळ इतर लोक समाधानी व्हावेत असा विचार करतात ते जवळच्या मार्गाने भगवंताला जाऊन मिळतात. कारण सर्व जण समाधानी होणे यातच भगवंतही समाधानी झाला आणि सर्वांची सेवा करणारा सर्वांमध्येच गणला जात असल्याने तोही समाधानी झाला असे होते.
जे लौकिक सुखांची इच्छा धरून काम करतात त्यांना त्यांचे फळ दृश्य असल्यामुळे लवकर मिळते. यालाच बाराव्या श्लोकामध्ये देवतांची आराधना केली की ते लवकर फळ देतात असे रूपकात्मक भाषेत म्हणले आहे. सर्वांच्या समाधानासारखे अदृश्य फळ मिळावे एवढी ज्यांची इच्छा असते त्यांना मात्र समाजातील सर्व व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी काय काय करावे लागेल याचा विचार करावा लागतो. सर्व व्यवस्था सुरळीत चालू असतील तर सर्वांना समाधान मिळू शकते हे सांगण्यासाठी गीतेच्या रचनेच्या काळी जी चातुर्वर्ण्य व्यवस्था आदर्श मानली जात होती तिचा उल्लेख केला आहे. समाजात काहीतरी घडते किंवा घडत नाही तेव्हा संतुलन, गतिशीलता किंवा निष्क्रियता यांपैकी काहीतरी प्रभावी असते. या तिन्ही अवस्थांनाच तत्त्वज्ञानामध्ये ‘गुण’ असा शब्द आहे. प्रत्येक व्यक्ती मध्ये हे गुण कमी अधिक प्रमाणामध्ये असतात. दिवसाची वेळ, वर्षातील ऋतू, त्या व्यक्तीचे आरोग्य या सर्वांमुळे या तीन गुणांचे प्रमाण कमी जास्त होत असते. परंतु एखादा गुण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात जास्त काळ आणि जास्त वेळा वरचढ असतो आणि तो त्याच्या स्वभावाचे वर्णन ठरतो. या त्याच्या स्वभावामुळे त्या व्यक्तीचे समाजातील काम ठरत जाते. पूर्वीच्या काळी समाज फारसा गतिशील नसल्याने एकदा एकाचे काम ठरले की तो ते काम आयुष्यभर करत राहू शकायचा. त्यातून त्याने तसेच काम करावे अशी अपेक्षा निर्माण व्हायची. रूपकात्मक भाषेत अशी ही व्यवस्था मीच निर्माण केली आहे असे म्हटले आहे. ती समाजातील विविध प्रवाहांचा परिणाम म्हणून घडत असल्यामुळे तिचा मी कर्ता असूनही खरेतर अकर्ता आहे असेही पुन्हा तेराव्या श्लोकात म्हटंले आहे. केवळ अकर्ता नाही तर निर्विकार ही आहे असे म्हणले आहे. समाजातील घडामोडींच्या मुळाशी असणाऱ्या शक्तीला तिचे काही घेणे देणे नसते म्हणून ती अकर्ता आणि निर्विकार आहे. पण लोकांना प्रत्येक बदलाच्या मागे काहीतरी कारण असले पाहिजे असे व्यवहारात दिसत असल्यामुळे मीच ही स्वभावातील प्रभावी गुणांनुसार आयुष्यातील कामे ठरत असते अशी चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण केली आहे असे तेराव्या श्लोकातच म्हणले आहे.
सध्याच्या काळात हा तेरावा श्लोक विशेष गोंधळ निर्माण करणारा झाला आहे. पण इथे चातुर्वण्य व्यवस्था हे त्या काळात रूढ असल्यामुळे उदाहरण घेतले आहे हे समजून घेतले पाहिजे. समाजातील सुस्थिती आणि दुस्थिती यांचा विचार चालू असल्यामुळे समाजातील उदाहरण घेतले आहे. नवव्या अध्यायामध्ये आठव्या आणि नवव्या श्लोकात समाजातील सुस्थिती किंवा दुस्थिती याच्या ऐवजी साऱ्या विश्वाची उभारणी किंवा संव्हारणी असा विषय आहे. तिथेही एकटा मी उत्पत्ती आणि संहरणी करतो असे म्हणले आहे. आणि पाठोपाठ दहाव्या श्लोकामध्ये मी स्वतः काही करत नाही. माझ्या शक्तीद्वारा ही उभारणी आणि संव्हारणी होत असते आणि मी उदासीन असतो असेही म्हणले आहे. समाजाचा विचार असेल किंवा विश्वाचा विचार असेल होते ते सगळे त्यांच्या त्यांच्या स्वभावाचा किंवा गुणांचा परिणाम आहे. कुणीही एकच सर्व घडवणारा असे म्हणता येत नाही. पण परिणामासाठी मागे कारण असलेच पाहिजे असा आग्रह असेल तर भगवंत कारण असेल. परंतु घडले तर भगवंताला त्याचा आनंद नाही आणि बिघडले तर त्याचे दुःख नाही कारण सगळे काही खरेतर सर्वांमध्ये असलेल्या मूळ शक्तीच्या अंशातील गुणामुळेच घडत असते.
म्हणून चौथ्या अध्यायाच्या चौदाव्या श्लोकात म्हणले आहे की भगवंत म्हणून मी कर्मे करतो पण त्यांचे परिणाम मला चिकटत नाहीत म्हणजे मला सुखी किंवा दुःखी करत नाही. आणि मी सगळी कर्मे करतो असे म्हणले तरी त्याचे फळ मला मिळावे असा लोभ नसतो. मी करतो असे वाटले तरी मी करणारा नाही हे ज्याला समजले तो माझ्या सारखाच ‘कर्माचे परिणाम बाधत नाहीत’ असा होऊन जातो.
समाजात ज्या ज्या वेळी सुस्थिती होती तेव्हा तेव्हा समाजातील अनेक जणांनी काम केले म्हणूनच तशी परिस्थिती होती. त्यांच्याद्वारे जणू मीच काम करत होतो. जेव्हा जेव्हा दुस्थिती होते तेव्हा काही जण ती पालटण्यासाठी काम करतात तेव्हा मीच जणू काही त्यांच्या रूपाने जन्म घेतो. पूर्वीच्या लोकांप्रमाणे आजही ज्यांना समाजाची स्थिती चांगली हवी असे वाटते त्यांनीही असेच काम केले पाहिजे. आणि तरी मी काही करत नाही असा भाव ठेवला पाहिजे. असे पंधराव्या श्लोकात सांगितले आहे. गीतेतील चौथा अध्याय कर्मयोगासंबंधी आहे. धर्माला म्हणजे समाजातील सुस्थितीला जेव्हा धक्का बसतो तेव्हा धर्मसंस्थापना करावी लागते म्हणजे समाजातील ढळलेली सुस्थिती पुन्हा निर्माण करावी लागते. आणि हे करणारे लोक जेव्हा सर्व काही करूनही मी काही करत नाही असे मानतात तेव्हा ते कर्मयोगी होतात. असा या सगळ्या श्लोकांचा भाव आहे. समाजात सुस्थिती निर्माण करणे हे मुख्य काम असल्याने जुन्याकाळी त्याला धर्मसंस्थापना म्हणत असले तर आज त्या कामाला समाजसंस्थापना म्हणणे योग्य होईल असे प्रबोधिनीच्या संस्थापकांना वाटत होते. समाजसंस्थापना म्हणजे आजच्या काळात चातुर्वणाची स्थापना असे म्हणण्याचे कारण नाही. आजच्या गतिशील आणि गुंतागुंतीच्या सामाजिक परिस्थितीत प्रत्येकालाच आयुष्याच्या वेगवेगळ्या काळात वेगवेगळी कामे करावी लागतात आणि एकाच काळात पूर्वी वेगवेगळ्या काळात नेमून दिलेली कामे करावी लागतात. आजच्या काळात समाजसंस्थापना म्हणजे वर्णव्यवस्था आणि तिचे बोट धरून आलेली जातीव्यवस्था आणि यातून आलेली विषमता यांचे निर्मूलन करणे हेच एक महत्त्वाचे काम होऊन बसले आहे.
भारतीय राज्यघटनेत म्हटलेली समानता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये प्रस्थापित करणे, घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलेली विज्ञानाभिमुखता आणि त्याद्वारे तंत्रज्ञानातील उत्तमता प्रस्थापित करणे हेच खरे समाजसंस्थापनेचे काम आहे. सर्व काही करूनही मी अकर्ता आहे हा भाव निर्माण होण्यासाठी मात्र समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि विज्ञानाभिमुखता या चार तत्त्वांबरोबर आध्यात्मिकता हेही तत्त्व आधाराला घ्यायला लागेल. पहिली चार तत्त्वे आदर्श मानणाऱ्या अनेक संस्था-संघटना आजही देशात आहेत. परंतु या सर्वांच्या मुळाशी आध्यात्मिकता असणे आवश्यक आहे असा प्रबोधिनीचा विश्वास आहे. हा विश्वास प्रबोधिनीत नित्य चालणाऱ्या उपासनेतून आला आहे.