ईश्वरचरणी समर्पिता……

पृथ्वी, जल, वायू, तेजाने, आकाशाने भरलेली
शुद्ध घडो काया माझी जी महाभुतांनी व्यापियली
कोण असे मी? मी काया की तिच्यामध्ये स्थित चेतनता?
ज्योति असे मी विमल निरागस, ईश्वरचरणी समर्पिता॥ध्रु.॥

प्राण, अपाने, व्यान, उदाने, समानादि पंचप्राणे
व्याप्त तनू ही, चेतन राहो, प्राणांविण कुठले जगणे?
कोण असे मी? पंचप्राण की? की त्यांच्यावरली सत्ता?॥१॥

शब्द कर्णिचा, स्पर्श त्वचेचा, रूप विषय हा नयनांचा
रस जिव्हेचा पावन होवो, गंध नासिकाद्वारींचा
कोण असे मी? संवेदन का? की या विषयांचा भोक्ता?॥२॥

विचार करणे कर्म मनाचे, वाणीचे बोलणे असे
अन्‌‍ देहाचे कृती असे, मी कर्मशुद्धि ती प्रार्थितसे
कोण असे मी? ही कर्मे का? की या कर्मांचा कर्ता?॥३॥

अन्न, प्राण अन्‌‍ मन-विज्ञाने, आनंदाने नटलेले
शुद्ध असावे पंचकोश हे, निर्मळात जे वसलेले
कोण असे मी? पंचकोश का? की त्यांचाही निर्माता?॥४॥

या कायेच्या कणाकणामधि, दिव्य प्रेरणा नित्य वसे
कणात तनुकण, परमकणातहि प्रभा ज्योतिची प्रकटतसे
कोण असे मी? आता कळले, मी तर परमात्मा-सविता
ज्योति असे मी विमल निरागस, ईश्वरचरणी समर्पिता॥५॥