इतिहासाची उलटुन पाने
भविष्यवेधी कृती हवी
अभ्युदयाला परमार्थाच्या
उपासनेची जोड हवी ॥ ध्रु.॥
हिंदुत्वाचे पुनर्जागरण
विरक्तीतही करुणासिंचन
जेत्यांच्या उन्मत्त शिरावर
धर्मध्वजेचे हो आरोहण
अद्वैताच्या त्या पथिकासम
जागृत अर्पण वृत्ति हवी ॥१॥
निःशस्त्रांची उभवुन सेना
सत्यव्रताचे मार्ग निर्मिले
अंत्यजपूजा सार्थक मानुन
राष्ट्रशक्तिचे मर्म जाणले
त्या द्रष्ट्याचे शब्द उमगण्या
अंतःकरणा साद हवी ॥२॥
ध्येय एक, जरि भिन्न साधने
कोटि मनांचे बळ जागविणे
समर्थ वाणी – सहज कृतीतुन
‘राष्ट्रधर्म’ अवघा उलगडणे
त्या धर्माचे स्वत्व राखण्या
तेज-सत्त्व, अन् भक्ति हवी ॥३॥
कितीक सत्ता दंडशक्तीने
जग जिंकाया लढताती
आसुरी आकांक्षांचे वारू
मानवतेवर कोसळती
स्नेहपूर्ण सहजीवन रुजण्या
हिंदू जीवनदृष्टी हवी || ४ ||