संघटना म्हणजे काय?

कोणत्याही समाजामध्ये तीन प्रकारांनी लोक एकत्र जमत असतात. एक प्रकार म्हणजे ‘संस्था, दुसरा प्रकार म्हणजे ‘संघटना’, व तिसरा प्रकार म्हणजे ‘मित्रसमूह’.

‘संस्था’ दोन प्रकारच्या असतात. औपचारिक संस्था सरकारने केलेल्या कायद्याप्रमाणे तयार होतात व चालतात. अनौपचारिक संस्था या समाजातील रूढी, परंपरा व प्रथांमुळे बनलेल्या असतात. एखादी बँक, कंपनी, शिक्षणसंस्था किंवा क्लब या औपचारिक संस्था आहेत. कुटुंब, जात पंचायत या अनौपचारिक संस्था आहेत.

‘संघटना’ ही औपचारिकही नसते आणि अनौपचारिकही नसते. समान उद्दिष्ट, समान कार्यपद्धती आणि समान विधिनिषेध (म्हणजे काय करावे किंवा करू नये या बाबतीत समान भूमिका) असणारा लोकांचा गट म्हणजे संघटना. संघटनेची उद्दिष्टे, कार्यपद्धती व विधिनिषेध त्या संघटनेच्या सदस्यांनीच ठरविलेले असतात.

‘मित्रसमूह’ आपोआप बनतात. ते समाजात स्वतंत्रपणे असतात. तसेच कोणत्याही औपचारिक संस्थेमध्ये किंवा संघटनेमध्ये एक किंवा अनेक मित्रसमूह असतात. मित्रसमूहांना स्वतःचे दीर्घकालीन उद्दिष्ट नसते. त्यांना तात्कालिक उद्दिष्टे असू शकतात व ती बदलूही शकतात. मित्र समूहांमध्ये ठरविलेली कार्यपद्धती किंवा ठरविलेले विधीनिषेध नसतात. परंतु आपोआप बनत गेलेली कार्यपद्धती व विधीनिषेध हे मित्रसमूहाचे प्राण असतात.

संस्था किंवा संघटनेतील एखादा मित्रसमूह आपल्या संस्थेची किंवा संघटनेची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि विधिनिषेध मानतो. पण त्यांच्या पलीकडे स्वतःचे असे जास्तीचे कार्यक्रम करत असतो. विशिष्ट दिवशी विशिष्ट प्रकारचे किंवा विशिष्ट रंगाचे कपडे घालायचे, ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणी चहासाठी किंवा डबा खाण्यासाठी एकत्र जमायचे, एकत्र सहलीला जायचे, एकत्र वाढदिवस साजरे करायचे, गप्पा मारता मारता कामातले शॉर्टकट्स् सांगायचे, आपल्या समूहाचे अलिखित विधिनिषेध पक्के करायचे किंवा बदलायचे अशा कृतींमधून मित्रसमूह टिकून राहतो आणि आपल्या सदस्यांना त्यांच्या व्यक्तिगत आणि संघटनेतील कामांना ऊर्जा पुरवित असतो.

आपण एक किंवा अधिक मित्रसमूहाचे सदस्य असू शकतो. ते सदस्यत्व न सोडता परंतु त्यातच अडकून देखील न पडता आपल्या कामाला लागणारी अधिकाधिक ऊर्जा संघटनेच्या ध्येयापासून आणि उद्दिष्टापासून मिळू लागणे म्हणजे खरे संघटनाभिमुख होणे, हे नाही जमले आणि गणवेष, विशिष्ट भाषा आणि शब्दांचा उपयोग, कार्यक्रमांना आणि बैठकींना उपस्थिती अशी संघटनेची बाह्य लक्षणे धरून बसलो तर आपण संघटनाभिमुख होऊ पण आपल्या कामाची ऊर्जा मात्र आपल्या मित्रसमूहातूनच घेत राहू, प्रथम प्रतिज्ञितापैकी बहुतेकांना अशा मित्रसमूहात असण्याची गरज असते. द्वितीय प्रतिज्ञितांनी मात्र प्रयत्नपूर्वक आपल्या उर्जेचे किंवा कामातील प्रेरणेचे स्वावलंबन वाढवायचे असते. ऊर्जेसाठी मित्रसमूहावर अवलंबून राहणे कमी करायचे असते.