प्रबोधिनीच्या द्वितीय प्रतिज्ञितांना प्रबोधिनीच्या स्थापना-दिनी प्रतिज्ञेबद्दल किवा संघटनेचा स्वरूपाबद्दल दरवर्षी पत्र लिहित असतो. तसे हे आठवे पत्र. प्रबोधिनीच्या एकूण द्वितीय प्रतिज्ञितांची संख्या आता २०१५ अखेर ३४५ झाली आहे. या ३४५ सदस्यापैकी आज प्रबोधिनीच्या एखाद्या विभागात किंवा केंद्रात नियमित किंवा प्रासंगिक काम करणारे सुमारे १२५ सदस्य आहेत. अन्य सर्वजण प्रबोधिनीत पाच पासून पंचवीस वर्षे काम करून नंतर अन्यत्र काम करत आहेत. त्यांच्या त्यांच्या कंपनी, बँक, कारखाना, दुकान, क्लब, शासकीय कार्यालय, रुग्णालय, स्नेहमंडळ, इ. औपचारिक किंवा अनौपचारिक कामांच्या ठिकाणी त्यांचा अनेक व्यक्तींशी संबंध येतो व अनेकांना बरोबर घेऊन त्यांना गटामध्ये काम करावे लागते. प्रबोधिनीत आज थेट काम करत असले किंवा नसले तरी या सगळ्यांनाच कोणत्या ना कोणत्या स्वरुपात कार्यसंच-बांधणी किंवा गटबांधणी म्हणजेच संघटनाचे काम करावे लागते. म्हणून प्रबोधिनीच्या द्वितीय प्रतिज्ञितांनी आपापल्या ठिकाणी आपल्याला हे संघटन कसे व किती जमते आणि इतरांना शिकवता येते याचा आढावा घेतला पाहिजे.
या सर्व द्वितीय प्रतिज्ञितांना गेल्या काही पत्रांमध्ये विशेष प्रबोधिनीपणाच्या पाच पैलूपैकी एकेका पैलूवर पत्र लिहिले होते. विशेष प्रबोधिनीपणाचा एक पैलू संघटनाभिमुखता आहे. द्वितीय प्रतिज्ञेनुसार आपण संघटनेचे घटक होतो. यावर्षी संघटनाभिमुखतेबद्दल काही विचार अधिक तपशीलात पाहूया. संघटना म्हणून आपण कसे व किती वाढलो याचाही आढावा आपण घेत राहिले पाहिजे. संघटनेच्या विकासाचे सहा टप्पे करता येतात.
ते पुढीलप्रमाणे आहेत –
१. लोकरचना : संघटनाची सुरुवात अनेक नवीन लोकांना एकत्र येण्याची काही रचना व निमित्त तयार केल्याने होते. उदाहरणार्थ, २०१४-१५ वर्षात –
* सांगली येथे १०० शाळांमधील शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम झाला.
*पुणे येथील काशीवाडी वस्तीमध्ये नियमित साप्ताहिक आरोग्य तपासणी सुरू झाली.
*पुणे येथे शिक्षक प्रबोधन मंचाच्या मासिक व्याख्यानांना सुमारे ४० शाळांमधील शिक्षक प्रतिनिधी येऊ लागले.
*शिवगंगा व गुंजवणी खोऱ्यात गावागावांमध्ये शून्य ते सहा वयोगटातील मुले असलेल्या मातांसाठी बालसंगोपनाचे प्रशिक्षण ‘हिरकणी प्रकल्प’ या नावाने सुरू झाले.
*प्रबोधिनीच्या केंद्रांवरील विभाग व प्रकल्प, सर्व दले, सर्व संपर्क, उपक्रम, व विस्तार केंद्रे लोकरचनाही आहेत. काही लोकरचना तात्पुरत्या असतात. काही दीर्घकाळ टिकणाऱ्या किंवा स्थायी असतात.
२. लोकसंवाद : नवीन लोकांना औपचारिक किंवा अनौपचारिक उपक्रमांच्या निमित्ताने एकत्र येण्याची रचना
निर्माण झाल्यावर संघटन कामाचा दुसरा टप्पा सुरू होतो. या उपक्रमांसाठी येणाऱ्या लोकांशी कामापलीकडचा अनौपचारिक संवाद, त्यांच्या सुखदुःखांविषयी बोलणे, त्या-त्या उपक्रमापलीकडचे प्रबोधिनीचे काम त्यांना गप्पांमधून सांगणे, गृहभेटी, इ. मार्गाने कामाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या संबंधांचे मैत्रीच्या व स्नेहाच्या नात्यांमध्ये रूपांतर होते. अशा लोकसंपर्कासाठी शिबिरे व दौऱ्यांमधील २४ तासांचा एकत्र सहवासही उपयोगी पडतो. उदाहरणार्थ, गेल्या वर्षात –
*बचतगट प्रमुख व गाव प्रतिनिधी महिलांचे तोरण्याच्या पायथ्याशी वाघदर येथे निवासी शिबिर झाले.
*काशीवाडी, वडारवाडी व दांडेकर पूल या पुण्यातील तीन वस्त्यांमधील किशोरींचे निवासी शिबिर झाले.
*सर्व विभाग व केंद्रांमधील सदस्यांचा समूहगुण विकसन प्रशिक्षणाचा निवासी वर्ग झाला.
या सर्व शिबिरांना आधीपासून प्रासंगिकरित्या जमणारा गट अधिक काळासाठी एकत्र निवासी राहिला. विभाग, प्रकल्प व दलांवर नित्य येणाऱ्यांचा परस्परसंवाद होत असतो तो लोकसंवादच. पण त्या त्या गटांच्या प्रमुखांचा आपल्या गटातील सदस्यांशी होणारा संवाद हा संघटनाच्या लोकसंवाद टप्प्याला अधिक जवळचा असतो. संवादामुळे मोकळेपणा आल्यानंतर स्वतःच्या सुखदुःखांच्या पलीकडे, गप्पा-टप्पांच्या पलीकडे, समाजाची सुखदुःखे, समाजाचे प्रश्न आणि त्यावरील उपाय; असे उपाय कोणी योजले व त्यातील त्यांचे यशापयश; यावरती ही मोकळ्या अनौपचारिक गप्पा होऊ लागल्या, म्हणजे असा गप्पा मारणारा गट संघटनेच्या विकासाच्या पुढच्या टप्प्याला जायला तयार झाला.
३. लोकसंग्रह : अनौपचारिक संवादाच्या आणि व्यक्तिगत संबंधांच्या पलीकडे अनेकजण विशिष्ट उद्दिष्टासाठी व ध्येयासाठी एकत्र येतात. प्रमुख किंवा संयोजक बदलले तरी त्यांचे काम चालू राहते. तेव्हा ध्येयाभोवती लोकसंग्रह झाला असे म्हणता येते. बोली भाषेत लोकसंग्रह म्हणजे व्यक्तीच्या परिचयाचे वर्तुळ मोठे असणे व विविध कामांसाठी तिने हाक मारल्यावर त्या परिचय-वर्तुळातल्या अनेकांनी प्रतिसाद देणे असा होतो. सघटनाशास्त्रात मात्र लोकसंग्रह म्हणजे संघटनेने आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी एखादा कार्यक्रम ठरवल्यावर कोण हाक मारते आहे याच्या निरपेक्ष संघटनेचा कार्यक्रम म्हणून अनेक जणांनी प्रतिसाद देणे असा अर्थ आहे. उदाहरणार्थ, गेल्या वर्षात –
*बचत गटांच्या महिला मेळाव्यासाठी ७२ गावांतील महिला प्रतिनिधींनी साडेचार हजार महिला गोळा केल्या. या सर्व महिला विविध बचत गटांच्या किमान एक ते पंधरा वर्षे सदस्य आहेत.
*पुणे व निगडी येथील युवतींनी पूर्वी एकत्र काम केलेले नसतानाही प्रबोधिनीचा कार्यक्रम म्हणून एकमेकींशी जुळवून घेत सामूहिक पद्यगायनाचा कार्यक्रम केला. यामध्ये ३० युवती पद्यगायनात व अन्य तांत्रिक व्यवस्थांमध्ये २५ युवती सहभागी झाल्या होत्या.
*निगडी येथील सेतुबंधन मेळाव्याची योजना पालक समितीच्या वीस जणांनी केली. यामध्ये हे वीस पालक-प्रतिनिधी लोकसंग्रहाच्या टप्प्याला पोहोचले, तर सेतुबंधन मेळाव्याला आलेल्या ५०० पालकांसाठी तो लोकरचनेचा उपक्रम होता.
अनेक प्रकारची गटकार्ये एकत्र करत गेल्यावर कार्यसंचबांधणी किंवा समूहगठण होत जाते. हा समूह टिकवून ठेवण्यासाठी त्यांना सतत नवीनवी कामे आणि अभियाने द्यावी लागतात. त्यांच्यासाठी नव्या लोकरचना मधून मधून उभ्या कराव्या लागतात. संचाच्या सदस्यांमधील अनौपचारिक लोकसंवादही चालू राहील याची काळजी घ्यावी लागते.
४. लोकप्रशिक्षण : संघटनेच्या कोणाही प्रतिनिधीने हाक मारल्यावर जमा होणाऱ्या लोकांचा समूह संघटनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी परिणामकारक काम करणारा व्हायचा असेल तर समूहातील सदस्यांचे प्रशिक्षण व्हावे लागते. संस्कार, वृत्तिघडण, प्रतिसादाची संधी, आव्हान स्वीकारण्याची संधी, प्रतिनिधित्वाची संधी या सगळ्यांसाठी येथे प्रशिक्षण असा शब्द वापरला आहे. उदाहरणार्थ गेल्या वर्षात –
*फिल्म क्लबचे काम करणाऱ्या गटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी लघुपट तयार करण्याचा प्रकल्प पूर्ण करून पहिल्याच प्रयत्नात प्रथम क्रमांक मिळविला.
*प्रबोधिनीच्या सुमारे २५ महिला सदस्यांनी हैदराबाद येथे ‘World Women’s Congress’ मध्ये निबंध वाचन केले. अनेक जणींचा निबंधलेखनाचा व परिषदेत हिंदी किंवा इंग्रजीत निबंध सादर करण्याचा हा पहिलाच अनुभव होता.
*’छात्र प्रबोधन’ने योजलेल्या संयोजक प्रशिक्षण वर्गात छात्र प्रबोधनच्या सदस्यांनी मोठ्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन व त्यातील सत्रे घेण्याचा प्रथमच अनुभव घेतला. त्यांच्यासाठी तो लोकप्रशिक्षणाचा टप्पा होता. वर्गाला आलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी तो लोकरचनेचा उपक्रम होता.
सदस्यांचे प्रशिक्षण व्यक्तिशः जबाबदाऱ्या देऊन, प्रशिक्षण वर्गांना पाठवून, बैठकी-वैचारिकांमधून व व्यक्तिगत चर्चामधूनही होत असते. त्यांच्याकडून संघटनेच्या कार्यपद्धतीचाही सराव करून घ्यावा लागतो. प्रबोधिनीच्या संदर्भात साप्ताहिक व विशेष वार्षिक उपासना, प्रार्थना, खातेवाटप, शोधबोध, प्रदीर्घ बैठक, मनोगत लेखन, संचालक भेट, भवितव्य लेख, प्रतिज्ञाग्रहण, इ. पद्धतींचे हेतू व तपशील सदस्यांना कळतील अशी व्यवस्था करावी लागते. व्यक्ती कार्ये, जोडी-कार्य व गटकार्यांचा; नियोजित व उत्स्फूर्त नेतृत्वाचा; कार्यालयीन कामाचा व क्षेत्रकार्याचा अनुभव द्यावा लागतो.
५) लोकउपयोजन : प्रशिक्षित झालेले सदस्य प्रबोधिनीच्या भवितव्य लेखानुसार स्वतःहून नवीन नवीन जबाबदाऱ्या घेऊ लागणे म्हणजे लोकउपयोजन. प्रबोधिनीच्या योजनेनुसार प्रशिक्षित सदस्यांनी आपल्याच विभागातील नवीन जबाबदारी, वेगळ्या विभागातील नवीन जबाबदारी, वेगळ्या विभागातील नवीन जबाबदारी, वेगळ्या केंद्रातील नवीन जबाबदारी, किंवा नवीनच ठिकाणी, किंवा नवीन विषयात काम करायला लागणे म्हणजेही लोकउपयोजन. याने संघटनेचा विस्तार व विकास होतो. उदाहरणार्थ, गेल्या वर्षात –
*निगडी येथील एक युवक व पुण्यातील एक युवती नेतृत्व संवर्धन केंद्रात पूर्णवेळ काम करू लागले.
*युवती विभागातील दोन युवती ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत अध्यापन करू लागल्या.
*प्रज्ञा मानस संशोधिकेमधील एक प्रशिक्षक नियमितपणे हराळी येथे बुद्धिविकसनाचे प्रशिक्षण द्यायला गेले.
*सोलापूर येथील शिशु अध्यापिका विद्यालयातील माजी विद्यार्थिनी तेथील किशोरी विकास योजनेचे काम करू लागल्या.
बऱ्याच वेळा लोक-उपयोजन व लोक-प्रशिक्षण एकाच वेळी चालू राहते. पुरेसे प्रशिक्षण झाल्यावर सदस्यांचे आता नव्याने उपयोजन झाल्याचे मग ठळकपणे लक्षात येते. एखाद्या विभागात किंवा केंद्रामध्ये नवीन खात्याचा किंवा नवीन विभागाचा प्रमुख करणे, नवीन दलावर पाठवणे, अधिक मोठी प्रशासकीय किंवा संघटनात्मक जबाबदारी देणे, हीसुद्धा लोकउपयोजनाचीच उदाहरणे आहेत.
६. लोकपरिवर्तन : ‘रूप पालटू देशाचे’ हे प्रबोधिनीचे ध्येय आहे. लोकपरिवर्तन म्हणजे देशाच्या स्तरावर हे ध्येय साकार करणे. तो खूपच लांबचा पल्ला आहे. आधीच्या पाचही टप्प्यांवरती काम करत करत एखाद्या गावात किंवा एखाद्या वस्तीत टिकाऊ परिवर्तन करता आले तर त्या दिशेने एक पाऊल पडेल. प्रबोधिनीच्या सदस्यांच्या घरी, शेजारी आणि त्यांच्या त्यांच्या संपर्क वर्तुळात त्यांच्या कामामुळे आणि अस्तित्वामुळे जे टिकाऊ बदल होतील ते ही या दिशेनेच एक पाऊल आहे. उदाहरणार्थ, गेल्या काही वर्षांमध्ये
*प्रबोधिनीप्रणीत संस्कार पोथ्यांचा वापर समाजात वाढतो आहे.
*प्रबोधिनीच्या बचत गट प्रशिक्षण पुस्तिकांचा इतर संस्थांच्या बचत गटांसाठी वापर होतो आहे.
*’छात्र प्रबोधन’ मधल्या लेखांचा शाळाशाळांमधून मूल्यशिक्षणासाठी वापर सुरू झाला आहे.
*सोलापूरच्या शिशु अध्यापिकांनी इतर पूर्व प्राथमिक शाळांमध्ये प्रबोधिनीतील पूर्व प्राथमिक शिक्षणाची तंत्रे वापरणे सुरू केले आहे.
क्रीडाकुलातील प्रशिक्षकांच्या आग्रहामुळे बाह्य योजनेने होणाऱ्या क्रीडास्पर्धांमधील भ्रष्टाचारावर काही अंशी नियंत्रण आले आहे.
असे बिंदुवत् लोकपरिवर्तन आपण करू शकलो आहोत. देशाच्या मानाने आपल्या कामाचा परिणाम दीर्घकाळ बिंदुवतच वाटेल. परंतु किती बिंदू आपण निर्माण करू शकतो हे बघितले पाहिजे. समाजातील बदलांच्या रेट्यापुढे काही बिंदूंची वाफही होऊन जाईल. पण असे बिंदू निर्माण करण्याचा आपला वेग वाढविणे हेच यावर उत्तर आहे. हा वेग वाढला म्हणजे बिंदूंच्या ऐवजी सतत वाहणारा कामाचा प्रवाह आणि कार्यकर्त्यांचा ओघ सुरू होईल. हा प्रवाह किंवा ओघ चारमाही किंवा आठमाही न राहता वर्षभर चालू राहील असा प्रयत्न केला पाहिजे.
आपल्या व्यक्तिगत आणि विभागाच्या कामाची योजना करताना तसेच केंद्राच्या व एकूण प्रबोधिनीच्या कामाच्या योजना आखताना लोकरचनेचा पाया व्यापक करत जाणे व त्यातल्या अधिकाधिक लोकांना वेगाने पुढच्या पुढच्या टप्प्यापर्यंत नेणे याचे भान सतत ठेवले पाहिजे. तसे भान ठेवून काम करणे म्हणजे द्वितीय प्रतीज्ञेनुसार तन-मन-धनपूर्वक उत्तरदायी राहून संघटनेचा घटक म्हणून काम करणे.
कै. आप्पांच्या जन्मशताब्दीनिमित्त संघटन-कार्यात जाणीवपूर्वक योगदान
लोकरचना ते लोक परिवर्तन हे सर्व टप्पे एकाच उपक्रमाचे उदाहरण घेऊन पाहू. छोट्या स्तरावर काही ग्रामीण भागात हे बघायला मिळते. बचतगट ही गावातल्या वीस महिला एकत्र येण्यासाठीची लोकरचना आहे. दर महिन्याच्या बैठकीत बचत, कर्ज, व्याज, परतफेड इ. हिशोबांच्या बरोबरीने महिलांना तिथे इतरही विषय बोलायला जागा व वेळ मिळतो. आर्थिक विषयांपलीकडच्या विषयांवर त्यांच्या गप्पा होऊ लागल्या म्हणजे लोकसंवादाचा टप्पा आला. बचतगटाचा दिवस सोडून मेळावा, भजन, क्रीडास्पर्धा, अभ्यास सहल अशा कार्यक्रमांनाही महिला सहजपणे येऊ लागल्या म्हणजे त्यांनी लोकसंग्रहाचा टप्पा गाठला. आर्थिक साक्षरता, बँकेचे कामकाज, व्यक्तिगत व गटाचे हिशोब ठेवणे व तपासणे, लोकसंग्रहाच्या कार्यक्रमांचे नियोजन करणे, ग्राम सभेत सहभागी होणे, बचत गटाचे प्रतिनिधीपण व प्रवक्तेपण करणे, इ. कामांसाठी बचतगटातील काही प्रमुख महिलांचे प्रशिक्षण सुरू झाले की लोकप्रशिक्षणाचा टप्पा गाठला. प्रशिक्षण घेऊन बचतगटांच्या प्रमुख अनेक गटांच्या विभागांच्या बैठकांना जाऊ लागल्या व विभागाच्या बैठकीत गावचा पाणी प्रश्न, गावातील व्यसनमुक्ती, गावातील मुलामुलींचे शिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी, इ. चर्चा होऊन एकेका विषयाची जबाबदारी त्या घेऊ लागल्या म्हणजे बचतगटात प्रशिक्षण घेऊन अन्य कामांसाठी त्यांचे लोकउपयोजन सुरू झाले. अशा जबाबदाऱ्या घेणाऱ्या महिला लग्नाच्या मिरवणुकीत नाचणाऱ्या तरुणांना दारू द्यायची नाही; वैभवलक्ष्मीचे व्रत करताना वायफळ खर्चाची गरज नाही; सातवी-आठवी पर्यंत शिक्षण झाले असले तरी प्रौढपणी मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा देऊन पदवीधर होता येते, मुलींचे लग्न अठराव्या वर्षानंतरच करायचे; गावकीच्या कार्यक्रमांची योजना महिलाही करू शकतात; असे नवे पायडे गावात पाडायला लागल्या की गावाच्या स्तरावर लोकपरिवर्तनाचा टप्पा गाठला. मग पुढील प्रगतीसाठी बचत गटापेक्षा वेगळ्या, नव्या लोकरचना निर्माण करायला लागतील. असे हे ‘रूप पालटू देशाचे’ या कामाचे चक्र चालू राहील.
उपक्रम केंद्र म्हणून सुरू झालेल्या डोंबिवली विस्तार केंद्राने चालू केलेला निर्माल्य संकलन उपक्रम, किंवा साळुंब्याला एका गावात सुरू झालेला पवनामाईचा उत्सव मावळातील तीन नद्यांच्या खोऱ्यांमध्ये अनेक गावांमध्ये सुरू होणे, किंवा बर्ची गटांसारखे सामूहिक नृत्याचे किंवा सामूहिक वादनाचे शहरात इतरांचे अनेक गट सुरू होणे, किंवा एका गुरुकुलाचे अनुकरण अन्य संस्थांच्या दहा ठिकाणी होणे, या सर्वांमध्ये बचत गटांसारखेच सहा टप्पे दिसतात का याचा शोध घेऊन पाहण्यासारखा आहे. प्रबोधिनीच्या जेवढ्या कामांमध्ये आपण हे सहा टप्पे नेमके दाखवू शकू त्याप्रमाणात संघटन हे काहीजणांचे कौशल्य न राहता अनेकांना वापरता येईल असे संघटनाशास्त्र बनेल. प्रबोधिनीचे नित्य काम करू न शकणाऱ्यांनी देखील आपापल्या कार्यगटासह संघटनाचे कोणते टप्पे आपण गाठू शकतो आहोत याचा विचार अवश्य करून पाहावा. संघटना, देशव्यापी संघटना, संघटनांचे जाळे हे सर्व कै. आप्पांच्या अतिशय जिव्हाळ्याचे विषय होते.
(सौर २४ आषाढ शके १९३७ / दि. १५ जुलै २०१५ रोजी द्वितीय प्रतिज्ञितांना लिहिलेले पत्र)
*****
संघटनेचा प्रतिज्ञित घटक म्हणजे काय ?
प्रबोधिनीच्या रचनेमध्ये कायद्यानुसार नोंदवलेले व त्यानुसार चालणारे असे काही कामाचे प्रकार आहेत. तर काही प्रकारचे काम ज्यासाठी कायदे नाहीत अशा प्रकारचे आहे. पहिल्या प्रकारात विद्यार्थी म्हणून प्रवेशाचे आवेदन भरून किंवा सदस्य म्हणून नियुक्ती होऊन प्रबोधिनीचे घटक होता येते. असे घटक असण्याला कायद्याचे नियंत्रण असते. दुसऱ्या प्रकारात कायद्याचे नियंत्रण नाही. तिथे स्वतः घेतलेल्या प्रतिज्ञेचे बंधन आहे. प्रबोधिनीचे आदर्श, मूल्ये आणि कार्यपद्धती आपलेही आदर्श, मूल्ये आणि कार्यपद्धती म्हणून स्वतःहून स्वीकारायचे आहेत. असा आपणहून स्वीकार करणे म्हणजे प्रतिज्ञित घटक होणे.