९. राष्ट्रउभारणीसाठी प्रतिज्ञा

प्रथम प्रतिज्ञेत फक्त राष्ट्रसेवेचा उल्लेख आहे. द्वितीय प्रतिज्ञेत राष्ट्रसेवा आणि धर्मसंस्थापना असे का म्हटले आहे ?

राष्ट्र-उभारणीचे काम म्हणजे धर्मसंस्थापनेचेच काम. प्रबोधिनीच्या घटनेत ‘रूप पालटू देशाचे’, ‘देशाचा कायपालट व्हावा’, ‘देशात विचारप्रबोधन आणि कार्यप्रबोधन व्हावे’, ‘देशात आणि लोकमानसात नवचैतन्य निर्माण व्हावे’, ‘भारतीय समाज आणि भारतीय राष्ट्र यांना वैभवसंपन्न आणि गौरवसंपन्न करणे’ अशा वेगवेगळ्या पद्धतीने राष्ट्र-उभारणीच्या कामाचे वर्णन केले आहे. राष्ट्र-उभारणीसाठी काम करणे म्हणजे राष्ट्रसेवेचे काम करणे, राष्ट्रसेवेचे उद्दिष्ट इतरही अनेक संस्थांनी व व्यक्तींनी ठेवलेले असते. प्रथम प्रतिज्ञा घेणारा प्रबोधिनीद्वारे या उद्दिष्टाची ओळख करून घेतो. एकच उद्दिष्ट असण्याला सलोकतेची पातळी म्हणतात.

राष्ट्र-उभारणी हे प्रबोधिनीचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. आजच्या परिस्थितीला अनुरूप राष्ट्र-उभारणी झाली तरी नवीन काळात पुन्हा ध्येयानुसार काही बदल करावे लागतात. धर्मसंस्थापना म्हणजेच समाजसंस्थापना हे प्रबोधिनीचे ध्येय आहे. धर्मसंस्थापना म्हणजे स्वतः मधील आणि इतरांमधील चैतन्यशक्तीचे अधिकाधिक प्रकटीकरण करणे. समाजसंस्थापना म्हणजे सर्व परिस्थितीत भारतीय समाजाची उत्तम धारणा करणाऱ्या तत्त्वांची आणि आदर्शाची पेरणी व बांधणी भारतीयांच्या मनात करणे. प्रबोधिनीच्या अधिक जवळ यायचे म्हणजे उद्दिष्टांच्या बरोबर प्रबोधिनीचे ध्येय आणि कार्यपद्धती समजून घेऊन काम करायचे. याला समीपतेची पातळी म्हणतात.

*****

द्वितीय प्रतिज्ञेपूर्वी किंवा प्रतिज्ञा झाल्यावर आवर्जून वाचावीत अशी पुस्तके

१) कै. आप्पांचे चरित्र, २) ज्ञान प्रबोधिनी खंड २,

३) विवेकानंदांचा राष्ट्रधर्म ४) नेतृत्वाचे पैलू,

५) ज्ञान प्रबोधिनी खंड ३, ६) माताजी-अरविंद काय म्हणाले?,

७) रामदास काय म्हणाले?, ८) विवेकानंदांची भारतीय व्याख्याने, ९) साता उत्तरांची कहाणी (लेखक प्रा. ग. प्र. प्रधान)