गीतेमध्ये म्हटले आहे – यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थ धनुर्धरः।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्भुवा नीतिर्मतिर्मम ।। (गीता १८.७८)
योगेश्वर जिथे कृष्ण, जिथे पार्थ धनुर्धर।
तिथे मी पाहतो नित्य, धर्म श्री जय वैभव ।। (गीताई १८.७८)
आम्ही विजयी व्हावे, आम्ही नीतिमंत श्रीमंती निर्माण करावी, यासाठी आम्हीच अर्जुनासारखे रथी आणि कृष्णासारखे सारथी व्हायचे ठरवले आहे. त्यासाठी आम्ही संघटित प्रयत्न करण्याचे आणि संघटना करण्याचे ठरवले आहे. आम्ही ज्ञान आणि विज्ञान, भौतिकशास्त्रे आणि अध्यात्म यांची कस धरून सहविचाराने काम करण्याचे ठरविले आहे. असे म्हणणे म्हणजे प्रबोधिनीचा घटक बनण्याचा निश्चय करणे. जे प्रबोधिनीचे घटक आहोत, त्यांनी मनापासून राष्ट्रभक्ती केली पाहिजे. स्वतःच्या क्षमता वाढविल्या पाहिजेत. संघटना केली पाहिजे आणि धर्मसंस्थापनेचे कार्य चालू ठेवणाऱ्यांची परंपरा निर्माण केली पाहिजे. त्यासंबंधी समर्थ रामदास म्हणतात
मनापासूनि भक्ती करणे । उत्तम गुण अगत्य धरणे । तया माहांपुरुषाकारणे । धुंडीत येती ।।
ऐसा जो माहानुभाव । तेणें करावा समुदाव । भक्तियोर्गे देवाधिदेव । आपुला करावा ।।
आपण अवचितें मरोन जावे। मग भजन कोणे करावे । याकारणें भजनास लावावे । बहुत लोक ।।
आमची प्रतिज्ञा ऐसी । काहीं न मागावें शिष्यासी । आपणांमागे जगदीशासी । भजत जावे ।।
याकारणे समुदाव। जाला पाहिजे मोहोछाव । हातोपातीं देवाधिदेव। वोळेसा करावा ।।
आता समुदायाकारणे । प्राहिजेती दोनी लक्षणे । श्रोतीं येथे सावधपणे । मन घालावे ।।
जेणें बहुतांस घडे भक्ति । ते हे रोकडी प्रबोधशक्ती । बहुतांचे मनोगत हाती । घेतले पाहिजें ।।
मागा बोलिले उत्तम गुण । तयास मानिती प्रमाण । प्रबोधशक्तीचे लक्षण । पुढे चाले ।।
बोलिण्यासारखे चालणे । स्वये करून बोलणें । तयाची वचने प्रमाणे । मानिती जनीं ।।
जें जें जनास मानेना । तें तें जनहि मानीना। आपण येकला जन नाना । सृष्टीमर्धे ।।
म्हणोन सांगाती असावे । मानत मानत शिकवावे । हळु हळू सेवटा न्यावे । विवेकाने ।।
आपण जी प्रतिज्ञा करतो, त्या प्रतिज्ञेप्रमाणे वागल्याने आपल्यामधील ‘प्रबोधशक्ती’ जागी होते. ‘प्रबोधशक्ती’ म्हणजे इतरांना जागे करायची शक्ती. स्वतःपुरता विचार करणाऱ्यांना इतरांसाठी जगायला शिकवणारी शक्ती. ही ‘प्रबोधशक्ती’ ज्यांच्याकडे आहे, तेच इतरांचा भार घेणारे होऊ शकतात. राष्ट्रसेवेची प्रतिज्ञा घेणाऱ्या प्रत्येकानेच, स्वतःच्या कुटुंबाशिवाय आणखी किमान एका कुटुंबाला स्वतःच्या पायावर उभे राहायला मदत केली पाहिजे. असे करणे म्हणजे ‘मनोगत हाती घेणे’. ज्याची प्रबोधशक्ती जास्ती, तो अनेकांचे मनोगत हाती घेऊ शकेल. आपण सगळ्यांनी मिळून सर्व भारतीयांचे मनोगत हाती घेण्याचा संकल्प करायला हवा.
*****
१. अगत्य – प्रयत्नपूर्वक, २. अवचितें अचानक, ३. मोहोछाव – महोत्सव, ४. वोळेसा – प्रसन्न, ५. रोकडी प्रत्यक्ष अनुभवाला येणारी