२१ विद्याव्रत संस्कार हा प्रबोधिनीच्या शिक्षण-प्रणालीचे मुख्य सूत्र आहे असे आपण म्हणतो. पण तसे वाटत नाही. तो जास्तीचा, नंतर भर घातलेला, उपक्रम वाटतो. (मुख्य सूत्र कसे आहे ते समजावून सांगावे).
उत्तर :- दि. ८ ऑगस्ट १९६२ ला प्रबोधिनीचे शैक्षणिक कार्य सुरू झाले, तेव्हा उत्तम विषय-अध्यापन, सामाजिक जाणीव निर्मितीसाठी विशेष उपक्रम व नेतृत्वगुणविकासासाठी सहली व शिबिरे असे या शैक्षणिक कार्याचे स्वरूप होते. त्यामध्ये क्रमशः साप्ताहिक व दैनंदिन उपासना, पद्य-गायन, भजन, प्रार्थना, दल, वर्षारंभ उपासना, वर्षान्त उपासना व शेवटी विद्याव्रत संस्कार अशी भर पडत गेली. सुरुवातीला काल-सुसंगत व म्हणूनच काळानुसार बदलू शकणाऱ्या गोष्टी सुरू झाल्या. हळुहळू त्यामध्ये काल-निरपेक्ष गोष्टींचा समावेश आपण करत गेलो.
गेल्या वर्षी लोकपाल विधेयक आंदोलनानंतर गणेशोत्सवात अनेक ठिकाणी गणपतीच्या मूर्तीला आण्णा हजारेंचा वेष चढवलेला होता. १९७७ साली आणीबाणी संपल्यावर गणपतीला जयप्रकाश नारायणांचे रूप दिलेले होते. १९६५ च्या युद्धानंतर लालबहादूर शास्त्रींच्या वेषातला गणपती ही पाहिल्याचे मला आठवते. सोंड असलेले गणपतीचे रूप त्यात स्थिर होते. वरचे पोशाख बदलले. तसे प्रबोधिनीच्या शिक्षण-प्रणालीत सुरुवातीला सुरू झालेले उपक्रम काळानुसार बदलू शकतील. नंतर प्रकट होत गेलेले (भर घातलेले नाही) उपक्रम विचार – वेगवेगळ्या वेषातील गणपतीच्या मूळ रूपाप्रमाणे स्थिर राहतील.. त्यातील मध्यवर्ती विचार – वेगवेगळ्या वेषातील गणपतीच्या मूळ रूपाप्रमाणे स्थिर राहतील.
सूत्र म्हणजे दोरी. तिला लांबी असते. एक उपक्रम म्हणजे एक बिंदू. त्याला लांबी नाही. म्हणून शिक्षण-प्रणालीचे मुख्य सूत्र म्हणून विद्याव्रत-वर्षारंभ-वर्षान्त अशा तीन उपासनांचा एकत्र विचार करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. या तीन उपासना म्हणजे जणू वाहनाची चॅसी (chassis) आहेत व इतर उपक्रम जणू वाहनाच्या अॅक्सेसरीज (accessories) आहेत. चॅसीवरील क्रमांक बदलत नाही तोपर्यंत अॅक्सेसरीज कितीही बदलल्या तरी वाहन तेच आहे असे मानतात. तसे या तीन उपासना केवळ कर्मकांड म्हणून नाही, तर त्यांच्या आशयासह स्थिर आहेत तोपर्यंत
इतर उपक्रम बदलले तरी ती प्रबोधिनीची शिक्षणप्रणाली आहे.