२२ : बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी प्रशाला ही कल्पना आता कालबाह्य झाली आहे का ?
उत्तर :- प्रबोधिनीत बुद्धिमान विद्यार्थ्यांची प्रशाला सुरू झाल्यावर १) बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास, २) बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या चारित्र्यगुणांचा (प्रबोधिनीच्या घटनेत दिलेल्या गुणांचा) विकास आणि ३) बुद्धिमान विद्यार्थ्यांचे समान बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांबरोबर बौद्धिक शिक्षण व सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांबरोबर समूहजीवनाचे शिक्षण, अशी किमान तीन शैक्षणिक उद्दिष्टे निश्चित होत गेली. प्रथम या तीन ही उद्दिष्टांनुसार झालेल्या कामाचे वृत्त-लेखन व त्यातून हस्तपुस्तिकेची निर्मिती झाली पाहिजे. त्या हस्तपुस्तिकेनुसार आणखी एखाद्या ठिकाणी बुद्धिमान विद्यार्थ्यांची प्रशाला एखाद्या वेगळ्या गटाने चालवल्याशिवाय ही कल्पना कालबाह्य झाली आहे की नाही हे ठरवता येणार नाही.
बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त व तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता अशी सुरुवातीची कल्पना होती. आता त्यात भाषिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता व सर्जनशील बुद्धिमत्ता या बुद्धीच्या वेगळ्या पैलूंची भर पडली आहे. बुद्धीच्या या सर्व पैलूंना गवसणी घालणारी शिक्षण-प्रक्रिया प्रबोधिनीतही अजून पूर्णपणे मांडायची आहे. ही मांडणी पूर्ण होईपर्यंत प्रशालेचा प्रयोग कालबाह्य झाला आहे असे मी म्हणणार नाही.