प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक ११

११ : चांगले नागरिक घडवणे हे प्रबोधिनीचे उद्दिष्ट आहे का ?

उत्तर :- मला एकदा रोटरी क्लबतर्फे योजलेल्या युवकांच्या नेतृत्व विकसनाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये बोलवले होते. तिथे मी ‘चांगल्या नागरिकांमधूनच चांगले नेते कसे घडतात’ यासंबंधी बोलावे अशी त्यांची अपेक्षा होती. ‘नेतृत्वाची जबाबदारी घेऊ शकतील असे कार्यकर्ते घडवणे’ ही भाषा आपल्याला प्रबोधिनीत समजते. सर्वसाधारण समाजामध्ये नागरिक हीच संकल्पना समजते. भाषण इंग्रजीत करायचे होते. त्या भाषणात subjects (प्रजाजन), ordinary citizens (नागरिक), enlightened citizens (प्रबुद्ध नागरिक) आणि leader citizens (नेते) अशा चार पायऱ्या मी मांडल्या होत्या. प्रबोधिनीचे काम सुरू झाले तेव्हा शासनावर अवलबून राहणाऱ्या प्रजाजनांमधून स्वावलंबन हे मूल्य मानणारे नागरिक साधारण शिक्षण संस्था घडवतील असे गृहीत होते. त्यामुळेच ‘प्रबोधिनी म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांचे शिक्षण देणारी सामान्य प्रतीची शिक्षणसंस्था नव्हे’ अशी प्रबोधिनीच्या घटनेची सुरुवात केलेली आहे. स्वावलंबी नागरिकांमधून प्रबुद्ध नागरिक म्हणजेच कार्यकर्ते घडवणे हे प्रबोधिनीचे मध्यंतर उद्दिष्ट आहे. परंतु प्रबोधिनीचे काम जसे वाढत गेले आहे तसे अनेक ठिकाणी आपल्या उद्दिष्टाकडे जाण्याची पूर्वतयारी म्हणून स्वावलंबी नागरिक बनवण्याचे कामही आपल्याला करावे लागत आहे. संघटना जेवढी व्यापक होईल तेवढे हे पूर्वतयारीचे काम आपल्याला अधिकाधिक करावे लागेल अशी चिहे दिसत आहेत. परंतु ते प्रबोधिनीचे उद्दिष्ट नाही. परिस्थितीला प्रतिसाद देणारे, जबाबदारीने, एकजुटीने, कल्पकतेने व इतरांना आपल्यासारखे काम करण्याची प्रेरणा देत परिस्थितीच्या आवश्यकतेप्रमाणे नेतृत्व करतील असे कार्यकर्ते घडवणे हे प्रबोधिनीचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे.