प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक १२

१२ : प्रबोधिनीचे काम करण्यासाठी बुद्धिमत्ता हा घटक किती आवश्यक किंवा महत्त्वाचा आहे ?

उत्तर :- भारतीय परंपरेत गायत्री मंत्राला अत्यंत महत्त्व आहे. या गायत्री मंत्राची उपासना सगळ्यांनी करावी असे आपण म्हणतो. गायत्री मंत्रात ‘बुद्धीला प्रचोदना मिळो’ अशी प्रार्थना आहे. त्यामुळे फक्त प्रबोधिनीच्या कामात नाही तर व्यक्तिगत आयुष्यात आणि राष्ट्रजीवनातही बुद्धिमत्ता हा घटक आवश्यक व महत्त्वाचा आहे.

प्रश्न विचारताना ‘कमी बुद्धिमत्ता असेल तर प्रबोधिनीचे सदस्यत्व नाही’ या अर्थाने आवश्यक किंवा महत्त्वाचा घटक असे प्रश्नकर्त्याच्या मनात आहे हे बोलताना लक्षात आले. असलेली बुद्धिमत्ता जास्तीत जास्त वापरण्याची व त्या वापरातून स्वतः अधिकाधिक काम करायला सक्षम होण्याची मानसिक तयारी असणे, त्यासाठी लागणारे धैर्य व चिकाटी वाढवण्याची तयारी असणे हे प्रबोधिनीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी व टिकवण्यासाठी जास्त आवश्यक आहे. किती व कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे हे विशिष्ट कामांसाठीच कदाचित निर्णायक असेल. एकूण प्रबोधिनीच्या सदस्यत्वासाठी त्याची गरज नाही.