तत्त्वसप्तक समारोप

सिंहावलोकन

ज्ञान प्रबोधिनीच्या वैचारिक भूमिकेची काही मांडणी आधीच्या सात प्रकरणांमधून करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ‘धर्मसंस्थापना’ हे व्यापक ध्येय म्हणून मांडलेले आहे. धर्मसंस्थापना याच अर्थ अध्यात्मप्रधान संस्कृतीसाठी अनुकूल अशी समृद्ध, मूल्यसंपन्न आणि न्यायाधिष्ठित समाजरचना घडविणे असा केलेला आहे. यासाठी म्हणून ‘हिंदू जीवनदृष्टी’ आणि ‘जनी जनार्दन ऐसा भाव’ यांचे विवेचन केलेले आहे. ‘हिंदू जीवनदृष्टी’ मध्ये हिंदू संस्कृतीतील ईश्वरविषयक, जीवनविषयक, विद्या आणि अविद्या या दोन साधनांसंबंधित, राष्ट्रसंबंधित, सहजीवन आणि समाजरचनाविषयक नि व्यक्तिविषयक धारणा स्पष्ट केल्या आहेत. समतेवर आधारलेल्या, प्रयत्नवादी, पुरुषार्थी, रसमय, आनंदमय जीवनाची साधना या सर्व धारणांमुळे कशी शक्य होते ते पहिले आहे. ‘जनी जनार्दन’ मध्ये विकासाची संधी न मिळालेल्या दलित, पीडित, आर्त जनांची सेवा करणे, त्यांच्या विकासाला अनुकूल वातावरण निर्माण करणे कसे आवश्यक आहे, ज्ञान प्रबोधिनीने या पूर्वी या संबंधात काय केले आहे, उद्या काय करायचे आहे, त्यासंबंधी लिहिले आहे. शिवभावाने जीवसेवा करायची आहे, ‘मी कर्ता’ ही भावना सोडून, अहं विसर्जन करून, लीनभावाने सेवा करायची आहे असेही म्हटले आहे.

पुरुषार्थाने आणि सेवेने समाजाचे रूप पालटायचे आहे म्हणून त्यासाठी ‘संघटना’ आणि ‘विकास’ ही साधन-तत्त्वे म्हणून स्वीकारलेली आहेत. ज्ञान प्रबोधिनी ही संचाधारित (cadre-based) संघटना आहे. अशा संघटनेची कार्य-पद्धती, संकेत, पथ्ये इत्यांदीचा विचार ‘संघटना’ या विषयावरील लेखात केलेला आहे. ‘विकास’ या लेखात राष्ट्रीय विकासाची क्षेत्रे, संघटनेचा विकास, कार्यकर्त्यांचा विकास आणि या दोन्हीची परस्परपूरकता यांचे विवेचन केले आहे. त्या नंतर प्रबोधिनीच्या कार्याचे दोन स्थायी दृष्टिकोन म्हणून ‘उत्तमता’ आणि ‘विज्ञानाभिमुखता’ यांचा विचार केला आहे. उत्तमतेचा सामाजिक संदर्भ, समता, समान संधी, विकासाची संधी ज्यांना शतकानुशतके मिळालेली नाही अशा ‘नाही रे’ वर्गाला विकासाची विशेष संधी- अशा बहुविध संबंधित गोष्टींची चर्चा केली आहे. प्रारब्धवाद, अंधश्रद्धा, अकर्मण्यता बळावू नये यासाठी विज्ञानाभिमुख दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. शुद्ध विज्ञान, उपयोजित विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्यविज्ञान या सर्वांची हिंदुस्थानाला अतिशय आवश्यकता आहे; इतकेच नव्हे तर अध्यात्माकडेही वैज्ञानिक दृष्टीने पहिले पाहिजे असा विचार ‘विज्ञानाभिमुखता’ या शेवटच्या लेखात मांडला आहे. प्रत्येक विशिष्ट तत्त्वाच्या संदर्भात ज्ञान प्रबोधिनीने केलेल्या उपक्रमांचेही उल्लेख काही ठिकाणी आले आहेत. ‘धर्मसंस्थापने’च्या संदर्भात उपक्रमांचा फारसा उल्लेख नाही. कारण ते कोण्या एका संघटनेपुरते मर्यादित ध्येय नाही, व्यापक ध्येय आहे. भौतिक समृद्धी, मूल्यांची प्रतिष्ठापना, दैनंदिन उपासना, ‘उपास्यानां अनियमः’ आणि कंटकांचे निर्दालन या समाज बांधणीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी सर्वच स्वयंसेवी संघटनांनी, शासनाने आणि लोकांनी मिळून करायच्या आहेत. हिंदू जीवनदृष्टी ही प्रत्यक्ष आचरणातून, कृतीतून औपचारिक, अनौपचारिक शिक्षणातून, लोकशिक्षणातून घडणार आहे. हे उपक्रम करताना या दृष्टीची जाण कार्यकर्त्यांना असावी म्हणून त्यासंबंधीचे विवेचन केले आहे. ‘जनी जनार्दन’ पासून ‘विज्ञानाभिमुख’ तेपर्यंतचा तत्त्वविचार हा अधिक मूर्त आणि उपक्रमसंबंधित आहे.

ध्येय, तत्त्व, त्यांचे उपयोजन आणि तत्संबंधित दृष्टिकोन असे मिळून जीवनप्रणाली- weltanschuing वेल्टान्शुंग निर्माण होते. ज्ञान प्रबोधिनीत जीवनप्रणालीची निर्मिती व्हावी असे कै. आप्पांना वाटत होते. ते त्या संबंधी वेळोवेळी बोलत असत. त्यांचे स्वतःचे जीवन प्रयोगमय होते. विविध लेखनांतून, व्याख्यानांतून, कवनांतून त्यांनी विचार, कल्पना मांडल्या होत्या. प्रबोधिनीला मार्गदर्शक ठरतील अशा तत्त्वांचे प्रतिपादन केले होते, त्यांचे चिंतन आणि त्यांच्यानंतर ज्ञान प्रबोधिनीचे दायित्व सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांचे चिंतन हे सुसूत्र रूपात या ग्रंथात मांडण्याचे साहस केले आहे.

मौन राखणे सोयीचे, सोपे असते. एकदा तुम्ही मांडणी करायला बसलात की आक्षेप, आणि प्रतिवाद हे येतातच. परंतु ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ अशा विश्वासाने आणि मोकळेपणाने ही मांडणी केली आहे. कारण त्यामुळे विचाराला आणि कृतीला नेमकेपणा, स्पष्टता आणि दिशा येईल असे वाटते. प्रत्यक्ष लेखांमध्ये ज्यांचा परामर्श घेता आला नाही अशा काही मुद्द्यांचा विचार या समारोपात्मक लेखात केला आहे.

उपासना न करण्याचेही स्वातंत्र

‘धर्मसंस्थापने’ मध्ये ‘उपास्यानां अनियमः।’ असे एक तत्त्व आहे. सगुणाची उपासना करा वा निर्गुणाची करा, या दैवताची करा किंवा त्या दैवताची करा, त्याचे स्वातंत्र्य आहे एवढ्यापुरताच त्याचा अर्थ मर्यादित नाही. एखाद्याला कोणतेच उपास्य दैवत नको असेल, चार्वाकाप्रमाणे तो नास्तिक वा इहवादी असेल किंवा अज्ञेयवादी असेल तर त्याला उपासना न करण्याचेही स्वातंत्र्य आहे हे ‘उपास्यानाम् अनियमः’ मध्ये गृहीत धरले आहे.

सध्या कै. बाबासाहेब आंबेडकरांच्या रामायणावरील टीकेमुळे (रिडल्स इन रामायण) बरेच वादळ उठले आहे. ही टीका विपर्यस्त आहे हे खरे असले तरी आंबेडकरांचा मोठेपणा त्यामुळे कमी होत नाही. त्यांच्या व आता त्यांच्या अनुयायांच्या असहिष्णुतेचे कारण जाणून ती दूर केली पाहिजे असे ज्ञान प्रबोधिनीला वाटते.

नवीन समाजरचनेचा पाया

सुप्रसिद्ध विचारवती श्रीमती विमलाताई ठकार यांनी साम्यवादासंबंधी एक महत्त्वाचा विचार मांडला आहे, तो प्रबोधिनीला ग्राह्य वाटतो. साम्यवादाने स्वतःला जडवादाशी बांधून घेतले आणि विरोधविकास हा एकच विकासाचा मार्ग मानला म्हणून साम्यवाद भारतीय विचारसरणीत स्वीकारार्ह ठरला नाही. चैतन्यवाद आणि बहुविध प्रकारे विकास जर साम्यवादाने मानला असता तर तो विश्वकुटुंबवाद झाला असता. या शतकातील वैज्ञानिक संशोधनामुळे जडवाद कोसळू पाहात आहे. त्यावर आधारलेल्या तत्त्वज्ञानांच्या प्रभावाचा काळही मागे पडणार आहे अशी चिन्हे दिसू लागली आहेत. विज्ञानधिष्ठष्ठित चैतन्यवाद, अध्यात्मवाद (scientific spiritualism) आणि त्यावर आधारित समाजरचना ही आगामी एकविसाव्या शतकाला अनुकूल समाजरचना आहे अशी प्रबोधिनीची धारणा आहे.

कार्यकर्त्यांचे व्यासपीठ

अणुयुद्धाचे भय, परकीय आक्रमणे, अंतर्गत फुटीरता, भ्रष्टाचार, विषमता, स्त्रियांवरील अत्याचार, धार्मिक असहिष्णुता, अंधश्रद्धा, अफाट वाढती लोकसंख्या असे हिंदुस्थानापुढे भेडसावणारे कित्येक प्रश्न आहेत. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे Man-making and character-building मनुष्य घडणीचे, चारित्र्य घडणीचे शिक्षण, संघटितरीत्या काम करण्याची सिद्धता, हेच या प्रश्नांच्या सोडवणुकीचे मूलगामी मार्ग आहेत. तथापि शिक्षण आणि संघटन हेही पुरणार नाही. महात्माजींनी उभरली तशी विराट लोक आंदोलने या प्रश्नांवर करावी लागतील; वादळी वारे वाहातील असे प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी तशा तपस्येचे, कुवतीचे, वक्तृत्त्वाचे, कर्तृत्त्वाचे, आत्मबलाचे, लक्षावधी लोकांचे नेतृत्व करू शकतील असे झुंजार, कणखर आणि पोटी करुणा असलेले स्त्री-पुरुष नेते, कार्यकर्ते निर्माण व्हावे लागतील. प्रबोधिनी ही अशा कार्यकर्त्यांचे ध्यासपीठ व्हावे अशी मनीषा आहे.

विविध संघटनांशी सहकार्य

देशातील आणि विदेशांतीलही विविध संघटनांशी सहकार्य करून मोठमोठी लोकशिक्षणाची, लोकहिताची कामे करायला हवी आहेत. आपल्या समाजासाठी काही काम करायचे आहे ह्या एका मुद्द्यांवर जरी एकमत असले तरी ख्रिस्तीमिशनऱ्यांबरोबरही एकत्र काम करायला ते पुरेसे आहे. मतभेदांवर भर न देता ऐक्यावर भर देऊन आप्पांनी मिशनरी मंडळींसमवेतही कामे केली. मुलांना वेगवेगळ्या विचारसरणींची ओळख करून देण्यासाठी समाजवादी, साम्यवादी, गांधीवादी, सर्वोदयी अशा सर्व मंडळींनाही ते आवर्जून बोलावत. Building bridges across different denominations विविध संघटना, मतप्रवाह, पंथ, पक्ष यांच्यात स्नेहाचे, ऐक्याचे, एकत्रित कार्याचे सेतू बांधणे हे ज्ञान प्रबोधिनीचे स्वीकृत कार्यच आहे. मौलाना अबुल हसन अली नदवींसारखे थोर मुस्लिम विचारवंत पुण्याला आले की प्रबोधिनीच्या मुलांना भेटण्यासाठी आवर्जून येतात आणि प्रबोधिनीचे मित्र श्री. अनीस चिस्ती हे त्यासाठी आवर्जून डॉ. ताम्हनकरांना दूरभाष करतात. हे एक बोलके उदाहरण आहे.

सांस्कृतिक सेतुबंधन

तुम्ही पैगंबरांची उपसानन करता की येशूची करता की गणपतीची याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. पण या देशात राहणारे सर्वच उपासक येथे सहस्त्रो वर्षे चालत आलेल्या संकृतीचे घटक आहेत. त्या संकृतीचे नाव भारतीय अथवा हिंदू संकृती आहे. भारताबाहेरील हिंदू हेही सांस्कृतिकदृष्ट्या हिंदू आणि राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने त्या त्या राष्ट्राचे असे मानले पाहिजे. भारतातील ख्रिस्ती आणि मुसलमान हे सांस्कृतिकदृष्ट्या हिंदू आहेत अशी प्रबोधिनीची भूमीका आहे. ख्रिस्ती समाजातील तीन विचारवंत व्यक्तींनी याच प्रकारची मते व्यक्त केली आहेत. त्यांपैकी पहिले म्हणजे कवी ना. वा. टिळक यांचे चिरंजीव देवदत्त नारायण टिळक त्यांनी १९६१ मध्ये कै. आप्पांना म्हटले होते की आजपासून ५० वर्षांच्या आत हिंदुस्थानातील सर्व लोक समाजदृष्ट्या हिंदूच होणार आहेत. केरळ मध्ये १९८१ साली जी सर्वधर्म परिषद भरली होती तिचे संयोजक आणि एर्नाकुलम्चे आर्चबिशप श्री. जोसेफ पॅरॅकट्टिल यांनी आप्पांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे : -‘As you have very well pointed out, the Christians in india, especially of Kerala are Hindus culturally and socially. This undeniable fact will go a long way in builiding the bridge of understanding between the two communities.’

‘आपण म्हटलं आहे ते योग्यच आहे. भारतीय ख्रिश्चन, विशेषतः केरळातील ख्रिश्चन हे सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या हिंदूच आहेत ही वस्तुस्तिथी नाकारण्यासारखी नाही. या दोन समाजांमध्ये सामंजस्याचा सेतू बांधण्यासाठी ह्या वस्तुस्थितीचा दूरगामी उपयोग आहे. ‘वसई येथील एक प्रागतिक ख्रिस्ती धर्मगुरू श्री. मायकेल गोन्साल्विस यांनी ‘नम्रता’ या मासिकात लिहिलेल्या एक लेखाचे शीर्षकच असे आहे की ‘आम्ही ख्रिस्तीदेखील हिंदूच आहोत.’ ऋषी विनोबांचे व प्रसिद्ध विचारवंत श्री. प्रभाकर पाध्ये यांचे या संबंधीतील विचार ‘हिंदू जीवनदृष्टी’ या प्रकरणात आलेले आहेतच. सर्व पंथांमधील जाणकार, प्रगल्भ व्यक्तींना याची जाणीव आहे की भारतीय किंवा हिंदू संस्कृती ही आसेतुहिमाचल सर्व भारतीयांच्या रक्तातच आहे. काहींनी पंथ बदलला किंवा त्यांना सक्तीने बदलावा लागला तरी ते संस्कार पुसले गेलेले नाहीत आणि जाऊ शकणार नाहीत. या सांस्कृतिक वस्त्राचे आडवे उभे धागे श्रीराम आणि श्रीकृष्ण आहेत असे डॉ. राम मनोहर लोहियांनी म्हटले आहे. सहिष्णुता हा या वस्त्राचा पोत आहे. राष्ट्रभक्तीचा रंग अद्याप त्या वस्त्राला पुरेसा लागायचा आहे. त्यासाठी शिक्षणाद्वारे प्रयत्न व्हावयास हवे आहेत.

देशासाठी मरणे वा जगणे

राष्ट्रभक्ती आणि स्वदेशप्रीती हे जीवनमूल्य ज्ञानप्रबोधिनीला अत्यंत महत्त्वाचे वाटते. स्वातंत्र्यपूर्व काल, त्यातील प्रेरणा, देशभक्तांची बलिदाने यांची विलक्षण उत्कट वर्णने आप्पा करीत असत. चाफेकर बंधूंवर एक चित्रपटही काढण्याची त्यांची मनःपूर्वक इच्छा होती.’हे काय बंधु असतो जरि सात आम्हीत्वत्स्थंडिलिच असते दिधले बळी मी’असे ऊर्जस्वल काव्य लिहिणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची कित्येक कवने त्यांच्या बोलण्यातून वारंवार उद्धृत होत. मृत्यूपूर्वी काही महिने त्यांनी केलेल्या भाषणात कवी गोविंदांच्या एक कवनात थोडा बदल करून म्हटले होते.

‘मज तानाजीच्या दे मरणा

मज वीरबाजीच्या दे निधना’

देशासाठी स्वातंत्र्यपूर्वक कालात मरणे आवश्यक होते तर स्वातंत्र्यानंतरच्या कालात स्वदेशाच्या उत्कर्षाकरिता देह झिजवणे, जीवन समर्पण करणे आवश्यक आहे अशी आवाहने ते करीत. प्रबोधिनीच्या गीतांमधूनही देशभक्तीची उत्कट भावना पुनःपुन्हा व्यक्त होते. केवळ बौद्धिक बांधिलकी Intellectual commitment ही श्रेष्ठ कार्यासाठी पुरत नाही. त्यासाठी उत्कट भावनेचीही आवश्यकता असते. ती उदात्त भावना विद्यार्थ्यांमध्ये जागविण्याचा प्रयत्न प्रबोधिनीत असतो, आणखी असायला हवा आहे-

स्फटिकवत् जीवन

कोणत्याही व्यक्तीचे भावजीवन हे एखाद्या स्फटिकाप्रमाणे असते. त्याला काही बीजगत गुणधर्म, गाभा nucleus असतो. ज्या वातावरणात ती व्यक्ती राहते ते वातावरण स्फटिक-बीजाभोवतीच्या रसायनासारखे असते. त्या वातावरणात तो स्फटिक बीजानुकूल संस्कार ग्रहण करत जातो. विशिष्ट आकार धारण करत जातो. कार्यकर्त्यांच्या बीजगुणांमध्ये, गाभ्यात श्रद्धा आणि भक्ती असली पाहिजे. या गाभ्याभोवती त्याचा विकास झाला पाहिजे, भावनांचे अनेक रंग त्यात उमटले पाहिजेत, कर्तृत्वाला पैलू पडले पाहिजेत. या स्फटिकात शुद्ध रसायने असतील याची काळजी घेतली पाहिजे. व्यक्तिमत्त्वाला घनता येण्यासाठी, कणाकणाने संचय होण्यासाठी स्फटिकबीजाला रसायनात दीर्घकाळ स्थिर राहावे लागते. मनोविश्व सारखे डहुळते राहिले तर संचय होणार नाही. विकार, हीनभावना, अहंकार यांनी व्यक्तीचे भावजीवन गढूळलेले असू नये. गाभ्यात जर श्रद्धाभक्ती असेल तर व्यक्तिमत्त्वात मलिनता येण्याचा संभव कमी राहतो. अशा स्फटिकवत् विकसित झालेल्या व्यक्तींची संघटना प्रबोधिनीत व्हावी अशी अपेक्षा आहे. बुद्धीच्या मर्यादा ध्यानात आणून देताना स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे-

बुद्धी आणि भावना

‘बुद्धी आणि तर्क यात काय आहे? … त्यांची धाव फार मर्यादित आहे; पण हृदयात मात्र स्फूर्तीचा उचंबळता झरा आहे. म्हणून हृदयाला सर्वाधिक महत्त्व आहे. देव भावाने भेटतो, बुद्धीने नाही! बुद्धी फार तर आपल्यापुढचा मार्ग मोकळा करते. तिचे कार्य पोलिसासारखे आहे. पण पोलीस हे काही समाजाचे अनिवार्य अंग नव्हे. पोलीस गुन्हा करू देणार नाही, गोंधळ माजू देणार नाही. बुद्धीचेही काम एवढेच आहे. बुद्धीला डोळे नाहीत, हात आणि पायही नाहीत. ती स्वतःहून काहीच करू शकत नाही. भावना ही खरोखर चैतन्यमयी आहे. भावना विजेहून अधिक वेगाने काम करते. म्हणूनच कोणतीही गोष्ट तुमच्या हृदयाला जावून भिडते का हा खरा प्रश्न आहे.

बुद्धीची आवश्यकता आहेच. ती नसेल तर आपण चुका करू, धडपडू, ठेचाळू. पण चुका टाळणे यापलीकडे बुद्धीचे काही काम आहे असे समजू नका. तिची मदत आहे, पण ती निष्क्रिय. तिचे स्थान दुय्यम. खरे काम तर भावनेनेच आहे-हृदयाचेच आहे.

‘म्हणून प्रबोधिनीत बुद्धिगुणांच्या विकासाबरोबरच भावनांचा परिपोष महत्त्वाचा मानला आहे. कोणत्याही संघटनेत तो आवश्यक आहे असे वाटते.

प्रबोधिनीला काय करायचे आहे ?

ज्ञान प्रबोधिनीला काय करायचे आहे? हिंदुस्थानात जे अविकसित समाज आणि वर्ग आहेत त्यांच्यातून त्या समाजासाठी झटणारे चारित्र्यवान, दूरदर्शी, राष्ट्रहितैषी आणि विधायक असे नेतृत्व उभे राहावे, त्या नेतृत्वाने आपल्या समाजाचे तर प्रश्न सोडवावेतच आणि राष्ट्रीय प्रश्नांबाबतही महत्त्वाचे योगदान करावे असे प्रबोधिनीचे स्वप्न आहे.

विकसित आणि सुस्थितीतील जो वर्ग आहे त्यातील युवशक्ती आत्मसंतुष्ट, स्वार्थपरायण न राहता तिने ‘नाही रे’ साठी काम करावे, राष्ट्रीय प्रश्नांची मोठी आव्हाने पेलावीत असे शिक्षण त्यांना दयावयाचे आहे. देशभरातील लोकशक्ती संघटित करायची आहे. आंदोलनात्मक किंवा विधायक मार्गाने या देशात विचारांचे आणि विकासकार्याचे प्रबोधन करायचे आहे. निवडक विद्यार्थ्यांपासून सुरुवात करून विराट लोकसमूहांना हलविणारे, चैतन्य देणारे कार्य करून दाखविणे हे काळाने समोर ठेवलेले आव्हान आहे. यात सहस्रावधी तरुण, कर्तृत्वशाली जीवनांचे समर्पण आवश्यक आहे. एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत असे म्हणतात आणि प्रबोधिनीला तर शेकडो तेज तलवारी-प्रखर बुद्धिप्रतिभेच्या एका म्यानात नांदवायच्या आहेत. त्यासाठी भक्ती या पाचव्या पुरुषार्थसिद्धीची आवश्यकता आहे. आपण भगवत्रशक्तीच्या हातीचे साधन आहोत असा भाव, अशी शरणता आवश्यक आहे. बुद्धी आणि शरणता हे दर्शनी द्वैत दिसते. पण मोठमोठ्या व्यक्तींनी या विरुद्ध गुणांचा संगम स्वतःच्या ठायी घडविलेला दिसतो. स्वामी विवेकानंद हे याचं गेल्या शतकातील तेजस्वी उदाहरण आणि रामकृष्ण मिशनचे स्वामी रंगनाथानंद हे सदय शतकातले.

रामकृष्ण मठाने समर्पित संन्याशांची संघटना सेवाकार्यार्थ, शिक्षणकार्यार्थ निर्माण केली आहे. जेझुइटांनी धर्मप्रसारार्थ अनुशासनबद्ध संन्यासी संघटना बांधली तिचा इतिहास सुमारे चारशे वर्षांचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सर्वसामान्य माणसात देशभक्ती जागृत करण्याचा प्रयत्न गेली साठ वर्षे केला आहे. सर्वोदय समाजाचा विचार केला तर विकेन्द्रित पद्धतीने ठिकठिकाणी काम करत असलेले कार्यकर्त्यांचे अनेक गट दिसतात. शेतकरी संघटनेने गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सात-आठ प्रांतातील बराच मोठा शेतकरी वर्ग उभा केला आहे. या संघटनांचा विचार केला तर संचाधारित, विकेन्द्रित आणि प्रवाही असे तीन प्रकार दिसतात. तीनही प्रकारे प्रभावी काम होऊ शकते असे दिसते.

रूप पालटू देशाचे !

ज्ञान प्रबोधिनीत सर्वच प्रकारचे कार्यकर्ते असतील. विवाहित असतील, विरागी असतील, सवेतन असतील, निर्वेतन असतील, साध्या वस्त्रातील असतील, शुभ्रवस्त्रातील असतील, प्रौढ असतील, युवा असतील, स्त्रिया असतील, पुरुष असतील पण सर्वांच्या अंतर्यामी ध्यास मात्र एकच असेल की ‘रूप पालटू देशाचे.’ विविध प्रकृत्तींच्या, प्रवृतींच्या विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी ज्ञान प्रबोधिनी हे देशसेवेचे महत्त्वाचे माध्यम होऊ शकेल. हिंदुस्थानातील विविध संघटनांबरोबर येथे देशप्रश्नांवर सहचिंतन होऊ शकेल. परस्पर मतभेद बाजूला ठेऊन एकत्रित काम करण्यासाठी लोक येथे येतील. येथून हिंदुस्थानात आणि विदेशातही सर्वदूर कार्यकर्ते जातील, आणि स्वतःच्या प्रतिभेने, लोकसंग्राहकतेने, संघटनकुशलतेने तेथील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विविध कार्ये उभी करतील, जातील त्या क्षेत्रात संघटना घडवतील असे स्वप्न आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे-

-‘A hundred thousand men and women, fired with the zeal of holiness, fortified with eternal faith in the Lord, and nerved to lion’s courage by their sympathy for the poor and the fallen and the downtrodden, will go over the length and breadth of the land preaching the gospel of salvation, the gospel of help, the gospel of social raising-up, the gospel of equality.’

‘पावित्र्याच्या तेजाने तळपणारे, ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेले, मृगेंद्राचे सामर्थ्य नसांत स्फुरत असलेले, दीनदलितांबद्दल हृदयात अपार करुणा असलेले सहस्रो युवक-युवती हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र संचार करतील; मुक्ती, सेवा आणि सामाजिक उत्थानाचे आणि सर्व प्रकारच्या समानतेचे आवाहन ते करतील आणि हा देश पौरुषाने मुसमुसून उठेल !

चराति चरतो भगः।

हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल का? हे कार्यकर्त्यांच्या जिद्दीवर, स्वतःला कार्यानुकुल वळण देण्याच्या क्षमतेवर, अडचणींवर मात करून यशस्वी होईनच अशा मनोबलावर, कर्तुत्त्वावर अवलंबून आहे. आजवरच्या कार्याच्या वाटचालीत ते कमी पडलेले नाही, पण उद्याच्या वाटचालीसाठी ते शतपट वाढायला हवे आहे.

चराति चरतो भगः ।

जो चालतो त्याचे दैवही चालते.

हे जर खरे असेल तर ज्ञान प्रबोधिनीचा प्रवास गेली २५ वर्षे सतत चालू आहे आणि पुढेही चालू राहणार आहे. मग भाग्य तरी स्वस्थ कसे बसून राहील?

1 thought on “तत्त्वसप्तक समारोप”

  1. गौरी कुलकर्णी

    सेतूबंधन
    लोकशिक्षण
    सहकार्य
    देशसेवा
    बुद्धी आणि भावना
    मनुष्यनिर्मिती
    चारित्र्य निर्मिती
    सेवा
    समर्पण

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *