फार प्राचीन काळी भारतीयांनी बाह्य सृष्टीवर विजय मिळविण्याचा प्रयत्न चालू केला. त्यानंतर बाह्यसृष्टीबरोबर प्रत्येकाच्या मनाच्या आणि बुद्धीच्या आतील अंत सृष्टीवर विजय मिळविण्याचा प्रयत्न चालू केला. पुढे बाह्य सृष्टीवर विजय मिळविण्याच्या प्रयत्नाकडे दुर्लक्ष झाले व अंतः सृष्टीच्या शोधातच भारतीय समाज रमला. नेमका त्याच काळात आधुनिक विज्ञान व समुद्रप्रवासाच्या साहाय्याने युरोपने बाह्य सृष्टीवर विजय मिळविण्याचा मोठा प्रयत्न चालू केला. आज आता आपल्याला दोन्ही प्रकारच्या प्रयत्नांचे महत्त्व कळले आहे. बाह्यसृष्टीवर विजय मिळविण्याचा प्रयत्न चालू ठेवला नाही, तर पारतंत्र्य, गरीबी आणि अज्ञान वाढते. अंतःसृष्टीवर विजय मिळविण्याच्या प्रयत्न चालू ठेवला नाही तर आयुष्यात असमाधान, दिशाहीनता आणि पोकळपणा जाणवायला लागतो. ज्या समाजात हे दोन्ही एकाच वेळी करायचा उत्साह आहे आणि तसे प्रयत्न चालू आहेत, तिथली माणसे देवमानव बनायच्या दिशेने प्रगती करू लागतात.
पूजनीय आणि रक्षणीय
रौप्यपदक कोणाला ?
हे प्रकट चिंतन लिहित असताना अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूला पहिले रौप्य पदक मिळाले होते. वैयक्तिक क्रीडाप्रकारात पहिले ब्राँझ पदक मिळाल्यानंतर बावन्न वर्षांनी आणखी एका भारतीय खेळाडूला वैयक्तिक क्रीडाप्रकारात पुढचे रौप्य पदक मिळाले. मेजर राज्यवर्धन राठोड यांनी रौप्यपदक मिळाल्यानंतर स्पर्धेच्या वेळच्या स्वतःच्या मनःस्थितीचे ‘मी शंभर वेळा मरण अनुभबले’ असे वर्णन केले आहे. त्याक्षणी त्यांच्या या मनःस्थितीत किती भारतीय सहभागी झाले असतील? नंतरच्या आनंदात अथेन्सला गेलेला सर्व भारतीय संघ, व भारतात बातमी कळत गेली तसे सर्व भारतीय सहभागी झाले. म्हणजे रौप्यपदक मिळवण्याचा सराव एकाने केला, स्पर्धेच्या वेळचा ताण त्यानेच सहन केला, पण आनंद त्याला व सर्व भारतीयांना झाला. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांनाही झाला असेल. छायाचित्र पाहिले नाही तरी नाव ऐकताच हा रौप्यपदक विजेता भारतीय आहे हे कळते. ज्या सगळ्यांना या रौप्यपदकाचा आनंद झाला ते परस्परांशी ज्या नात्याने जोडलेले असतात त्याला म्हणतात राष्ट्रीयत्व. पराक्रम एकाचा पण आनंद राष्ट्रातील सर्वांना.
आपल्याकडे क्रीडा-संस्कृती आहे का ?
ऑलिंपिक स्पर्धा चालू असल्याचे माहीत नाही असेही अनेक जण आपल्या देशात आहेत. चालू असल्याचे माहीत असले तरी त्या स्पर्धाचे महत्त्व वाटत नाही असेही अनेक जण आहेत. तसे सर्वच देशात असतात. स्पर्धा महत्त्वाच्या बाटल्या तरी दरदर्शनवरील प्रक्षेपण पाहणे बातम्या ऐकणे वा वाचणे व नंतर चर्चा करून काही काळाने विसरून जाणे एवढेच महत्त्व त्या स्पर्धांना अनेक जण देतात. जत्रा योजणारे थोडे जण असतात. जत्रेची मजा घेणारे अनेक जण असतात. तसे बहुसख्य भारतीय ऑलिंपिक क्रीडा-जत्रेची मजा लुटत असतात. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धाचे यशस्वी संयोजन हा एक मोठा खटाटोप आहे. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धामध्ये पदकांची लूट करून आणणे हाही एक मोठा खटाटोप आहे. खटाटोप सुरू करून तो पूर्ण करण्यासाठी महत्त्वाकांक्षा, जिद्द, नेमकेपणा, सातत्य, प्रतिभा लागते. क्रीडा-क्षेत्रात हे सर्व गुण प्रकट होत असतील तर आपल्याकडे क्रीडा-संस्कृती आहे असे म्हणता येईल.
जिंकू आणि जगू
युद्धकाळात ‘जिंकू किंवा मरू’ अशी घोषणा गाजते. पण शिवाजी महाराजानी ‘जिंकू आणि जगू’ याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्याने भारताचा इतिहास पालटला. हा इतिहास पालटण्यासाठी महत्त्वाकांक्षा, जिद्द, नेमकेपणा, सातत्य, प्रतिभा हेच गुण शिवाजी महाराजांच्या आयुष्यात प्रकट झाले. त्याबरोबर होती देशभक्ती आणि देवभक्ती. ‘जगायचे कशासाठी?’ याचे उत्तर शोधता शोधता आमचे राष्ट्र ‘जगायचे कसे?’ हे विसरले होते. शिवाजी महाराजांना या दोन्हीची जाण होती. जिंकण्यासाठी ‘जगायचे कसे?’ हे माहीत असावे लागते. जगत असताना ‘जगायचे कशासाठी?’ हे माहीत असावे लागते.
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये अनेक जणांचे उद्दिष्ट किंवा साध्य यश किंवा पदक मिळवणे हे असते. रौप्यपदक मिळाल्यानंतरच्या मेजर राज्यवर्धन राठोड यांच्या काही छायाचित्रांमध्ये ते पदकाचे चुंबन घेताना दिसतात. ज्याची खूप प्रतीक्षा केली ते मिळाल्यावर त्याचे चुंबन घेणे ही आनंद व्यक्त करण्याची पाश्चात्य पद्धत आहे. ऑलिम्पिकचा प्रसार याच पाश्चात्य संस्कृतीच्या साधनांनी केला असल्याने तिचा प्रभाव धोपटमार्गाने जाणाऱ्यांवर होतोच. खूप प्रतीक्षा केल्यानंतर मिळालेली वस्तू मिळाल्यावर ती डोक्याला लावणे हा असाच भारतीय धोपटमार्ग. काही महिन्यांपूर्वी छत्तीसगडचे एक मंत्री नोटांचा गठ्ठा कपाळाला लावताना कॅमेऱ्यात टिपले गेल्याने अडचणीत आले.
पदक देवापुढे ठेवणे ही आनंद आणि कृतज्ञता एकत्र दाखवण्याची भारतीय पद्धत. देवापुढे ठेवलेले प्रसाद म्हणून कपाळाला लावणे हा विवेक. देवापुढे न ठेवता एकदम कपाळाला लावणे, म्हणजे त्यालाच देव मानणे, हा अविवेक. फक्त जिंकूच जिंकू’ असा विचार असला की अविवेक होऊ शकतो. ‘जगायचे कशासाठी ?’ हे माहीत असले की ‘जिंकू आणि जगू’ असा विचार होतो. मग विवेकाने बागणे होते. शिवाजी महाराजांकडे हा विवेक होता.
विवेकाचा आणखी एक प्रकारही आवश्यक
साध्य-साधनाकडे बघायचा भारतीय दृष्टिकोन साधनाला पूजनीय बनवतो. पण जे पूजनीय आहे त्याचे आपणच रक्षण करायचे असते. हे या दृष्टिकोनातून आपोआप कळत नाही. उलट ‘पत्र पुष्पं फलं तोयम्’ या पद्धतीने हे नाही तर ते पूजा साधन, अगदी पान, फूल, फळ, पाणीसुद्धा चालेल अशी आपल्याकडे सोय आहे. त्यामुळे विवेकशक्ती न वापरणाऱ्यांना योग्य साधने आग्रहपूर्वक मिळवायची असतात, आस्थेने सांभाळायची असतात, सर्वतोपरी वापरायची असतात हे उमजत Zihr. साधने पूजनीय असतात. म्हणून आमचे जीवन घडविणारे सर्वात मोठे साधन आमचा देश त्याला आम्ही मातृभूमी म्हणून देवाचे स्थान दिले. पण साधने रक्षणीयही असतात. त्यामुळे आमचा देश या समाजाच्या मालकीचा आहे. वंशपरंपरेने या समाजाचा आहे. तो इतर कोणाचा होऊ देणार नाही असा ठामपणाही आपण दाखविला पाहिजे. पदकांपासून देशाच्या भूमीपर्यंत सर्व गोष्टी समाजाने मिळवल्या पाहिजेत, राखल्या पाहिजेत, वाढवल्या पाहिजेत. त्यासाठी आवश्यक ती गुणसंपदा मिळवणे ही बाह्य राष्ट्रसेवा. सर्व सुघटित राष्ट्र ती करत असतात. त्यांचा विचार ‘जिंकूच जिंकू’ असा असतो. सर्व साधने जोडून ती ईश्वरार्पण करणे व त्या अर्पणातून आपल्यातले दिव्यत्व प्रकट करणे ही आंतरिक राष्ट्रसेवा. बाह्य राष्ट्रसेवेच्या बरोबरीने राष्ट्रातल्या प्रत्येकाची आंतरिक राष्ट्रसेवाही चालली पाहिजे. या दोन्ही प्रकारच्या राष्ट्रसेवेच्या कल्पनेत आपल्या राष्ट्राचे वेगळेपण म्हणजेच राष्ट्रीयत्व किंवा हिंदुत्व आहे.