संघटित समाज हेच राष्ट्राचे शरीर

राष्ट्र म्हणजे परंपरेच्या मध्यवर्ती सूत्राभोवती आणि परस्पर आत्मीयतेच्या नात्याने संघटित झालेला समाज. राष्ट्राच्या आम्हीपणात व्यक्तीचे मौपण विरघळवून टाकायला शिकणे म्हणजे राष्ट्र घडवणे. राष्ट्रापुढे माणसाचा देवमाणूस बनविण्याचे ध्येय असले, असे देवमाणूस बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची परंपरा असली, तरी एखादा समाज जेव्हा आपली आजची स्थिती सुधारण्यासाठी संघटित होतो तेव्हाच त्या समाजाचे राष्ट्र बनते. आजचा हिंदू समाज भारतीय संस्कृतीच्या रूपाने इतिहासाशी जोडलेला आहे. व्यवहार्य अध्यात्माच्या रूपाने भविष्याशी जोडलेला आहे. पण संघटनेच्या रूपाने वर्तमानकाळाशी जोडलेला नाही. आम्ही राष्ट्र आहोत ही जाणीव सर्व स्त्री-पुरुषांमध्ये निर्माण करणे ही राष्ट्रघडणीची गरज आहे.

व्यवहार्य अध्यात्म हे आमच्या हिंदूपणाचे पहिले तत्त्व आहे, त्यातून सर्वांमध्ये ईश्वरी शक्ती पाहण्याची जीवनदृष्टी हे आमच्या हिंदूपणाचे दुसरे तत्त्व आहे. या जीवनदृष्टीतून तयार झालेली सर्व प्रकारची विविधता स्वीकारणारी जीवनपद्धती हे आमच्या हिंदूपणाचे तिसरे तत्त्व आहे. हे अध्यात्म, ही जीवनदृष्टी आणि ही जीवनपद्धती घडवणारी हजारो वर्षांची परंपरा हे आमच्या हिंदूपणाचे चौथे तत्त्व आहे. या सर्वांच्या बळावरच आजचा हिंदू समाज विस्कळीत असूनही त्याला मधून-मधून एक राष्ट्र असल्याची आठवण होते. ही आठवण मनात सदैव ताजी राहण्यासाठी समाज संघटित होणे हे हिंदूराष्ट्र घडविण्याचे पाचवे तत्त्व आहे. या संघटित समाजाने वर्तमानकाळातही समृद्ध, सबळ आणि ज्ञाननिर्मितीत अग्रेसर व्हावे हे राष्ट्रघडणीचे सहावे तत्त्व आहे.

प्रतिकूल परिस्थितीत काही कंद जमिनीखाली सुप्तावस्थेत राहतात आणि हवा-पाणी अनुकूल झाल्यावर त्यांचे अंकुर जमिनीबाहेर येऊन वेगाने वाढू लागतात. आजच्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदुत्वाची पहिली चारच तत्त्वे असल्यामुळे हे राष्ट्र जमिनीखालच्या कंदाप्रमाणे सुप्त अवस्थेत गेले आहे. संघटना आणि सर्व क्षेत्रातील विकास करून हा कंद अंकुरला पाहिजे म्हणजे आधुनिक अर्थाने राष्ट्र बनला पाहिजे.