हिंदुस्थानचे राष्ट्रत्व
प्राण्यांमध्ये प्राण्याना स्वतःची वेगळी ओळख नसते. कोणताही प्राणी त्याच्या प्रजातीचा प्रतिनिधी असतो व्यक्तीच्या बाबतीत मात्र व्यक्ती मानवजातीची केवळ प्रतिनिधी नसते. प्रत्येक व्यक्तीला स्वतःची वेगळी ओळख असते. ‘मी कोण आहे’, मी इतरापेक्षा वेगळा कसा आहे, या ‘मी’पणाची अखंड जाणीव म्हणजे व्यक्तीचे व्यक्तित्व असते. त्याचप्रमाणे एखाद्या समाजाला आपल्या वेगळ्या परंपरेची अखंड जाणीव असणे म्हणजे त्या समाजाचे राष्ट्रत्व आहे. समाज, त्या समाजाची परंपरा आणि तो समाज जिथे पिढ्यान्पिढ्या राहिला ती भूमी या तिन्ही गोष्टी मिळून राष्ट्र बनते.
हिंदुस्थानात कृष्णाला पूजणारे लोक भारतभर आहेत. पण बिहारच्या काही भागात जरासंघाची पूजा करणारेही लोक आहेत. भारतभर रामाची पूजा करणारे लोक आहेत. पण दक्षिण भारतात रावणाचेही भक्त आहेत. वामन अवतारामधे विष्णूने बळीला पाताळात पाठवले. आपल्या देशात विष्णूप्रमाणेच बळीची पूजा करणारेही लोक आहेत. कृष्ण-जरासंध, राम-रावण, विष्णू-बळी ही सर्व आपल्या परंपरेतीलच नावे आहेत. या व्यक्तींच्या काही कृती, काही मते किंवा काही विचार आपल्याला मान्य नसतील, पण या सर्व व्यक्ती आपल्या आहेत असे मानणे व त्यांच्या गुणांचा अभिमान वाटणे म्हणजे परंपरेची अखंड जाणीव.
पृथ्वीराज चौहानने महंमद घोरीचा सतरा वेळा पराभव केला, या त्याच्या पराक्रमाचा अभिमानच आहे. परंतु शत्रू ओळखू न आल्यामुळे त्याला सतरा वेळा सोडून दिले ही त्याची चूकच झाली, असे आज मागे वळून पाहताना म्हणता येते. हजारो रजपूतांनी केसरिया करून हौतात्म्य पत्करले या त्यांच्या शौर्याचा अभिमानच वाटला पाहिजे. परंतु माघार घेऊन त्यांना गनिमी काव्याने लढण्याचे का सुचले नाही असा विचार करण्यामध्ये काही चूक नाही. परंपरेचा अभिमान वाटूनही त्यामधील स्त्री-पुरुषांच्या उणिवा आणि चुका यांचा शोध घेण्यामध्ये आपण त्यांचे मोठेपण अमान्य करत नाही. मोठी माणसेही चुका करू शकतात कारण ती माणसेच आहेत, असा विचार राष्ट्राच्या बाबतीत करावा लागतो.
हिंदू राष्ट्राचा आदर्श काय आहे? प्रत्येकाने आपल्या स्वतःमधील शक्तीचा स्रोत अनुभवावा, इतरांना त्यांच्या त्यांच्यामधील शक्तीचा स्रोत अनुभवायला मदत करावी, हे सर्व शक्तीचे स्रोत वेगवेगळे नसून एकच आहेत हे अनुभवावे, आणि ती शक्ती व्यक्तिगत, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये अधिकाधिक प्रमाणात प्रकट करावी. हा हिंदुराष्ट्राचा आदर्श आहे. व्यवहार्य अध्यात्म मानणाऱ्या सर्व भारतीयांचा हाच आदर्श असला पाहिजे. ही माझी हिंदुत्वाची कल्पना आहे. मी हिंदू आहे. त्यामुळे मला माझे राष्ट्रीयत्व ज्या प्रकारे समजले त्यालाच मी हिंदुत्व समजतो.
एकत्वाचा शोभादर्शक
गतिमान संतुलन
प्रबोधिनीतील अनेक कार्यकर्त्यांचे मित्र असलेले श्री. दिलीप कुलकर्णी कोकणातील कडावळे या गावातून ‘गतिमान संतुलन’ या नावाचे एक मासिक चालवतात. दोरावरून तोल सावरत जाणारा डोंबारी आणि एकचाकी सायकलवर कसरत करणारा कसरतपटू गतिमान संतुलन करत असतात. ते पुढे पुढे जातात म्हणून तोल साबरणे त्यांना सोपे जाते. सराफाकडचा नाजूक तराजू जेव्हा सोन्याच्या दागिन्यांचे वजन दाखवत स्थिर असतो तेव्हा तराजूच्या दांडीचे गतिमान संतुलन आलेले असते. आकाशात दिसणाऱ्या इंद्रधनुष्याची कमान स्थिर दिसते. पण तिथे वातावरणातल्या वायूंचे रेणू आणि धुळीचे कण सतत हालचाल करत असतात. तो ही गतिमान संतुलनाचाच एक नमुना आहे. पृथ्वीवरचे ऋतुचक्र जेव्हा नियमितपणे चालते तेव्हा तिथेही पृथ्वीची गती, हवा, पाणी, उष्णता, थंडी यांचे गतिमान संतुलन झालेले असते. एखाद्या समाजात जेव्हा शांतता व सुव्यवस्था असते व समाजाचा विकासही चालू असतो तिथे समाजाचे गतिमान संतुलन झालेले असते. समाजातील व्यक्ती व व्यक्तींचे लहान-मोठे गट गतिशील असतात. पण त्यांच्या गतींमध्ये असा सुसंवाद असतो की समाजामध्ये स्थैर्याचा अनुभव येतो. असे गतिमान संतुलन टिकवायला अनेकांचे सुजाण प्रयत्न आवश्यक असतात. राष्ट्रघडणीचे किंवा देशाचे रूप पालटण्याचे काम म्हणजे समाजामध्ये गतिमान संतुलन निर्माण करण्याचे कामच करायचे असते.
एकत्वाची विविध रूपे
‘विविधतेत एकता’ ही घोषणा आपण अनेकवेळा ऐकतो. विविध ठिकाणचे प्रवाह एकत्र येऊन भारताची संमिश्र संस्कृती तयार झाली आहे असे अनेक जण मानतात. समाजातील विविध भाषिक, सांप्रदायिक, जातीय, भौगोलिक गटांना एकत्र आणणारे ‘एक ‘एक तत्त्व’ त्यांना शोधावे लागते. हे ‘एक तत्त्व’ सर्व गटांमधील चांगल्या गोष्टींच्या एकत्रीकरणातून तयार झाले आहे असे ते मानतात. त्यांच्या दृष्टीने विविधता आधी आहे. त्यातून एकत्व शोधायचे प्रयत्न करायचे आहेत. विविधतेत एकता शोधणाऱ्यांना गतिमान संतुलन राखण्यासाठी समाजाला, ‘आपापले वैशिष्ट्य धरून ठेवा व एकत्व आत्मसात करा’ असे सांगावे लागते.
या उलट इथे आधी एकत्व आहे, त्यातून विविधता कशी आली हे शोधायचे आहे, असे मानणारे लोक भारताची सस्कृती ‘एकात्म’ आहे, ‘संमिश्र नाही असे मानतात. भारतातील विविधता म्हणजे स्थळ-काळानुसार व नवीन नवीन लोकांशी संपर्क आल्यावर मुळातील एकाच सस्कृतीचे नवीन आविष्कार आहेत असे त्यांना दिसते.
‘पंजाब-सिन्ध-गुजराथ-मराठा द्राविड-उत्कल वंग’ हे एकाच भारतीयत्वाचे विविध अविष्कार आहेत असे भारतीय सस्कृतीत आधी एकात्मता पाहणारे मानतात. या उलट सर्व प्रांतांच्या वैशिष्ट्यांच्या संयोगातून भारतीयत्व निर्माण झाले आहे असे भारतीय संस्कृती समिश्र आहे असे मानणारे म्हणतात.
विविधतेतील एकता शोधणे हे बौद्धिक काम आहे. एकत्वाची विविध रूपे ओळखणे हे भावनिक काम आहे. रामदास दयानंद विवेकानंद अरविंद या प्रखर बुद्धिमान राष्ट्रपुरुषांनी भारतीय संस्कृतीचे एकत्व शोधताना आपल्या मनातील हिंदुत्वाच्या भावनेचाच आधार घेतला आहे. मुळातील एकत्वाचा आधार नेहमीच गतिमान संतुलन साधायला अधिक उपयोगी ठरतो.
सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि आध्यात्मिक राष्ट्रयोग
संस्कृतीमुळे राष्ट्र घडते असे सांगणारा विचार म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवाद. प्रबोधिनीमध्ये आपण भारताची संस्कृती एकात्म आहे असा विश्वास ठेवतो. हा विश्वास अनुभवाने वाढत जातो. प्रांतोप्रांतीचे संत एक भाषा कशी बोलतात, या संतांची भाषा प्रांतोप्रांतीचे लोक आजही कशी प्रमाण मानतात हे अनुभवल्यावर हा विश्वास वाढतो. ज्ञानेश्वरी आणि गीताईचे अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतर कसे झाले आहे हे पाहिले, की हा विश्वास वाढतो. हा सांस्कृतिक राष्ट्रवाद.
वेगळेपणापासून सुरुवात केली की वेगळेपणाचे नवीन नवीन मुद्दे सुचायला लागतात. त्यातून एकता शोधत राहण्याची कसरत खूपच अवघड आहे. एकत्वापासून सुरुवात केली की कोणतेही वेगळेपण आढळले तरी एकत्वाचे आणखी एक रूप म्हणून त्याच्याकडे पाहता येते. या एकत्वाच्या जाणिवेला स्थिर ठेवून समाजाला गतिमान करणे हे ही अवघड काम आहे. हाच आध्यात्मिक राष्ट्रयोग.
सशक्त एकात्म संस्कृती
जिवंत शरीर विविध प्रकारचे अन्नपदार्थ पचवून त्या अन्नरसाला शरीरात जिरवून टाकते. मग त्या खाद्य पदार्थांचे वेगळे अस्तित्व राहात नाही. शरीर अशक्त असले तर मात्र ते अन्नपदार्थ नीट पचत नाहीत. पचवण्याची शक्ती कमी पडली की सात्मीकरणाचे एकसारखे आहे ते एकत्र करण्याचे काम अपुरे राहते. सशक्त समाजाकडे बाहेरून येणारी विविधता पचविण्याची शक्ती असते. त्यातून एकात्म संस्कृतीचे पोषण होते. अशक्त समाजाची विविधता पचवण्याची शक्ती कमी पडते. अशा अर्धवट पचलेल्या अवस्थेत एकात्म संस्कृतीच्या ऐवजी समिश्र संस्कृतीचा भास होतो. निवडणुकांचे राजकारण करणारे लोक पक्षीय स्वार्थासाठी समाजाच्या अशक्ततेचा आधार घेतात, आणि संमिश्र संस्कृती हेच आमचे राष्ट्रीयत्व असे म्हणतात. ज्यांना पाच वर्षांच्या सत्तेपलीकडे, समाजाच्या कायमच्या गतिमान संतुलनाची काळजी आहे, ते समाजाच्या शक्तीचा अंतर्गत स्रोत असलेली एकात्म संस्कृती हेच आमचे राष्ट्रीयत्व आहे असे म्हणतात.