तू संघटनेची देवता आहेस. तुला स्मरून आम्ही असा संकल्प करतो की आम्ही सर्व एकदिलाने राहू. हाती घेतलेले कार्य सिद्धीस नेण्याचा सर्व शक्तीनिशी प्रयत्न करू. व्यक्तीपेक्षा कार्य मोठे असते, हा मंत्र आम्ही सदैव लक्षात ठेवू. आणि त्यानुसार कार्याच्या हितासाठी वैयक्तिक स्वार्थाला तिलांजली देऊ.
हे बुद्धिदायका,
तू सर्व विद्या आणि कलांचा अधिष्ठाता आहेस. आमच्या देशात जीवनाच्या सर्व क्षेत्रांत, सदैव नवीन संशोधन व्हावे, ते ज्ञान समाजाच्या कारणी लागावे आणि त्यातून सर्व समाजाचे जीवन संपन्न आणि समृद्ध बनावे, असा प्रयत्न करण्याची बुद्धी तू आम्हा सर्वांना दे.
हे परमेशा !
तुझ्या पावित्र्याची विटंबना आमच्या हातून कधीही न घडो. विद्येचे व्यसन आणि सत्कार्याचे व्यसन ही दोनच व्यसने आमच्या मनात असोत. अन्य सर्व व्यसनांपासून आम्हाला मुक्त कर, आणि अशाप्रकारे, हा समाज सद्गुणसंपन्नतेकडे वाटचाल करो !