हिंदू जीवनदृष्टी

हिंदुत्व हा ज्ञान प्रबोधिनीच्या स्फूर्तीचा अक्षुण्ण झरा आहे. या शब्दातून सहस्रावधी वर्षे अप्रतिहत वाहात असलेल्या भारतीय परंपरेत नि संस्कृतीत जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे त्याचे संजीवक स्मरण होते. १९५२ मध्ये डॉ. आप्पाजी पेंडसे यांनी लिहिलेल्या ‘विवेकानंद काय म्हणाले?’ या पुस्तकात हिंदुत्वाची चतुःश्लोकी व्याख्या केली आहे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या हिन्दुत्वाच्या तत्पूर्वीच्या व्याख्याकारांच्या व्याख्यांचाही त्यांनी परामर्श घेतला आहे. कै. आप्पांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व हे राजकीय हिंदुत्व नव्हते. सर्व मानव्याला ज्यातून प्रकाश मिळेल अशी एक कल्याणप्रद विचारप्रणाली आणि जीवनदृष्टी त्यांना अभिप्रेत होती. ही प्रणाली भारतात वा हिंदुस्थानात जन्माला आली म्हणून तिला ‘भारतीयत्व’ किंवा ‘हिंदुत्व’ असे नाव मिळाले. आचार्य विनोबा भावे यांनी सहिष्णुतेच्या आधारावर हिंदुत्वाची केलेली व्याख्या पहिल्या प्रकरणात उद्धृत केलीच आहे. साने गुरुजी यांनी भगिनी निवेदिता यांचे काही निबंध ‘राष्ट्रीय हिंदुधर्म’ या नावाने अनुवादित केले आहेत. त्यात हिंदुत्वाची अत्यंत प्रेरणादायी मांडणी केलेली आहे. अद्वैताच्या श्रेष्ठ तात्त्विक भूमिकेवर आधारलेले आणि पाश्चात्त्य जगतातील उपयुक्त आधुनिक विचारसरणी, कार्यपद्धती यांना सामावून घेणारे जयिष्णू हिंदुत्व निवेदितांनी प्रतिपादिलेले आहे. स्वामी विवेकानंदांनी मांडलेल्या Aggressive Hinduism या विचाराचाच तो कल्पक जोमदार आविष्कार आहे. अभ्युदय आणि निःश्रेयसाची उपासना करणाऱ्या या समाजाला प्रमाण मानणे, ही दोन तत्त्वे ज्यांच्या जीवनात प्रत्यक्ष उतरलेली दिसतात, अशा संत आणि वीर स्त्री- पुरुषांना प्रमाण मानणे, त्यांच्या जीवनसंदेशाला प्रमाण मानणे म्हणजे हिंदुत्व. हिंदुत्वाची जीवनदृष्टी कोणती ते ज्ञान प्रबोधिनीच्या वर्षारंभ, वर्षान्त म्हणजे दीक्षाग्रहण, इत्यादी विविध संस्कार पुस्तिकांमधील वेद-उपनिषदातील श्लोकांमधून मांडलेले आहे. प्रस्तुतचे विवेचन हे वर उल्लेखिलेल्या विविध प्रतिपादनांच्या आधाराने केलेले आहे.

हिंदुत्वाची चतुःश्लोकी व्याख्या

स्वर्गवासी डॉ. पेंडसे यांनी केलेली ही व्याख्या समाजनिष्ठेवर – समाजप्रामाण्यावर आधारलेली आहे. तिच्या पहिल्या श्लोकात म्हटले आहे-

सहिन्दुःवेदसंभूता रामकृष्णादिवर्धिता। आत्मापरंपरा यस्य तं जनं यः प्रमाणयेत्।।  (विवेकानंदांचा राष्ट्रधर्म, आवृत्ती चौथी, पृ. ७६)

वेदांमध्ये मूळ असलेली, व्यास, वाल्मिकी, मनू, महावीर, बुद्ध, शंकराचार्य, रामानुज, चैतन्य, बसव, कबीर, तुलसीदास, नानक आदी संतांनी आणि प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण, शिवछत्रपती इत्यादी कालपर्यंत झालेल्या महापुरुषांनी जिचे संवर्धन केले अशी परंपरा ज्या समाजाचा आत्मा आहे, तो समाज किंवा ते लोकच प्रमाण मानतो तो हिंदू.

पुढच्या श्लोकात समाजाला प्रमाण मानणे म्हणजे काय ते सांगितले आहे-

तस्योत्कर्षेस्व-उत्कर्षः गौरवेगौरवं तथा।व्यत्ययेव्यत्ययश्चेति धीः प्रामाण्यमुदाहृतम्।।

या समाजाच्या उत्कर्षात माझा उत्कर्ष, त्याच्या गौरवात माझा गौरव, त्याच्या अवनतीत माझी अवनती, त्याच्या अपमानात माझा अपमान हे तत्त्व शिरसावंद्य करून जीवनयात्रा चालविणे याचे नाव समाजप्रामाण्य बुद्धी. या समाजाची तीन वैशिष्ट्ये यानंतरच्या श्लोकात आली आहेत-

उपास्यानाम् अनियम: साधनानाम् अनेकता।बाह्यसृष्टिजिगीषाच यद्यपीदं भवेत्त्रयम्।।

उपास्य दैवत कोणतेही असू शकते हे पहिले वैशिष्ट्य, साधनांची विपुलता हे दुसरे वैशिष्ट्य आणि इंद्रियांना प्रतीत होणाऱ्या सृष्टीवर विजय मिळविण्याची आकांक्षा हे तिसरे वैशिष्ट्य. ही तिन्ही असली तरी-

अंतःसृष्टिवशीकृत्य साक्षात्कारोऽन्तरात्मनः। प्रधानंलक्षणं यस्या: तामाहुः हिंदुसंस्कृतिम्।।

अंतःसृष्टीवर विजय मिळवून अंतरात्म्याचा साक्षात्कार करून घेणे हे जिचे मुख्य लक्षण आहे तिला हिंदू संस्कृती म्हणतात.म्हणून हिंदुत्व अथवा भारतीयत्व हे कोणत्याही इझम किंवा वाद या स्वरूपात प्रबोधिनीत स्वीकारलेले नसून मूलभूत जीवनदृष्टी म्हणून स्वीकारलेले आहे. या संस्कृतीने, जीवनदृष्टीने जीवनाच्या विविध अंगांबद्दल काय म्हटले आहे ते प्रबोधिनीच्या संस्कार पुस्तिकांमधून जागोजागी उद्धृत केलेले आहे.

या हिंदूभूमीमध्ये, भरतभूमीमध्ये जे अद्वैत तत्त्वज्ञान व योगशास्त्र उदयाला आले ते चैतन्यवादी तत्त्वज्ञान आहे. या तत्त्वज्ञानाने ईश्वरविषयक, जीवनविषयक-, जीवनसाधकविषयक आणि व्यक्तीविषयक जे चिंतन मांडले आहे ते सुसंगत, एकात्म आहे. जीवनाविषयी अशी एकात्म, अद्वैताधिष्ठित भूमिका असणे ही जीवनदृष्टी घेऊन जो समाज आणि ज्या राष्ट्रीय विभूती जगल्या, त्यांची जीवने प्रमाण असणे यात हिंदुत्व सामावलेले आहे. अमुक एक आचार, अमुक एक पोशाख, विशिष्ट उपासना यात हिंदुत्वाला बांधणे इष्ट होणार नाही. आपल्या राष्ट्राची अस्मिता, एकात्मता जोपासण्यासाठी म्हणून काही राष्ट्रीय पोशाख, भाषा वा राष्ट्रीय आचार असणे असे उपयुक्त ठरू शकते पण बहिरंगाच्या या गोष्टी स्थलकालसापेक्ष असतात. जीवनदृष्टी ही या सर्वांहून वर असते. हिंदू जीवनदृष्टीच्या विविध पैलूंचा थोडक्यात परामर्श या लेखात घेतलेला आहे. 

ईश्वरविषयक दर्शन 

ईशावास्योपनिषदातील पुढील श्लोक ज्ञान प्रबोधिनीच्या वर्षारंभ आणि वर्षान्त उपासनेत आलेला आहे-

ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्। तेनत्यक्तेनभुञ्जीथा: मागृधः कस्यस्विद्धनम्।।

या विश्वामध्ये जे काही जीवन आहे ते सर्व परम अशा ईश्वराने व्यापलेले आहे. प्राप्त संपदा त्याला समर्पित करून मग आपण उपयोगात आणावी. दुसऱ्याच्या धनावर वासना ठेवू नये. (ईशावास्य १)

चराचरात एकच ईश्वरत्व भरून राहिलेले आहे हा हिंदू नीतिशास्त्राचा दार्शनिक पाया आहे. आपण मिळवलेली संपत्ती ही केवळ आपल्यापुरती नसून विविध रूपांत नटलेल्या ईश्वराची आहे. त्या रूपांना ती देऊन त्यांचे समाधान झाल्यावर मग आपण संपत्तीचा उपयोग करावा ही श्रेष्ठ नीती आहे. दुसऱ्यांच्या धनावर वासना जाणे हे ईश्वरीय संपत्तीचा अपहार करण्यासारखे आहे. तो अधर्म आहे. ईशावास्यातील या श्लोकातून ईश्वराचे सर्वव्यापी स्वरूप आणि त्या संदर्भात या नीतीचा अर्थ प्रकट झालेला आहे.

ईश्वरविषयक आणखी एक मूलभूत हिंदू धारणा म्हणजे-

एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति                                          (ऋग्वेद .१६४.४६)

ईश्वर एकच आहे. जाणते लोक त्याला भिन्न भिन्न नावांनी संबोधितात. स्वामी विवेकानंदांनी जागतिक धर्म परिषदेत याच तत्त्वाचा उद्घोष करून त्या विराट लोकसमूहाचे मन जिंकले होते. त्यांनी शिवमहिम्नातील पुढील ओळी उद्धृत केल्या होत्या-

रुचीनां वैचित्र्यात् ऋजुकुटिल-नाना-पथजुषाम्।नृणामेकोगम्यस्त्वमसि पयसामर्णव इव।।                        (शिवमहिम्न, ७)

‘ज्याप्रमाणे आकाशातून निरनिराळ्या ठिकाणी पडणारे पाणी अखेर सागराला जाऊन मिळते, त्याप्रमाणे हे परमात्मन्, लोकांच्याकडून निरनिराळ्या मनोभावनांनी अनुसरले जाणारे पूजनाचे विविध असे सरळ वा वक्र मार्ग अखेर तुलाच येऊन पोहोचतात!’

एका सर्वश्रुत सुभाषितातसुद्धा हाच भाव व्यक्त केलेला आहे-

आकाशात्पतितं तोयं यथागच्छति सागरम्।सर्वदेवनमस्कार: केशवं प्रतिगच्छति।।

‘आकाशातून पडलेले पाणी जसे सागराला जाऊन मिळते, तसा सर्व देवांना केलेला नमस्कार शेवटी केशवाला- एकाच परमेश्वराला पोहोचतो.’

गांधीजींच्या आश्रम प्रार्थनेत विनोबाजींनी रचलेली नाममाला आहे-

ओम् तत्सत् श्रीनारायण तू पुरुषोत्तमगुरु तू।सिद्धबुद्ध तू स्कंद-विनायक सवितापावक तू। ब्रह्म-मज्द तू यहवशक्ति तू येशूपिता प्रभु तू|रुद्रविष्णु तू रामकृष्ण तू रहीम-ताओ तू।।वासुदेवगो विश्वरूप तू चिदानंद हरि तू।अद्वितीय तू अकालनिर्भय आत्मलिंगशिव तू।।

भगवान श्री रामकृष्णांचे जीवन म्हणजे या विचाराचे जणू प्रयोगदर्शनच होते. अनेक सुफी संतांच्या काव्यातही असा विचार आलेला आहे. तथापि अन्य कोणत्याही संस्कृतीत एवढ्या स्पष्टपणे हा विचार न आल्याने हा प्राधान्याने हिंदू विचार आहे. 

जीवनविषयक धारणा 

हिंदूंची जीवनविषयक धारणा त्यांच्या ईश्वर विचाराशी सुसंगतच आहे. ईशावास्यातील दुसरा श्लोक कसे जगावे या संबंधीचा आहे.

कुर्वन्नेवइह कर्माणि जिजीविषेत्शतंसमा:।एवंत्वयि न अन्यथा इतोऽस्ति, न कर्म लिप्यते नरे।। (ईशावास्य२)

‘इहलोकी कर्मे करीत करीतच शंभर वर्षे जगण्याची इच्छा धरावी. तुला देहवंताला हाच मार्ग आहे. याहून वेगळा मार्ग नाही. मनुष्याला कर्म चिकटत नाही, फलवासना चिकटते.’ ईशावास्योपनिषदाने शंभर वर्षांचे कर्मपर जीवन सांगितले आहे. स्वतःमधील ईशतत्त्वाचे आणि इतरांमधील ईशतत्त्वांचे प्रकटन करीत शंभर वर्षे जगावयाचे. अहंकर्तृत्त्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद सोडून कर्मे करावयाची. असे कर्म करणाऱ्यांच्या वृत्ती कशा असतात? फलवासना चिकटू द्यायची नाही याचा अर्थ जीवन शुष्क-निरस करायचे का? मुळीच नाही. तैत्तिरीय आरण्यकात म्हटले आहे-

जीवेम शरदः शतम्। नन्दाम शरदः शतम्।संजीवस्याम शरदः शतम्। प्रब्रवाम शरदः शतम्। अदीना:स्याम शरदः शतम्। (तैत्तिरीय आरण्यक४.४२.९३)

‘आम्ही शंभर वर्षे जगू, आम्ही शंभर वर्षे आनंदू, आम्ही शंभर वर्षे अमृतपान करू, शंभर वर्षे विद्योपासना करू, शंभर वर्षे सामर्थ्यपूर्ण राहू.’

ईशावास्योपनिषदातील वरील दोन श्लोकांमध्ये शंभर वर्षे कर्ममय, आनंदपूर्ण जीवन जगण्याची जी आकांक्षा प्रकट झाली आहे, तिच्यामागे ही जाणीव आहे, की परमेश्वर सत्-चित्-आनंदरूप आहे. त्यामुळे आपणामधून घडणारा त्याचा आविष्कारही सत्वपूर्ण, चैतन्यपूर्ण, गतिमय, आनंदमय असला पाहिजे. अभ्युदय आणि निःश्रेयस यांची सिद्धी करण्यासाठी दोन प्रकारच्या साधना हिंदू जीवनप्रणालीत सांगितलेल्या आहेत. ईशावास्योपनिषदातील एका श्लोकात या दोन साधना मांडलेल्या आहेत. हा श्लोक प्रबोधिनीने ध्येयवाक्य म्हणून स्वीकारलेला आहे. 

दोन साधना 

विद्यां च अविद्यांच यः तत् वेद उभयं सह।अविद्ययामृत्युं तीर्त्वा, विद्ययाऽमृतमश्नुते।। (ईशावास्य११)

विद्या म्हणजे अध्यात्मज्ञान, आणि अविद्या म्हणजे भौतिक सृष्टीचे ज्ञान. जो या दोन्हींना जाणतो तो अविद्येच्या-विज्ञानाच्या साहाय्याने इहलोकीचे जीवन पार करून विद्येच्या साहाय्याने म्हणजे आत्मज्ञानाने अमृतत्वाची प्राप्ती करून घेतो.सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांनी ‘हिंदू समाज संघटना आणि विघटना’ या ग्रंथामध्ये आग्रहाने म्हटले आहे की ऐहिक संपत्तीच्याबाबत उदासीनता हिंदू समाजाच्या अवनतीचे एक महत्त्वाचे कारण आहे. ते लिहितात-

शेकडोवर्षे समाजमनात दृढपणे खोल रुतून बसलेली निवृत्ती, शब्दप्रामाण्य, जातीभेद, अस्पृश्यता, व्यक्तिगत मोक्षकल्पना, दैववाद, कर्मकांड इ. अधर्म-तत्त्वे नष्ट करून राष्ट्रनिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र, समता, प्रवृत्तिवाद, प्रयत्नवाद, विज्ञाननिष्ठा, बुद्धिप्रामाण्य, समष्टिधर्म यांचे संस्कार केले तरच त्यातून संघटित आणि समर्थ हिंदूसमाज निर्माण होईल.

वास्तविक हा सर्व ‘अविद्या विचार’ हा अध्यात्मविद्येशी विसंगत किंवा विरोधी नाही. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी म्हटले आहे-

Vedanta offers a religious faith that can have no quarrel with the scientists who work in the laboratory or with the geologists who do research in the history of the physical world, and yet it offers a firm spiritual foundation for the just polity of a new world.

वेदांतावर आधारलेल्या या धर्माचा प्रयोगशाळेत काम करणाऱ्या शास्त्रज्ञांशी किंवा भौतिक जगाच्या इतिहासाचे संशोधन करणाऱ्या भूगर्भशास्त्रज्ञांशी कधीही झगडा नव्हता, आणि तरीही नव्या जगाच्या न्यायाधिष्ठित रचनेला त्याने दृढ आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले आहे.” (Hinduism: Doctrine and way of life-by C. Rajgopalachari, page 101)

फ्रिजॉफ काप्रा हे नामवंत ब्रिटिश पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘ताओ ऑफ फिजिक्स’ या पुस्तकात पौर्वात्य तत्त्वज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील अनेक साम्यस्थळे त्यांनी दाखवून दिली आहेत. पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटले आहे.

They (Physicists) will find that eastern mysticism provides a consistent and beautiful philosophical framework which can accommodate our most advanced theories of the physical world.

हे पुस्तक वाचल्यावर पदार्थविज्ञानवेत्त्यांच्या ध्यानात येईल की भौतिकजगताविषयीचे विज्ञानाचे जे आधुनिकतम सिद्धांत आहेत त्यांची पौर्वात्यतत्त्वज्ञांच्या चौकटीत सुसंगत आणि आशयपूर्णरीतीने मांडणी होऊ शकते.

ओपनहायमर या अणुविज्ञान शास्त्रज्ञाने म्हटले आहे-

The general notions about human understanding … which are illustrated by the discoveries in atomic physics are not in the nature of things wholly unfamiliar, wholly unheard of or new. Even in our culture they have a history and in Buddist and Hindu thought, a more considerable and central place.” (The Science and Common Understanding, 1954)

“अणुविज्ञानाच्या अभ्यासातून मानवी जाणिवेबद्दलच्या ज्या निष्कर्षाप्रत आपण येऊन पोहोचलो आहोत ते अगदी नवीन, कधी न ऐकलेले असे नाहीत. आपल्या संस्कृतीत त्यांचा काही विचार झाला आहे. बौद्ध आणि हिंदू संस्कृतींमध्ये तर त्यांना अधिक महत्त्वाचे, मध्यवर्ती स्थान आहे.”

– त्यामुळे अभ्युदय आणि निःश्रेयस किंवा अविद्या आणि विद्या ह्या परस्पर विरोधी साधना नसून परस्परपूरक आहेत, अंती एकाच गन्तव्याकडे नेणाऱ्या आहेत, अशी आपल्या संस्कृतीत धारणा आहे. 

राष्ट्रविषयक चिंतन 

‘राष्ट्र’ हा शब्द फार प्राचीन काळापासून संस्कृत भाषेत आहे. ‘पृथिव्यै-समुद्रपर्यंताया एकराट् इति’ हा उल्लेख मंत्रपुष्पांजलीत आहे. ऋग्वेदातील श्रीसूक्तातील पुढील श्लोक आहे- 

उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह।

प्रादुर्भूतोस्मि राष्ट्रेस्मिन कीर्तिमृद्धिं ददातु मे ।।                  (ऋग्वेदखिलसूक्ते: श्री सूक्त, )

देवलोकातील व्यक्तींनी समृद्धी आणि कीर्ती घेऊन माझ्याकडे यावे. (कारण) या राष्ट्रात माझा जन्म झाला आहे.

सिंधू नदीला तर एकराष्ट्रीयत्व आणि एकसंस्कृती यांचे मूर्तस्वरूप मानून तिची ऋग्वेदात अशी प्रार्थना केली आहे-

इमा आप: शिवतमा इमा राष्ट्रस्य भेषजी:।इमाराष्ट्रस्य वर्धनीः इमाराष्ट्र भृतोपमाः॥              (ऋग्वेद– आपसूक्तात[१०.९] पहिली ओळ काही प्रमाणात मिळते, दुसरी नाही; तसेच नदीसूक्तातही[१०.७५] यातले काही मिळत नाही.)

ही पुण्यसलिला सिंधू या राष्ट्राची संजीवनी आहे, हिच्यामुळे या राष्ट्राचे पोषण आणि वर्धन होते.

असा अनेक ठिकाणी ‘राष्ट्र’ या शब्दाचा उपयोग केलेला दिसतो. शतपथ ब्राह्मण हा इ. स. पूर्व अनेक शतकांपूर्वीचा ग्रंथ आहे. त्यात म्हटले आहे

श्रीः वै राष्ट्रम्।श्रीः वै राष्ट्रस्य भार: ।श्रीः वै राष्ट्रस्य मध्यम्।क्षेमो वै राष्ट्रस्य शीतम्।              (शतपथब्राह्मण१३.२.६.३)

‘श्री म्हणजे विद्या, संपत्ती नीती यांनी युक्त तेच राष्ट्र होय. विद्या-संपत्ती नीती हाच राष्ट्राचा संसार अथवा व्याप होय. विद्या-संपत्ती-नीती हाच राष्ट्राचा गाभा होय. या सर्वांचे रक्षण करणे हेच राष्ट्राचे शीतल अथवा सुख होय.’

शतपथ ब्राह्मणात मांडलेली ही राष्ट्रविषयक कल्पना आजही तेवढीच मार्गदर्शक आणि स्फूर्तिदायक आहे. ज्या राष्ट्रांनी विद्येचे-संपत्तीचे-नीतीचे संरक्षण आणि पोषण केले नाही, ती राष्ट्रे अवनतीला पोहोचल्याचे आपल्याला इतिहासात दिसते. ‘दुसऱ्या महायुद्धात फ्रान्सचा पराभव रणक्षेत्रावर झाला नाही, तर विलासी नृत्यगृहात झाला’ अशा आशयाचे एक वाक्य म्हटले जाते. याचा अर्थ असा की फ्रान्सने नीतीचे रक्षण केले नाही. अनीती बोकाळल्यामुळे फ्रान्सचा पराभव झाला. हिंदुस्थानने आपली विद्योपासनेची परंपरा सोडून दिली. खगोलशास्त्रज्ञ वराहमिहिर, आयुर्वेदाचार्य सुश्रुत, चरक आणि अन्य शास्त्रांचे प्रणेते यांचे विद्यावंश खंडित झाल्याने हिंदुस्थान दुबळा झाला, येथील समाजाचा ऱ्हास झाला. अकराव्या शतकात वैभवाने भरभराटलेल्या युरोपची संपत्ती हूणांनी ओरबाडून नेली. या सर्व उदाहरणांच्या संदर्भात विद्या- संपत्ती-नीती हा जो राष्ट्राचा गाभा, तो जपणे, यातच राष्ट्राचे हित आहे असे शतपथ ब्राह्मणात का म्हटले आहे ते कळून येते. विद्या-संपत्ती-नीती यांनी युक्त असे सामर्थ्यशाली राष्ट्र उभे करावयाचे असेल तर त्यासाठी राष्ट्राच्या सर्व घटकांमध्ये प्रबळ संघटन वृत्ती असली पाहिजे असे डॉ. आप्पाजी पेंडसे यांनी भगिनी निवेदिता यांच्या चरित्राच्या समारोपात म्हटले आहे. 

सहजीवनाचा मूलमंत्र 

आपल्या ऋषिकालीन गुरुकुलांमधून पुढील मंत्र गुरू आणि शिष्य उभयता म्हणत असत- 

ॐ सह नाववतु। सहनौभुनक्तु।सहवीर्यंकरवावहै।तेजस्विनावधीतमस्तु।माविद्विषावहै। ॐशान्तिः।शान्तिः।शान्तिः।।

‘गुरू आणि शिष्य या दोघांचेही परमेश्वर रक्षण करो. आम्हा उभयतांचा तो परमेश्वरी कार्यात उपयोग करो. आम्ही एकत्र पराक्रम करू, पुरुषार्थ करू. आमची विद्या अत्यंत तेजस्वी होवो. आम्हाकडून परस्परांचा द्वेष कधीही न होवो. ॐ शांती असो, शांती असो, शांती असो.

या मंत्रात सहजीवनाची काही महत्त्वाची सूत्रे सांगितली आहेत. मनुष्य जीवन हे बहुतांश समूहजीवन असते. कुटुंब, विद्यालय, विद्यापीठ, व्यवसाय, सामाजिक कार्य, राजकीय कार्य ही सर्व समूहजीवनाची विविध अंगे आहेत. काही लोक सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांशी निगडित असे उद्दिष्ट समोर ठेऊन काम करणाऱ्या स्वयंसेवी संघटनांमध्ये काम करतात. वरील सर्वच ठिकाणी स्वीकृत उद्दिष्टांच्या दिशेने प्रगती करता येणे, परस्पर सहकार्याने परस्परांच्या विकासाला पोषक अशा रीतीने काम करता येणे, कामात आनंद वाटणे, यासाठी सहजीवनाचे आणि संघटनेचे काही मूलमंत्र यांचे सतत स्मरण ठेवणे, ते आचरणात आणणे हे महत्त्वाचे आहे. ऋग्वेदात म्हटले आहे-

संगच्छध्वं संवदध्वं संवोमनांसि जानताम्।देवाभागं यथापूर्वे संजानानां उपासते।।समानीव आकूतिः समाना हृदयानि वः।समानमस्तुवो मनो यथा वः सुसहासति।               (ऋग्वेद१०.१९१.२-४)

ऋग्वेदात पुढे म्हटले आहे-

‘समानो मंत्र: समिति: समानी।समानं मनः सहचित्तमेषाम्।।’

याचा अर्थ असा- तुम्ही सर्व एके ठिकाणी जमत जा. तुमच्यामध्ये उत्तम संवाद असू द्या. तुम्ही सर्व एकहृदय व्हा. पूर्व काली देवांनी एकत्रित होऊन मोठमोठी कार्ये केली. त्याप्रमाणे तुम्हीही एकत्रित जमून मोठी कार्ये करा. तुमचा आशय एक असो. तुमची हृदये अभिन्न असोत तुमच्यातून एकत्वाच्या शक्तीचे दर्शन घडो. सर्वांचे मंत्र समान असोत. सर्वांच्या सभा समान, एकरस असोत. आणि सर्वांच्या चित्तांत समान आकांक्षा उदित होवोत.

हिंदुत्वातील ईश्वरविषयक दर्शन, विद्या आणि अविद्या या दोन साधना, राष्ट्रविषयक चिंतन आणि समूहजीवनाचे मूलमंत्र आपण पाहिले. आता समाजरचनाविषयक विचार पाहूया. 

समाजरचना

हिंदुत्व आणि समाजरचना या संदर्भात वर्ण, आश्रम आणि पुरुषार्थ यांचा विचार स्वाभाविकपणे मनात येतो. वर्णासंबंधी महाभारतात एक श्लोक आहे-

एकवर्णमिदं पूर्वं विश्वमासीद्युधिष्ठिर।कर्मक्रियाविभेदेन चातुर्वर्ण्यं प्रतिष्ठितम्।।   

‘युधिष्ठिरा, पूर्वी जगात एकाच वर्ण होता. पुढे कामे वेगवेगळी झाल्याने चार वर्ण निर्माण झाले.’ ते जन्माधिष्ठित नव्हते. कालांतराने त्यांना जन्मजात वर्णांचे स्वरूप प्राप्त झाले. वर्णांच्या पुढे जाती झाल्या. जातिबंधने घट्ट झाली. अस्पृश्यतेसारखी दुष्ट रूढी जन्माला आली. 

वर्ण-जातिरहित समाज

आजच्या काळात वर्ण आणि जाती यांना कसलाही अर्थ उरलेला नाही. जे स्वतःला ऋग्वेदी ब्राह्मण म्हणवितात, त्यातील अनेकांना ऋग्वेदातील एक शब्दही माहीत नसतो. क्षत्रिय म्हणवणारे युद्धकर्म न करता अन्य अनेक व्यवसाय करीत असतात. त्यामुळे तथाकथित वर्ण आणि जाती सुदैवाने द्रुत गतीने नामशेष होत आहेत. त्या लवकरात लवकर नामशेष व्हाव्यात यासाठी प्रयत्न करायला हवेत. अस्पृश्यता हा तर केवळ आपल्या संस्कृतीवरचाच नव्हे, तर मानवतेवरचा एक महाभयानक कलंक. मनुष्य कोणत्या जातीत जन्मला यावरून त्याचे श्रेष्ठत्व वा कनिष्ठत्व ठरता कामा नये. जन्मजात विषमता ही अद्वैत तत्त्वज्ञानाच्या अत्यंत विरोधी आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘Each soul is potentially divine.’ म्हणून व्यक्तीला व्यक्ती म्हणूनच प्रतिष्ठा (human dignity) असली पाहिजे, आणि विकासाची संधी असली पाहिजे. आजवर ज्यांना विषमतेने वागविले गेले, त्या सर्वांना विकासाच्या विशेष संधी उपलब्ध करून दिल्या गेल्याच पाहिजेत. 

भेदा भेद भ्रम, अमंगल 

आम्ही अस्पृश्यता मानत नाही एवढे म्हणून पुरेसे नाही. दलित, मागासवर्गीय भटक्या आणि विमुक्त जमाती, तसेच आदिवासी-गिरिजन यांच्यासाठी विशेष शिक्षणाच्या सोयी उपलब्ध असल्या पाहिजेत. त्यांना समाजात सन्मानाने नागरिक म्हणून जगता आले पाहिजे. दलितांची पुढची पिढी आपले दलितपण आणि त्याच्याशी निगडित असलेले सर्व प्रकारचे मालिन्य विसरून जाईल असे तथाकथित सवर्णांचे प्रयत्न असले पाहिजेत. ऋग्वेदात समतेचा मोठाच उद्घोष केलेला आहे-

अज्येष्ठासो अकनिष्ठास एते।संभ्रातारोवावृधुः सौभगाय। (ऋग्वेद५.६०.५)

तेअज्येष्ठा अकनिष्ठास उद्भिदो।अमध्यमा सोमहसाविवाधुः॥ 

‘कोणी ज्येष्ठ नव्हेत, कोणी कनिष्ठ नव्हेत आणि कोणी मध्यमही नव्हेत. (असे भेद अनुचित आहेत.) सर्वच जण परस्परांचे बंधू आहेत आणि उत्तम भाग्यासाठी सर्व वर्धिष्णू होत आहेत.’

पुढे संतांनीही आध्यात्मिक पायावर समतेसाठी प्रयत्न केले. त्यात वारकरी संप्रदायाचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. तुकाराम महाराजांनी ठसठशीतपणे सांगितले. ‘वर्ण  भेदाभेद भ्रम, अमंगल अभिमान विसरली जाती, एकएका लोटांगणी जाती किंवा विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम, अमंगल’ हे शब्द त्यांचेच आहेत.

स्वातंत्र्योतर काळात जातिभेदाचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्यात आल्याने विषमतेचा प्रश्न आणखी चिघळला. परंतु जातिभेदावर आधारलेल्या राजकारणाचा सामान्य माणूस बळी होऊ नये, यासाठी सामाजिक चळवळीतून प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे.

धन्यो गृहस्थाश्रमः

आश्रमव्यवस्थेचा विचार केला तर ती मात्र आमच्या काळातही लाभदायक आहे असे वाटते. मनुस्मृतीत म्हटले आहे-

ब्रह्मचारी गृहस्थश्च वानप्रस्थो यतिस्तथा।ते गृहस्थप्रभवाः चत्वारः पृथगाश्रमाः।सर्वेऽपि क्रमशस्त्वेते यथा शास्त्रं निषेविताः।यथोक्तकारिणं विप्रं नयन्तिपरमां गतिम्।।                      (मनुस्मृती६.८७-८८)

‘ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे चार आश्रम आहेत. ते गृहस्थाश्रमाच्या आश्रयाने राहणारे आहेत. या आश्रमांचे क्रमाक्रमाने, शास्त्रानुसार आचरण केल्यास ते जाणत्या मनुष्यास श्रेष्ठ गतीला नेतात.’

ब्रह्मचर्याचा मुख्य अर्थ म्हणजे श्रेष्ठ प्रकारचे व्यक्तिमत्त्व विकसन, शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक शक्तींचा विकास असे प्रबोधिनीच्या दीक्षाग्रहण उपासनेत म्हटले आहे. सामान्यतः पंचवीस वर्षांपर्यंत विद्याध्ययन करून नंतर गृहस्थाश्रमात प्रवेश करावयाचा, प्रापंचिक, सामाजिक, राष्ट्रीय कर्तव्ये उत्तम रीतीने पार पडायची, कर्तृत्वाची, पराक्रमाची उंच शिखरे गाठायची, उत्तम व्यवहाराने नीतीयुक्त धनसंपदा जोडायची आणि अन्य तीन आश्रमांना आधार द्यायचा, अशी गृहस्थाश्रमाची मांडणी आहे.

व्यावसायिक निवृत्ती हा वानप्रस्थाचा काळ होय. या काळात प्रापंचिक, व्यावसायिक जबाबदारी पुढील पिढीवर सोपवून स्वतः सामाजिक-राष्ट्रीय कार्यात निःस्वार्थी बुद्धीने काम करावे, अध्यात्म साधना दृढ करावी असे अभिप्रेत असते.

कौपीनवन्तः खलुभाग्यवन्तः

चतुर्थाश्रमात मात्र सर्व ऐहिकाचा त्याग करून ‘वसन्तवत् लोकहितं चरन्तः । कौपीनवन्तः खलु भाग्यवंतः॥ ‘अशी आचार्यांनी सांगितलेली संन्यासवृत्ती आचरायची असते. गृहस्थाश्रमी लोकांनी वानप्रस्थ आणि संन्यास स्वीकारावा अशी प्रथा आता फारशी राहिलेली नाही. पण ती समाजहितकारक नि उपयुक्त म्हणून आवश्यक वाटते. तारुण्यातही संन्यास घेणारांची एक परंपरा रामकृष्ण मिशनने निर्माण केली आहे. साध्या वेषात पण आजीवन संन्यस्त वृत्तीने काम करणारे प्रचारक वा जीवनव्रती कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा विवेकानंद केंद्र यासारख्या संघटनांमधून दिसतात.

ज्ञान प्रबोधिनीच्या घटनेतही परिव्राजक कार्यकर्त्यांबद्दल लिहिले आहे. प्रबोधिनीच्या आदेशानुसार कोणत्याही ठिकाणी जाऊन सांगितलेले काम करण्याची ज्यांची तयारी असते, ज्यांच्या जीवनाला निष्कांचनता, पावित्र्य आणि आज्ञांकितता यांचा सुगंध येतो, असे कार्यकर्ते हे परिव्राजक सदस्य होत.

नव्या प्रकारचा संन्यास धर्म

नव्या प्रकारच्या संन्यास धर्माची आवश्यकता भगिनी निवेदितांनी प्रतिपादन केली आहे. त्या म्हणतात-

 ‘नवभारतातील संन्याशाच्या संन्यासाचा अर्थ दुसऱ्याची सेवा करणे हाच असला पाहिजे. हा नवसंन्यासी वज्राप्रमाणे कठोर, प्रखर तेजस्वी, सागराप्रामाणे विशाल हदयाचा, सर्वस्व देणाऱ्या मेघाप्रमाणे निःस्वार्थी असा असला पाहिजे. शास्त्र संशोधनातील संन्यासी, ज्ञानपूजक संन्यासी, कारखाने चालविणारे संन्यासी, राजकारण चालविणारे संन्यासी, अनाथालये चालविणारे संन्यासी, शाळा चालविणारे संन्यासी, स्थानिक स्वराज्यातील संन्यासी, गोरक्षण करणारे संन्यासी, विधवांचे अश्रू पुसणारे संन्यासी, पतित स्त्रियांची चिंता वाहणारे संन्यासी-सर्वत्र जीवनाच्या सान्या क्षेत्रांतून संन्याशांची गरज आहे.’

हा संन्यास मोक्षपर, समाजापासून पराङ्मुख करणारा नसून प्रवृत्तिपर समाजहिताला वाहिलेला असा आहे. असे काहीतरी लोक उभे राहिल्यावाचून या देशाचे रूप पालटणार नाही. म्हणून चतुर्विध आश्रमांचा कालोचित अर्थ मांडण्याचा प्रयत्न ज्ञान प्रबोधिनी सातत्याने करीत आलेली आहे.

चतुर्विध पुरुषार्थ

आश्रम व्यवस्थेप्रमाणेच समाजधारणेला उपयुक्त असलेली एक महत्त्वाची संकल्पना चतुर्विध पुरुषार्थाची आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे हे चार पुरुषार्थ आहेत. अर्थ आणि काम या दोन प्रेरणांना वाजवी स्थान हिंदू जीवनपद्धतीत आहे. ‘धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ।’ ‘धर्ममार्गाने, विवेकाने प्राप्त केलेला काम हेही माझेच रूप आहे’ असे भगवंतांनी म्हटले आहे. तथापि महाभारतात असा सावधानतेचा इशाराही दिलेला आहे की- 

नजातु काम: कामानाम् उपभोगेन शाम्यति।हविषाकृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते।।                  (श्रीमदभागवत९.१९.१४– महाभारतात आहे म्हणतात पण मिळाला नाही)

‘इंद्रियविषयांच्या उपभोगाने कामाभिलाषेची तृप्ती होत नाही, तर अग्नीला आहुती दिल्यावर तो प्रज्वलित व्हावा त्याप्रमाणे ही कामलालसा वाढतच जाते.’ स्वामी स्वरूपानंदांनी म्हटले आहे-

धर्माविण अर्थ, अनर्था कारण । काम तो दारुण, दुःख देई।।अर्थ-काम-भोगी, राहावा संयम।म्हणोनिया धर्म, आचरावा।।स्वधर्मे साधावे, अर्थ आणि काम।मुक्तीचे हे वर्म, ध्यानी घ्यावे।।

मोक्षाचा उदात्ततर अर्थ

म्हणून अर्थ आणि काम या पुरुषार्थांवर धर्म आणि मोक्ष या श्रेष्ठतर पुरुषार्थांचा अंकुश ठेवलेला आहे. जिथे अर्थाचे आणि कामाचे प्राबल्य आहे, अशा संस्कृतीमध्ये कुटुंबव्यवस्था मोडकळीला आलेली दिसते. अमेरिकेत शंभरातील बेचाळीस दांपत्ये घटस्फोट घेतात. मातापित्यांनी संगोपनाची जबाबदारी नाकारल्याने मुले निराधार, भटकणारी, मूल्यहीन, व्यसनांच्या गर्तेकडे चाललेली दिसतात. अशा प्रकारे विकारांचे दास होणे म्हणजे बद्धता आणि विकारांवर विजय मिळविणे, स्वामित्व मिळविणे, म्हणजे मुक्ती किंवा मोक्ष. समाजधारणा करणाऱ्या धर्म या पुरुषार्थाबद्दल ‘धर्मसंस्थापना’ या प्रकरणात सविस्तर लिहिलेच आहे.

अशा रीतीने व्यष्टी (व्यक्ती), समष्टी (समाज), आणि परमेष्टी (परमात्मसत्ता) या तिन्हींचा परस्परसंलग्न विचार हिंदू जीवनपद्धतीत, हिंदू संस्कृतीत, परंपरेत मांडलेला आहे. 

भारतीयत्व म्हणजेच हिंदुत्व

प्रारंभी म्हटले होते की ‘हिंदुत्व’ या शब्दाने येथील परंपरेत जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे त्याचा बोध होतो. त्याचाच विस्तार येथे केला आहे. कै. प्रभाकर पाध्ये यांच्यासारख्या डाव्या विचारसरणीकडून प्रवास करत आलेल्या विचारवंताने म्हटले आहे-

भारतीय असणे म्हणजे भारतीय परंपरेचा अभिमान बाळगणे… म्हणजे परंपरेतील सर्जनशील गोष्टींचा अभिमान बाळगणे होय. परंपरा म्हटली की काही अविचारी आधुनिकांचे डोके उठते. पण परंपरा सातत्याला व सर्जनशीलतेला पोषक असते. भारताची परंपराही केवळ धार्मिक नाही. मुख्यतः ती सांस्कृतिक आहे. वेद- उपनिषदे, रामायण-महाभारत, नाट्यशास्त्र-अर्थशास्त्र-कामशास्त्र-कालिदास-भवभूती- शूद्रक-बाण-भास इत्यादींचे संस्कृतवाङ्मय, तुलसीदास, कबीर, ज्ञानदेव, तुकाराम इत्यादींचे भक्तिवाङ्मय, महावीर-बुद्ध-गांधी यांच्यासारख्या’अवतारी’ व्यक्ती, अशोक- अकबर-राणा-प्रताप-शिवाजी यांच्यासारखे राजे, आर्यभट्ट-भास्कराचार्य-पाणिनी- अभिनवगुप्त यांच्यासारखे वैज्ञानिक विचारवंत, अजिंठा, वेरूळ, खजुराहो, ताजमहाल, गोलघुमट यांच्यासारख्या कलाकृती, संगीताचेप्रवर्तक अमीरखुस्रो, तानसेन, कथ्थक, मणिपुरी, भरतनाट्यादि नृत्यांचे प्रकार अशा किती तरी गोष्टी आहेत की ज्यांच्या केवळ स्मृतीने प्रत्येक भारतीयाचा ऊर भरून यायला पाहिजे.

इंडोनेशियन मुसलमानांना बाली(हिंदू) नृत्याबद्दल अभिमान वाटतो; ‘कुसुमात्मज’, ‘सुमित्रो’ अशी संस्कृत नवे मिरविण्याचा अभिमान वाटतो. रामायण महाभारतावर आधारलेली नृत्य-नाटके करण्यात अभिमान वाटतो. कृषिदेवता म्हणून ‘श्रीदेवी’ ची प्रार्थना करण्यात अभिमान वाटतो. मगयेथले मुसलमानच भारताबाहेर का पाहतात? आणि त्यांनाही सवय लागली म्हणून भारतीयांनी ती मान्य करावी काय? …

याचा अर्थअसा होतो की भारतीयत्व म्हणजे मूलतः हिंदुत्व; पण विकसित हिंदुत्व, सांस्कृतिक हिंदुत्व, आधुनिक हिंदुत्व. धार्मिक हिंदुत्व नव्हे.

भारतीयत्व हा शब्दसांस्कृतिक हिंदुत्वाला नकार देण्यासाठी वापरायचा असेलतर ती शुद्ध फसवणूक ठरेल. अधिक धोकेबाजीची गोष्ट म्हणजे ते लोकशाहीलाआव्हानठरेल… एकप्रकारची सांस्कृतिक सहिष्णुता हाच लोकशाहीचा आधार असतो. सांस्कृतिक हिंदुत्वाचा वारसा याचे आश्वासन देतो.’ (आभाळातील अभ्रे – हिंदू की भारतीय ?- पान २५, २७ -प्रभाकर पाध्ये ) 

त्यागेन एके अमृतत्वम् आनशुः। 

ज्ञान प्रबोधिनीला अभिप्रेत असलेले हिंदुत्व हे असे विशाल, सहिष्णू, जयिष्णू, वर्धिष्णू, आधुनिक, विकसित, पुरोगामी हिंदुत्व आहे. घटपटादी शुष्क चर्चा नि उपासतापास, व्रतवैकल्य, कर्मकांड, भाकडकथा, भ्रामक समजुती, अंधश्रद्धा यांचा त्याच्याशी काही संबंध नाही. स्वामी विवेकानंदांनी ज्या व्यावहारिक वेदांताचा उद्घोष केला, तो वेदांत जगणारे वीर-महात्मे जीवनादर्श मानणे, त्यांनी प्रकाशित केलेल्या पथावरून चालणे यात हिंदुत्व आहे. समर्थ, प्रसन्न, कर्ममय, आनंदमय जीवन हे हिंदू जीवनविचाराचे आदर्श चित्र आहे. ‘त्यागेन एके अमृतत्वमानशुः।’ (कैवल्योपनिषद, ३) हा त्यातील श्रेष्ठतम मंत्र आहे. राजर्षी जनक याच त्यागवृत्तीने राज्याची धुरा सांभाळत होते. आणि योगींद्र शुक याच त्यागवृत्तीने गिरीकंदरात सुखेनैव विहार करत होते! शिवछत्रपतींनी याच त्यागवत्तीने आपले हिंदवी स्वराज्य क्षणात समर्थांच्या झोळीत टाकले आणि समर्थांनीही त्याच त्यागवृत्तीने क्षणाचाही विलंब न लावता ते छत्रपतींना परत केले. हे सर्वच अमृताचे वारस ठरले.

ज्ञान प्रबोधिनीची स्फूर्ती आहे ती या हिंदुत्वाच्या अमृतधारेचा वारसा चालविण्यात!