उत्तमतेची साधना

प्रबोधीनीचे दीर्घकालीन उद्दिष्ट राष्ट्र उभारणी आणि ध्येय धर्मसंस्थापना आहे हे कळले. प्रबोधिनीची कार्यपद्धती काय आहे?

तनमनधनपूर्वक आणि उत्तरदायी राहून काम करणे ही प्रबोधिनीची कार्यपद्धती आहे. काम करता करताच ही पद्धती समजत जाते. तनमनधनपूर्वक काम करायचे तर बुद्धीचा निश्चय किंवा निर्णय व्हायला पाहिजे. आपल्याला दोन प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. धोरणात्मक निर्णय आणि कार्यवाहीचे निर्णय. एखाद्या ध्येयासाठी तनमनधनपूर्वक काम करायचे ठरवणे हा धोरणात्मक निर्णय झाला. परंतु ध्येय गाठण्यासाठी शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती, आर्थिक शक्ती कशी वापरायची हे अनेक छोट्या छोट्या कार्यवाहीच्या निर्णयांच्या एकत्रित परिणामांमधून दिसते.

एखादी गोष्ट ‘व्हावी’ हा धोरणात्मक निर्णय झाला. ती गोष्ट व्हावी म्हणून कोणी? कधी? किती वेळ ? कुठे? कोणाबरोबर? कशाच्या साहाय्याने? याची उत्तरे ठरली म्हणजे कार्यवाहीचे निर्णय होतात.

कार्यवाहीच्या निर्णयांच्या एकत्रित परिणामांमधून दिसत.

एखादी गोष्ट ‘व्हावी’ हा धोरणात्मक निर्णय झाला. ती गोष्ट व्हावी म्हणून कोणी? कधी? किती वेळ? कुठे? कोणाबरोबर? कशाच्या साहाय्याने? याची उत्तरे ठरली म्हणजे कार्यवाहीचे निर्णय होतात.

कार्यवाहीचे निर्णय परिस्थितीनुसार बदलावे लागतात. ‘येत्या वर्षात प्रबोधिनीच्या अमुक अमुक कामासाठी दिवसाचे किंवा आठवड्याचे इतके तास वापरायचे’ हा कार्यवाहीचा पहिला निर्णय. त्यानंतर काम पूर्ण झाल्याचे निकष ठरविणे, स्वतःचे वेळापत्रक ठरवणे, अर्थसंकल्प करणे, खाते-वाटप निश्चित करणे, कार्य-ओघपत्रक बनवणे हे सगळे कार्यवाहीचे निर्णय आहेत. स्वत:च्या बाबतीत हे ठरवणे म्हणजे वेळ आणि धन देण्याचे निर्णय झाले. या निर्णयांची कार्यवाही सुरू झाली की कामासाठी मन द्यायला सुरुवात केली. कार्यवाही चालू असताना आळस, चालढकल, दिरंगाई, या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कामासाठी तनही दिले. काम पुढे सरकेल तसे व बदलत्या परिस्थितीनुसार नियोजन दुरुस्त करत काम करणे म्हणजे तन-मन-धन पूर्वक काम करणे. संकल्प करण्यातून सद्भाव व सदिच्छा व्यक्त होतात. कार्यवाहीचे निर्णय झाले की तन-मन-धनपूर्वक काम सुरू होते.

प्रबोधिनीचे काम म्हणजे उत्तमतेची साधना. उत्तमतेच्या साधनेचा शत्रू म्हणजे – सामान्य स्थितीकडे घसरणे. एखादा गुण कष्टाने मिळवतो आहोत तोच मूळ पदावर जाणे. ज्या वैशिष्ट्‌यामुळे आपली इतरांना ओळख होईल ते वैशिष्ट्यच हरवून जाणे.

काम सुरू करण्याच्या, काम नियोजनाने करण्याच्या, काम प्रतिभापूर्ण करण्याच्या, काम तडफेने करण्याच्या, काम गटाने करण्याच्या सवयी बाणविण्याचा प्रयत्न आपण करत असतो. एकेक गोष्ट प्रयत्नाने मिळवत असतो. आणि दुसऱ्या बाजूला सामान्यत्वाकडे घसरण चालू असते. पुढे नेणारी इच्छाशक्ती आणि सामान्यत्वाकडे घसरण यांच्या चढाओढीत इच्छाशक्ती बलवान करणे म्हणजे उत्तमतेची साधना, स्वत:साठी आणि मग इतरांसाठी अशी उत्तमतेची साधना करणे म्हणजेच प्रबोधिनीचे काम.

या उत्तमतेच्या साधनेत सतत जागरूक राहणे म्हणजे उत्तरदायी राहून काम करणे. त्यासाठी ज्येष्ठांना नियमितपणे कामाचे निवेदन करावे लागते. आपल्या चुका लगेच मान्य करणे आणि कामातील यशाचे उचित श्रेय सहकाऱ्यांना देणे हे जमावे लागते. रोज आत्मपरीक्षण करावे लागते. रोज देशस्थितीचा व आपल्या सहकाऱ्यांच्या मन:स्थितीचा आढावा घ्यावा लागतो.