४ : प्रबोधिनीचा विस्तार करायचा म्हणजे कशाचा विस्तार करायचा ?
उत्तर :- प्रबोधिनीच्या भवितव्य लेखात आपण दोन प्रकारचा विस्तार मांडला आहे. पहिला कार्य विस्तार आणि दुसरा भौगोलिक विस्तार. शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, आरोग्य, प्रदेशविकसन या प्रभागांमध्ये कार्यविस्तार म्हणजे वेगळा वयोगट, वेगळे कौशल्य, वेगळी साधने, वेगळे विषय, वेगळा समाजगट, वेगळा व्यवसायगट डोळ्यासमोर ठेवून काम करणे. आधी फक्त मुलांसाठी सुरू झालेली प्रशाला, मुलींसाठीही चालू झाली हा कार्यविस्तार. साध्या टर्निंग मशीनवर शिकवण्याऐवजी CNC टर्निंग मशीनवरही शिकवायला लागलो हा कार्यविस्तार. संगणक शिकवणाऱ्या विभागाने नेत्र तंत्रवर्ग सुरू केला हा कार्यविस्तार. संस्कृत संशोधन विभागात पौरोहित्य प्रशिक्षण वर्ग सुरू झाले हा कार्यविस्तार. मैदानावर खेळणाऱ्यांसाठी व्यायामाशाळा सुरू झाली हा कार्यविस्तार. कागद-पेन्सिल घेऊन मानसशास्त्रीय चाचण्या सोडवण्याऐवजी संगणकावरही सोडवण्याची सोय केली हा कार्यविस्तार. क्रीडादल घेणाऱ्यांनी विज्ञान दल सुरू करणे हा कार्यविस्तार.
एकाच प्रकारचे काम शहराच्या वेगळ्या भागात, वेगळ्या गावात, वेगळ्या राज्यात सुरू होणे हा भौगोलिक विस्तार. पुण्यात संजीवन रुग्णालय चालवणाऱ्यांनी शिरवळला नेत्र रुग्णालय सुरू करणे हा भौगोलिक विस्तार. निगडीसारखी शाळा साळुंब्याला सुरू होणे हा भौगोलिक विस्तार. पुण्यासारखे पौरोहित्य वर्ग डोंबिवलीला चालणे हा भौगोलिक विस्तार. शिवगंगा खोऱ्याप्रमाणे गुंजवणी खोऱ्यात काम करणे हा भौगोलिक विस्तार. एकाच गावात पाच दलांच्या ऐवजी पंधरा दले चालणे हा भौगोलिक विस्तार.
कार्यविस्तारासाठी नवीन क्षमता मिळवण्याची व नवीन विषय शिकायची तयारी असलेले कार्यकर्ते लागतात. त्यांना प्रबोधिनीचे ध्येय पक्के माहित असायला लागते. भौगोलिक विस्तारासाठी कार्यपद्धतीवर पकड असलेले कार्यकर्ते लागतात. त्यांना कार्यपद्धतीतले काय बदललेले चालेल व काय बदलायचे नाही हे पक्के माहीत असायला लागते. दोन्ही प्रकारच्या विस्तारासाठी विस्तारकांक्षाही लागते.