प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक १३

१३ : प्रबोधिनीत श्रद्धावान लोकांना स्थान आहे का ?

उत्तर :- एखादे कर्मकांड केले नाही किंवा चुकीच्या पद्धतीने केले तर काहीतरी अनर्थ होईल, संकट येईल किंवा लोक नावे ठेवतील या भीतीपोटी अनेक जण अनेक कृती करत असतात. अशा कृती करण्याला लोक श्रद्धा म्हणतात. ही स्वतःची तर्कबुद्धी वापरण्यापूर्वीची श्रद्धा आहे. अशा लोकांनाही प्रबोधिनीत प्रवेश आहे. कारण त्या शिवाय त्यांची भीती घालवता येणार नाही.

काही जणांची आपल्या तर्कबुद्धीवरच श्रद्धा असते. त्यांच्या तर्काच्या कसोटीवर जे टिकत नाहीत ते हे लोक मानत नाही. अशा श्रद्धावान लोकांनाही प्रबोधिनीत प्रवेश आहे. ते मर्यादित क्षेत्रात पण मोठे समाजोपयोगी काम करू शकतात. जे आपल्या तर्कबुद्धीची कक्षा वाढवत राहतात पण तर्कबुद्धीच्या पलीकडेही काही मानवी क्षमता आहेत असे मानतात ते ही श्रद्धावानच आहेत. ते समाजसंघटन व समाजविकासाचे काम करू शकतात. त्यांनाही प्रबोधिनीत प्रवेश आहे. प्रवेश सर्वांनाच आहे. आपले स्थान प्रबोधिनीत आहे की नाही हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.