१४ : प्रबोधिनीची मांसाहाराबाबत भूमिका काय आहे ?
उत्तर :- हा संवेदनशील प्रश्न आहे. याचे उत्तर काही जणांच्या भावना दुखवणारे होऊ शकते. प्रबोधिनीचे सदस्य किंवा विद्यार्थी यांनी आपापल्या घरी किंवा कुटुंबियांसह शाकाहाराबाबतचे नियम किंवा मांसाहाराच्या सवयी आपल्या कुटुंबाच्या प्रथेप्रमाणे किंवा स्वतःच्या विचारानुसार पाळाव्यात. त्याबाबत प्रबोधिनीचे काही म्हणणे नाही. प्रबोधिनीच्या सहली, शिबिरे, सहनिवास येथे आपण मांसाहाराची योजना करत नाही. याला दोन कारणे आहेत. १) मांसाहार सर्वांना परवडत नाही आणि २) आज तरी प्रबोधिनीतील बहुसंख्य सदस्य रोज मांसाहार करणारे नाहीत. प्रबोधिनीचा अन्य राज्यात किंवा वनवासी भागात विस्तार झाला तर तेथील सवयी-परंपरा-रूढींनुसार तेव्हाचे व तेथील कार्यकर्ते वेगळा विचार करू शकतील. सर्व जगच शाकाहारी बनायच्या मार्गावर आणखी पुढे गेले तर त्या वेळी तेव्हाचे कार्यकर्ते घरोघर शाकाहार आहे म्हणून सामूहिक भोजनाच्या वेळी विनासायास शाकाहाराचा आग्रह धरू शकतील नव्हे, तसा नियमही करू शकतील.
आज काही सदस्यांनी प्रबोधिनीत शाकाहाराचा प्रसार केला तर आपण त्यांना आडकाठी करत नाही. कोणी सकस किंवा शक्तिवर्धक आहार म्हणून सहनिवासात मांसाहाराची योजना करायचा प्रयत्न केला तर आपण त्यांना त्यापासून परावृत्त केले आहे. परंतु मांसाहार निषेध किंवा शाकाहार पुरस्कार हे विषय प्रबोधिनीच्या वैचारिक मूलतत्त्वांमध्ये म्हणजेच तत्त्वसप्तकामध्ये आणायची प्रबोधिनीची भूमिका नाही.