१८ : प्रबोधिनीचे प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट काय आहे ?
उत्तर :- आपण प्रबोधिनीत माध्यमिक शिक्षणाचा जेवढा विचार केलेला आहे तेवढा प्राथमिक शिक्षणाचा विचार केलेला नाही. साखरशाळांच्या निमित्ताने आपण प्राथमिक शिक्षणावर पाच सहा पुस्तिका प्रकाशित केल्या आहेत. परंतु त्यात अध्यापन तंत्र व मूल्यमापन तंत्रावरच जास्त भर आहे. पुस्तकी शिक्षणासाठी क्षमताधिष्ठित अध्ययनाचा विचारही त्यात आहे. परंतु प्रबोधिनीचे प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट काय असावे यावर वेगळा विचार त्याही वेळी झाला नाही.
प्रबोधिनीच्या घटनेत ज्या चारित्र्य-गुणांचा उल्लेख आला आहे त्यापैकी १) सदाचार, २) सत्प्रवृत्ती व ३) स्वावलंबन या गुणांच्या विकासाची सुरुवात तर प्राथमिक शाळेतच व्हायला पाहिजे. ज्ञान प्रबोधिनी, सोलापूरला सुरुवातीला प्राथमिक शाळाच होती. त्या वेळी केलेल्या ज्ञान प्रबोधिनी सोलापूरच्या घटनेत ज्ञान प्रबोधिनी, पुणेच्या घटनेमध्ये असलेल्या चारित्र्य-गुणांच्या यादीत ४) प्रामाणिकपणा, ५) सत्य व न्यायप्रीती, ६) उत्तमता, ७) उत्स्फूर्ती (स्पॉन्टेनिइटी), ८) करुणा व ९) साहस अशा आणखी सहा चारित्र्य गुणांची भर घातलेली आहे. अधिक विचार होईपर्यंत या नऊ गुणांचा विकास करणे हे प्रबोधिनीचे प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट आहे असे म्हणता येईल.