
भगवान श्री रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातील एक गोष्ट सांगतात. १८८४ मध्ये एकेप्रसंगी वैष्णव पंथाबद्दल चर्चा निघाली. चैतन्यांनी स्थापित केलेल्या पंथाची वैशिष्ट्ये सांगून अखेर रामकृष्ण म्हणाले, ‘यात तीन गोष्टी मुख्य आहेत, एक म्हणजे नामोच्चार, दुसरे सर्वांभूती दया, तिसरे वैष्णवांची म्हणजेच परमेश्वराच्या भक्तांची सेवा. या तीन तत्त्वांचा अर्थ काय ? परमेश्वराचे सदैव नामस्मरण करणे याचा अर्थ ‘नामापरता नाही देव’ म्हणून सदैव नामस्मरण करीत असावे. दुसरे म्हणजे श्रीकृष्ण आणि त्याचे भक्त हे काही वेगळे नाहीत, ते एकरूप आहेत, म्हणून साधुसंत आणि भक्त यांना वंदन करावे. तिसरे म्हणजे सर्व विश्व श्रीकृष्णाचेच आहे, हे ध्यानात घेऊन भूतमात्रांवर दया करावी !”दया करावी’ असे शब्द श्री रामकृष्णांनी उच्चारले मात्र, तोच त्यांना भाववेश प्राप्त झाला. काहीसे भानावर येता येता ते स्वतःशी पुटपुटले, ‘दया? भूतमात्रांवर दया? अरे मूर्खा ! मातीत वळवळणारा क्षुद्र किडा तू, तू दुसऱ्यांना दया दाखवणार? नाही, तसे नाही. दया दाखविणे नाही, प्राणीमात्रांत परमेश्वर दृश्य झाला आहे, त्याची सेवा करणे हेच खरे!’नरेंद्राने ते शब्द ऐकले आणि अंतःकरणात साठवून ठेवले. तेथून काही वेळाने बाहेर आल्यावर तो म्हणाला- ‘सदुरूंच्या विचारांचे रहस्य आज मी जाणू शकलो. इतके दिवस समजूत अशी होती की वेदान्तसिद्धी ज्याला मिळवायची आहे, त्याने अंतःकरणातल्या प्रेम, भक्ती दया इत्यादी भावनांचा त्याग करून समाजापासून दूर, तुटून राहिले पाहिजे. आज कळले की, वेदान्ताचे आचरण घरी नित्याचे उद्योगांत राहून करता येईल. मात्र हे समजले पाहिजे की सर्व स्थळी, सर्व प्राणिमात्रांत एक परमेश्वरच भरलेला आहे. त्याची सेवा करण्यात माणसाने आयुष्य वेचावे आणि तशाने तो निश्चितपणे आपल्या ध्येयमार्गाकडे जाईल. मला हे आज समजले आणि जर परमेश्वराची इच्छा असेल, तर हे तत्त्व सर्व जगभर जाऊन मुक्त कंठाने सर्वांना मी सांगेन.’
आत्मनो मोक्षार्थं जगद्विताय च ।
श्री संत नामदेव महाराजांच्या एका अभंगात ‘मुखी नाम सदा संतांचे दर्शन जनी जनार्दन ऐसा भाव’ या ओळी आल्या आहेत. ‘जनी जनार्दन ऐसा भाव’ म्हणजे काय, ते श्री रामकृष्णांच्या वरील शब्दात नेमके व्यक्त झाले आहे. म्हणूनच स्वामी विवेकानंद यांनी श्री रामकृष्ण संघाचे ध्येय ‘आत्मनो मोक्षार्थं जगदहिताय च।’ असे निर्धारित केले. त्यांच्या शिष्योत्तमा भगिनी निवेदिता यांनी तर मृत्यूपूर्वी जनता जनार्दनाच्या चरणी आपली समर्पण भावना अतिशय हृदयस्पर्शी आणि काव्यात्मक शब्दात व्यक्त केली आहे-‘प्रियतम परमेश्वराला स्वतःची कोणतीच वांछा नाही, पण मानवांच्या वांछिताच्या रूपाने प्रकट होतो – अशासाठी की मला त्याची सेवा करता यावी. तो भूक तहान यांच्या अतीत आहे, तथापि तो मागणे मागत येतो अशासाठी की मला ते देता यावे. तो माझ्या भेटीला येतो – एवढ्याचसाठी की मी दार उघडावे आणि त्याला आश्रय द्यावा. तो क्लांतता धारण करतो- एवढ्याचसाठी की मला त्याला विश्राम देता यावा. हे प्रियतम परमेश्वरा, जे जे माझे आहे ते ते सर्व तुझे होवो. माझे मीपण पूर्ण विलयाला जावे आणि माझ्यातून तुझेच प्रकटन व्हावे.’ज्ञान प्रबोधिनीमध्ये शिक्षण, संशोधन, संघटन, लोकसेवा अशी बहुविध कामे चालतात. ती करताना कार्यकर्त्यांची वृत्ती कशी असावी, कामाची दिशा काय असावी, यासंबंधी विचार करताना ‘जनीजनार्दन’ हे तत्त्व मार्गदर्शक म्हणून निश्चित केले गेले.
सेवा कोणाची करायची ?
हिंदुस्थानात अनेक ठिकाणी अनेक प्रकारची सेवाकार्ये चाललेली आहेत. त्यांपैकी अध्यात्माचा पाया असलेल्या सेवाकार्यात त्या त्या कार्याचा प्रारंभ करणाऱ्या महापुरुषांनी ‘शिवभावाने जीवसेवा’ हीच धारणा दृढमूल केलेली दिसते. स्वामी विवेकानंदांचा ‘दरिद्री देवो भव’ हा मंत्र, महात्मा गांधीची ‘दरिद्री नारायणाच्या सेवेची’ कल्पना, गाडगे महाराजांनी महाराष्ट्रात ठायी ठायी उभारलेली सेवाकार्ये आणि केरळात नारायण गुरूंनी प्रतिपादन केलेले भक्तीचे आणि सेवेचे अद्वैत यांतूनही हीच धारणा व्यक्त होते.परमेश्वर तर सर्वच प्राणिमात्रांच्या ठायी आहे, श्रीमंतांच्यातही आहे आणि गरीबांच्यातही आहे. जे ‘आहे रे वर्गातले आहेत त्यांच्यात आहे आणि जे ‘नाही रे’ वर्गातले आहेत त्यांच्यातही आहे, बहुजनांमध्ये आहे आणि अभिजनांमध्येही (elite class) आहे. दलितजनांमध्ये आहे तसेच ललितजनांध्येही (कलावंतांमध्येही) आहे. खेडूतांमध्ये आहे तसा नागरजनांमध्येही आहे. स्त्रियांमध्ये आहे तसा पुरुषांमध्येही आहे. आपण जेव्हा ‘जनी जनार्दन’ मानून त्याची सेवा करायची म्हणतो तेव्हा यांपैकी कोणाची सेवा करणे अभिप्रेत आहे ?
आर्तदेवो भव ।
याचे स्वाभाविक उत्तर असे आहे की स्वतःमधले ईश्वरत्व प्रकट करण्यासाठी ज्यांच्याभोवती अनुकूल परिस्थिती नाही, अशांची सेवा प्रथम केली पाहिजे. म्हणजे गरिबांची, ‘नाही रे’ ची, बहुजनांची, दलितजनांची, खेडुतांची, स्त्रियांची, आर्ताची, पीडितांची, दुःखितांची सेवा करायची आहे. म्हणजे ‘जे का रंजले गांजले’ आहेत, ‘ज्यांसी आपंगिता नाही’ त्यांच्या विकासाला अनुकूल अशी परिस्थिती त्यांच्याभोवती निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी Depressed Classes Mission स्थापन करून प्रथम मुंबई येथे अस्पृश्य मुलांसाठी शाळा काढली. दलित विद्यार्थ्यांसाठी त्यांनी १५० वसतिगृहे सुरू केली. वनवासी कल्याण आश्रमाने शेकडो गिरिजन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निवासी शाळा काढल्या. महात्मा फुले आणि महर्षी कर्वे यांनी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली. आण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीच्या गरीब शेतकऱ्यांच्या बरड माळावर समृद्धी फुलवली. कुष्ठरोग्यांच्या वेदनांनी व्यथित होऊन बाबा आमटे यांनी आनंदवन उभारले आणि कुष्ठरोग्यांच्या जीवनात चैतन्य आणि आशा निर्माण केली. आंध्र वादळाने ज्यांची जीवने उध्वस्त झाली होती त्यांना रामकृष्ण मिशनच्या संन्याशानी ती पुन्हा उभारून दिली. विवेकानंद केंद्राने अरुणाचल प्रदेशासारख्या दुर्गम ठिकाणी गिरिजनांसाठी शाळा काढल्या. या सर्व सेवाकार्यांचे लक्ष्य हे अविकसित आणि आर्त मानव हेच आहे.केवळ स्वतःपुरते न पाहणे, आपल्या भोवतालच्या व्यक्ती, आपला समाज यांच्या सुखःदुखाविषयी उत्कट संवेदना असणे हे खरे मनुष्यत्वाचे लक्षण आहे.
सेवेच्या प्रेरणा : आव्हान
वर ज्या सेवाकार्यांचा उल्लेख केला आहे, ती करणाऱ्या व्यक्ती आणि संघटना यांचे स्वभाव, कार्यशैली, साधने ही भिन्न भिन्न असतील. तथापि त्यांचा परिणाम मात्र एकच आहे – तो म्हणजे ज्या माणसांची ते सेवा करीत आहेत ती माणसे अधिक समर्थ, निर्भय आणि सुखी होताना दिसत आहेत. जगत ठिकठिकाणी तरुणांना अशा प्रकारच्या सेवा कार्यांमध्ये एक आव्हान वाटते, त्या संबंधी ओढ वाटते, त्यात झोकून दयावेसे वाटते असे दिसते. या सेवाकार्यांच्या मागे प्रेरणा तरी कोणत्या असतील असा विचार मनात येतो. एक प्रेरणा असावी पराक्रमाची. समाजाची दुःस्थिती मी पालटून दाखवीन अशी प्रेरणा असते. दुसरी प्रेरणा ही करुणेची आहे. स्वर्गवासी डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांनी पहिल्या प्रेरणेचे उदाहरण सांगितले आहे. दक्षिण अमेरिकेत ‘औका’ नावाची एक हिंस्र रानटी जमात आहे. या जमातीत धर्मप्रसार करण्यासाठी म्हणून एक ख्रिश्चन मिशन काम करीत होते. या मिशनमधील चार उमदे तरुण औका जमातीच्या हिंस्रपणाचे भक्ष्य झाले. ही बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच हजार अमेरिकन तरुण पेटून उठले. आम्ही औकांना माणसाळवून दाखवू, आम्हाला औकांमध्ये काम करायला पाठवा अशी पत्रे त्यांनी त्या मिशनरी केंद्राला पाठविली. ह्यात परिस्थिती बदलण्याची, त्यासाठी हवे ते साहस करण्याची प्रेरणा दिसून येते.
करुणेची प्रेरणा
दुसरी प्रेरणा करुणेची आहे. दक्षिण भारतातील वेलोर हॉस्पिटलच्या संचालिका कै. डॉ. आयडा स्कडर यांनी वैद्यकीय सेवेचे व्रत का स्वीकारले त्याची एक गोष्ट आहे. त्यांचे आईवडील हिंदुस्थानात येऊन काम करत होते. तथापि लहानपणी त्यांना स्वतःला मात्र हिंदुस्थानचा तिटकारा वाटे. एकदा सुट्टीत अशाच त्या हिंदुस्थानात आल्या होत्या. एक दिवस त्यांचे आईवडील काही कामानिमित्त जवळपासच्या गावी गेले होते आणि त्या घरी एकट्याच होत्या. एका हिंदू माणसाची बायको गर्भवती होती. तिच्या पोटातला गर्भ अडला होता. ती असह्य वेदनांनी तळमळत होती. त्या माणसाचा आग्रह होता की आयडांनी त्याच्या घरी येऊन त्याच्या बायकोची सुटका करावी. परंतु आयडांचे वैद्यकीय शिक्षण त्या वेळी झाले नव्हते. दुसरा एक पुरुष डॉक्टर उपलब्ध होता. पण तो माणूस पुरुष डॉक्टरला आपल्या पत्नीला हात लावू देण्यास तयार नव्हता. ती गर्भवती स्त्री शेवटी वेदनांनी तडफडत आयाडाच्या देखत मृत्यु पावली. योगायोगाने एक मुसलमानाची बायकोही त्याच दिवशी अडलेली होती आणि स्त्री डॉक्टरकडून मदत न मिळ्याल्याने तीही त्याच दिवशी मृत्युमुखी पडली. या दोन घटनांचा जबरदस्त परिणाम आयडा स्कडर यांच्यावर झाला. त्या मायदेशी गेल्या आणि वैदयकीय शिक्षण घेऊन रुग्णसेवेसाठी पुन्हा हिंदुस्थानात परतल्या.करुणेची प्रेरणा ही अशी असते. महात्मा गांधीनी म्हटले आहे, या कार्यात (ग्रामविकास) जे कार्यकर्ते सामील होतील त्यांना त्यात गोडी वाटली पाहिजे. गोडीसारखे दुसरे इन्सेन्टिव्ह नाही. ही स्वयंप्रेरणा म्हणजे सहसंवेदनेतून किंवा करुणेतून जन्माला आली असली पाहिजे.
ज्ञान प्रबोधिनीतील सेवाकार्ये
वरील प्रेरणा-विचारांच्या संदर्भात ज्ञान प्रबोधिनीकडे पहिले तर एक मोठा घटनापट आणि त्या घटनांशी संबंधित प्रेरणा यांचे चित्र समोर येते. ज्ञान प्रबोधिनीच्या स्थापनेच्याही पूर्वी कै. डॉ. आप्पाजी पेंडसे आणि त्यांचे सहकारी डॉ. व. सी. ताम्हनकर आणि प्रा. य. शं. लेले यांनी विशेषतः आपत्तीच्या काळात अनेक सेवाकार्ये स्वयंस्फूर्तीने केली होती. १९५२ मध्ये पुण्याजवळ शिवणे या गावी मुख्य रस्त्याला जोडणारा एक उपरस्ता तयार करण्याचे काम त्यांनी केले. त्या वर्षी महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत सापडलेला होता. त्यावेळी दुष्काळ विमोचन समितीची स्थापना करून कै. डॉ. आप्पाजी पेंडसे यांनी महाराष्ट्रभर विविध ठिकाणी मदतकार्याचे उपक्रम चालविले. १९५७ मध्ये सगळेच पुणे एन्फ्लुएन्झाच्या साथीने आजारी पडले. हजारो लोक बिछान्याला खिळले. त्यापैकी आप्पांनी पुढाकार घेऊन पुण्यात अनेक ठिकाणी इन्फ्लुएन्झा उपचार आणि प्रतिबंधक केंद्रे सुरू केली. पुणे जिल्ह्यातही वडगाव, तळेगाव, चिंचवड, बोपोडी, पाषाण, मुंढवा, विंझर इ. ठिकाणी केंद्रे उभारली. १९६१ मध्ये पानशेतचे धरण फुटून पुण्यात प्रलय झाला तेव्हा डॉ. आप्पाजी पेंडसे आणि त्यांचे सहकारी-शिष्य आण्णा ताम्हनकर, अरविंद वाकणकर, आणि इतर मित्र तीन-तीन आठवडे आपापली कामे सोडून घरोघरी चिखल उपसत होते. पूरग्रस्त साहाय्याचा लाभ न्यू इंग्लिश स्कूल शेजारच्या (टिळक रस्ता) मातंगवस्तीला कसा होईल याचा विचार आणि कार्यवाही करत होते. त्यासाठी श्री. शंकरराव म्हात्रे आदींबरोबर फिरून कसोशीने प्रयत्न करत होते.१९६२ साली प्रबोधिनीची स्थापना झाली. त्यानंतर १९६७ च्या बिहारच्या दुष्काळात प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी मदतकार्य केले. १९६७ मध्येच कोयनेचा भूकंप झाला, तेव्हा प्रबोधिनीने एक छावणीच कोयनेला उभारली. छावणीवर प्रा. यशवंतराव लेले दीड महिना होते. विद्यार्थ्यांच्या तुकड्या येत होत्या. जगापासून तुटलेल्या दीडशे गावांत त्यांनी डोक्यावरून वाहून मदत पोचविली. १९७७ मध्ये आंध्रचा किनारा वादळलाटेने उध्वस्त केला, तेव्हा डॉ. गिरीश बापट व प्रबोधिनीतील दहावी-बारावीचे विद्यार्थीसुद्धा अभ्यास बाजूला ठेऊन आंध्रला गेले. त्यांनी सडलेली प्रेते वाहून नेली. त्यांचे अंत्यविधी केले. वादळग्रस्तांची घरे उभारून दिली. मोरवीच्या धरणफुटीच्या वेळीही असेच काम केले.
करुणेचे आवाहन
देशावर कोठेही नैसर्गिक आपत्ती येवो तिथे धावून जायचे आणि आपल्या शक्तीनिशी काम करायचे असे जणू बाळकडूच प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांना आणि कार्यकर्त्यांना कै आप्पांमुळे मिळाले. त्यांच्या पहिल्या श्राद्धदिनी त्यांना श्रद्धांजली वाहताना बॅ. आप्पा पंत म्हणाले होते, ‘आप्पांचे दोन व्यक्तिमत्व-विशेष मला जाणवले, ते म्हणजे करुणा आणि उत्तमता. सामान्यतः जे उत्तमतेचा आग्रह धरतात, त्यांच्या पोटी करुणा नसते आणि करुणामय हृदयाचे लोक उत्तमतेला प्राधान्य देऊ शकत नाहीत. पण आप्पांच्या ठिकाणी या दोन्ही गोष्टी होत्या.’निवेदितांनी आपल्या एका भाषणात भारतीय मातांना आवाहन केले आहे- ‘आपल्या मुलांमध्ये एक गाढ करुणा आपल्याला नाही का बिंबवता यायची? या करुणेमुळे लोकांच्या हालअपेष्टा, या मायभूमीची दुःखे यांचे ज्ञान वाढू लागते. या वाढत्या ज्ञानातून कामाच्या आनंदासाठी काम करणारे, आपल्या देशबांधवांची सेवा घडेल ना, मग त्यासाठी मृत्यूही पत्करीन अशा बाण्याने वागणारे कार्यकर्ते निर्माण होतील.’
कल्याण गावाशी जुळलेले नाते
आप्पांनी अशा प्रकारच्या सेवेचा, करुणेचा संस्कार प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर करण्याचा प्रयत्न केला. १९५० पासून त्यांचा सिंहगड पायथ्याच्या कल्याण गावाशी संबंध होता. या गावाचा राम डिंबळे हा मुलगा तर त्यांचा मानसपुत्र होता. खेड्यांची दुःस्थिती ते जवळून पाहत होते. कल्याण गावातून पुण्यात दूधविक्री सुरू करू या, तेथे कुक्कुटपालनाचा व्यवसाय लोकांना काढून देऊया. गुरांची उन्हाळ्यात तलखी होऊ नये म्हणून बंधारा बांधूया असे वाटून त्या अनुषंगाने बहुविध उपक्रम त्यांनी केले. हे उपक्रम करीत असताना ते गावकऱ्यांच्या घरी घरचे म्हणून जात. जिव्हाळ्याने बोलत, बसत. त्यांची सुखःदुखे जाणून घेत. यथाशक्ती ती हलकी करण्याचा प्रयत्न करत. कल्याणच्या ग्रामस्थांना आप्पा हा मोठा आधार वाटे.
‘नाही रें’ ना प्राधान्य
हळूहळू या संबंधांतूनच ज्ञान प्रबोधिनीच्या शिवगंगा खोरे विकास योजनेने आकार घेतला. शेतीची अवजारे पुरविणे, बी-बियाणे पुरविणे, विहिरी, पाझर तलाव खोदणे अशी अनेक कामे सुरू झाली. शिवापूरला किर्लोस्करांच्या साहाय्याने यंत्रशाळा सुरू झाली. ग्रामीण तरुणांना आर्थिकदृष्ट्या समर्थ करण्यासाठी हा प्रयत्न होता. या सर्व उपक्रमांचा लाभ खेड्यातला नाही रे वर्ग म्हणजे दलित, नवबौद्ध, मातंग यांनाही मिळालाच पाहिजे असा आप्पांचा आग्रह असे. म्हणून यंत्रशाळेच्या उद्योजक साहाय्य योजनेतून पहिले यंत्रकुटीर उभे राहिले ते कोंढणपूरचे गुलाबराव कांबळे यांचे. भुजंगराव वनशीव यांसारख्या दलित समाजातील कुशल तंत्रज्ञाचेही यंत्रकुटीर उभे राहिले. वडार समाजातील मुस्लिम तरुण श्री. सैपन तथा सोपानराव करजगी यांचेही यंत्रकुटीर यंत्रशाळेच्या मदतीने उभे राहिले. आजही यंत्रशाळेत सर्जेराव गायकवाड यांच्यासारखे अनेक उमदे नवबौद्ध तरुण उत्तम काम करीत आहेत.
दारूबंदी आंदोलनात हरिजनांचा पुढाकार
१९८६ मध्ये शिवगंगा खोऱ्यात जे दारूबंदी आंदोलन झाले त्यात अकरा गावांमधील हरिजन स्त्री-पुरुष पुढाकार घेऊन काम करीत होते. कुसगावाच्या सौ. गिरिजाबाई गायकवाड यांचे वय पंचाहत्तर, पण जिद्द जबरदस्त. त्या पत्रकारांना म्हणाल्या, ‘खोऱ्यातील हातभट्टी बंद झाली. शिवापूर बागेतली देशी दारूची दुकाने बंद पाडण्यासाठी मी याही वयात आंदोलनात भाग घेणार! खोऱ्यातून दारूचा थेंबही दिसणार नाही यासाठी आम्ही झगडणार आहोत!’पॅन्थरचे कार्यकर्ते जेव्हा लखपती कंजारभाटांना ‘दलित’ समजून त्यांचा कैवार घेऊ लागले, तेव्हा शिवगंगा खोऱ्यातल्या अकरा गावातल्या ३०० हरिजनांनी कंजाऱ्यांच्या तडीपारीच्या मागणीवर सह्या करून ते पत्र उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठविले. दारूबंदी आंदोलनात स्त्रियांचा सहभाग शेकडोंच्या संख्येने होता. या सर्व अशिक्षित ग्रामीण स्त्रिया होत्या. पण प्रबोधिनी त्यांच्या दुःखावर इलाज करीत आहे या विश्वासाने त्या आंदोलनात सहभागी झाल्या.
‘क्लासेस’ कडून ‘मासेस’ कडे
ग्रामीण भागातील स्त्री-पुरुषांचा एवढा विश्वास ज्ञान प्रबोधिनीला का लाभला या मागे १९५२ पासूनचा इतिहास आहे. प्रबोधिनीचे काही टीकाकार उत्साहाने म्हणत असतात की प्रबोधिनी ‘मासेस’ची नसून ‘क्लासेस’ची आहे! दारूबंदी आंदोलनातून या टीकेला चांगले सज्जड उत्तर मिळाले आहे. तरीही याबाबत प्रबोधिनीची भूमिका स्पष्टपणे मांडली पाहिजे.
बुद्धिमान मुलांच्या शिक्षणापासून ज्ञान प्रबोधिनीने प्रारंभ केला, परंतु त्याच काळात ग्रामविकासाची मुहूर्तमेढ रोवली. बुद्धिमान मुलांच्या शिक्षणापासून प्रारंभ का केला याबद्दल कै. डॉ. आप्पाजी पेंडसे यांनी एका पत्रात लिहिले आहे- ‘माणसे कमी आहेत. शहाणी माणसा त्याहून कमी आहेत. म्हणून शहाण्या माणसांना आधी आपल्याकडे आकर्षित करून घेऊन त्यांना कामाला लावले पाहिजे हे सुचले आणि ज्ञान प्रबोधिनीची स्थापना झाली. देशाच्या पुनर्रचनेला केवळ सद्भाव पुरणार नाही, सद्भावला विशाल कर्तृत्व, निश्चयशक्ती, प्रेरकशक्ती, समस्यांचे स्वरूप बरोबर समजून घेणे आणि समस्यांवर बरोबर उपाय शोधून काढणे याची आवश्यकता आहे.’ बुद्धिमान मुलांना या विविध प्रकारच्या शक्ती लवकर आत्मसात करणे शक्य होईल असे यातले गृहीतक आहे.
ग्रामीण युवक व दलितांचे शिक्षण
आप्पा हे मानसशास्त्रज्ञ होते. बुद्धिमत्ता ही कोणत्याही एक वर्गाची मिरासदारी आहे असे त्यांना वाटत नव्हते. समाजाच्या सर्व स्तरांमधून बुद्धिमान मुले शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असे. कोल्हापूर परिसरातल्या खेड्यांतील पाच बुद्धिमान मुले त्यांनी मा. रत्नाप्पाआण्णा कुंभार यांच्या साहाय्याने पुण्यात आणली. ज्ञान प्रबोधिनीत त्यांचे शिक्षण झाले. आजही म्हैसाळच्या दलित समाजातील मुले प्रबोधिनीच्या वसतिगृहात राहून प्रबोधिनीच्या पुण्याच्या प्रशालेत शिकतात. या मुलांनी पुन्हा आपल्या भागात जाऊन तिथे काम करावे अशाच स्वरूपाचे आवाहन केले जाते. गिरिवासी वनवासी यांच्यातील गुणी मुले ज्ञान प्रबोधिनीत शिकण्यासाठी यावीत, यासाठीही प्रयत्न चालले आहेत. महापालिकेच्या शाळांमधून मुले यावीत असाही नित्य प्रयत्न असतो.ज्ञान प्रबोधिनीच्या कृषितंत्र निकेतनात तांत्रिक शिक्षणासाठी येणारी कित्येक ग्रामीण मुले ही दहावी नापास असतात. निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयात पूर्व प्राथमिक पासून दहावीपर्यंत सर्व बौद्धिक स्तराचे दोन हजार विद्यार्थी शिकतात. ज्ञान प्रबोधिनीच्या शैक्षणिक कल्पना या नागर नि ग्रामीण अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांमधून चारित्र्यसंपन्न माणसे घडविण्यासाठी आहेत. प्रा. वामनराव अभ्यंकर यांनी परिश्रमपूर्वक, कल्पकतेने हा प्रयोग निगडी येथे यशस्वी केला आहे. दोन्ही ठिकाणी त्या परिणामकारक ठरत आहेत. अमेरिकेतील बेथ्यून यांच्या शाळेचे ध्येयवाक्य असे आहे की-Enter to Learn, go out to serve.
निराधार खेड्यात सुखाची स्वप्ने व्हावी जागी…
ज्ञान प्रबोधिनीतील शिक्षणाची दिशासुद्धा हीच आहे. येथे गायिल्या जाणाऱ्या गीतांमधूनही याच आकांक्षा प्रतिबिंबित झालेल्या दिसतात. प्रा. राम डिंबळे यांनी कै. आप्पांना श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे-‘तुम्ही आम्हाला इथे शिकविले इतरांसाठी जिणेघोर जरी अंधार भोवती तरुणांनी का भिणे ?उज्ज्वल माझा दिवस उद्याचा सर्वांसाठी असोएक एक जोडीत जीवना जनसंघटना दिसोस्वप्न असे हे तुम्ही दिधलेले प्रतिदिन आम्हा गमो ।।मत्सर आहे, मस्ती आहे, पुंडजनांची भीतीदारिद्र्याचा शाप सनातन, दांभिकता ही नीतीशब्द-वेष-देशांच्या भिंती, लढत शेकडो जातीधमन्यांमधूनी रक्त एक परि पूर्ण लोपली नातीअशा आपल्या हतबल देशा सुधारण्या मन रमो ।।व्यक्ति व्यक्ति हो पूर्ण समर्पित, विद्या हो व्रतदायीलाचारीचा अंश नसावा, सामाजसेवेपायीधर्म बनावा समाजधारक, विद्वता उपयोगीनिराधार खेड्यात सुखाची स्वप्ने व्हावी जागीअसे प्रबोधन हे आजीवन तुजसम आम्हा जमो ।।’
सामान्य आकांक्षांमध्ये गुंतून जाऊ नका !
ज्ञान प्रबोधिनीत शिक्षण घेऊन युवक-युवतींनी सेवेसाठी, प्रबोधनासाठी देशभर जावे अशी कै. आप्पांची अपेक्षा होती. १९६९ मध्ये प्रबोधिनीची पूर्ण वेळ प्रशाला सुरू झाली. त्याही आधी १९६२ मध्ये मुलांचे सायंवर्ग म्हणजेच प्रबोधशाला सुरू झाली. तेव्हापासून समाजासाठी काम करण्याचा संस्कार देण्याचा प्रयत्न येथे चाललेला आहे. पदवी परीक्षा झाल्यावर किमान दोन वर्षे काम करावे आणि नंतर व्यवसाय, विवाह इ. गोष्टींकडे वळावे असे आवाहन ज्ञान प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांना केले जाते. परंतु पुष्कळ पालकांना हा विचार मानवत नाही असा अनुभव आहे. पैसा, नोकरी, सुरक्षितता, स्वास्थ्य हे प्रथम, लोकसेवा ही जमल्यास सवडीने करायची गोष्ट, अशी भावना असते. विवेकानंद जयंतीच्या एका प्रकट भाषणात त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पालकांना आप्पा अत्यंत आर्ततेने म्हणाले की, ‘आपली मुले जर कामासाठी पेटून उभी राहिली नाहीत तर मी म्हणेन की तुम्ही हे होऊ दिले नाही, तुम्ही त्यांना सामान्य आकांक्षांमध्ये अडकवून ठेवलेत ! विकसित देशांमधून व्यक्तिवादाचे (individualism) आणि भोगवादाचे झालेले आक्रमण हेही सेवेची प्रेरणा क्षीण करणारे आहे.
सेवाप्रेरणा सतेज कशी ठेवायची ?
ज्ञान प्रबोधिनीत स्वामी विवेकानंद, भगिनी निवेदिता यांच्या विचारांचा पुनःपुन्हा अभ्यास केला जातो, तोही सेवाप्रेरणा, कार्यप्रेरणा सतेज ठेवण्यासाठी. स्वामीजींनी अत्यंत स्फूर्तिदायक शब्दांत म्हटले आहे-‘विसरू नकोस की जगदंबेच्या चरणांशी समर्पित होण्यासाठी तुझा जन्म आहे ! विसरू नकोस की तुझी समाजरचना म्हणजे विश्वशक्तीचे एक स्पंदन आहे ! विसरू नकोस की हे शुद्वार्णीय, अजाण, निरक्षर, गोरगरीब, हा कोळी, तो भंगी हे तुझ्याच हाडामंसांचे आहेत, तुझेच भाऊ आहेत !’
या सर्वांमाधल्या जनार्दनाची सेवा करायची म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण हे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे एवढेच स्वामीजींना अभिप्रेत नव्हते. भौतिक शिक्षणाबरोबर संस्कृती आणि अध्यात्म हेही झोपड्या-झोपड्यांपर्यंत पोचले पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती. संस्कृत भाषा, संस्कृती आणि अध्यात्म हा काही कोण्या विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नव्हे, तर महात्मा गांधी ज्याला अंत्य म्हणत त्या शेवटच्या, तळागाळातल्या माणसांपर्यंत ही तिन्ही पोचली पाहिजेत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि त्याचबरोबर संस्कृत, संस्कृती आणि अध्यात्म हे सर्व मिळून अंत्योदय पूर्ण होतो. महात्मा गांधींचीही अशीच कल्पना होती.
महात्माजी स्त्रियांचा प्रश्नाबाबत…
विकासाच्या संधी ज्यांना उपलब्ध झालेल्या नाहीत अशा वर्गामध्ये स्त्रियांची गणना होते. त्यांच्यासंबधी स्वतंत्र विचार केला पाहिजे. गांधींजीनी म्हटले आहे, ‘पुरुषाइतकेच मानसिक सामर्थ्य असलेली स्त्री ही त्याची सहचरी आहे. पुरुषाला जो स्वातंत्र्याचा हक्क आहे, तोच तिलाही आहे. पुरुषाला त्याच्या कार्यक्षेत्रात जसे श्रेष्ठ स्थान आहे, तसेच तिलाही तिच्या कार्यक्षेत्रात मिळण्याचा हक्क आहे. हे स्वाभविकपणे व्हायला पाहिजे. केवळ लिहिणे- वाचणे शिकण्याचा परिणाम म्हणून नव्हे, तर एका दुष्ट प्रथेच्या दडपणामुळे अत्यंत अज्ञानी व नालायक पुरुषांना स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ दर्जा प्राप्त झाला आहे. या दर्जाला ते पात्र नाहीत व त्यांना तो मिळता कामा नये.
हुंड्यासारख्या अधःपात करणाऱ्या प्रथेविरुद्ध प्रभावी लोकमत निर्माण केले पाहिजे. ज्या तरुणांचे हात अशा गैर मार्गांनी मिळविलेल्या सोन्याने कलंकित झाले असतील त्यांना वाळीत टाकले पाहिजे. मुलींच्या पालकांचे डोळे इंग्रजी पदव्यांनी दिपून जाता कामा नयेत व त्यांनी आपल्या जातीबाहेरच्या किंवा प्रांताबाहेरच्या सुयोग्य तरुणांशी आपल्या मुलींची लग्ने लावायला कचरता कामा नये.
हिंदुस्थानातच नव्हे तर जगात सर्व स्त्रियांना स्वतःच्या विकासासाठी लढा द्यावा लागला आहे व लागत आहे. सर्वत्रच स्त्रिला उपभोग्य वस्तू मानले जात आहे. संपर्क-माध्यमातून तिच्या शरीराची लज्जास्पद जाहिरात केली जात आहे. खेड्यापाड्यांत पसरलेला स्त्री- समाज अदयाप अशिक्षित आहे, अंधश्रद्धांचा बळी आहे. हुंडा, सासुरवास, सुनेला छळणे, जाळणे, मारणे या गोष्टी तर खेड्यात आणि शहरात दोन्हीकडे सरसकट आहेत. राजस्थानमधील ‘सती’ घटनाही अस्वस्थ करणारी आहे. महाराष्ट्रात शासनाने मुलींना शालेय शिक्षण निःशुल्क केलेले असले तरी लहान वयातच पैसा मिळविण्याची जबाबदारी पडते किंवा भावंडांना सांभाळण्याची जवाबदारी पडते, त्यामुळे त्यांना या सवलतीचा लाभ घेता येत नाही.
मंजूश्री सारडा प्रकरण : निषेध अभियान
ज्ञान प्रबोधिनीचा युवती विभाग सुरू झाला तेव्हापासून स्त्रियांच्या विविध प्रश्नांवर येथे अभ्यास, पाहणी चालू असते. ‘जिव्हाळा’ या ज्ञान प्रबोधिनीच्या मानसशास्त्र संशोधन संस्थेने चालविलेल्या मार्गदर्शन केंद्रात स्त्रियांना साहाय्यही केले जाते. स्त्रीवरील अत्याचारांविरुद्ध लोकमत जागृत करण्याचा ज्ञान प्रबोधिनीचा पहिला सामूहिक प्रयत्न मंजुश्री सारडा खून खटल्याच्या वेळी १९८२ मध्ये झाला. मंजुश्रीचा पती शरद सारडा यांचे वकीलपत्र घेणारे वकील कै. श्री बाबाराव भिडे यांच्याकडे जाऊन प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खटला न चालविण्याची विनंती केली. ती त्यांनी न मानल्याने शरद सारडा, त्यांचे नातेवाईक आणि श्री बाबाराव भिडे यांच्याविरुद्ध निषेधाची मोठी लाट पुण्यात उसळली. या अभियानाचे नेतृत्व ज्ञान प्रबोधिनीने केले.
‘सती’ निषेध
अलीकडे राजस्थानात दिवराला या गावी घडलेल्या सती घटनेच्या विरोधात लोकमत जागृत करण्यासाठी ज्ञान प्रबोधिनीच्या ४३ विद्यार्थिनी, कार्यकर्त्या, शिक्षिका राजस्थानला गेल्या होत्या. त्यांनी दिवरालासह २४ गावांमध्ये गटागटांनी जाऊन काम केले. तिथे कीर्तने केली, सभा घेतल्या. त्यातून सती न जाता ज्यांनी पतीच्यानिधनानंतर राज्यकारभार चालविला, पराक्रम गाजविला, धर्मसेवा केली अशा स्त्रियांची चरित्रे सांगितली. ‘मुलगी झाली हो’ या सारख्या नाट्यातून स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांची जाणीव लोकांना करून दिली. जयपूरच्या ‘महारानी गायत्रीदेवी कॉलेज’ मध्ये सभा घेऊन सती घटनेचा निषेद केला आणि अशा घटना थांबविण्यासाठी काय केले पाहिजे यासंबंधी राजस्थानातील महिला संघटनांच्या कार्यकर्त्या आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी यांच्याबरोबर त्यांचे बोलणे झाले. राजस्थानातील विधवांची स्थिती अतिशय बिकट आहे. त्यांनी आपली दुःखे प्रबोधिनीच्या युवती कार्यकर्त्यांना सांगितली. संपूर्ण देशभर स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करणारी व्यापक संघटना किती आवश्यक आहे हे राजस्थान दौऱ्यातून फार जाणवले.
कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण सेवा
१९८० पासून ज्ञान प्रबोधिनी शिवगंगा आणि गुंजवणी खोऱ्यांमध्ये १७७ खेड्यांत कुष्ठरोग आणि क्षयरोग निवारणाचे काम करीत आहे. कुष्ठरोग्यांची स्वतंत्र वस्ती न करता त्यांना त्यांच्या घराने आणि समाजाने समजावून घ्यावे यासाठी प्रबोधिनीच्या आरोग्य योजनेचे कार्यकर्ते प्रयत्न करीत असतात. या खोऱ्यांमधील काही गावांमध्ये राज्य परिवहनाची बस जात नाही, जीप सुद्धा जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी सायकलने किंवा पायी जाऊन आरोग्य-प्रबोधक रुग्णांना औषधे पोचवितात. या कामात अंधश्रद्धा, देवऋषी, मंत्रतंत्र या सर्व गोष्टींशी टक्कर घ्यावी लागते. रुग्णांना शिकवावे लागते, त्यांच्याशी मायेने बोलून शुश्रूषा करावी लागते. ‘तुम्ही ज्या प्रेमाने वागवता, ज्या काळजीने जखमा धुता, बांधता तसे आमच्या गावचे डॉक्टर करत नाहीत,’ म्हणून कर्नाटकहून शिवापूरला उपचारासाठी येणारे कुष्ठरोगी आहेत.
यावर शक्ती केंद्रित करावयाची आहे
ग्रामीण तरुणांच्या विकासासाठी प्रबोधिनी गेली १७-१८ वर्षे काम करीत आहे. दारूबंदी आंदोलनाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील स्त्रियांच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाला प्रबोधिनीने हात घातला आहे. पण हे काम फार अल्प आहे. स्त्रिया आणि दलित यांच्या प्रश्नाबाबत व्यापक पातळीवर काम व्हायला पाहिजे आहे. महाराष्ट्रात प्रागतिक वातावरणात वाढलेल्या युवतींनी बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेशाचा अविकसित भाग अशा ठिकाणी जाऊन स्त्रियांच्या प्रश्नांबाबत जागृती केली पाहिजे. हुंडा, सासऱ्यांचा छळवाद, भोगाचे साधन म्हणून केला जाणारा वापर या सर्व दारूण समस्यांवर विधायक, सेवात्मक आणि आंदोलनात्मक काम व्हायला पाहिजे आहे.
आदिवासी, वनवासी, भटक्या विमुक्त जमाती, गिरीजन, हरिजन या समाजांचे रूप पालटण्यासाठी त्या त्या समाजामधून ध्येयवादी, विधायक विचारांचे युवक निर्माण व्हायला पाहिजेत. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ज्ञान प्रबोधिनीने घ्यायला हवी आहे. जातिवादी राजकारणाने जातिभेद अधिक बळकट झाले आहेत.
कोणी निरपेक्ष बुद्धीने साहाय्य करील अशी अपेक्षा आता ‘नाही रे’ या वर्गातील लोक करीत नाहीत. निरपेक्ष बंधुता, सद्भाव आणि सहभाव, दया नव्हे- हे घेऊन शोषितांकडे जायला हवे आहे. आणि तेथेही केलेल्या साहाय्याबद्दल कृतज्ञतेचीही अपेक्षा न करता शतकानुशतके साचलेला कडवटपणा चार दिवसांच्या सद्भावयुक्त कामाने निचरणार नाही. यासाठी संपूर्ण आयुष्य काम करण्याची तितिक्षा असलेले कार्यकर्ते निर्माण व्हावयाला हवेत.
सेवेत अहंकार विसर्जन
अहंकार किंवा उपकार भावना ठेवून कोणतेही सेवाकार्य करण्याने त्या कार्याचा हेतू पराजित होत असतो. केवळ योगायोगाने मला विकासाची संधी मिळाली आहे, परंतु अशी संधी ज्याला मिळाली नाही, त्याच्यापर्यंत ती संधी पोहोचविण्याचे मला साधन झाले पाहिजे, त्यांच्यात जो सुप्त जनार्दन आहे, त्याची मी विनम्र भावाने सेवा केली पाहिजे, असा भाव महत्त्वाचा आहे. भगिनी निवेदितांनी फार सुंदर शब्दांत लिहिले आहे-‘सेवेमध्ये अहंविस्मरणपूर्वक रममाण होता यावे म्हणून वर्षानुवर्षे सेवा करीत राहावे लागेल. क्षणोक्षणी तुमचे मन कर्म सोडून सुखाकडे वळेल, मोहाकडे वळेल, निंदास्तुतीचे तुमच्यावर परिणाम होतील, आशा-निराशा तुम्हाला हसवतील आणि रडवातील, परंतु हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यागानेच, स्वतःचा पूर्ण विसर पडल्यानेच परमपदप्राप्ती करून घेता येते.
जर खरोखर स्वतःचा विसर आपणास पडला तर मग दुसऱ्याच्या हिताचाच विचार सदैव हृदयात आणि डोक्यात खेळत राहील. दुसऱ्याचे सुख, दुसऱ्याचे कल्याण हाच ध्येयध्यास होईल. मग निरनिराळ्या कार्यपद्धती, निरनिराळ्या योजना व कार्यक्रम यांच्याबद्दल वादविवाद करण्यात आपण वेळ दवडणार नाही. ताबडतोप हातपाय दुसऱ्यासाठी झिजू लागतील. श्रमू लागतील, दरिद्री लोकांचे दारिद्य कसे दूर करू? आपले अस्पृश्य बंधू, ज्यांना आपण पशुहून पशु केले त्यांची स्थिती कशी सुधारू ? लोकांतील शेकडो दुष्ट रूढी कशा नाहीशा करू? अशा विचारांत समाधी लागेल व समाधीतून उपाय सुचतील. सुचलेले उपाय अमलात आणण्यासाठी हात धडपड करू लागतील. अशा रीतीने कायावाचामनाने बुद्धी, हृदय व शरीर यांच्या द्वारा आपण सेवा करण्यात मग्न होऊ, तन्मय होऊ. कर्म, कर्ता आणि कर्मसाधने सारा एकरूप होतील.’ (‘राष्ट्रीय हिंदुधर्म’ साने गुरुजी)
करुणा
सेवा
समर्पण
अहंकार विसर्जन
सहसंवेदना
जनसेवा
लोककल्याण
निश्चय
ध्येयध्यास
२०१४/१५ ते २०१८/१९ कालावधी – युवक विभागाच्या गणेशोत्सव मध्ये सहभाग घेतल्यानंतर उन्हाळ्याच्या काळात वेल्हे परिसरात दुष्काळ निवारण्याच्या कार्यात सहभागी होणे हे सुरुवातीला पराक्रमाचे लक्षण वाटायचे. दर शनिवारी रविवारी असे २ दिवस भर उन्हात दिवसभर विहीर खोली करणासाठी दगड काढणे, हे सर्व करताना पद्य म्हणणे, देशभक्तिपर गीत गाणे यातून हे सर्व आनंदाने करत आहोत, काहीतरी आपल्या हातून पराक्रम होतो आहे अशीच भावना असायची. आपल्या श्रमदानामुळे इथल्या स्थानिक लोकांच्या पाण्याचे प्रश्न सोडविण्यास मदत होईल, ही संवेदना वाटायला सुरुवात झाली.
मग पराक्रमाच्या पुढे सहसंवेदना आणि करुनेची प्रेरणा काम केली असावी, असे आत्ता वाटते. त्यामुळे मग प्रत्येकच शनिवारी, रविवारी आणि पुढचे ३,४ वर्ष नित्याने या भागात येणे झाले.
आमच्यापैकी काहीजण तर महिनाभर काढून याच भागात राहून जनसेवेच्या मार्गी लागले होते.
जनी जनार्दन वाचताना वरील विचार डोक्यात आला.
जनी जनार्दन तत्त्वामध्ये उपेक्षितांमध्ये जनार्दन पाहणे या सोबतच उत्तमतेचा आविष्कार म्हणून जनार्दन पाहणे हा ही भाग आला पाहिजे.
मानस शास्त्र निवडताना कायमच हे डोक्यात आणि मनात होते की अशांना मदत करायची ज्यांना खरी गरज आहे आणि अजूनही तसेच करण्याचे मनात आहे, जनी जनार्दन म्हणताना हे नक्की लक्षात येते की प्रत्येकात ईश्वर आहे पण मदतीचा हात देताना गरजवंत जोखणे पण आवश्यक असे नक्की वाटते, त्या जोखण्याचा माज नसावा पण त्यामुळे शांती मिळू शकेल असे वाटते…