संघटना

एकतेची शक्ती

भगिनी निवेदितांनी संघटनेविषयी म्हटले आहे, ‘आज संघटना करून सामुदायिकरीत्या अनेक प्रश्न हाती घेतले पाहिजेत. ते प्रश्न आपली वाट पाहात आहेत. मी एकटा दुनियेला हलवीन या भ्रमात, या पोकळ घमेंडीत अतःपर कोणी राहू नये. लावलेला प्रत्येक शोध, लिहिलेले प्रत्येक काव्य, कल्पनेत खेळवलेले प्रत्येक स्वप्न, संपादिलेली कोणतीही गोष्ट – ती सामुदायिक होऊ दे, सर्वांची मिळून होऊ दे, सर्वांसाठी होऊ दे. जो खरा धर्ममय सेवक आहे त्याने स्वतःचा अहंकार आधी साफ पुसावा. मी म्हणजे मुख्य कार्यकर्ता ही भावना त्याने आधी दूर फेकून दयावी. प्रबळ स्नेहबंधनांनी एकत्र बांधलेले, एकाच ध्येयाचे भक्त बनलेले, अशा दोन चार लोकांनी प्रथम एकत्र यावे आणि नंतर मानवजातीचे ज्यात कल्याण आहे, स्वबांधवांचे ज्यात कल्याण आहे असे कोणते तरी काम अंगावर घ्यावे. ते प्रथम शाळेत किंवा महाविद्यालयात एकत्र शिकलेले असतील, कदाचित एकाच गुरूच्या हाताखाली शिकल्यामुळे गुरुबंधू झालेले असतील. त्यांना एकत्र आणणारे, परस्परांना जोडणारे बंधन मुळात कोणतेही असो, त्यांच्यात समान ध्येय असावे, प्रयत्नांत सहकार्य असावे. त्यांच्यातील ज्या व्यक्ती संस्थेच्या प्राणभूत असतील त्यांच्यात अभंग प्रेमबंध असावा. अतूट प्रेम असावे. अशा तऱ्हेने जर एकत्र येऊन कार्याला प्रारंभ केला तर यश येण्याचा अवश्य संभव असतो… शास्त्रसंशोधनासाठी, आरोग्यपूर्ण जीवनासाठी, हितकर विचार करण्यासाठी, व्यापक दृष्टीसाठी आपण लायक आहोत की नाही? या गोष्टींसाठी आपल्यात हिमंत आणि कुवत आहे की नाही ? असेल तर आपली ती शक्ती सिद्ध करून दाखविण्याची वेळ आलेली आहे.’

समाजभिमुख संन्यास

स्वामी विवेकानंदांनी जेव्हा युरोप-अमेरिकाचा प्रवास केला तेव्हा तेथील लोक संघटित रीतीने मोठमोठी कामे उभारताना त्यांनी पहिले. ते चकित झाले. त्यांच्या भाषणात पाश्चात्त्यांच्या संघटनकुशलतेचे उल्लेख वारंवार येत. ही कला आपण त्यांच्याकडून शिकली पाहिजे, असे ते म्हणत. रामकृष्ण मिशनच्या स्थापनेच्या मुळाशी असा विचार होता की हिंदू धर्मातील संन्यासी हा मोक्षसाधक असतो, त्याचप्रमाणे सामाजिक संघटनेचाही तो घटक असला पाहिजे. त्याने ‘आत्मनो मोक्षार्थं जगद् हिताय च’ अशी साधना करायला हवी, अशी विवेकानंदांची कल्पना होती. युरोपमध्ये संन्यास सामाजिक जीवनाशी एकरूप झालेला आहे. संन्याशांनी लोकहिताच्या, लोककल्याणाच्या मोठमोठ्या चळवळी केलेल्या आहेत. रामकृष्ण मिशन ही अशा प्रकारची संन्यासी संघटना व्हावी असे विवेकानंदांना वाटे. सिस्टररशियन या संघटनेतील संन्याशांनी युरोपात शेती-शिक्षणाचे प्रचंड काम केले. जेसुइट संन्याशांनी शिक्षणाचा दीप खेड्यापाड्यांतून उजळला. त्यांनी जो शिक्षण प्रसार केला त्याच्या आधारावर युरोपातील मोठमोठ्या विद्यापीठांची उभारणी झाली. फ्रेंन्सिस्कन संघटनेचे संन्यासी आरोग्यसेवेसाठी जगद्विख्यात आहेत. हे सर्व काम कसे झाले? या संघटनांनी स्वतःकरता काही ध्येयनिश्चिती केली. कार्यपद्धती ठरविली. जबाबदाऱ्यांची नेमकी विभागणी केली. संघटना जणू एखादया शरीराप्रमाणे काम करू लागल्या. शरीरातील प्रत्येक अवयव आपापली कामे उत्तम करीत असतो, त्याच प्रमाणे संघटनेतील प्रत्येक घटक उत्तम काम करू लागला. हृदयातून सर्व अवयवांना रक्तपुरवठा होतो तसे संघटनेतील ध्येयदर्शन हे संघटनेतील घटकांना स्फूर्ती देऊ लागले. शत्रूवर स्वारी करणाऱ्या लष्करातही जेवढी शिस्त आणि आज्ञाधारकता नसेल, तेवढी या संन्याशांनच्या संघटनांमधून निर्माण झाली.

संघटन वृत्तीची आवश्यकता

केवळ संन्याशांच्याच नव्हे तर सर्वच नागरिकांच्या संघटनांमध्ये लष्करात, व्यापारात, राज्यकारभारात, शिक्षणात शिस्त, संयम, व्यवस्थितपणा यांचे बीज युरोपात आणि अमेरिकेत पेरले गेले. अमेरिका हा तर व्यक्तिवादाचा पुरस्करर्ता देश. पण तेथेही सर्वसामान्य नागरिकांमध्ये शिस्त, स्वच्छता, सचोटी, सहकार्याने काम करण्याची वृत्ती इत्यादी गुणधर्म दिसतात. साम्यवादी देशांमधील लोकही भांडवलवादी देशांशी स्पर्धा करील अशा तोडीचे संघटित अवकाशसंशोधन, अणुसंशोधन करू शकतात. हिंदुस्थानात मात्र संघटन वृत्तीचा अभाव दिसतो. गेल्या शतकातील विचारवंत, समाजधुरीण यांना तो जाणवला. विसाव्या शतकातल्या नेत्यांनीही संघटन वृत्ती बाणविण्याचा आग्रह धरला. स्वातंत्र्यपूर्व कालात स्वातंत्र्योत्सुक तरुणांच्या संघटना उभ्या राहिल्या. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘अभिनव भारत’ यासारखी संघटना होती. नेताजींची झुंजार ‘आझाद हिंद सेना’ होती. डॉ. हर्डीकरांचे ‘राष्ट्र सेवा दल’, डॉ. हेडगेवार यांनी ज्याचा प्रारंभ केला तो ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ यांसारख्या संघटना प्रभावी झाल्या. या संघटना स्वातंत्र्योत्तर कालातही अस्तित्वात आहेत.

स्वातंत्र्यानंतर जे नवीन पर्व सुरू झाले, त्याचा नवीन प्राण स्वतःमधून प्रकट करणाऱ्या संघटना बांधल्या जायला हव्या होत्या. ते काम फार अल्पप्रमाणात झालेले दिसते. संघटन वृत्तीची जोपासना करणाऱ्या संस्कारांचा अंतर्भाव शिक्षणात आहे असे दिसत नाही. त्यामुळे ठिकठिकाणी छोटी मोठी मंडळे काम करताना दिसत असली तरी संघटन वृत्तीचे शिक्षण नसल्याने छोट्या छोट्या मतभेदांवरून वा स्वार्थासाठी संघटनेत फूट पाडणे, गट पाडणे, एकमुखी नेतृत्व नसणे, सत्तास्पर्धा असणे इत्यादी गोष्टी दिसून येतात. त्या गोष्टी संघटनेचा प्रभाव कमी करतात. व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास करणारे लोक सांगतात की जपानमध्ये संघटितरीत्या काम करण्याची वृत्ती मोठ्या प्रमाणावर दिसून येते. जपान्यांना आपल्या शक्तींचा गुणाकार करण्याची कला अवगत आहे. त्यामुळे त्यांचे संघटित कार्य प्रभावी ठरते. हिंदुस्थानातील व्यक्तिगत गुणवत्तेची उंची मोठी आहे, पण संघटित कामाचे कौशल्य कमी दिसते.

संचाधारित (Cadre based) संघटना

ज्ञान प्रबोधिनीचे तत्त्व म्हणून संघटनेचा विचार करताना तिचा ध्येयवाद, रचना, पद्धती आणि तिच्यातील सदस्यांची वृत्ती अशा विविध संदर्भात विचार करायचा आहे. येथे प्राधान्याने संचाधारित म्हणजे केडर बेस्ड संघटनेचा विचार दृष्टीपुढे आहे. कारण ज्ञान प्रबोधिनी ही कार्यकर्त्यांचा एका संचाधारे उभी राहिलेली-केडर बेस्ड अशी संघटना आहे.धर्मसंस्थापनेसाठी प्रयत्न करणे, उत्तमतेची कास धरणारा नि विज्ञानभिमुख वृत्तीचा समाज निर्माण करणे, हिंदू जीवनमूल्यांची प्रतिष्ठापना करणे, चारित्र्य, पराक्रम, सेवा यांचे आदर्श समाजाच्या सर्व स्तरांमधून निर्माण करणे अशा प्रकारचा ध्येयवाद प्रबोधिनीचे संस्थापक संचालक कै. डॉ. आप्पाजी पेंडसे यांच्या मनात होता. त्यांनी समविचारी कार्यकर्त्यांचा एक संच उभा केला. तूर्त या संचात सुमारे साठ-सत्तर कार्यकर्ते शिक्षण, ग्रामविकास, संशोधन, आरोग्य, उद्योग अशा बहुविध क्षेत्रांत काम करत आहेत. हे कार्यकर्ते शिबिरे, सायंवर्ग, क्रीडा केंद्रे अशा विविध उपक्रमांतून लाभलेले आणि जोडलेले आहेत. विवेकानंद केंद्रासारख्या संघटनेत ते प्रौढ वयात, वृत्तपत्रीय प्रकटन-आवाहन यांना प्रतिसाद देऊन आलेले असतात. त्यांच्या प्रशिक्षणाची कालबद्ध योजना असते आणि नंतर ते कामाच्या आवश्यकतेनुसार भिन्न भिन्न ठिकाणी पाठविले जातात.

काही कार्यकर्ते विद्यार्थीदशेत असताना ज्ञान प्रबोधिनीत येतात. येथील उपक्रमांतून शिकत-शिकत सहा-आठ वर्षांत ते कार्यकर्ते म्हणून सिद्ध होतात. या दोन्ही पद्धतींचे लाभ आणि तोटे आहेत. प्रौढ वयात आलेल्या व्यक्तींच्या मनात कार्य करण्याची इच्छा असते, पण संघटनेविषयी प्रेम व भक्ती निर्माण व्हायला अवधी लागतो. तर लहान वयात आलेल्या युवक-युवतींचे शिक्षणाबाबतचे प्रश्न, घरचे ताणतणाव, व्यक्तिगत हेलकावे हे पुष्कळ असतात. कामाशी स्थिर, दीर्घकालीन बांधिलकी निर्माण होयला वेळ लागतो.

कार्यकर्त्याचे गुण

संघटना हे जसे ज्ञान प्रबोधिनीचे स्वरुप, तसे संस्था हेही एक स्वरूप आहे. संस्था या स्वरुपात ज्ञान प्रबोधिनीची रचना अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, संचालक, कार्यकारी मंडळ, सदस्य मंडळ आशी आहे. संघटना म्हणून मूर्धस्थानी संचालक आणि त्यांच्याभोवती उभे असलेले स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांचे मंडळ किंवा ‘केडर’ अशी रचना आहे. केडरकडून कोणते गुण अपेक्षित आहेत यासंबंधी कै. आप्पांनी वेळोवेळी सांगितले आहे. ते म्हणत की कार्यकर्ता हा सर्वप्रथम responsible म्हणजे जवाबदार, उत्तरदायी असला पाहिजे. तो responsive म्हणजे प्रतिसाद देणारा, संवेदनाक्षमही पाहिजे. त्याच्याजवळ नवीन सुचण्याची शक्ती पाहिजे. म्हणजे तो creative असला पाहिजे. इतरांशी सहकार्याने काम करण्याची हातोटी त्याच्या जवळ हवी, म्हणजे तो co-operative असला पाहिजे आणि आपली प्रेरणा आणि गुण इतरांच्यात संक्रांत करण्याची शक्ती त्याच्याकडे असली पाहिजे. त्याच्यासारखे इतर अनेक कार्यकर्ते त्याला प्रेरित करता आले पाहिजेत. To be responsible, responsive, creative, co-operative and regenerative अशी पंचसूत्री आप्पांनी कार्यकर्त्यांसाठी समोर ठेवली.

चार प्रतिज्ञांची मांडणी : जीवनाची एकवैशिष्ट्यपूर्ण मांडणी

तथापि कामाला सुरुवात करण्याच्या काळात हे सर्वच गुण अपेक्षिता येत नाहीत. टप्याटप्याने व्यक्ती संघटनेच्या निकट येते, याची आप्पांना जाणीव होती. म्हणून या प्रवासाचे चार टप्पे कल्पिले आणि व्यक्ती आणि कार्य यांच्यातील नाते स्पष्ट करणाऱ्या चार प्रतिज्ञांची मांडणी केली. पहिली प्रतिज्ञा ही आपले घरदार, संसार, नोकरी सांभाळूनही समाजासाठी आयुष्यभर मोबदल्याची अपेक्षा न करता काही ना काही काम करण्याची आहे. शनिवारवाड्यावर हजारोंच्या संख्येने नागरिकांना ही प्रतिज्ञा दिली पाहिजे, असे आप्पा म्हणत. म्हणजे जो कोणी या देशाचा नागरिक आहे त्या प्रत्येकानेच ज्यात पैशाची अपेक्षा नाही असे काही सामाजिक- राष्ट्रीय काम स्वतःच्या व्यवसायाचा वेळ सोडून केले पाहिजे असे त्यांना अभिप्रेत होते. द्वितीय प्रतिज्ञा ही ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून, उपक्रमातून स्वदेशसेवा करण्याची आहे. आपण जे काम करीत असू, त्याचे निवेदन संचालकांना करणे, त्यांचे मार्गदर्शन घेणे हे द्वितीय प्रतिज्ञितांकडून अपेक्षित असते. तिसरी प्रतिज्ञा ही ज्ञान प्रबोधिनीचे काम संचालक सांगतील तेथे जाऊन, सांगतील त्या स्वरूपाचे व काही विशिष्ट कालावधीपर्यंत करीन या स्वरुपाची असते. ती वैराग्यपूर्वक वा व्यवहारपूर्वक म्हणजे अविवाहित किंवा विवाहित असतानाही घेता येते. तृतीय प्रतिज्ञितांच्या निर्वाहाचे दायित्व ज्ञान प्रबोधिनीकडे असते. ते निर्वेतन अथवा सवेतनही काम करतात. चतुर्थ प्रतिज्ञा ही ज्ञान प्रबोधिनीला संन्यासपूर्वक सर्वस्व समर्पण करून प्रबोधिनिशी एकरूप होण्याची असते. ज्ञान प्रबोधिनीचे संचालक हे चतुर्थ प्रतीज्ञित असावेत अशी अपेक्षा असते. प्रबोधिनीचे विद्यमान संचालक आणि कार्यवाह हे दोघेही चतुर्थ प्रतिज्ञित आहेत. त्याशिवाय इतरही परीवाज्रक सदस्य असावेत असे प्रबोधिनीच्या घटनेतील परिच्छेद ७.४ मध्ये म्हटलेले आहे. परीवाज्रक सदस्य म्हणजे प्रबोधिनीच्या कार्याला ज्यांनी जीवन समर्पित केलेले आहे, जे प्रबोधिनीचे निश्चित केलेल्या धोरणानुसार भारतात वा भारताबाहेर कोठेही काम करावयास सिद्ध आहेत आणि ज्यांच्या जीवनाला निष्कांचन वृत्ती, विशुद्धता आणि आज्ञांकितता यांचा सुगंध येतो, असे कार्यकर्ते सदस्य. प्रथम प्रतिज्ञेपासून ते चतुर्थ प्रतिज्ञेपर्यंतचा प्रवास जणू सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या चार मुक्तीच्या प्रकारासारखा आहे, प्रबोधिनीचे ध्येय आणि कार्य जाणून घेत, त्यांच्या अधिकाधिक निकट येत, त्यांच्याशी एकरूप होऊन जाण्याचा आहे. संघटना म्हणून प्रबोधिनीचा जो विकास उद्या व्हावयाचा आहे, त्याला जीवनरस पोचविण्याचे सामर्थ्य या प्रतिज्ञांमध्ये आहे असे आजपर्यंतच्या अनुभवावरून अवश्यमेव वाटते.

लोकसंघ निर्माण करावयाचे आहेत

संघटना म्हणून कशा प्रकारची रचना, कार्यपद्धती आणि विस्तार प्रबोधिनीला अपेक्षित आहे? आत्ताची प्रबोधिनी हे एक multiplier model व्हायला पाहिजे हा विचार प्रारंभीपासून आहे. ८ ऑगस्ट १९७७ ला प्रबोधिनीच्या पंधराव्या वाढदिवशी केलेल्या भाषणात कै. आप्पा म्हणाले होते, ‘प्रबोधिनीच्या कार्यकल्पनांचे चिंतन १९४९ पासूनचे आहे. आजवर मिळालेल्या यशाने त्या कल्पना फुलत गेल्या. शिक्षण, संशोधन, उद्योग, आरोग्य, प्रदेशविकसन या सर्वांचा एकत्र मेळ असणे ही अपूर्वाई आहे. या कार्यकल्पनांचे मोल जाणून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी कोण सिद्ध आहेत ? या कामाला पुष्कळ तृतीय प्रतिज्ञित कार्यकर्ते हवे आहेत. आपल्याला काही पुणे आणि शिवगंगा खोरे यांवर समाधान नाही. आपल्याला लोकसंघ निर्माण करायचे आहेत- देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत. हे ध्येय कधीच दृष्टिआड होता कामा नये.’

देशातल्या आणि आपापल्या प्रदेशातील समस्यांची जाण असलेले, त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेले, राष्ट्रीयत्वाची आणि सामाजिक ऐक्याची जाणीव जोपासणारे लोकसंघ उभे राहिले पाहिजेत. त्यांनी विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी काम केले पाहिजे, शिक्षण, संस्कार, मनुष्य-घडण यांचे काम केले पाहिजे, असे आप्पांना अभिप्रेत होते. निगडी येथील नवनगर विद्यालयाच्या निमित्ताने असा एक प्रयोग झाला. निगडीमध्ये शिक्षण-संस्कारांचे दायित्व घेतलेला स्थानिक नागरिकांचा, अध्यापकांचा संघ उभा करण्यात प्रा. वामनराव अभ्यंकर यांना यश आले. असेच प्रयोग देशभर व्हायला पाहिजेत. त्यासाठी सर्व प्रांतांमध्ये कार्यकर्ते पाठविता आले पाहिजेत. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी ही कार्यकर्त्यांची मूस झाली पाहिजे, प्रशिक्षण केंद्र झाले पाहिजे, अशी कल्पना होती. तथापि केडरमधील महत्त्वाचे कार्यकर्ते प्रबोधिनीच्या संस्थात्मक कामात गुंतून पडल्याने हे आजपर्यंत फार अल्प प्रमाणात शक्य झाले. या कार्यकर्त्यांना नव्या कार्यकर्त्यांच्या घडणीकडे लक्ष देण्याइतकी उसंत राहील अशी रचना करण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे.

सहविचारात्मक नेतृत्व पद्धती

नेतृत्व पद्धती हा संघटनेच्या संदर्भातला महत्वाचा विषय. कारण ध्येयदर्शन उद्दिष्टांची निश्चिती, नियोजन, कार्यपद्धतीची निश्चिती, सदस्यांचे परस्पर संबंध आणि संघटनेचा विस्तार हे नेतृत्वावरच मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. ज्ञान प्रबोधिनीने सहविचारात्मक नेतृत्वपद्धतीचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे निर्णय प्रक्रियेत सर्व संबंधित सदस्यांनी योगदान करायचे, परंतु निर्णयाचे अधिकार संचालकांकडे सोपवायचे. संचालकांनी सर्व सदस्यांच्या सूचनांचा कार्यहितबुद्धीने विचार करून योग्य आणि अधिकाधिक सूचना स्वीकारून निर्णय घ्यावयाचा. प्रबोधिनीच्या आजपर्यंतच्या कामात अनेकानेकांच्या, लहान मुलांच्या सूचनांचाही अंगीकार केलेला आहे. त्या कल्पना फुलविलेल्या आहेत. विभागशः सहविचार समित्या असाव्यात अशी अपेक्षा असते. तेथे विभाग प्रमुख निर्णय घेणारे असतात. सहविचार पद्धतीबद्दल प्रबोधिनीच्या घटनेच्या परिशिष्टात म्हटले आहे-‘(संघटनेच्या) ध्येयाच्या दिशेने स्वतःचा, आपल्या सहकाऱ्यांचा व अनुयायांचा प्रवास घडविणे ही नेत्यांची जवाबदारी होय. या संदर्भात विभिन्न नेतृत्व पद्धतींचा प्रश्न उपस्थित होतो. सध्या अनेकांना लोकसत्तात्मक (डेमॉक्रॅटिक) नेतृत्व पद्धती आणि एकाधिकार (अथॉरितेरिअन) नेतृत्व पद्धती अशा दोनच पद्धती परिचित आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र नेतृत्व प्रक्रिया केवळ या दोनच प्रकारात विभागता येत नाही. कारण लोकसत्ता वा एकाधिकार हे दोन परस्परव्यावतर्क (म्युच्युअली एक्सस्क्लूझिव्ह) पर्याय असत नाहीत. लोकसत्ता ते एकाधिकार ही एक सरळ रेषा (कण्टिन्युअम) कल्पिली तर या रेषेवर लोकसत्ता व एकाधिकार या दोन टोकांच्या दरम्यान अनेक बिंदू किंवा अवस्था संभवतात. सहविचारात्मक नेतृत्व पद्धती ही प्रस्तुच्या रेषेवरील एक अवस्था आहे. या अवस्थेत लोकसत्ता आणि एकाधिकार या दोन्ही पद्धतीतील गुण आणि त्यापासून होणारे लाभ संकलित झालेले असतील व दोष कमीतकमी आलेले असतील अशी अपेक्षा आहे. लोकसत्ता व एकाधिकार यांतील कोणतीही एक पद्धती पूर्णतः गुणसंपन्न वा दोषार्ह म्हणता येणार नाही. या पद्धती विशिष्ट समूह व त्यांच्यापुढील कार्य किंवा समस्या यांच्या अनुरोधाने परिस्थितीनुरूप सर्वच देशांना अवलंबाव्या लागतात. लीडरशिप इज सिच्युएशनल, अ स्टाइल ऑफ ‘लीडरशिप इज ईक्वली सिच्युएशनल’ असे शास्त्र म्हणते.

नेत्याची कामे

नेतृत्व करणारी व्यक्ती ही चार प्रकारची कार्ये मुख्यतः करत असते. एक म्हणजे नियोजन करणे आणि निर्णय घेणे, दुसरे म्हणजे नियोजनाची कार्यवाही करून घेणे, तिसरे म्हणजे गट अथवा कार्य अथवा संघटना यातील व्यक्तीव्यक्तींमधील संबंध घडविणे आणि त्यांच्यातील गटैक्य वाढविणे आणि चवथे म्हणजे तत्कालीन आणि नवीन उपध्येये निर्माण करणे व अंतिम ध्येयप्रेरणा उत्पन्न करणे.

सहविचारात्मक नेतृत्व पद्धतीत ही चार कार्ये पुढील प्रमाणे चालतात. सदस्यांमध्ये नियोजन कसे असावे याची खुली चर्चा होते. अधिकाधिक उपयुक्त सूचना ग्राह्य मानायच्या अशा धारणेने चर्चा केली जाते. सर्वांच्या सूचनांचा समतोल विचार करून समोर असलेल्या प्रश्नाची नेमकी उकल कशाने होते हे जाणून अंतिम ध्येय व उपध्येय यांच्या अनुसंधानाने नेता निर्णय करतो.

कार्यवाहीसाठी नेता सर्व सभासदांचे सहकार्य मिळवितो. प्रसंगी तो आज्ञा करूनही कामे करून घेतो. पण या आज्ञा करण्यामागील अधिकार गटयशाची निष्ठा आणि ध्येयप्रेरणा यातून प्राप्त झालेला असतो. व्यक्तिगत मोठेपणा वा श्रेष्ठता यातून आलेला नसतो. स्तुती वा कानउघाडणी ही वस्तुनिष्ठ कामाच्या हिता-अहिताच्या जाणिवेतून होते. ती व्यक्तिनिष्ठ नसते.

गटातील सदस्य नेत्याशी प्रेमाने आणि आदराने बांधलेले असतात. त्यांचे परस्परातही आत्मीयतेचे बंध असतात. तत्कालीन ध्येय साध्य झाल्यावर पुढील उपध्येय कोणते हे सर्व सभासदांना विश्वासात घेऊन ठरवले जाते. हे ठरवण्यात नेत्याचा वाटा मोठा असतो. सभासदांमध्ये कार्याविषयी निष्ठा-प्रेरणा निर्माण करण्याचे कामही असते. पण या कामात त्याला उत्स्फूर्तपणे साहाय्य करणारे अन्य गट-सदस्यही असतात.’

सावधानता

सहविचारात्मक नेतृत्व पद्धतीचे हे विविध पैलू मांडल्यावर नंतर एक सावधानतेचा इशाराही दिला आहे-

‘संस्था जोपर्यंत लहान असते तोपर्यंत तेथे कोणी कामाला येत नाही. संस्था मोठी झाली, ती एक सामर्थ्य केंद्र झाली म्हणजे तिचे अधिकार, तिची सूत्रे आपणाकडे असावीत असे कित्येकांना वाटू लागते. तेथून सत्तास्पर्धेला आरंभ होतो. त्यातून अनिष्ट वळण मिळू लागते. यातून संस्थेचे कार्य वाचवावे याबद्दल सर्वांनी अतिशय काळजी घेतली पाहिजे.ही काळजी घेताना बहुमतात्मक, लोकसत्ताप्रधान कार्य पद्धती श्रेष्ठ का एकाधिकार कार्यपद्धती श्रेष्ठ, का सहविचारात्मक कार्य पद्धती श्रेष्ठ, हिंदुस्थानाला कोणती उपयुक्त ठरणार आहे, या व्यापक प्रश्नाचा विचार येथे करावयाचा नाही. या बाबतीत प्रबोधिनीचे म्हणून काहीही मत निश्चित ठरलेले नाही. प्रबोधिनीरूप एक कलम कार्यकर्त्यांनी लावले आहे. त्याचे रक्षण कसे करावे, त्याला अकाली वार्धक्य येऊ नये, अथवा त्याच्यावर अपमृत्यूही ओढवू नये यासाठी त्याला कसे जपावे याकडे सर्वांनी दृष्टि ठेवली पाहिजे. आणि म्हणून कोणाचे अधिकार कमी होतात किंवा जास्त होतात, सोम्याकडे सूत्रचालकत्व जाते की गोम्याकडे जाते, यापेक्षाही एक श्रेष्ठ कार्य निर्माण करण्याची मनीषा कार्यकर्त्यांनी बाळगली पाहिजे.’

घटनेतील या सावधतेच्या सूचना लक्षात घेऊनच निष्कांचनता, पावित्र्य, आणि आज्ञांकितता या गोष्टी विशेषतः प्रबोधिनीच्या गाभ्यातील कार्यकर्त्यानबाबत, तृतीय आणि चतुर्थ प्रतिज्ञित कार्यकर्त्यांबाबत महत्त्वाच्या मानल्या आहेत. संचालक हे चतुर्थ प्रतिज्ञित असावेत, त्यांच्यामागे पाश नसावेत, इ. संकेत केलेले आहेत.

आज्ञांकितता आणि विश्वास

आज्ञांकितता हा विस्तारशील, विकसनशील संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी नितांत आवश्यक गुण आहे. संघटनेत झालेला प्रत्येक निर्णय, घडलेली प्रत्येक गोष्ट याबाबत कार्यकर्त्यांनी सतत मूल्यमापन करत राहणे, स्वतःकडे न्यायाधीशाची भूमिका घेणे लाभदायक होत नाही. काही शंका असली, एखादी गोष्ट निराळी वाटली तर त्याबाबत अकारण निंदा-चर्चा करत न बसता संबंधित व्यक्तीशी वा ज्येष्ठ अधिकारी व्यक्तीशी बोलणे हिताचे ठरते. प्रत्येक निर्णयामागचा साधक-बाधक विचार संघटनेतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचविता येत नाही. त्यामुळे ज्यांनी निर्णय घेतला आहे, त्यांच्या विचारशक्तीवर विश्वास ठेवणे, जे आपल्याला कळते, उघड आहे, ते त्यांना सहज कळत असणार हे समजून घेणे आवश्यक असते. परस्परांविषयीचा अविश्वास हा संघटनेची ताकद क्षीण करणारा ठरतो. ज्येष्ठ व्यक्तींच्या आज्ञांचे काही जण हेतू नीट समजून न घेता बाह्यतः शब्दशः पालन करतात. कोणी आदेशांचा स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावतात, आणि जाणते कार्यकर्ते मात्र हेतू समजून घेऊन आदेश संपूर्णतया पाळायचा प्रयत्न करतात. यातील तिसरा प्रकार सर्वात चांगला. कारण तो संघटनेच्या सदस्यांची प्रगल्भता दर्शवितो.

व्यक्तिविकास व कार्यविकास

संघटनेत असही प्रश्न येतो की व्यक्तीचा विकास आणि कार्याचा विकास परस्परांना पूरक होऊ शकेल की नाही? जेव्हा संघटनेचे ध्येय हेच त्या व्यक्तीचे ध्येय असते, तेच जीवनात सर्वात महत्त्वाचे वाटते, तेव्हा बाकीच्या गोष्टी आपोआप दुय्यम ठरतात. जे ध्येय ठरविलेले असेल त्यानुरूप जीवनाची मांडणी करावी असे व्यक्तीला वाटू लागते. त्यासाठी आवश्यक ती कौशल्ये व्यक्ती संपादन करते. प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र स्वभाव, आग्रह आणि सवयी असतात. पण संघटित जीवनात कधी कधी ते बाजूला ठेवावे लागतात. आपण करत असलेले संघटनेचे काम महत्त्वाचे आहे असे वाटले तर स्वाभाविकच या व्यक्तिगत गोष्टी बाजूला ठेवल्या जातात किंवा सवडीने केल्या जातात. कार्यात जसजशा जवाबदाऱ्या पडत जातात तसतशी व्यक्तीची कुवत ही वाढत जाते, आवाका वाढतो, कर्तृत्व वाढते. अशा रीतीने व्यक्तिविकास आणि कार्याविकास हातात हात घालून जाऊ शकतात.

ज्ञान प्रबोधिनीत संसार करूनही राष्ट्रहितार्थ जीवन व्यतीत करणारांचे आणि सर्वसंगपरित्यागपूर्वक राष्ट्रसेवा, समाजसेवा करणारांचे दोन्ही आदर्श सदस्यांपुढे असतात. वैराग्यपूर्वक काम करणाऱ्या व्यक्तीकमी असणार हे गृहीतच धरलेले असते. पण पदवीधर झाल्यानंतर किमान दोन ते पाच वर्षे संघटनेचे पूर्ण वेळ काम करून मग व्यवसाय स्वीकारावा आणि अन्य आश्रमात प्रवेश करावा असे आवाहन अवश्यमेव केले जाते. संपूर्ण समर्पण करणारांपासून महिन्यातून स्वल्पकाल देणारांपर्यंत कार्यकर्त्यांचे अनेक प्रकार असणार. प्रत्येक प्रकारचे योगदान स्वागतार्ह आहे. आत, अधिक आत, गाभ्यापर्यंत क्रमशः प्रवेश आहे अशी रचना संघटनेत असावी असा प्रयत्न असतो.

अस्मितांचा समतोल

संघटना ही एखाद्या शरीरासारखी आहे अशी कल्पना, केली तर तिचे विविध विभाग हे शरीराच्या अवयवांप्रमाणे कल्पिले पाहिजेत. प्रत्येकाचे कार्य स्वतंत्र पण शरीराच्या एकूण व्यवस्थेला पोषक नि पूरक असे आहे. विभागातील सदस्य हेही धमन्या – पेशींप्रमाणे स्वतंत्र अस्तित्व असलेले, तरीही शरीररचनेला पूरक काम करणारे असायला हवेत. एखाद्या पेशीपुंजाची अकारण वाढ होऊ लागली तर ती शरीराला घातक ठरते. तशी विभागीय किंवा व्यक्तिगत अस्मितांची अवाजवी वाढ ही संघटनेला अहितकारक ठरू शकते. म्हणून संघटनेच्या हिताकरिता सदस्यांनी व्यक्तिगत मानापमान बाजूला ठेवणे, पचविणे, विसरून जाणे आवश्यक असते. एकत्रित काम कसे करावे, विधायक सूचना कशा कराव्यात, खटकलेल्या गोष्टीही सौम्यपणाने, गोडव्याने कशा सांगाव्यात, अडचणी कशा दूर कराव्यात, व्यक्तिनिरपेक्ष व्यवस्था कशा निर्माण कराव्यात की जेणे करून एक व्यक्ती गेली तर कामात खंड पडणार नाही या सर्व गोष्टी संघटनेत काम करता करता शिकण्याच्या गोष्टी आहेत. परस्परांविषयीचा स्नेहभाव, प्रेम आणि आदर, केंद्रस्थानीच्या व्यक्तीबद्दलचा स्नेह, प्रेम, आदर आणि श्रद्धा ह्याही गोष्टी आवश्यक आहेत.

कुलकल्पना

श्रीमती विमलताई ठकार यांनी असे म्हटले आहे की तथाकथित संघटना ही पाश्चात्त्य कल्पना आहे. भारतीय कल्पना म्हणजे ‘कुलकल्पना’ किंवा परिवार. पूजनीय विनोबाजींनी आचार्यकुल बनविले, किंवा प्राचीन भारतात गुरुकुले असत, आश्रम असत, कोणी तपस्वी व्यक्ती तेथे गुरुस्थानी असे, तीच व्यक्ती पितृस्थानीही असे आणि तिच्या वात्सल्यपूर्ण मार्गदर्शनाखाली सर्व कामे चालत. अन्य सर्व एखाद्या कुटुंबाप्रमाणे एकत्र राहत. कुटुंबात जसा सर्व घटकांचा गुणदोषांसहित प्रेमाने स्वीकार असतो, दोष दूर करायला जे सांगतात त्यांच्याही पोटात प्रेम असते, त्यामुळे त्यांचे शब्द कटू लागत नाहीत, तसेच वातावरण संघटनेत असले पाहिजे. समान ध्येय, सहविचार, सहकार्य आणि प्रेम हे संघटनेतील सदस्यांना जोडणारे धागे असले पाहिजेत.ज्ञान प्रबोधिनीच्या वर्षारंभ, वर्षान्त उपासनांमध्ये म्हटले आहे-‘कार्ये केवळ सदिच्छेने सिद्धीस जात नाहीत.त्यासाठी संघटना करावी लागते.वेदांनी हेच सांगितले,समानी व आकूतिःसमाना हृपयानि वः ।आपण सर्वांचा आशय एक असो.आपणा सर्वांची हृदये अभिन्न असोत.श्रीशिवछत्रपतींनी तेच सांगितले.दोन हृदये जर एकत्रित येतीलतर संकटांच्या पहाडांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतील.मग अशा एकत्रित हृदयांची संघटनाआमच्या हातून घडो.आमची मनेसंघटनेला आवश्यक अशीलवचिक आणि जुळवून घेणारीपरस्परांना प्रेमाने बांधणारीआणि कोणत्याही कारणासाठीपरस्परांपासून न तुटणारीअशी होवोत.जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातआम्ही संघटना घडवू.’उपासनेतील या शेवटच्या वाक्याचा अर्थ असा की ज्या क्षेत्रात आम्ही काम करत असू, त्या क्षेत्रात संघटनेला आवश्यक अशा वृत्ती आणि गुण निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शिक्षण, शेती, संशोधन, उद्योग, सामाजिक सेवा, संरक्षण, व्यवस्थापन या सर्वच क्षेत्रांत प्रभावी काम करण्यासाठी सहकार्याची वृत्ती, निरहंकरिता, सहभाव, समूहकार्याची कौशल्ये ही आवश्यक आहेत. ती स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये येतील यासाठी प्रयत्न करणे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात संघटना घडविणे.कै. आप्पांनी ज्याला लोकसंघ म्हटले आहे त्यामागची कल्पना हिचा आहे. विविध क्षेत्रांतील लोकांनी आपपल्या क्षेत्रात संघटित लोकशक्ती उभी करावी, ती शक्ती त्या क्षेत्राचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यान्वित व्हावी; गृहिणींची संघटना असावी, वृद्धांची असावी, युवक-युवतींच्या संघटना असाव्यात, क्रीडा-संघटना, कृषी-संघटना या सर्वांच्या कार्याचे स्वरूप भिन्न भिन्न असले तरी संघटनेसाठी मूलभूत वृत्ती आणि कौशल्ये तीच राहातील.

भावनात्मक वातावरण

अशा लोकसंघाबद्दल भगिनी निवेदितांनी म्हटले आहे, ‘एकाच ध्येयाने प्रेरित होऊन अनेकांनी एखाद्या कार्यास लागणे ही प्रचंड शक्ती आहे. समान भावना आपल्याला प्रबळ करते, अजिंक्य करते. लोकसेवकांना असे लहान-लहान संघ म्हणजे मोठा आधार वाटतो. हे संघ, हे आश्रम म्हणजे सेवकाचे जणू घर. हा संघ म्हणजे सेवकाची जणू आई. ही संघमाता, आश्रममाता सेवकास काम करावयास पाठवते, त्याला कामात यश आले म्हणजे त्याची पाठ थोपटते, त्याचे अभिनंदन करते. तो काम करून आश्रमात घरी परत आला म्हणजे त्याचे निंबलोण उतरते. सेवक आजारी पडला तर संघमाता त्याची शुश्रूषा करते. प्रेमळ आईप्रमाणे त्याला जपते. अशा प्रकारचा प्रेमाचा विसावा, अशा प्रकारचे आधारधाम असल्याशिवाय सेवकाचा उत्साह कसा टिकावा? त्याने कोठवर धैर्य धरावे? अशा प्रकारचे आधारभूत आश्रय नसतील, सेवकांचे कौतुक करणारे, त्याला साहाय्य देणारे, त्याच्याकडे लक्ष ठेवणारे जर आश्रम नसतील, तर सेवकास सेवा करावयास कोठून जोर येणार? त्या प्रेमाच्या बळावरच जी संकटे एरवी दूर करता आली नसती, ती संकटे दूर करावयास त्याला स्फूर्ती मिळते, चैतन्य मिळते.’संघटनेतले भावनात्मक वातावरण कसे असावे यावर फार चांगला प्रकाश या परिच्छेदात पडलेला आहे. तथापि, नेहमीच अशा प्रकारचे प्रेम, अनुकूलता कार्यकर्त्याला लाभेल असे नाही. केव्हा ना केव्हा त्याला स्फूर्तीचा झरा स्वतःमध्येच सापडला पाहिजे. इतरांनी केलेल्या निंदा-स्तुतीच्या निरपेक्ष स्वतःचे मूल्यमापन स्वतः करता आले पाहिजे. संघटनेबाहेरच्या हितशत्रूनी केलेल्या टीकेला चतुरपणे आणि कणखरपणे तोंड देता आले पाहिजे.

हम दिन चार रहे न रहे !

बुद्धाने तीन मंत्र सांगितले. ते कार्यकर्त्यांनी नित्य स्मरणात ठेवण्यासारखे आहेत. बुद्धं सरणं गच्छामि। संघ सरणं गच्छामि। धम्मं सरणं गच्छामि। प्रथम, संघटनेचा जो मार्गदर्शक, त्याच्या ठायी, प्रेम, श्रद्धा असावी. कारण तो संघटनेची ध्येये आणि आकांक्षा यांचा प्रवक्ता असतो. संघटनेच्या प्राणतत्त्वाचा समूर्त आविष्कार असतो आणि संघटनेच्या तत्वज्ञानाच्या प्रकाशात भविष्याकडे पाहण्याची दृष्टी त्याच्याजवळ असते. कालांतराने त्याच्या प्रेमाच्या आलंबनाशिवायही संघाच्या ठायी निष्ठा जडवता यावी. म्हणजे केंद्र व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली वा केंद्रातून दूर गेली आणि नवी व्यक्ती त्या जागी आली, तरी कार्यकर्ते विचलित होणार नाहीत. आपल्या भावभावना, आदर, श्रद्धा या नव्या व्यक्तींच्या ठिकाणी जडवू शकतील. शेवटी संघटना हे सुद्धा ध्येयसिद्धीचे साधन आहे. संघटनेवरील निष्ठा आणि शरणता अखेर ध्येयनिष्ठेत, ध्येयशरणते परिणत व्हावी, तत्त्वशरणतेत परिणत व्हावी. व्यक्ती येतील आणि जातील, संघटना जोम धरतील, कदाचित कालांतराने विसर्जित होतील. पण संघटनवृत्तीची आवश्यकता चिरकालिक आहे आणि ध्येयावरील निष्ठेची आवश्यकताही चिरकालिक आहे. एका कवीने म्हटले आहे,

ध्येयसाधना अमर रहे !

इससे प्रेरित होकार जन जन

करे निछावर निज तन मन धन

पाले देशभक्तिका प्रिय प्रण

अडिग लाख आघात सहे !

जीवनपुष्प चढा चरणोंपर

माँगे मातृभूमिसे यह वर

तेरा वैभव अमर रहे माँ

हम दिन चार रहे न रहे !

अशा वृत्तीने जे ध्येयसाधना करता है, त्यांची संघटनाही अम्लान, प्रभावी आणि जीवनसन्मुख राहाते.

7 thoughts on “संघटना”

  1. गौरी कुलकर्णी

    एकत्र येणे
    सहकार्य करणे
    ध्येय एक ठेवणे
    एकमेकांवर विश्वास ठेवणे
    जबाबदारीने काम करणे
    समाजासाठी काम करणे

    1. गौरी कुलकर्णी

      व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि संघटनेची शिस्त यांचा समतोल कसा साधायचा?

  2. गौरी कुलकर्णी

    वेगवेगळ्या विचारांच्या लोकांमध्ये खरे ऐक्य कसे निर्माण करायचे?

  3. निर्णय घेताना बुद्धीला महत्त्व द्यायचे की भावनांना?

  4. संघटनवृत्ती – नकार पचविण्याची ताकद वाढविणे विरुद्ध आपले आग्रह / भूमिका मांडण्यात ठाम असणे = ह्यातून दुखावला जाणारा आत्मसन्मान, अहंकार…

    आत्मनो मोक्षार्थ जगद् हितायचाः

    सावधानता – श्रेष्ठ कार्य करण्याची मनीषा बाळगणे

    आज्ञानकितता – विस्तारशील, विकसनशील कार्यकर्ते यांसाठी…

    सतत मूल्यमापन करत राहणे, न्यायाधीशाची भूमिका असणे, अकारण निंदा – चर्चा करत न बसणे विरुद्ध निर्णय / धोरण ठरविणाऱ्या / घेणाऱ्या सदस्यांच्या विचारशक्तीवर विश्वास ठेऊन जाणते कार्यकर्ते होण्याचा प्रवास ~ अवघड टप्पा आहे, असे वाटते… (नैसर्गिकरीत्या)

    व्यक्ति व कार्य विकास = कुवत > आवाका > कर्तृत्व

    अहितकारक गोष्टी – विभागीय / व्यक्तिगत अस्मितांची अवाजवी वाढ

    संघटना वृत्ती व कौशल्य – समान ध्येय, सहविचार, सहकार्य, प्रेम, निरंहंकरितां, सहभाव, समाजकार्याची कौशल्ये

    आचारधाम ते स्फूर्तीचा झरा स्वतःमध्येच

    बुद्ध सरणं गच्छामि, संघ सरणं गच्छामि, धम्म सरणं गच्छामि = व्यक्ति > संघ / कार्य / गट > तत्त्व निष्ठ प्रवास…

  5. संघटना तत्त्वामध्ये नेतृत्वाला पूरक गटाची अभिव्यक्ती याबद्दल मुद्दे यायला हवेत. वर्षारंभ व वर्षान्त उपासनाही इथे घातल्या पाहिजेत.

  6. अस्मिता

    आपल्या नावडीचा निर्णय असला तरी गटासोबत उभे राहणे मनापासून जमले पाहिजे, स्वतःच्या ध्येयाला गटासाठी बाजूला ठेवणे जमायला हवे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *