विकास

विकास हा शब्द विविध संदर्भात उपयोगात आणला जातो. जीवसृष्टीचा विकास, मानवजातीचा विकास, राष्ट्राचा वा समाजाचा विकास, एखाद्या बीजभूत संकल्पनेचा विकास, कार्याचा विकास, संघटनेचा विकास, व्यक्तीचा विकास असे काही संदर्भ सांगता येतील. विरोधातून विकास, सहकार्यातून विकास अशाही विकासाच्या संकल्पना मांडल्या गया आहेत. स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे मनुष्यात आधीच असलेले पूर्णत्व आणि दिव्यत्व प्रकट होणे यालाही विकास म्हणता येईल.

राष्ट्रीय विकासाची क्षेत्रे

ज्ञान प्रबोधिनीचे एक साधनतत्त्व म्हणून विकासाचा विचार करताना सामाजिक नि राष्ट्रीय विकास, त्यासाठी संघटनेचा विकास आणि संघटनांतर्गत व्यक्तींचा विकास हे मुख्य संदर्भ दृष्टीपुढे आहेत. राष्ट्रीय विकासाच्या सहा क्षेत्रांबद्दल कै. आप्पाजी पेंडसे वारंवार बोललेले आहेत. त्यात-

१) औद्योगिक उत्पादन आणि उपयुक्त तंत्रज्ञानाची निर्मिती;

२) सर्वांगीण ग्रामीण विकास, ग्रामीण भागातील लोकांच्या अन्न वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या किमान गरजा पूर्ण होणे, शेती व संबंधित तंत्रज्ञानाचा विकास होणे, व्यसनमुक्त समाज निर्माण होणे;

३) स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर आधारलेली समाजरचना येथे निर्माण होणे;

४) भारताचे राजकीय प्रशासन आणि परराष्ट्र संबंध हे भारताच्या विकासाला अनुकूल असे होणे;

५) राष्ट्रीय संरक्षण क्षमता मजबूत असणे; आणि

६) विकासाच्या या सर्व क्षेत्रांत व्यक्तींना प्रेरणा आणि जोम देईल अशी संघटना-एक वा अनेक निर्माण करणे, या गोष्टींचा विचार केलेला आहे.

पुरुषार्थाने विकास

हे सर्व यदृच्छेने घडून येणारे नसून त्यासाठी पुरुषार्थ आणि पराक्रमाची पराकाष्ठा करावी लागेल, हेही त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. प्रबोधिनीच्या घटनेत ‘स्वदेशात विचार प्रबोधन आणि कार्य प्रबोधन व्हावे’ असा जो उदेश सांगितला आहे त्याला देखील विकासाचा हा व्यापक संदर्भ आहे. ‘अपेक्षा’ नावाची कै. आप्पांची एक कविता आहे. त्यात कार्यकर्त्यांच्या विकासाच्या काही मिती सांगितलेल्या आहेत. त्यांचा विचार ओघात येईलच. पण या कवितेच्या शेवटी हा विकास कशासाठी, याचा हेतू सांगितला आहे-‘विमल हेतु स्फुरो नवनीतविमल राष्ट्र घडो अभिजात

‘राष्ट्रघडणीचे संघटना हे साधन आहे. त्यामुळे साधनाचा विकास ही साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे, हे जाणून त्याच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे.

ज्ञान प्रबोधिनी ही परिवर्तनशील, ‘रूप पालटू देशाचे’ असा ध्यास घेतलेली संघटना आहे. १९६२ ते १९८७ या पंचवीस वर्षांच्या वाटचालीत उपेक्षा, उदासीनता, उपहास, टीका, निंदा, विपर्यास, गुणग्रहण, गौरव या सर्व टप्प्यांमधून तिला जावे लागले आहे. आजही निंदेच्या वादळांना तिला सामोरे जावे लागतेच. पण जाणते विचारवंत, नेते, कार्यकर्ते यांचा स्नेह आणि आदरही तिला लाभत असतो. प्रबोधिनीचे संस्थापक संचालक कै. डॉ. आप्पाजी पेंडसे यांनी प्रबोधिनीच्या विकासाची विविध स्वप्ने रंगवली. त्यांच्या त्या वेळच्या सहकाऱ्यांना ती भावली. त्यांनी आपापल्या परीने त्यात भर घातली. त्यानंतरच्या पिढ्यांमधूनही प्रबोधिनीचा ध्येयविचार समजून-पटून काही युवक-युवती कामाला उभे राहिले. कै आप्पा हे सर्वाना पितृस्थानी होते. पुष्कळशा प्रेरणा प्रारंभी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती गुंफल्या गेल्या. परंतु त्यांच्या निधनाच्या काळापर्यंत अनेकांच्या प्रेरणा आत्मनिर्भर झालेल्या होत्या. असे तिशी-चाळिशीतले काही कार्यकर्ते तयार झालेले असल्यामुळे आप्पा गेल्यानंतर प्रबोधिनीत पोकळी निर्माण झाली नाही. ध्येयविचार मंदावला नाही. संघटनेच्या प्रगतीचा हा एक टप्पा म्हणावा लागेल. त्या पुढचा टप्पा म्हणजे नव्याने केंद्रस्थानी आलेल्या व्यक्तीशी आपल्या मनाच्या तारा जुळवणे, पूर्वग्रह न ठेवता सहकार्याने परस्परांना समजून घेऊन काम करणे, संघटना चैतन्यमय, गतिशील, अभिक्रमशील, समाजाभिमुख राखणे, संघटनेचा प्रत्येक घटक विधायक वृत्तीचा, उत्तरदायी असा होणे, त्या दिशेने संघटना म्हणून प्रबोधिनीचा प्रवास होणे, हे सर्व अगत्याचे आहे.

व्यक्तिविकासाच्या कल्पना

व्यक्तिविकासाच्या काही कल्पना प्रबोधिनीच्या संस्कार-पुस्तिकांमधून मांडल्या गया आहेत. विशेषतः दीक्षाग्रहण संस्कारात ब्रह्मचर्याश्रम हे दुसरे-तिसरे काही नसून श्रेष्ठ प्रकारचे व्यक्तिमत्त्व विकसन आहे असे म्हटले आहे. युक्ताहारविहार, इंद्रियसंयमन, ईश्वरोपासाना, स्वाध्याय-प्रवचन, सद्‌गुरूसेवा आणि राष्ट्र-अर्चना यांनी मिळून हे व्यक्तिमत्व विकसन घडून येते. म्हणजे व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक क्षमतांचा विकास होतो. असे विकसित व्यक्तिमत्त्व समाजाच्या, राष्ट्राच्या चरणी वाहण्याचे, म्हणजे विकसित शक्तीचा विनियोग समाजकारणी – देशकारणी करण्याचे आवाहन प्रबोधिनीत नित्य केले जाते. ‘अपेक्षा’ या आप्पांच्या कवितेचे मुख्य सूत्रही तेच आहे. अमुक एक कला शिकणे, तमुक कौशल्य शिकणे, खेळात प्राविण्य मिळविणे असा व्यक्तिविकासाचा मर्यादित अर्थ नाही. सभोवती घडणाऱ्या घटनांची संवेदनक्षमतेने नोंद घेता येणे, त्यातील प्रश्नांची जाण येणे आणि ते सोडविण्यासाठी आपल्या क्षमता-व्यक्तिगत आणि सामुहिक प्रभावी रीतीने वापरता येणे याला व्यक्तिमत्त्व विकसन म्हटले आहे. आप्पांची कविता अशी आहे-

अपेक्षा

विकसता विकसता विकसावे ।।धृ.।।

विकसता विकसता विकसावे

घडविता घडविता घडवावे

मिळविता मिळविता मिळवावे

विजयप्राप्त असे तळपावे ।।१।।

मन विशाल समृद्ध करावे

मन प्रफुल्ल सदाचि हसावे

मन विवेकबळे उमलावे

मन त्वरे जनपदी रमवावे ।।२।।

तपविता तपविता तपवावे

तपपुनीत शरीर करावे

तपवुनि प्रतिभे उजळावे

तपगुणे मन मना मिळवावे ।।३।।

झिजविता झिजविता झिजवावे

झिजुनी जीवनि महायश घ्यावे

तनु झिजो जगती जणु चंदन

मन बनो विजयी अतिपावन ।।४।।

वितरता वितरता वितरावे

जनमनी विपुल ज्ञान करावे

जन प्रचोदित असे घडवावे

जन सुसंघटनार्थ विणावे ।।५।।

भरडिता भरडिता भरडावे

अरिजनां भुइसपाट करावे

हटविता हटविता हटवावे

तुडविता तुडविता तुडवावे ।।६।।

समकृती समकृती समकार्य

हृदयस्पंदन घडो मन एक

विमल हेतु स्फुरो नवनीत

विमल राष्ट्र घडो अभिजात ।।७।।

विकसता विकसता विकसावे

या कवितेत पहिले तर विजयाकांक्षा, यशाकांक्षा ही आग्रहाने मांडलेली दिसते. पण ती व्यक्तिगत यशाकांक्षा नाही. समकृती करणाऱ्या, जन सुसंघटनार्थ विणणाऱ्या कार्यकर्त्यांची ती सामूहिक आकांक्षा आहे. ‘वितरता वितरता वितरावे, जनमनीं विपुल ज्ञान करावे’ अशी केवळ शिक्षण, विधायक कार्य यांची प्रेरणा विकसनात अभिप्रेत नाही, तर जे कोणी समाजकंटक, दुष्ट, देशद्रोही, समाजद्रोही आहेत त्यांना भरडून काढावे असेही निःसंकोचपणे म्हटले आहे. न्यायाची प्रतिष्ठापना आणि अधर्माचा उच्छेद ही जी धर्मसंस्थापनेची दोन मूलभूत कार्ये त्यांचा विचार व्यक्तिमत्त्व विकसनामध्ये केलेला आहे. म्हणून व्यक्तींच्या विकासावर आधारलेला असा सामूहिक कार्यविकास आप्पांना अभिप्रेत होता असे दिसते.

घडतिल येथे द्रष्टे…

प्रबोधिनीसारख्या संघटनेत एकाच वेळी कार्यकर्ते घडणीचे कामही चालू असते. आणि घडत असलेल्या कार्यकर्त्यांच्या शक्तींचे उपयोजनही चालू असते. ‘पिंडे पिंडे मतिर्भिन्ना’ या न्यायाने संघटनेत येणारी प्रत्येक व्यक्ती वेगळे संस्कार घेऊन आलेली असते. तिच्या स्वतःच्या प्रवृत्ती आणि प्रकृती असतात. आवडी, निवडी, आग्रह, पूर्वग्रह असतात. संघटनेत काम करताना ह्या सर्व बाबतीत खूपच लवचिकता असावी लागते. ती शिकावी लागते. संघटनेबाबत विचार करताना कार्यकर्त्यांच्या गुणांची पंचसूत्री Being responsible, responsive, creative, co-operative and regenerative अशी असल्याचे आपण मागच्या प्रकरणात पहिले आहे. तसेच कार्याच्या अधिकाधिक निकट जात एकरूप करणाऱ्या चार प्रतिज्ञांचीही मांडणी पाहिली आहे. एका समग्र जीवनसरणीचा भाग म्हणून आश्रमांना प्रबोधिनीत नवीन अर्थ दिलेला असून त्याद्वारे चतुर्विध पुरुषार्थ कसे साधावयाचे याच्या मार्गदर्शक पुस्तिकाही संस्कार पोथ्यांच्या रूपाने तयार केल्या आहेत. जेथे आम्ही पदार्पण करू तेथे मौलिक आणि मूलगामी कार्य आमच्या हातून घडेल, असे होऊ दे, विवेक, विचारे राजकारणे व्यक्तिमत्व पुनीत करू असे संकल्प प्रबोधिनीच्या उपसनांमधून केलेले आहेत. पूर्ण विकसित शुद्ध जीवनपुष्पसे हो राष्ट्रअर्चन अशी प्रबोधिनीची धारणा आहे. व्यक्तीच्या आणि कार्याच्या विकासाची ही सर्वस्पर्शी आणि व्यापक मांडणी आहे. त्यातही आधीच्या पिढीपेक्षा पुढची पिढी अधिक उंचीची, अधिक सरस, अधिक पुढचे पाहणारी व्हावी अशी अपेक्षा कै. आप्पांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. प्रबोधीनीतल्या एका कवयित्रीने म्हटल्याप्रमाणे –

‘पुर्तीला जातील येथुनी जनमनिंची ईस्पितेघडतील येथे द्रष्टे चिंतक नवयुग निर्मातेप्रखर तयांची प्रज्ञा वेधिल विश्वरहस्यातेदेवत्वाप्रत खचित पोचतिल पथिकसंघ येथले’असा प्रबल आशावाद उत्कट शब्दांत प्रकट केलेला आहे. यात कार्यामध्ये गुंतलेल्या व्यक्तींच्या आध्यात्मिक विकसनाचाही विचार आहे. म्हणून देवत्वाप्रत पोचण्याची आकांक्षा व्यक्त केलेली आहे.

विकासाचे टप्पे, मार्ग व प्रवास

या विकासाच्या चित्राजवळ जाण्याचे कोणते मार्ग प्रबोधिनीने अंगिकारले आहेत ? कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण कसे होत असते ? विद्यार्थीदशेत साधारण ७ वी पासुन मुलांना प्रबोधिनीचा परिचय होऊ लागतो. वय वर्ष १६ पर्यंत एक टप्पा मानता येईल. १६ ते २५ हा तरुणपणाचा काळ हा दुसरा टप्पा, २५ ते ३० वर्षे हा तिसरा टप्पा आणि वय वर्षे ३० च्या पुढचा काळ हा चवथा टप्पा.

पहिल्या टप्प्यात व्यक्तींच्या क्षमतांची वाढ होण्यासाठी प्रयत्न केला जातो. वाचन व लेखनकौशल्ये, समयनियोजन, अभ्यास कौशल्ये, वकृत्व, गटकार्य, प्रतिभा-विकसन यांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव असतो. इयत्ता आठवीच्या पुढे इतिहास, सामाजिक दृष्टिकोण, नेतृत्वाच्या प्रक्रिया आणि कौशल्ये, छोट्या गटांची हाताळणी यांचे शिक्षण एकीकडे चालू होते, तर दीक्षाग्रहणाच्या कार्यक्रमातून ब्रह्मचर्याश्रमाचे यमनियम, व्यक्तिमत्त्व विकसनाच्या संकल्पना मांडल्या जातात. क्रीडाकेंद्रे दले यावर विद्यार्थी हळूहळू काम करू लागतात. अभ्यास दौरे, प्रवास शिबिरे, वाचन यातून विचारकोश, भावनाकोश समृद्ध होत जातो. समविचारी मित्रांशी स्नेह जुळतो, वाढू लागतो. याच काळात कार्याचे स्वरूप जाणून घेत घेत आपल्या निष्ठा त्या कार्याशी जडवाव्यात, त्यात अधिकाधिक योगदान करावे असा निश्चय काही जणांच्यात मूळ धरू लागतो.

महाविद्यालयीन अभ्यासक्रम करीत असतानाही विविध उपक्रमांतून भाग घेणे, दोन्हीकडे उत्तम यश मिळविणे शक्य असते. पहिल्या पदवीनंतर काही काळ संघटनेत काम करावे, संघटना सांगेल त्या क्षेत्रात कार्यानुभव घ्यावा आणि मग उर्वरित शिक्षण पूर्ण करावे अशीही अनेक कार्यकर्त्यांची मनोभूमिका तयार होते.

वय वर्षे २५ ते ३० या तिसऱ्या टप्प्यात आश्रमांतर, व्यवसाय, प्रवेश या संबंधीचे महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात. पूर्ण वेळ कार्यकर्ता, परिव्राजक कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा निर्णय घेणारे काही क्वचित असतात. परंतु बहुतांश व्यवसायात पडणारे आणि विवाह करणारे असतात. या काळातही कामाच्या प्रेरणा मनात जाग्या राहाव्यात यासाठी व्यक्तीला आणि तिच्याभोवतीच्या कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागतात.

पूर्ण वेळ कार्यकर्ते

पूर्ण वेळ कार्यकर्त्यांमध्ये देखील विविध प्रकार दिसतात. काहींचे समर्पण उत्कट असते. भावना प्रबळ असते. पण कार्याला आवश्यक अशी कौशल्ये मिळविण्याबाबत ते पुरेशी तत्परता दाखवीत नाहीत. त्यांच्या समर्पणाला तज्ज्ञतेचे परिमाण येत नाही. म्हणून त्या समर्पणातून कार्यकर्त्यांचा विकास होत नाही, कार्याला बळ येत नाही, किंवा कार्याचा विस्तार होता नाही. उलट काही कार्यकर्ते स्वतंत्र वृत्तीचे असतात, त्यांना नवीन सुचत असते पण इतरांबरोबर जुळवून घेऊन आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणायच्या आहेत याचे भान राहत नाही. आपण पूर्ण वेळ कार्यकर्ते झालो आहोत, आपण समर्पण केले आहे यांची इतरांनी दखल घ्यावी. आणि आपल्या चुकीबद्दल कोणीही आपल्याला बोलू नये अशी काही कार्यकर्त्यांची अपेक्षा निर्माण होऊ शकते. पण ते व्यवहार्य नाही. संघटना हे पूर्ण वेळ कार्यकर्त्यांचे घर असते ते खरे. परंतु या घरात प्रेम असेल तरी चुका सुधारणे, आत्मपरीक्षण करणे हे आवश्यक असते. एरवी कार्यकर्त्यांची आणि कार्याची प्रगतीच होणार नाही.

रामकृष्ण मिशन वा विवेकानंद केंद्र येथे पूर्ण वेळ कार्यकर्त्याला अमुक ठिकाणी जायचे आहे आणि अमुक काम करावयाचे आहे असे आदेश असतात. ‘हे मला विचारून का ठरवले नाही?’ याचे नियोजन माझ्याबरोबर बसून का केले नाही? असे प्रश्न त्या ठिकाणचे कार्यकर्ते विचारत नाहीत. प्रबोधिनीत आरंभापासून सहचाराचे तत्त्व असल्याने बहुतेक वेळा कार्यकर्त्यांशी विचार-विनिमय करून याबाबतचे निर्णय घेतले जातात. परंतु त्यातून हळूहळू अशी अपेक्षा निर्माण होऊ शकते की माझ्याशी संबंधित किंवा असंबंधित गोष्टींबाबतही मला विचारले पाहिजे, माझ्या सल्ला घेतला पाहिजे. वास्तविक प्रत्येक प्रश्नावर विविध पातळ्यांवर सहविचार होतच असतो. पण ‘मला का विचारले नाही’, हा अस्मितेचा, अहंकाराचा, प्रतिष्ठेचा प्रश्न होऊ शकतो. त्यातून मुक्त व्हायला शिकणे हा कार्यकर्त्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे.

कर्मसु कौशलम्

श्रद्धा आत्मविश्वास यांचे उत्तम संतुलन कार्यकर्त्याच्या ठिकाणी असले पाहिजे. टीका वा मूल्यमापन यांमध्ये गडबडून न जाता शांतपणे आत्मपरीक्षण करण्याची सवय त्याने लावून घेतली पाहिजे. भावनिक परावलंबन कमी होऊन आत्मनिर्भरता वाढली पाहिजे. शक्य असल्यास कोणत्या तरी एका क्षेत्रात, एका विषयात व्यासंग सखोल नेला पाहिजे. तज्ज्ञता प्राप्त केली पाहिजे. उपयुक्तता आणि समाधान – आनंद दोन्ही दृष्टींनी हे महत्त्वाचे आहे. तरी असे शेकडो कार्यकर्ते विविध संघटनांमध्ये आहेत की जे कोण्या एका विषयातले तज्ज्ञ नसूनही महत्त्वाचे काम करीत आहेत. तज्ज्ञता म्हणजे कुठलीही स्वीकृत गोष्ट चांगली करता येणे. ‘योगः कर्मसु कौशलम्’ आणि त्या पलीकडे जाऊनही व्यापक दायित्व स्वीकारता येणे. विविध क्षेत्रांमध्ये विचारशक्तीला संचार करता येणे हे संघटनेतील काही व्यक्तींना तरी आवश्यक असते.

एकत्रित काम करण्यासाठी आवश्यक ते अनुशासन, कौशल्य, बुद्धिगुण आणि हृदयगुण या सर्वांची साधना कार्यकर्त्याने केली पाहिजे. ती मूल्ये आपल्या स्वतःच्या जीवनात आहेत ना, याचा शोध घेतला पाहिजे.

आपले कौटुंबिक जीवन, सामाजिक कार्यातले जीवन, व्यक्तिगत जीवन हे विलग तुकडे नसून ते एकात्म आहे. आनंद, उल्हास आणि समरसतेने ते जगायचे आहे. कामात आनंद वाटला पाहिजे. तात्पुरते चढ-उतार, सुख-दुःखे असणारच. पण आपण जे करतो त्यातून आनंद मिळाला पाहिजे. तो मिळत नसेल तर अंतर्यामी शोध घेतला पाहिजे, की कार्यातला रस कमी करणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत? अतिताण, प्रेम वा स्नेहाचा अभाव, मत्सर, दंभ, असामंजस्य या गोष्टी कमी झाल्या तर कार्यातला रस वाढेल.

‘काही गलबला काही निवळऐसा कंठीत जावा काळ’असे समर्थांनी म्हटले आहे. सदैव लोकान्तात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मधून मधून एकान्तही लाभला पाहिजे, अंतर्मुख होता आले पाहिजे. मौनात अंतर्भूत असलेल्या शक्ती त्याला उपलब्ध करून घेता आल्या पाहिजेत. प्रसन्नतेची साधना करता आली पाहिजे. हे अध्यात्माचे अधिष्ठान लाभले, तर काही कार्यकर्त्यांना जी वैफल्यभावना जाणवते, ‘हेचि काय फळ मम तपाला, असे वाटते, तसे होणार नाही. समाजाने सेवा स्वीकारली नाही, दूषणे दिली तरी त्याची खंत राहणार नाही.

अहंकर्तृत्वाचा अहंकार सुटणे, धृति-उत्साह-समन्वित कार्य करता येणे ही कार्यकर्त्याच्या विकासाची श्रेष्ठ अवस्था मानली पाहिजे. अशा मनोधारणेचे कार्यकर्ते तयार होणे हा कार्याचाही विकास आहे, मोठे यश आहे, संघटनेचेही यश आहे. समाज परिवर्तनाचा प्रारंभ हा व्यक्तीच्या परिवर्तनातून होतो. तद्वत् संघटनेच्या विकासाचा प्रारंभबिंदू कार्यकर्त्यांच्या विकासात असतो. परंतु विकासाची व्याख्या मात्र वर सांगितल्याप्रमाणे व्यापक कार्यकेंद्री आहे. ती केवळ व्यक्तिकेंद्रित आणि स्वार्थाशी निगडित नाही. विकसित कार्यकर्त्याचे वर्णन करणाऱ्या एका कवितेने या लेखाचा समारोप करता येईल. कवयित्री म्हणते-

हिंदुभूमिच्या गौरवात मज श्रेय गवसले होसमर्पणाचे शुभ्र कमल हृदयात विकसले हो ।।धृ.।।

अहंपणाचे तुटता अडसर

आत्मशक्तीचे विमुक्त निर्झर

दो तीरांना फुलवित-फळवित हसत निघाले हो ।।१।।

स्फटिकगृहीच्या दीपापरि मन

प्रसन्नतेने ये ओसंडून

चिरंतनाच्या चिंतनात मग सहजचि रमले हो ।।२।।

ध्रुवापरी दृढ ध्येयप्रवणता

ऋजु समर्थता कार्यशरणता

बहुत शोधुनि हे जीवनस्वर आज उमगले हो ।।३।।

हवे कुणा घर? माझे त्रिभुवन

आप्तचि सगळे सुहृद्य प्रियजन

कोटिकरांनी जगदंबेने कुशीत घेतले हो ।।४।।

मज श्रेय गवसले हो !

मज श्रेय गवसले हो !!

4 thoughts on “विकास”

  1. गौरी कुलकर्णी

    स्व विकास
    आत्मविश्वास
    कौशल्य विकसन
    स्वावलंबन
    सामूहिक विकास
    राष्ट्र विकास

  2. विकास म्हणजे फक्त आर्थिक प्रगती नाही हे आजच्या काळात लोकांना पटणे खूप अवघड होते त्यासाठी काय करावे?

  3. प्रयत्न करत राहिल्यानेच यश मिळते, मग परिस्थितीची/इतर सदस्य मत भूमिका काय?

  4. “विकास” तत्त्वामध्ये क्रमविकासवादाधारित व तार्किक नव्हे तर व्यावहारिक arguments मांडत सिद्धांत पुढे नेण्याचे महत्त्व मांडले पाहिजे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *