
उत्तमता हा ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यातील एक स्थायी दृष्टिकोन आहे. प्रबोधिनीच्या प्रार्थनेत ‘राष्ट्रार्थ भव्य कृति काहि पराक्रमाची’ करण्याचा संकल्प आहे. उपासना पुस्तिकांमध्ये ‘जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आम्ही उतुंग यश मिळवू असे होऊ दे’ अशी ईश्वराची प्रार्थना आहे. प्रबोधिनीच्या प्रारंभापासून कै. आप्पांनी प्रत्येक कामात गुणवत्तेचा आग्रह धरलेला असे. नवीन उपक्रम सुचणे, ते उत्तम रीतीने संपन्न करता येणे, या कार्याचे अधिष्ठान असलेली वास्तू उत्तमातली उत्तम असावी यासाठी झटणे, कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिका, पुस्तकांचे मुद्रण हे सर्व, उत्तम आकर्षक असावे असा कटाक्ष असणे, समारंभ कार्यक्रम रेखीव, नियोजनपूर्वक, परिणामकारक करणे हे सर्व त्या उत्तमतेच्या, गुणवत्तेच्याच आग्रहाचे विविध पैलू आहेत.
पूर्णतेची उपासना
पथकाधिपती म्हणून किंवा राष्ट्रसंत, मार्गदर्शक पुरुष म्हणून ज्या महापुरुषांकडे प्रबोधिनी पाहते ते महापुरुषही उत्तमतेचा, पूर्णतेचा आग्रह धरणारे होते असे दिसते. श्री समर्थ रामदासांनी ‘उत्कट भव्य तेचि घ्यावे, मिळमिळीत अवघेचि टाकावे’ असे ठसठशीत शब्दांत म्हटले आहे. ‘उत्तम पुरुष लक्षण’ म्हणून दासबोधात समासच आहे. त्यांनी म्हटले आहे-
ऐसा उत्तमगुणी विशेष । तयासि म्हणावे पुरुष ।
जयाच्या भजनी जगदीश तृप्त होये ।।
जो उत्तमगुणे शृंघारला । तो बहुतांसि कळो आला ।
सर्व आर्जवी तयाला। काय उणे ।।
अक्षर सुंदर, लिहिणे सुंदर इथपासून अंतर्कळा शृंगारण्यापर्यंत सर्व प्रकारच्या उत्तमतेबद्दल समर्थांनी लिहिले आहे. व्यक्तीमध्ये मुळातच असलेल्या पूर्णतेचे प्रकटन करणे हे शिक्षणाचे ध्येय असल्याचे स्वामी विवेकानंदांनी सांगितले आहे. Education is the manifestation of perfection already in man. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांनी आपल्या सुप्रसिद्ध कवितेत म्हटले आहे-
Where tireless striving stretches its arms towards perfection……
Into that heaven of freedom my Father,Let my country awake!
पूर्णतेकडे प्रवास
भारतीय संस्कृतीलाच पूर्णत्वाच्या दिशेने प्रवास करण्याची ओढ असल्याचे अजिंठा-वेरूळ सारख्या अतिमनोहर चित्र-शिल्पांतून, आणि भारतात अन्यत्र विकास पावलेली शास्त्रे आणि कला यावरून वाटते.
योगी अरविंदांनी ‘पूर्णयोगा’ची मांडणी केली. त्यात शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या सर्वांसाठी पूर्णतेची साधना सांगितलेली आहे. मानवाचा देवमानव होणे ही त्या साधनेची दिशा आहे. गीतेमध्येही सर्व सृष्टी हे जरी माझे रूप असले, तरी काही ठळक विभूती ही माझी विशेष उत्कट रूपे आहेत असे म्हटले आहे.
यद यद विभूतिमत् सत्वं श्रीमत् ऊर्जितमेव वा।
तद् तद् एव अवगच्छ त्वं मम तेजांशसंभवम् ।।
जे जे वैभवसंपन्न, ईश्वरीय तेजाने युक्त, प्रभावशाली असेल ते ते माझ्या तेजाच्या अंशापासून झालेले आहे असे समज.तसेच गीतेत ‘योगः कर्मसु कौशलम्’ असेही भगवंतांनी म्हटले आहे. कुशलतापूर्वक कर्म करणे म्हणजेच योग असा त्याचा अर्थ आहे.
स्थल काल सापेक्षता
हे बहुविध संदर्भ पाहात असताना गुणवत्ता, पूर्णता, प्रभावकारिता, तेजस्विता असे उत्तमतेच्या निकटार्थी अनेक शब्द उपयोगात आणले गेले आहेत. उत्तमता हा शब्द आपण अनेकदा सापेक्ष अर्थाने वापरतो. एखादया गुणाचे तौलनिक श्रेष्ठत्व सांगण्यासाठी वापरतो. तुलनेसाठी एखादी संदर्भवस्तू, व्यक्ती किंवा गट आपल्या दृष्टीपुढे असतो. स्थल आणि काल यांची सापेक्षतात असतेच. कुसुमाग्रजांची ‘गर्जा जयजयकार’ ही एक ‘उत्तम’ कविता आहे असे आपण म्हणतो, तेव्हा कुसुमाग्रजांचा काल, ज्या प्रांत-परिसरात त्यांची कविता जन्मली ते स्थलसंदर्भ, मराठी भाषा आणि त्यांच्या सामकालीनांची कविता इतक्या तुलना, इतकेसंदर्भ आपल्या मनात असतात. ऑलिम्पिक्समध्ये Higher, Stronger, Faster अशा तुलना व उच्चांक मोडण्याची आतुरता दिसून येते. म्हणून बहुतांश उत्तमता ही तौलनिक असते. तुलना किंवा स्पर्धा ही इतरांशीच असायला पाहिजे का? इतरांशी तुलना आणि स्पर्धा काही वेळा अनारोग्यकारक मनः प्रवृत्तींना जन्म देण्याची शक्यता असते. पण स्वतःशी स्पर्धा केली, स्वतःच केलेले उच्चांक मोडायचे ठरविले तर आरोग्यपूर्ण विकास होतो. स्वतःच्या मूल्यमापनाची, परीक्षणाची हितकारक सवय लागते. स्वतः ठरविलेली मानके दृष्टीपुढे असली तर खोटी स्तुती वा अवाजवी निंदा यामुळे मन दोलायमान, विचलित होत नाही. विजिगीषु प्रेरणा वा सिद्धी प्रेरणा यांच्या मुळाशी स्वतः ठरविलेल्या मानकांचा निकषांचा संदर्भ असतो आणि त्यानुसार प्रगती करत व्यक्ती यश प्राप्त करते.
बहिरंग आणि अंतरंग अभिव्यक्ती
उत्तमतेची बहिरंग अभिव्यक्ती कोणती? नेटकेपणाने केलेले एखादे काम हे उत्तम झाले आहे असे आपण म्हणतो. रेखीवपणा, टापटीप, सौंदर्य, गती, कार्यक्षमता, कुशलता हे सारेच उत्तमतेत अंतर्भूत असते. तथापि हा सर्व उत्तमतेचा बाह्यवेष झाला. साधनांचा वापर तर करावा लागतो, पण सारे जीवन काही त्यात मापता येत नाही, बसवता येत नाही. जीवनात उत्स्फूर्तता असते. त्या उत्स्फूर्ततेतही काही उत्तमता, सौंदर्य असते. उत्तमतेचा अंतरंग अविष्कार म्हणजे प्रयोजन, प्रभाव, अभिनवता आणि आशयपूर्णता. शबरीने दिलेली बोरे उष्टी होती, पण त्यांचे प्रयोजन अतिउत्तम होते, महात्माजींची मीठ उचलण्याची कृती अत्यंत साधी होती, पण तिचे प्रयोजन आणि प्रभाव यांना तोड नव्हती. पं. वसंतराव देशपांडे यांच्या गायकीच्या ढंगात एक अभिनव चैतन्य होते आणि बहिणाबाईंची साधी कवितारचना फार मोठा आशय सांगून जात होती. हे सर्व उत्तमतेचे अतिशय उत्कट अविष्कार होते. या अंतरंग उत्तमतेशिवाय केवळ बहिरंग-उत्तमता अल्प परिणाम करणारी ठरते. अंतरंग उत्तमतेत एक मौलिकता, अ-पूर्वता असते.
उत्तमतेची साधना
उत्तमतेची साधना कशी करायची? ‘असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास, तुका म्हणे’ – असा अभ्यास, कठोर परिश्रम, स्वयंअनुशासन हे उत्तमतेसाठी आवश्यक आहे. यासाठी आळसाला थारा देऊन चालणार नाही. एका वेळी किती गोष्टींत उत्तमता मिळवता येईल याला मर्यादा आहे. आपल्या वाट्याला आलेली सर्वच कामे किमान उत्तमतेने करावयाची आणि शिवाय कोणत्या तरी एका विशिष्ट क्षेत्रात कमाल उत्तमता मिळवायची असे ठरवावे लागते. एकाच वेळी शिल्प, चित्र, नाट्य, गायन, वादन या सर्वच कलांमध्ये प्रावीण्य मिळविणे अवघड आहे. त्यासाठी काही क्षेत्रनिश्चिती करून त्या क्षेत्रात आपले प्रयत्न एकवटावे लागतात. विविध खेळणी-आकर्षणे सोडून मनाला एका ठिकाणी स्थिर करावे लागते. गायनाच्या क्षेत्रात गुरूचा आणि घराण्याचा गंडा बांधण्याची पद्धत आहे ते आपले मन एकक्षेत्रीय होऊन राहावे यासाठीच. प्रतिभाशाली सतारवादक पंडित रविशंकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य केवळ सतारवादनाच्या कलेलाच अर्पण केले आहे.
मनाला एकक्षेत्री करणे सोपे नाही. कारण चंचलता हाच त्याचा स्वभाव आहे.
‘चंचल हि मनः कृष्ण प्रमाथि बलवत् दृढम्।’
असे भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी म्हटले आहे किंवा समर्थांनी’अचपळ मन माझे नावरे आवरीता’
असे मनाच्या अस्थिरतेचे वर्णन केले आहे. ते म्हणू लागते की पुरे, या क्षेत्राचा आता कंटाळा आला. आता नवीन मुलखात भटकूया. अशा वेळी स्वयंअनुशासनाची गरज असते. जीवनरसौघ क्षीण करणाऱ्या, चंचलता, निराशा इत्यादी गोष्टींपासून कटाक्षाने दूर राहावे लागते. स्वीकृत ध्येयाचा अपरंपार ध्यास या सर्व दोषांपासून दूर रहायला साहाय्य करतो. उत्तमतेच्या साधनेसाठी आवश्यक त्या गुणांची प्राप्ती करण्यासाठी उमेद देतो.
स्वातंत्र्य ही उत्तमतेच्या साधनेसाठी आवश्यक गोष्ट आहे. प्रारंभीच्या काळात दुसऱ्याने ठरवून दिलेले काम हे काही वेळा आवश्यक असते. पण केवळ दुसऱ्याने ठरवून दिलेले काम यंत्रवत् पार पाडायचे म्हटले तर फार तर बाह्य उत्तमता राहील. पण उत्स्फूर्तता, प्रयोजन, आशयपूर्णता यांची उणीव भासेल. त्यामुळे ‘आता काय करू?’ म्हणून सारखे दुसऱ्याकडे वळावे न लागता स्वतःचे स्वतःला सुचणे, निर्णय घेता येणे हे महत्त्वाचे आहे. प्रसंगी चुका झाल्या तरी हरकत नाही, पण स्वतःच्या बुद्धीने काम करीता आले पाहिजे. स्वतंत्र्यपणे कार्य करण्याची शक्ती आणि आज्ञांकितता ही प्रगल्भ कार्यकर्त्याच्या दृष्टीने असंगत नाहीत. रामकृष्ण मिशनचे कर्तृत्ववान संन्यासी हे याची चांगली उदाहरणे आहेत.
व्यक्तीबाबत तसेच संघटनेबाबत
उत्तमतेच्या साधनेतील या सर्व गोष्टी जशा व्यक्तीला लागू आहेत, तशाच त्या संस्थेला अथवा संघटनेलाही लागू आहेत. ज्ञान प्रबोधिनीत आपण बाह्य उत्तमतेचा आग्रह धरतो तसेच अंतरंग उत्तमतेवरही तितकाच भर देतो. ही एक गतिमान संघटना आहे, असली पाहिजे असे आपणा म्हणतो. विविध उपक्रम आणि त्यामागची दिशा ही गती आणि चैतन्य निर्माण करणारी असते. विवेकानंद जयंतीच्या प्रात्यक्षिकांमध्ये शारीरिक कौशल्यांमध्ये उच्चांक गाठण्याची चुरस असते. वर्षान्त- वर्षारंभ उपासनांमधून अतिभव्य आशय, विचार, भावना, स्वर यांची मनाला विलक्षण उंचीवर नेणारी गुंफण असते. पौरुषपूर्ण बर्चीनृत्यांमध्ये किंवा मर्दानी भांगड्यामध्ये एक अभिनवता असते. पंजाब सदभाव यात्रेसारख्या उपक्रमातून अपूर्वता, साहस आणि राष्ट्रीय एकात्मतेचा विराट आशय अंतर्निहित असतो. शिक्षणात मनुष्य-घडणीचे प्रयोजन ठेवून प्रतिभा जागरण, परिस्थितीज्ञान, समूहकार्यातून नेतृत्वशिक्षण, प्रकल्पांमधून वैज्ञानिक वृत्तीची जोपासना अशा उतमोत्तम कल्पना कार्यान्वित केलेल्या असतात. शिवगंगा खोऱ्यातील दारूबंदी आंदोलनातही कल्पकता, समयसूचकता, प्रभावनियोजन (Impact planning) असे उत्तमतेचे पोषक घटक मोठ्या प्रमाणात होते. यापूर्वीच्या लेखात ज्या चतुर्विध प्रतिज्ञांचा उल्लेख आला आहे तोही श्रेष्ठ, श्रेष्ठतर ध्येयाच्या दिशेने म्हणजे उत्तमतेच्या दिशेनेच प्रवास आहे.
उत्तमतेच्या साधनेतील धोके
उत्तमतेची साधना करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला वा संघटनेला काही धोक्यांपासून सावध असावे लागते. उत्तमतेचे साधक हेच स्वाभाविकपणे इतरांपासून वेगळे पडण्याचा संभव असतो. इतरांना ते वेगळेपण चांगल्या अर्थाने जाणवले तर ते आदर करतात, पण निकट येत नाहीत, अंतरावर राहू पाहतात. उत्तमतेच्या साधकाला अनेकदा मत्सर आणि द्वेष यांना तोंड द्यावे लागते. तुकाराम महाराजांना मंबाजीबुवा, रामेश्वरभट्ट यांच्याकडून छळ सोसावा लागला तो मत्सरापोटीच.
उत्तमतेच्या साधकाला स्वतःलाच असे वाटू लागले की आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ प्रतीचे आहोत, तर त्यांचा अहंकार पुष्ट होतो. त्यांच्यात आढ्यता निर्माण होते. उर्वरित जगाशी त्यांचा संवाद तुटतो. तो जणू एक ‘बेट’ बनतो. संघटनेच्या बाबतीतही असेच होण्याची शक्यता असते. जनी जनार्दन हे तत्व मानणाऱ्यानी तर हे विशेष लक्षात ठेवले पाहिजे.
तसेच उत्तमतेच्या साधनेमुळे एका प्रकारची निष्ठुरतासुद्धा येऊ शकते. प्राचीन गीसमध्ये स्पार्टा नावाचे शहर होते. त्या शहरातील सर्वच स्त्री-पुरुष सुदृढ बांध्याचे, युद्धक्षम असावेत अशी त्यांची इच्छा होती. म्हणून जन्माला आलेल्या अर्भकांना ते काही काळ उजाड टेकडीवर एकाकी सोडून येत. तिथल्या थंडीवाऱ्याला ते पोर टिकले तर स्पार्टाचा शक्तिशाली नागरिक होण्याची त्याची क्षमता आहे असे मानले जाई. हिंदुस्तानात मात्र आपण Each soul is potentially divine, प्रत्येकातच देवत्व अंतनिर्हित आहे असे मानले आहे. तथापि आपल्या काही पिढ्यांनी याच्या विपरीत व्यवहार केला आणि त्यातून सोवळे-ओवळे, स्पृश्यास्पृश्य भाव, वांशिक शुद्धतेचा अतिरेकी आग्रह आणि सप्तबंदया अशा विकृती जन्माला आल्या. उत्तमतेच्या नादात आपले पूर्वज माणुसकी विसरले. कबीरांचा एक दोहा आहे-
उँचा भया तो क्या भया, जैसे ताल-खजूर ।
पथिकको छाया नाही, फल लागै अतिदूर ।।
ज्या उत्तमतेजवळ नुसतीच उंची आहे पण वात्सल्य, स्नेह, माणुसकी यांची छाया देण्याचे सामर्थ्य नाही, त्या उत्तमतेचा समाजाला उपयोग नाही.
उत्तमतेच्या शोधात आणखी एक धोका संभवतो तो जीवघेण्या, कटोकटीच्या स्पर्धेचा. अलीकडे आपल्या समाजात शालांत परीक्षेचे व १२ वीचे यश फार महत्त्वाचे समजले जाते. ९५.७ टक्के गुण मिळवणारा ९५.६ पेक्षा श्रेष्ठ ठरतो. एकाला वैदयकीय महाविद्यालयात प्रवेश मिळतो व पाठच्याला मिळत नाही. अशा आत्यंतिक स्पर्धेतून तीव्र निराशा, मनोभंग उद्भवू शकतात. त्याची परिणती आत्महत्येपर्यंतही क्वचित्प्रसंगी होऊ शकते. म्हणून उत्तमतेचा आग्रह असला, तरी जीवघेण्या स्पर्धेचे स्वरूप त्याला केव्हाही येता कामा नये.
उत्तमता विरुद्ध संख्या, गुणवत्ता विरुद्ध संख्या असे द्वंद्व नेहमी दिसते. गुणवत्तेशी तडजोड न करता, ‘एटीकेटी’चा आग्रह न धरता उत्तमता आणि समता या एकत्र नांदणे शक्य आहे अशी ज्ञान प्रबोधिनीची भूमिका आहे. Best should not be the enemy of better अशी येथे धारणा आहे. म्हणून खेड्यांमधला दहावी पास होऊ न शकणाऱ्या मुलांना जीवनात उभे राहता येईल असे शिक्षण देणे हा प्रबोधिनीचा महत्त्वाचा उपक्रम असतो. हा उपक्रम विशेष गुणी मुलांना नेतृत्व-शिक्षण देण्याच्या उपक्रमाच्या विसंगत आहे असे मानले जात नाही.
संधीची समानता नव्हे, तर विशेषता
संधीची केवळ समानता हे तत्त्व प्रबोधिनीला पुरेसे वाटत नाही. ज्यांना आजवर विकासाची संधी मिळाली नाही, अशांना समान नव्हे तर विशेष संधी मिळाली पाहिजे. त्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत हा प्रबोधिनीचा परिपाठ आहे. उत्तमतेला करुणेची आणि सहसंवेदनेची सदैव जोड येथे राहिली आहे. यापुढे ही हरिजन, गिरीजन, दलित यांच्याकडून प्रबोधिनीला विद्यार्थी मिळावेत, त्यांनी उत्तम शिक्षण घेऊन आपल्या समाजाच्या विकासासाठी काम करावे, या दृष्टीनेच शिक्षणाची योजना राहायला हवी आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भटक्या जमातींमधील, मांग-गारुड्यांची मुले आपल्याजवळ शिकण्यासाठी आणली. त्यांच्यापैकी काही उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊन आले आणि कर्मवीरांनीच स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये ते अधिकाराची पदे भूषवित आहेत नि आपल्या बांधवांच्या शिक्षणाचे काम करीत आहेत. रयत शिक्षण संस्थेची जवळजवळ ३५० वसतिगृहे आहेत. तेथील वसतिगृह प्रमुख बव्हंशी संस्थेचेच माजी विद्यार्थी आहेत. ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक संचालक कै. डॉ. आप्पाजी पेंडसे यांनीही अधिकांशाने दलित, मुस्लिम, ब्राह्मणेतर अशा मुलांना घरी राहायला आणले आणि पोटच्या मुलांप्रमाणे संगोपन केले.
दलितांना विशेष संधी देण्याच्या विरुद्ध असलेले काही सवर्ण आहेत. आमची मुले उत्तम गुण मिळवून उतीर्ण होतात पण त्यांना वैद्यकीय वा अभियांत्रिकीला प्रवेश मिळत नाही आणि कमी गुण मिळवणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मात्र मिळतो अशी त्यांची तक्रार असते. गुणवत्तेशी फारशी तडजोड न करता मागासवर्गीयांना विशेष संधी दिली पाहिजे, अपेक्षित गुणवत्तेला येऊन पोचण्यासाठी त्यांना साहाय्य दिले पाहिजे असे ज्ञान प्रबोधिनीला वाटते. आजवर सवर्णांना संधी उपलब्ध होती. आता मागासवर्गीयांना आहे. आमच्या पूर्वजांनी जे केले त्याबद्दल आम्हाला शिक्षा का? असा सवर्णांचा प्रश्न असतो. पण आजवर आमच्या पूर्वजांना संधी मिळाली नाही म्हणून आम्ही मागास राहिलो. आता तुम्हीही थोडे सोसा, असे दलितांचे म्हणणे असते. तात्कालिक फायट्या-तोट्यांच्या पलीकडे जाऊन या प्रश्नाकडे पहिले पाहिजे आणि मागासवर्गीयांना पुरेसा काळ, पुरेशी संधी आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी पुरेसे शिक्षण, साहाय्य दिले पाहिजे. समान गुणवत्तेचा एक दलित आणि एक सवर्ण विद्यार्थी असेल तर विकासाच्या संधीचे प्राधान्य दलिताला असले पाहिजे अशी प्रबोधिनीची निःसंदिग्ध भूमिका आहे. म्हणून ज्ञान प्रबोधिनीचा उत्तमतेचा आग्रह हा समतेच्या विरुद्ध नसून समतोल पोषक असाच आहे.
संघटनेला उत्तमतेकडे वाटचाल करायची असेल तर तिच्यातील प्रत्येक घटकाचा विकास महत्त्वाचा आहे. तिच्यात विकासाला पोषक असे आरोग्यपूर्ण वातावरण असणे हेही महत्त्वाचे आहे. या दोन्ही संबंधांत आधीच्या प्रकरणांतून चर्चा केलेली आहे.जयिष्णू प्रेरणा : एक राष्ट्रीय गरजउत्तमता हा काही कोण्या व्यक्तीला किंवा संघटनेलाच आवश्यक असलेला दृष्टिकोण नव्हे, तर कोणत्याही प्रगतिशील राष्ट्राची ती महत्त्वाची गरज आहे. जर्मनी आणि जपान ही राष्ट्रीय स्तरावरच्या उत्तमतेच्या साधनेची लक्षवेधक उदाहरणे आहेत. विजिगीषु प्रेरणा (Achievement motivation), यशाकांक्षा हे उत्तमतेचे इंधन आहे. ज्ञान प्रबोधिनीचे विद्यमान…
उत्तम काम
अचूकता
नावीन्य
शिस्त
स्पर्धा स्वतः शी
माणुसकी
हेतूंमधील उत्तमता आणि कामांमधील उत्तमता यांमध्ये समतोल साधताना कस लागतो. त्यावर काम कसे करायचे?
उत्तमता हे साधनतत्त्व नसून साध्य तत्त्व आहे असं आपण मांडलं पाहिजे; कारण उत्तमता हाच परमेश्वराचा आविष्कार आहे.