धर्मसंस्थापनेचे आधुनिक स्वरूप
भारतीय मुशीतला विचार
भारतीय राष्ट्राच्या विकासासाठी समर्थांचे विचार आज ही मार्गदर्शक होऊ शकतील असे वाटते, म्हणून हे संकलन केले. याची सुरुवात व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक सद्गुणांच्या वर्णनाने केली आहे. याचा शेवट हे गुण अंगी बाणवलेल्या भाग्यवान व्यक्तीच्या वागण्याच्या वर्णनाने केला आहे. राष्ट्र विकसित होण्यासाठी व्यक्ती विकसित होणे हे मुख्य. त्याचा भारतीय मुशीतला आणि स्वत: अनुभवलेला विचार समर्थांनी मांडला आहे. पुढील कारणांमुळे आजही तो मला महत्त्वाचा वाटतो.
सनातन धर्म आणि राष्ट्र
पाश्चात्य देशांमध्ये राष्ट्रकल्पनेचा उदय धर्मसत्तेच्या विरोधात झाला. भारतात मात्र राष्ट्रकल्पनेचा विकास धर्मरक्षणासाठी आणि धर्माची परिभाषा वापरतच झाला. समर्थ रामदास आणि शीख गुरू यांनी धर्मरक्षणासाठीच राष्ट्ररक्षणाची आवश्यकता मांडली. स्वामी दयानंद व स्वामी विवेकानंद यांनी अनुक्रमे वेदप्रणीत धर्म किंवा उपनिषदांचा धर्म जागविल्यानेच राष्ट्र जगेल असे सांगितले. योगी अरविंदांनी तर त्यापुढे जाऊन सनातन धर्म जगला तर राष्ट्र जगेल असे सांगितले. टिळक, लाला लजपतराय, गांधी, रवींद्रनाथ, विनोबा यांनीही वेगवेगळ्या प्रकारे हेच सांगितले. सावरकर आणि आंबेडकर यांनीही धर्माचा किंवा धम्माचा आधार नाकारून राष्ट्र जगणार नाही हेच सांगितले.
धर्म आणि समाज जीवन
या सगळ्यांच्या प्रतिपादनापरून राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रसमर्पणाची वृत्ती जागी करायची असेल तर खऱ्या धर्माविषयीची आस्था निर्माण करायला लागेल हे स्पष्ट होते. विज्ञानाचा विकास होण्यापूर्वी जीवनाच्या सर्व क्षेत्रांचा विचार धर्मानेच करायचा प्रयत्न केला होता. आज सर्वसामान्य लोकांनाही त्यातील काही भाग कालबाह्य झाल्याचे दिसते. आज कोणीही सूज्ञ व्यक्ती राजधर्माचा (किंवा खरे तर नागरिकाच्या, लोकप्रतिनिधींच्या व शासकीय अधिकाऱ्यांच्या कर्तव्यांचा) विचार करताना आधी राज्यशास्त्र, समाजशास्त्र यांचा आधार घेईल आणि मग गरज पडली तर धार्मिक स्मृतींचे संदर्भ शोधेल. काळानुसार आचारधर्मात बदल झालाच पाहिजे. तो तत्कालीन ज्ञानाशी सुसंगत असलाच पाहिजे.
भारतातील पुरातन समाजजीवन
जेव्हा साऱ्या जगभर विज्ञानाचा आणि बुद्धिवादाचा फारसा विकास झाला नव्हता तेव्हा कदाचित हिंदुस्थानातील धर्म-विकास इथल्या समाजाला इतर समाजांच्या तुलनेत अधिक संघटित, अधिक वैभवसंपन्न व अधिक नीतिमान बनण्यास उपयोगी पडला असेल. आज मात्र विज्ञान आणि आधुनिक मूल्यांच्या साहाय्याने जगातील अनेक समाज आपल्यापेक्षाही अधिक संघटित, अधिक संपन्न आणि अधिक राष्ट्रीय वृत्तीचे झालेले दिसतात.
आजचा विचार
आज भारतासमोर लोकांचे अज्ञान, दारिद्य्र, निष्क्रियता आणि अल्पसंतुष्टता या समस्या आहेत. त्या साऱ्या एकमेकांमध्ये गुंफलेल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी सर्व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान, राजकीय इच्छाशक्ती, प्रबुद्ध आणि संघटित लोकशक्ती आणि आंतरराष्ट्रीय डावपेचांना तोंड देणारी व्यापारी दृष्टी या सर्वांची आवश्यकता आहे. यातील कोणतीही गोष्ट करू नका असे कोणत्याही भारतीय धर्मसंप्रदायात सांगितलेले नाही. या सर्वांच्या साहाय्यानेच इतर राष्ट्रे प्रगत झाली. आपल्याला तोच मार्ग वापरावा लागेल.
समाज जीवनासाठी अध्यात्म
प्रगत राष्ट्रांना ‘पुढे काय?’ हा प्रश्न पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर आपल्या धर्माचा आधार असलेला शाश्वत अध्यात्मविचार देऊ शकतो. हा विचार सुरक्षित ठेवून राष्ट्रांची भौतिक प्रगती कशी करायची याचे मार्गदर्शन समर्थांच्या विचारातून मिळते. समर्थांनी विद्या, वैभव, प्रयत्न, विवेक, सावधपणा, दूरदृष्टी, संघटना, योजकता, चातुर्य, बुद्धिवाद यांचीही गरज सांगितलेली आहे. आणि या सर्वांबरोबर नि:स्पृहता, भगवंतावर श्रद्धा, भगवंताचे भजन, धर्मस्थापना, वैराग्य हे देखील सांगितले आहे. आजच्या परिभाषेत हे दोन्ही कसे करायचे हे समजून घेण्यासाठी काही संकल्पना स्पष्ट करून घेतल्या पाहिजेत.
भारतातील विकसित धर्मकल्पना
भारतीय परंपरेमध्ये चार वेगवेगळ्या संकल्पना आहेत १) इष्ट, २) पथ, पंथ किंवा मार्ग, ३) संप्रदाय आणि ४) धर्म. इष्ट म्हणजे एकेका व्यक्तीला दिसलेले किंवा समजलेले आध्यात्मिक उद्दिष्ट. प्रत्येक व्यक्तीचे स्वत:चे इष्ट असते. ते त्याने स्वत:च गाठायचे असते. जगातील प्रत्येक व्यक्तीला आपापले इष्ट माहीत असणे व सर्वांना ते गाठावेसे वाटणे ही आदर्श स्थिती आहे. परंतु व्यवहारात ही स्थिती नसते.
पंथ किंवा मार्ग ही दुसरी संकल्पना. ज्यांना अजून इष्ट सापडलेले नाही त्यांच्यासाठी आहे. पंथ म्हणजे आध्यात्मिक उपाययोजना आहे. भारतीय परंपरेमध्ये चार मुख्य मार्ग गणले गेले आहेत. एक ज्ञानाचा मार्ग. दुसरा भक्तीचा मार्ग. तिसरा कर्माचा मार्ग. चौथा ध्यानाचा मार्ग. हे मार्ग पूर्णपणे स्वतंत्र नाहीत. त्यांचे कमी-अधिक प्रमाणात मिश्रण करता येते. यांच्याशिवाय इतर लोकांनी चोखाळलेले अन्य काही मार्ग आहेत. कोणता मार्ग निवडायचा व कोणत्या मार्गाने जायचे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. वैदिक काळापासून ‘एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति’ हा पंथ-निवडीबाबतचा सर्वमान्य सिद्धान्त आहे. रामकृष्ण परमहंस यांनी हाच सिद्धान्त ‘जतो मत ततो पथ’ या पद्धतीने सांगितला. जितके दृष्टिकोन तितके मार्ग हा त्याचा आशय आहे. जितक्या व्यक्ती तितके दृष्टिकोन या सिद्धान्तामुळेच आध्यात्मिक बाबतीतली सहिष्णुता भारतीय संस्कृतीमध्ये आली आहे.
संप्रदाय ही तिसरी कल्पना. इष्ट सापडल्यानंतर किंवा शोधण्यासाठी स्वत:चा पंथ किंवा मार्ग निवडून व्यक्तीने इष्ट गाठण्यासाठी एकेकट्याने प्रयत्न करायचा असतो. पण मार्गाने एकट्याने प्रवास करणे सर्वांनाच जमत नाही. त्यासाठी संप्रदायांची संकल्पना निर्माण झाली. एखाद्या समान मार्गाने जाणाऱ्या लोकांचा कमी अधिक प्रमाणात संघटित गट म्हणजे संप्रदाय. एखाद्या संप्रदायातील लोक किंवा त्यांचे नेते विशिष्ट प्रकारच्या व्रतवैकल्यांना, विशिष्ट पद्धतीने पूजा-उपासना करण्याला, विशिष्ट ग्रंथांना, विशिष्ट व्यक्तींच्या चरित्रांना जास्त महत्त्व देतात. त्यामुळे त्या संप्रदायाचे विशिष्ट रूप तयार होते. भारतीय परंपरेमध्ये ‘उपास्यानाम् अनियम: साधनानाम् अनेकता’ हा सिद्धान्त आहे. प्रत्येकाला आपले उपास्य इष्ट निवडण्याचा अधिकार आहे. या सिद्धान्तामुळे भारतामध्ये अनेक संप्रदायही निर्माण झाले आहेत. इतर देशांतून आलेले अभारतीय संप्रदाय देखील भारतात प्रचलित आहेत.
संप्रदायांना कवेत घेणारा धर्म
व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने व्यक्ती तितकी इष्टे; प्रत्येक इष्टाकडे जाण्याचे अनेक मार्ग व एका मार्गाने अनेक इष्टांकडे जाण्याची सोय; ही विविधता व स्वीकारशीलता यांतून निर्माण होणारी संप्रदायांची अनेकता हे आध्यात्मिक व सामाजिक वास्तव आहे. याशिवायची चौथी भारतीय संकल्पना म्हणजे धर्म. इष्ट, पंथ, संप्रदाय यांची विविधता मान्य करून समाज एकसंध राखण्याची जी व्यवस्था ती व्यवस्था म्हणजे धर्म. त्या त्या काळात समाज एकसंध राखण्यासाठी धर्मातील काही गोष्टी बदलतात. तर काही जुन्याच चालू राहतात. राजकारणात लोकशाही, शासनात संप्रदायनिरपेक्षता, समाजात समानता, अर्थकारणात प्रत्येकाला संपत्ती निर्माण करण्याचे स्वातंत्र्य, संप्रदायांमध्ये परस्पर सहिष्णुता हे सर्व आजच्या धर्मातले काही महत्त्वाचे घटक आहेत. प्रत्येक समाजाचा स्वत:चा धर्म असतो. या सर्व धर्मांतील समान शाश्वत भाग हा आध्यात्मिक असतो. तर बदलता वेगवेगळा भाग हा व्यावहारिक असतो.
समाजाची गतिशील स्थिती
शाश्वत भाग पुन्हा सांगणे आणि बदलता भाग कालानुरूप करून घेणे म्हणजे धर्मसंस्थापना. जगात सर्वत्रच बदलाचा वेग जेव्हा संथ होता तेव्हा धर्मसंस्थापना करताना शाश्वत आणि बदलता असा फारसा फरक करायची गरज नसायची. परंतु या शतकात बदलाचा वेग इतका वाढला आहे की आता एका पिढीलाच स्वत:ला एक-दोनदा तरी बदलावे लागेल. त्यामुळेच आता धर्मातील शाश्वत आणि बदलाचा भाग कोणता हे जाणून घेण्याची आवश्यकता खूपच वाढली आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, जागतिक अर्थकारण आणि जागतिक राजकारण प्रत्येक समाजावर आणि त्याच्या शासनावर प्रभाव पाडत असतात. अशा बहुआयामी परिस्थितीत समाजाची एकसंधता टिकवून धरण्यासाठी बदलत्या घटकांचा सतत विचार करावा लागतो. त्यांना तोंड देण्यासाठी समाजातील व्यक्तींची एकात्मताच पुरेशी नसते. तर राष्ट्रातील विज्ञान-तंत्रज्ञान, अर्थकारण, राजकारण, पर्यावरणाविषयी जागरूकताही वाढावी, विकसित व्हावी लागते. त्यामुळे धर्मसंस्थापनेचाच पर्यायी अर्थ समाजसंस्थापना किंवा ‘समाजसंघटन आणि समाजविकास’ असा आता झाला आहे. समाजसंघटन म्हणजे व्यक्तींमध्ये समाजघटक म्हणून येणाऱ्या जबाबदारीची जाणीव वाढवणे व कुटुंबसंस्था, विवाह-संस्था, न्यायसंस्था, संस्कार संस्था इत्यादी समाजाचे आरोग्य राखणाऱ्या घटकांची शक्ती वाढविणे. तर समाजविकास म्हणजे राजकारण, अर्थकारण, संरक्षण, तंत्रज्ञान याबाबतीत जगाच्या तुलनेत अद्ययावत राहणे. बदलाची गती जेव्हा संथ होती तेव्हा समाजसंस्थापना म्हणजे स्थिती राखण्यासाठी दुरुस्ती करणे-समाजातील दुष्टांचे निर्दालन करणे व धर्माची लोकांना पुन्हा आठवण करून देणे-ही कल्पना पुरेशी होती. आता समाजसंस्थापना म्हणजे विकासाची गती राखून समाजाचे ऐक्य टिकविणे अशी कल्पना करायला पाहिजे.
समाज-संस्थापनेची कृति-कक्षा
सर्व मानवसमाज उत्तम विकासाच्या व एकात्मतेच्या दिशेने जात राहणे हे समाज-संस्थापनेचे व्यापक ध्येय असले पाहिजे. व्यवहारत: प्रत्येक देशामध्ये तेथील समाजाने आपल्या संघटनाची व विकासाची जबाबदारी घेणे असे समाज-संस्थापनेचे त्या त्या राष्ट्रापुरते ध्येय असले पाहिजे. ध्येय राष्ट्रापुरते मर्यादित करणे हा व्यवहाराचा एक भाग झाला. समाज-संस्थापनेसाठी संघटना आणि विकास कोणत्या दृश्य गोष्टींमध्ये मोजायचा हे देखील निश्चित केले पाहिजे. त्यामध्ये समाजाच्या, समाज आणि व्यक्ती-दोन्हीच्या, आणि व्यक्तीच्या गरजा व जबाबदाऱ्या यांचा विचार करावा लागतो. तो पुढीलप्रमाणे करता येईल.
समाजाची जबाबदारी
विज्ञानावर आधारित तंत्रज्ञानाचा विकास विसाव्या शतकात वेगाने झाला आहे. या तंत्रज्ञानामुळे आर्थिक व भौतिक बदल एवढ्या झपाट्याने झाले आहेत की यापूव गृहीत धरलेल्या गोष्टींची सुद्धा आता पुनर्येाजना करावी लागते. समाजाला किंवा शासनाला त्यांची व्यवस्था करावी लागते. हवा, पाणी, ऊर्जा, निवारा, सुरक्षितता या गोष्टींची शुद्धता व मुबलकता आता गृहीत धरता येत नाही. त्या साधण्यासाठी समाजाने लक्ष घातले पाहिजे. जाणीवपूर्वक योजना करायला पाहिजे. जबाबदारीपूर्वक व्यवस्था करायला पाहिजे. या आता समाजाच्या गरजा होऊन बसल्या आहेत.
समाजाची आणि व्यक्तीची जबाबदारी
तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या भौतिकताप्रधान समाजव्यवस्थेमुळे अन्न-वस्त्राबरोबर आरोग्य, उपजीविका, मनोरंजन या आता व्यक्तीच्या गरजा होऊन बसल्या आहेत. पण त्या पूर्ण करण्यासाठी समाजालाही त्यात लक्ष घालावे लागते. त्यामुळे त्या समाजाच्याही गरजा आहेत. त्या पूर्ण करण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची आहे. तशीच समाजाचीही आहे. समाज विकासासाठी आणि समाजसंघटनेसाठी त्यांच्या पूर्ततेचा विचार करावा लागेलच. परंतु समाजाचा खरा विकास व्यक्तीच्या विकासामुळे होत असतो.
व्यक्तीची जबाबदारी आणि सत्पुरुषांचे मार्गदर्शन
व्यक्तीची प्रगती किंवा विकास होण्यासाठी कौशल्ये, ज्ञान, संस्कार, ध्येयदर्शन आणि प्रेरणा हे घटक एकत्र यावे लागतात. यापैकी कौशल्य आणि ज्ञान हे घटक समाजातील व्यवस्थांमुळे व्यक्तींना उपलब्ध होऊ शकतात. परंतु एका संस्कारित, ध्येयदर्शन झालेल्या, स्वयंप्रेरित, व्यक्तीनेच इतरांपर्यंत संस्कार, ध्येयदर्शन व प्रेरणा या गोष्टी पोचवाव्या लागतात. व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक पाचही घटक ज्यांच्यामध्ये एकत्र आले होते असे विकसित सत्पुरुष म्हणजे समर्थ रामदास. म्हणूनच ‘रामदास काय म्हणाले?’ हे समजण्याची आजही गरज आहे. या संकलनातील पहिल्या सहा वेच्यांमध्ये विविध गुणांच्या संस्कारांकडे लक्ष वेधलेले आहे. पुढच्या आठ वेच्यांमध्ये संस्कारांच्या जोडीने ध्येयदर्शनही घडवले आहे. शेवटच्या सहा वेच्यांमध्ये संस्कार आणि ध्येयदर्शनाच्याबरोबर ध्येयप्रेरणाही सापडते. वाचकांनी या दृष्टीने यातील वेच्यांचा अभ्यास करावा अशी विनंती आहे.