
भाग ३
“सलाईनची बाटली संपल्यावर हॉर्न वाजणारं मशीन तयार करता येईल का? मृत्यूशी झुंज देतानाही असा विचार करणारा माणूस तुम्ही पाहिलाय? तत्वज्ञान केवळ पुस्तकात न ठेवता ते जगणाऱ्या पोंक्षेसरांच्या आणि त्यांच्या विलक्षण ‘प्रबोधक कुटुंबाच्या’ काही हृदयस्पर्शी आठवणी…”
पोंक्षे कुटुंबाचं स्वरूप कधीच त्या ठराविक ‘आम्ही चौघे आणि आमचं घर’ अशा चौकटीत बसणारं नव्हतं. तिथली पंगत कधीच छोटी नसायची; आठवड्यातून किमान चार-पाच पाहुणे तर हक्काने जेवायला असायचेच. अरुणाचलच्या मुलांसाठी तर ते खऱ्या अर्थाने ‘सेकंड होम’ होतं. तिथून शिकायला येणाऱ्या अनेक मुलांचे सर आणि ताई जणू पालकच (गार्डियन) बनले होते. काही मुलं तिथे काही दिवस राहिली, तर काही चक्क तीन-तीन वर्षं पोंक्षे कुटुंबाचा सदस्य म्हणून वावरली.
हाजुली नावाच्या मुलाचा किस्सा तर काळजाला भिडणारा आहे. एका मुलाने ताईंना सांगितलं की, “ताई, हाजुली पैशाअभावी एक दिवस वडापाव खातो आणि दुसऱ्या दिवशी फक्त चहा पिऊन राहतो.” हे ऐकताच ताईंचा मायेचा पाझर फुटला. त्या तडक उठल्या, त्या मुलाला सोबत घेतलं आणि थेट हाजुलीला गाठून आपल्या घरी घेऊन आल्या. त्यानंतर पुढची तीन वर्षं हाजुली पोंक्षे कुटुंबाचाच एक भाग होऊन राहिला. अशी तीन-तीन वर्षं राहणारी किमान चार-पाच मुलं आणि वर्ष-दोन वर्षं राहणारी किमान वीस एक मुलं तरी नक्कीच असतील. प्रबोधिनीचे कार्यकर्ते असोत, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी असोत की तरुण अविवाहित मुलं, सरांच्या घरची पंगत सर्वांसाठी नेहमीच उघडी असायची. आशाताईंच्या भोजनगृहातील पंगतीनंतर पुण्यातली दुसरी मोठी पंगत मी अनुभवली असेल, तर ती फक्त पोंक्षे सरांच्या घरीच!
सरांच्या घर घेण्याचा किस्साही तितकाच रंजक आणि त्यांच्या निस्पृह स्वभावावर प्रकाश टाकणारा आहे. पहिलं घर घेण्यासाठी सर जेव्हा बँकेत गेले, तेव्हा योगायोगाने समोर त्यांचाच एक विद्यार्थी अधिकारी म्हणून बसला होता. त्याने जेव्हा सरांची ‘पे-स्लिप’ पाहिली, तेव्हा तो अस्वस्थ झाला. त्याने ताईंना बाजूला बोलावून घेतलं आणि नाराजीने सांगितलं, “ताई, सरांच्या या पगारावर मी त्यांना गृहकर्ज (Loan) देऊ शकत नाही.” पण ताईंनी किंवा सरांनी त्यावर कोणताही आक्षेप घेतला नाही किंवा त्यांना त्याचं वाईटही वाटलं नाही. “ठीक आहे, काही हरकत नाही,” असं म्हणून ते शांतपणे घरी परतले.
पुढे जेव्हा दुसऱ्या घराची वेळ आली, तेव्हा ताईंच्या आई त्यांच्याकडे राहायला येणार होत्या आणि थोड्या मोठ्या जागेची गरज होती. योगायोगाने बाजूचंच घर विकायला निघालं. सोसायटीतल्या लोकांना जेव्हा हे कळलं, तेव्हा ते स्वतः ताईंना भेटायला आले आणि विचारलं, “ताई, तुमच्याकडे बयाणा द्यायला पाच-दहा हजार रुपये आहेत का?” ताई म्हणाल्या, “बघावं लागेल.” योगायोगाने घरात पाच हजार रुपये निघाले आणि त्यातूनच दुसऱ्या घराचा इसार झाला. पैशांची जुळवाजुळव करणं तसं कठीणच होतं, पण सरांचं एक पक्कं तत्व होतं— “पैशांचा विचार करण्यापेक्षा आपण जर दुसऱ्याला मदत केली, तर आपल्यासाठीही पैशांची आपोआप योजना होते.” प्रबोधिनी हे तर सरांचं विस्तारित कुटुंबच होतं, त्यामुळे तिथल्या अनेक हातांनी या प्रवासात मोलाची साथ दिली.
एक दिवस पैशांची जुळवाजुळव होत नाही म्हणून ताई आपल्या शेजारी राहणाऱ्या मिलिंद सरांशी सहज बोलत होत्या. ते ऐकताच मिलिंद सर क्षणाचाही विचार न करता ताडकन उठले आणि म्हणाले, “चला ताई, आपण आत्ता बँकेत जाऊ.” त्यांनी चक्क स्वतःकडचे सगळे शेअर्स विकून टाकले आणि घरासाठी लागणारी पाऊण रक्कम मदतीचा हात म्हणून पुढे केली. न मागता ही मदत सरांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या पदरात पडत राहिली. असं हे खरोखरच एक निराळं कुटुंब’ आहे.
आयुष्याचा प्रवास हा एखाद्या वळणावळणाच्या वाटेसारखा असतो. कधी आपण आपल्याच ध्येयधुंदीत चाललेलो असतो, तर कधी अचानक समोर असं एखादं वळण येतं की जे आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतं. तसंच काहीसं माझ्याही बाबतीत घडलं. काही माणसं आपल्याला का भेटतात, हे सुरुवातीला उमजत नाही; पण नंतर तीच माणसं आपल्या आयुष्याचा भक्कम आधार बनून पहाडासारखी पाठीशी उभी राहतात.
माझा स्वभाव तसा मोकळाढाकळा. माणसांत मिसळणं, गप्पांचे फड रंगवणं आणि आनंदाने काम करणं हेच माझं जगणं. ‘जो न लोकांसे लोक न कंटाळती तया’ या गीतेतल्या ओळीप्रमाणे मी माझं आयुष्य जगत होतो. विवेकानंद केंद्राच्या ‘अरुण ज्योती’ प्रकल्पात मी अगदी मनापासून रमलो होतो. पण नियतीला काहीतरी वेगळं मान्य होतं. अचानक एक दिवस दिब्रुगडहून बोलावणं आलं आणि तिथूनच माझ्या संघर्षाची सुरुवात झाली.
खरं सांगायचं तर मी थोडा ‘जड’ स्वभावाचा माणूस. सहजासहजी आपली जागा सोडणं किंवा बदल स्वीकारणं माझ्या जीवावर येतं. त्यामुळे तातडीने निरोप येऊनही मी लगेच हाललो नाही. पण शेवटी जेव्हा तिथे पोहोचलो, तेव्हा कळलं की मला संघटनात्मक काम सोडून ‘औपचारिक शिक्षण’ विभागात काम करायचं आहे. दापोरिजोसारखं छोटं गाव सोडून दिब्रुगडला शिफ्ट व्हायचं होतं. माझं मन त्या कामासाठी अजिबात तयार नव्हतं. मी निवेदिता दीदींना अगदी रोखठोक ‘नाही’ म्हणून सांगितलं. पण दीदी म्हणजे प्रेमाचा सागर. त्यांनी झारखंडच्या शिबिरात मला पुन्हा गाठलं आणि हळुवारपणे समजावलं. “तू एकदा पुण्याला जा आणि आपल्या ज्येष्ठांशी बोल, त्यांचा तुझ्यावर जीव आहे,” असं त्यांनी सांगितलं आणि त्यांचा शब्द मानून मी पुण्याला आलो.
पुण्यात गिरीशराव आणि विवेक सरांनी मला एकच नाव सुचवलं, ते म्हणजे विवेक पोंक्षे सर! त्यावेळी खरं तर मला सरांबद्दल काहीच माहिती नव्हतं. ते शिक्षण क्षेत्रात काय काम करतात किंवा त्यांचं योगदान काय, याबद्दल मी पूर्ण अनभिज्ञ होतो. पण सरांना भेटलो आणि पुढचे तीन-चार दिवस जणू काळाचं भानच हरपलं. आम्ही दिवसातले अठरा-अठरा तास एकत्र होतो. त्यांच्या घरी राहणं, एकत्र जेवणं आणि न संपणाऱ्या गप्पा… हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं होतं.
सर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांशी बोलायचे आणि पुन्हा तितक्याच आपुलकीने माझ्याशी संवाद साधायचे. त्या तीन दिवसांच्या प्रदीर्घ सहवासात सरांनी मला शिक्षणाचं महत्त्व आणि या कामाची खोली इतक्या सहजपणे पटवून दिली की, माझ्या मनातला सगळा संभ्रम कुठल्या कुठे पळून गेला. ज्या कामाला मी नको म्हणत होतो, त्याच कामात मला आता नवी दिशा दिसू लागली होती. मराठवाडी मातीतल्या माझ्या रांगड्या स्वभावाला सरांच्या विचारांची अशी काही जोड मिळाली की, तिथून माझ्या आयुष्याचा एक नवा आणि समृद्ध प्रवास सुरू झाला.
ज्या कामाला सुरुवातीला मी ठाम नकार दिला होता, त्याच कामाचा अथांग आवाका आता मला लख्ख उमजू लागला होता. पोंक्षे सरांचे विचार आणि त्यांचा तो साधा-सरळ, पारदर्शी स्वभाव… या दोन्ही गोष्टींनी माझ्या मनावर अशी काही मोहिनी घातली की माझा नकाराचा सूर पार बदलून गेला. तिथूनच माझ्या एका नव्या प्रवासाचा श्रीगणेशा झाला आणि मी आनंदाने ‘शिक्षणाधिकारी’ होण्याची जबाबदारी स्वीकारली. खरं सांगायचं तर, आयुष्याच्या वाटेवर माणसं तर खूप भेटतात, पण काही माणसं अशी असतात जी फक्त रस्ता दाखवत नाहीत, तर त्या रस्त्यावर चालण्याचं बळही काळजात पेरतात. माझ्या आयुष्यात पोंक्षे सर अगदी त्याच ‘श्रीकृष्णा’च्या भूमिकेत आले, ज्यांनी मला माझ्या खऱ्या ‘कुरुक्षेत्रा’ची ओळख करून दिली.
एका संघटकाच्या बेधडक वृत्तीने जगणाऱ्या माझ्यासारख्या माणसासाठी औपचारिक शिक्षण क्षेत्र आणि त्यातली ही प्रशासकीय खुर्ची म्हणजे खरं तर जीवावर आलेलं काम होतं. फाईली, नियम आणि प्रशासन हे सगळं माझ्या स्वभावात बसणारं नव्हतं. पण पोंक्षे सरांनी माझ्यावर जो अढळ विश्वास टाकला, तोच माझ्यासाठी मोठा आधार ठरला. त्यांनी मला नुसती जबाबदारी देऊन वाऱ्यावर सोडलं नाही, तर ती पेलण्यासाठी लागणारी सगळी ‘शिदोरी’ आणि ‘आयुधं’ देऊन मला सज्ज केलं. काम करताना पावलोपावली अडचणी येत होत्या, अनेकदा गोंधळ उडायचा, पण अशा प्रत्येक वेळी सर माझ्या पाठीशी एखाद्या ढाल बनून उभे राहिले. त्यांनी मला कधीच एकटं पडू दिलं नाही. खऱ्या अर्थाने ते माझे ‘सारथी’ झाले आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे कोरडं वाटणारं प्रशासकीय काम माझ्यासाठी आनंददायी आणि समृद्ध करणारा अनुभव ठरलं.
शब्दांपलीकडचे शिक्षण
सरांचं माझ्यावरचं प्रेम हे कधीच फक्त कामापुरतं मर्यादित नव्हतं, त्यात एक वेगळीच जिव्हाळ्याची ओढ होती. एकदा तर केवळ मला भेटण्यासाठी त्यांनी आपला नियोजित मार्ग बदलला आणि ते खास दिब्रुगडला आले. त्या काही क्षणांच्या भेटीने मला जी ऊर्जा दिली, ती शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. पुढे गुवाहाटीत शिक्षकांचं शिबिर झालं आणि तिथे मला ‘ज्ञान प्रबोधिनी’ची खरी शैक्षणिक भूमिका आणि त्यामागचं सखोल तत्वज्ञान खऱ्या अर्थाने उमजलं. ज्याला आपण ‘Philosophy in Action’ म्हणजेच ‘कृतीतील तत्वज्ञान’ म्हणतो, त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे पोंक्षे सर होते.
अरुणाचलमधील कामाचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी बांधून जेव्हा मी परतलो, तेव्हा मनात अंबाजोगाईत प्रबोधिनीचं काम सुरू करण्याचा विचार घोळू लागला. या नव्या कोऱ्या वाटेवर चालताना विवेक कुलकर्णी सर आणि पोंक्षे सरांनी माझा हात इतका घट्ट धरला की मला कधी भीतीच वाटली नाही. नियोजनातील अगदी छोट्या बारकाव्यांपासून ते मनात येणाऱ्या शंकाकुशंकांपर्यंत, प्रत्येक टप्प्यावर सरांचं भक्कम पाठबळ मला लाभलं. पोंक्षे सरांच्या घराशी निर्माण झालेला हा ऋणानुबंध माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा ठेवा आहे. बागेश्री ताई आणि सरांचं ते घर म्हणजे केवळ विटा-मातीची वास्तू नव्हती, तर आम्हा कार्यकर्त्यांसाठी तो एक ‘ठेपा’ म्हणजेच हक्काचा आधारवड होता. पुण्यात आल्यावर ईशान्य भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी आणि माझ्यासाठी तर ते ‘दुसरं घरच’ झालं होतं. जेवताना रंगणाऱ्या गप्पांपासून ते तत्वज्ञानाच्या सखोल चर्चेपर्यंत, त्या घरात मला जे संस्कार मिळाले, त्यातूनच एका नव्या संकल्पनेचा जन्म झाला.
सरांच्या संपूर्ण कुटुंबाकडे पाहून माझ्या मनात एक विचार पक्का झाला— ‘प्रबोधक कुटुंब’. प्रबोधिनीच्या इतर कोणत्याही कार्यकर्त्यापेक्षा सुरुवातीच्या काळात कदाचित जास्त वेळ मी सरांसोबत घालवला असेल. त्यांच्यासोबत जेवलो, तासनतास गप्पा मारल्या, अनेकदा आमचे वैचारिक वाद झाले, अगदी भांडणंही झाली; पण त्यातून आमचं नातं अधिकच घट्ट होत गेलं. आज जेव्हा मी माझ्या अंबाजोगाईच्या घराचा विचार करतो, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर सतत पोंक्षे सरांच्या घराची प्रतिमा असते. माझं घरही असंच असावं—जिथे तत्वज्ञान केवळ बोललं जात नाही तर ते प्रत्यक्ष कृतीत उतरतं आणि जिथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला हे आपलंच घर आहे असं वाटतं. पोंक्षे कुटुंबानं दिलेली ही ‘प्रबोधक कुटुंबाची’ संकल्पना आता माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे.
प्रबोधक कुटुंब
ताईंच्या आई आजारी पडल्या, त्यांना अर्धांगवायूचा त्रास सुरू झाला आणि ताईंची त्यांची शुश्रूषा करण्यासाठी धावपळ होऊ लागली. तेव्हा सरांनीच पुढाकार घेऊन सुचवलं की, “एवढी धावपळ करण्यापेक्षा आईंना आपल्याच घरी आणून का ठेवत नाही? म्हणजे त्यांची सेवाही होईल आणि तुझी ओढाताणही थांबेल.” सासूबाईंची सेवा स्वतःच्या घरात करण्याची ही संवेदनशीलता फक्त सरांकडेच असू शकत होती.
मध्यंतरीच्या काळात सरांचा मला फोन आला. नेहमीप्रमाणे ते “प्रसाद, आपण असं करू, तसं करू,” असं उत्साहाने बोलत असत. पण त्या दिवशी त्यांनी विचारलं, “प्रसाद, माझं एक काम करशील का?” सरांनी काम सांगावं आणि मी ते करू नये, असं शक्यच नव्हतं. सर म्हणाले की, “अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीला अभिषेक करायचा आहे.” सर स्वतः मंदिरात जाणारे गृहस्थ नाहीत हे मला ठाऊक होतं, तिथे अभिषेक तर खूप लांबची गोष्ट! मी स्वतःही वर्षानुवर्षे मंदिरात जात नाही आणि नवरात्रीत तर गर्दीमुळे तिकडे पायही ठेवत नाही. सरांसाठी मी “हो” म्हटलं, अभिषेक पूर्ण झाला. जेव्हा मी विचारलं की, “सर, प्रसाद कुठे पाठवू?” तेव्हा ते म्हणाले, “आईच्या पत्त्यावर आणि आईच्या नावाने पाठव.” तेव्हा माझ्या लक्षात आलं की, हे सगळं ते आपल्या आईसाठी करत आहेत. जोपर्यंत आई होत्या, तोपर्यंत दर नवरात्रीत सरांचा मला फोन यायचा आणि त्या निमित्ताने माझंही योगेश्वरीचं दर्शन व्हायचं. आपल्या आईच्या सुखासाठी कधीकधी आपला सारासार विवेक बाजूला ठेवून केवळ भावनेने नातं जपणारे असे हे सर होते. या मायेला काय म्हणावं!
एकीकडे सर ‘राष्ट्रार्थ भव्य कृतिका’ म्हणजे राष्ट्रासाठी पराक्रमाची कामं करत हिंडत होते, तर दुसरीकडे घराची सगळी धुरा बागेश्री ताई समर्थपणे सांभाळत होत्या. मुलांची शाळा, जेवण, अभ्यास, पाहुण्यांची सरबराई—हे सगळं ताईंनी आनंदाने पेललं. खरं सांगायचं तर, एकीकडे ‘विवेक’ होता तर दुसरीकडे ‘भावना’ होती; एका बाजूला प्रगल्भ ‘मस्तिष्क’ होतं तर दुसऱ्या बाजूला मायेने भरलेलं ‘हृदय’ होतं. या दोघांच्या मेळानेच हे प्रबोधक कुटुंब पूर्णत्वास गेलं होतं.
त्यांची मुलं पण अफलातून आहेत. छोटी निवेदिता पाच सहा वर्षांची असेल, एक दिवस ताई बाहेरगावाला व्याख्यानासाठी जाणार होत्या. तिला शाळेतून आणण्यासाठी सरांना सांगितलं होतं, पण सर कामाच्या गडबडीत विसरून गेले. ही छोटी पोरगी कुठलाही त्रागा न करता स्वतःहून आपल्या काकूकडे निघून गेली आणि तिथून आईला फोन केला, “आई तू गावाला गेलीस हे मला माहित होतं आणि बाबा तर येणं शक्य नव्हतं (विसरणार हे माहीत होतं). मी काकूकडे आले आहे, काळजी नको.” अशी ही समंजस निवेदिता.
सरांना कॅन्सर झाला आणि त्यांचा तो जीवघेणा लढा सुरू झाला. याच काळात निवेदिता कॅन्सरमधून वाचलेल्या (Survivors) लोकांची एक प्रश्नावली भरून घेत होती. तिच्या मैत्रिणीने सहज विचारलं, “तुझे वडीलही कॅन्सर सर्व्हायव्हर आहेत ना, मग तू त्यांचा फॉर्म का नाही भरून घेत?” त्यावर निवेदिताने दिलेलं उत्तर काळजावर कोरण्यासारखं होतं. ती म्हणाली, “नाही, माझे वडील ‘सर्व्हायव्हर’ नाहीत, ते ‘कॅन्सर फायटर’ आहेत. त्यांच्याकडून मी हा फॉर्म भरून घेणार नाही.” केवढा तो अभिमान आणि केवढा तो विश्वास!
मला कधीकधी प्रश्न पडायचा की, सर आणि ताईंमध्ये कधी भांडणं होत नसतील का? सरांच्या त्या भव्य राष्ट्रकार्याच्या धुंदीत अनेकदा घरच्या छोट्या-मोठ्या गोष्टी राहून जायच्या. मग कधीतरी ताई चिडायच्या, त्यांचा भांडायचा पूर्ण बेत असायचा. पण सर तिथेही एकदम शांत! भांडण्यातली त्यांची ती शांत भूमिका समोरच्याच्या रागाची हवाच काढून टाकायची. मग भांडण होणार तरी कसं?
सुरुवातीला ताईंना कॅन्सर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, त्यामुळे त्यांना वारंवार तपासण्या कराव्या लागायच्या. एकदा तर त्यांना खात्रीच पटली की आपल्याला कॅन्सर झालाय आणि त्यांचा चेहरा पार उतरला. तेव्हा सर त्यांना इतक्या सहजपणे म्हणाले, “अगं, सहा-सात वर्षांच्या लहान लेकराला जेव्हा ब्लड कॅन्सर होतो, तेव्हा त्याने काय समजायचं? आपल्या शरीराचा असा एखादा अवयव ज्याचा उपयोग आता संपलाय, तो काढून टाकला तर त्यात काय एवढं!” पुढे जेव्हा प्रत्यक्ष सरांना कॅन्सर झाला, तेव्हाही त्यांचं वागणं असंच होतं. विवेकपूर्ण विचार करण्याची त्यांची ही प्रक्रिया अखेरपर्यंत बदलली नाही.
हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना, वेदना होत असतानाही त्यांचं डोकं चालतच होतं. तिथे भेटायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना ते म्हणायचे, “ते सलाईन पडतंय ना, ते संपल्यावर एखादा हॉर्न देणारं किंवा सिग्नल देणारं उपकरण आपल्याला तयार करता येईल का? त्याची खूप गरज आहे.” मृत्यूशी झुंज देतानाही ही सृजनशीलता आणि हा स्थितप्रज्ञपणा थक्क करणारा होता. सरांच्या या वागण्यातूनच ताईंनी आयुष्यातले मोठे धक्के पचवायला शिकले. आईचा अर्धांगवायू, सरांचा कॅन्सर, आणि त्यानंतर तरुण निवेदिताचं अचानक जाणं… हा तर फार मोठा आघात होता. आता ९२ वर्षांच्या वडिलांची शुश्रूषा ताई तितक्याच धीराने करत आहेत. गेल्या सात वर्षांत माझ्या स्वतःच्या आईची सेवा करताना माझी जी अस्वस्थता झाली, मला ज्या मानसिक त्रासातून जावं लागलं, ते पाहता ताईंचा हा संयम अवाढव्य वाटतो.
मी जेव्हा ताईंना विचारतो की तुम्ही हे कसं करता, तेव्हा त्याचं श्रेय त्या सरांच्या सहवासाला देतात. धक्के सहज पचवण्याची ताकद त्यांना सरांकडून मिळाली. एकमेकांना समजून घेणारं आणि सावरून धरणारं हे पोंक्षे कुटुंब खरोखरच विलक्षण आहे. सरांच्या वडिलांना अल्झायमर झालेला असताना हे कुटुंब जेव्हा अंबाजोगाईला आलं होतं, तेव्हा त्यांचं ते वेगळेपण डॉक्टर लोहियांच्या दवाखान्यात आणि आमच्या घरी प्रकर्षाने जाणवलं. मी पाहिलेला ‘तत्त्वविचार’ केवळ पुस्तकात न ठेवता तो प्रत्यक्ष जगण्यात उतरवणारं हे खऱ्या अर्थाने एक ‘प्रबोधक कुटुंब’ आहे.
तत्वज्ञान केवळ शब्दांत न मांडता ते प्रत्यक्ष कृतीत कसं उतरवायचं, याचं चालतं-बोलतं विद्यापीठ म्हणजे बागेश्रीताई व पोंक्षेसर! ‘राष्ट्रार्थ भव्य कृतिका’ घडवताना आपलं घर कसं असावं आणि संकटांशी कसं लढावं, याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला. आज अंबाजोगाईत प्रबोधिनीचं काम करताना सरांच्या विचारांचा तो ‘ठेपा’ आणि ताईंची ती ‘माया’ सोबतीला आहे. सरांनी दिलेला हा ‘प्रबोधक कुटुंबाचा’ वारसा पुढे नेणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
आपल्याला या कुटुंबातील काय आवडले ? आपले कुटुंब अधिक चांगले होण्यासाठी आपण काय करता हे जरूर लिहा !! आपल्या कुटुंबात ह्याचे एकत्र वाचन करता येईल का ?