संघटनेचे पर्यावरण – २.भवितव्याचा वेध

काही शब्दांना असे सामर्थ्य येते की जणू काही ते शब्द वापरल्यानेच तसे घडणार आहे, असे वाटायला लागते.

नवीन काळासाठी नवीन शब्द

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काँग्रेस पक्षाचे महाअधिवेशन कलकत्त्याला झाले. त्याला समांतर अधिवेशन खासदार ममता बॅनर्जी यांनी एक दिवस आधी भरवले होते. आपल्या गटाला त्यांनी ‌‘तृणमूल‌’ काँग्रेस असे नाव दिले आहे. ‌‘ग्रासरूट्स‌’ हा इंग्रजी शब्द अनेक वर्षे प्रचारात आहे. त्याचे शब्दश: भाषांतर प्रथमच वापरलेले दिसले. ‌‘तृणमूल‌’ म्हणजे सर्वसामान्य माणसांची काँग्रेस.
ज्यांचे आयुष्य दैनंदिन जीवनातल्या प्रश्नांशी झगडण्यातच जाते, असे सर्व लोक म्हणजे समाजाची तृणमूल पातळी. अगदी जमिनीलगत असलेली; त्यांच्या आधाराने समाजाचा पिरॅमिड उभा राहातो. ‌‘तृणमूल‌’ काँग्रेस जगली तर ‘तृणमूल‌’ शब्दसुद्धा प्रचारात येईल. मग आपण देखील एकमेकांना विचारायला लागू की प्रबोधिनीचे काम ‌‘तृणमूल‌’ पातळीवर चालू आहे का? काही शब्दांना असे सामर्थ्य येते की जणू काही ते शब्द वापरल्यानेच तसे घडणार आहे असे वाटायला लागते. भवितव्य लेख या शब्दाला देखील आपल्या कामानेच वलय मिळणार आहे.

भविष्यकाळ खात्याचा मंत्री

अडीच-तीन वर्षांपूर्वी जर्मनीच्या मंत्रिमंडळात एकनवीन खाते तयार करण्यात आले. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पूर्वी जलसंधारण खाते निर्माण केले गेले. कारण तो शब्द आणि त्यामागची संकल्पना महत्त्वाची वाटायला लागली. त्यापूर्वी भारताच्या मंत्रिमंडळात मानव संसाधन विकास खाते तयार झाले. कारण त्या शब्दातही नवीन काळासाठी काहीतरी विशेष आशय भरला आहे, असे वाटत होते. तसेच हे जर्मनीतले भविष्यकाळ खाते. शिक्षण, विज्ञान, संशोधन व तंत्रज्ञान या तीन खात्यांच्या एकत्रीकरणातून काही शब्दांना असे सामर्थ्य येते की जणू काही ते शब्द वापरल्यानेच तसे घडणार आहे, असे वाटायला लागते. भविष्यकाळ खाते तयार करण्यात आले. पुढील शतकात जर्मनी आर्थिकदृष्ट्या शक्तिसंपन्न व गुंतवणूकदारांचे आकर्षण बनलेला देश व्हावा म्हणून ही आतापासूनची तयारी. ‌’इनोव्हेशन‌’ (नूतनीकरण) ही भविष्यकाळाची गरज आहे. ‌’केवळ राजकारणाने नूतनीकरण होणार नाही म्हणून या वेगळ्या खात्याची रचना केली‌’ असे या खात्याच्या पहिल्या मंत्र्याने आपल्या खात्याचे धोरण जाहीर करताना सांगितले. शिक्षण आणि संशोधन यांचा परस्पर संबंध वाढावा आणि तंत्रज्ञानाचे नूतनीकरण करण्यासाठी उद्योगांनी संशोधन करावे व त्यातून नूतनीकरणाच्या प्रक्रियेला वेग आणावा, अशी आपली इच्छा असल्याचे या मंत्र्याने सांगितले.

अनेक लोकांनी कामाची आव्हाने स्वीकारली आणि प्रतिभेने व कार्यक्षमतेने ती कामे पूर्ण केली की त्यातून भविष्यकाळ घडतो.

योजना तत्र दुर्लभा

आपले धोरण जाहीर केले त्याच भाषणात या मंत्र्याने नंतर सांगितले की या खात्याकडून गैरवाजवी अपेक्षा करू नका. भविष्यकाळाची आरेखने ड्रॉईंग बोर्डवर काढता येत नाहीत किंवा मंत्रालयातल्या टेबलांवर भविष्यकाळ घडत नाही. ज्यांच्याकडे कल्पना आहेत अशा अनेक लोकांनी कामाची आव्हाने स्वीकारली आणि प्रतिभेने व कार्यक्षमतेने ती कामे पूर्ण केली की त्यातून भविष्यकाळ घडतो. आमचे खाते तंत्रज्ञानाच्या नूतनीकरणाला वेग आणणार म्हणजे भविष्यकाळासाठी शैक्षणिक जगत्‌‍, उद्योग जगत्‌‍ आणि संशोधन जगत्‌‍ यांच्यामधली देवाण-घेवाण जाणीवपूर्वक वाढवणार. त्यातून नूतनीकरणाची बीजे रोवली जातील. ज्याची योजना करता येत नाही असा भविष्यकाळ योजनेप्रमाणे घडविण्याचा हा एक शासकीय प्रयत्न. प्रबोधिनीमधला भवितव्य लेख हा असाच एक पण अशासकीय प्रयत्न आहे.

जिरायती कार्य आणि बागायती कार्य

योजनापूर्वक वेळ, पैसा, श्रम, साधने या सगळ्यांचा वापर करून काम करणे हे अधिक चांगले. हे बागायती कार्य.

जिरायती शेती बेभरवशाची समजली जाते. पावसाच्या वेळापत्रकानुसार पेरणीचे वेळापत्रक ठरणार आणि पुढे पावसाच्या लहरीवरतीच शेते पिकणार. पृथ्वीच्या पाठीवर पूर्णपणे पावसाच्या लहरीवर दहा हजार वर्षे तरी शेती चालू आहे. त्यातली अनिश्चितता संपवण्यासाठीच बागाइत सुरू झाली. जिराइत शेती प्रामाणिकपणे केली व बागाइत प्रामाणिकपणे केली तर बागायतीत पाणी देण्याचे वेळापत्रक आपल्या हातात असल्यामुळे जास्त उत्पन्न मिळू शकते. प्रामाणिकपणाच्या जोडीने तंत्रज्ञान कामाला आले तर परिणाम जास्त. बागायतीमध्ये ठिबक सिंचन हे आणखी पुढचे प्रगत तंत्र. पाणी देण्याचे वेळापत्रकच नाही तर पाण्याचे प्रमाणसुद्धा प्रत्येक रोपाला मोजून देण्याचे.

सुचेल ते आणि सुचेल तेव्हा, जमेल तसे करणे हे जिरायती कार्य आहे. काहीच न करण्यापेक्षा असे करणे हे निश्चितच चांगले. पण योजनापूर्वक वेळ, पैसा, श्रम, साधने या सगळ्यांचा वापर करून काम करणे हे अधिक चांगले; हे बागायती कार्य. डोळस प्रयत्नवादावर भर देणारे. पण कोणतेही न्यून नसलेली योजना करणे दुर्लभ आहे. एखादा कार्यक्रम – काही तासांचा – नियोजनाप्रमाणे तंतोतंत करणे शक्य आहे. पण उपक्रमाचा कालावधी लांबला की त्यात अनिश्चितता – आश्चर्याचे धक्के – अनपेक्षित लाभ कवा हानी इत्यादींचा शिरकाव होतो. दीर्घकालीन काम करणाऱ्यांना या सगळ्यांवर मात करण्याचीही योजना करावी लागते.

भविष्यचित्रे रंगवणे म्हणजे योजनांची योजना

प्रत्येक भविष्य चित्रामध्ये आपण काय करायचे हे ठरवून ठेवणे म्हणजे भविष्यवेध घेण

आश्चर्यावर मात करणे, अनपेक्षिताला तोंंड देणे आणि आपल्याला पाहिजे त्याच दिशेला जात राहणे यातून आपल्याला पाहिजे तसा भविष्यकाळ घडवता येईल . आपल्याला पाहिजे तो भविष्यकाळ म्हणजे ‌‘इष्ट‌’ भविष्य. त्याचे एक चित्र आपण रंगवले पाहिजे. पण तेच घडेल असे नाही. इतर काहीसुद्धा घडू शकेल. अशी अनेक ‌‘शक्य‌’ भविष्यांची चित्रेसुद्धा रंगवता येतील. या प्रत्येक भविष्यचित्रामध्ये आपण काय करायचे हे ठरवून ठेवणे म्हणजे भविष्यवेध घेणे. प्रबोधिनीमध्ये आपण हे करू इच्छितो. त्यातून आपण तृणमूल काम करायचे, की गगनचुंबी काम करायचे, की दोन्ही करायचे ही सर्व शक्य भविष्यचित्रे जसजशी रंगवत जाऊ तसतसे आपले इष्ट भविष्यचित्र प्रत्येकाच्या मनात स्पष्ट होत जाईल.