संघटनेचे पर्यावरण – ३. वर्तमानकाळाचे विस्तृत भान

३. वर्तमानकाळाचे विस्तृतृत भान

दोन प्रकारची तंत्रे वापरावे लागतात….. क्षणात घडलेल्या हालचाली प्रत्यक्षापेक्षा काहीपट संथ गतीने दाखवतात……….…. दुसरे तंत्र द्रुत गतीने घटना दाखविण्याचे.

एखादा विषय शिकविण्यासाठी चित्रपट्टिका तयार करत असताना दोन प्रकारची तंत्रे वापरावी लागतात. काही क्षणांत घडणारी घटना उलगडून दाखविण्यासाठी त्या क्षणात घडलेल्या हालचाली प्रत्यक्षापेक्षा काही पट संथ गतीने दाखवतात. उंच उडी, जिम्नॅस्टिक्स्‌‍, पोहणे, धावणे इत्यादी क्रीडास्पर्धांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर चालू असते, तेव्हा निर्णायक प्रसंग नंतर संथ गतीने दाखवलेले बघायला मिळतात. अशी संथगतीची चित्रपट्टिका वारंवार पाहून नवीन खेळाडू आपल्या हालचालींमध्ये दुरुस्त्या करून अधिक कौशल्य मिळवतात. एखाद्या अपघाताचे चित्रण संथ गतीने पाहिले की अपघात कशामुळे झाला हे कळायला मदत होते.

दुसरे तंत्र द्रुत गतीने घटना दाखविण्याचे. एखादे फूल उमलायला काही तास लागतात. सतत कळीकडे पाहत राहिले तरी कळी पूर्ण उमलण्याचा नेमका क्षण पकडणे कठीण असते. पण ही प्रक्रिया द्रुत गतीने काही सेकंदांत किंवा एखाद-दुसऱ्या मिनिटात चित्रपट्टिकेमध्ये दाखवली की फूल उमलण्याची प्रक्रिया स्पष्टपणे समजते. कोंबडीचे पिल्लू अंड्याबाहेर येणे ही काही तासांची प्रक्रिया आहे. झाडाची पाने गळून पडणे, वाळवंटात वाऱ्याने वाळूच्या टेकड्या सरकणे ही काही दिवसांची प्रक्रिया आहे. गर्भाची वाढ होणे ही काही महिन्यांची प्रक्रिया आहे. एखादे शहर वसणे ही काही दशकांची प्रक्रिया आहे. पाण्याच्या प्रवाहाने खडकांची झीज होणे ही काही शतकांची प्रक्रिया आहे. या सर्व प्रक्रिया द्रुत गतीने पाहिल्या की त्या आपल्या समजण्याच्या आवाक्यात येतात. मग त्या बदलांचा अभ्यास करता येतो.

आपला आजचा दिवस चांगला जाण्यासाठी भूतकाळातल्या – घटनांचा चांगला परिणाम लागतो आणि भविष्यकाळातल्या चांगल्या इच्छाही लागतात.

संथ गतीने किंवा द्रुत गतीने एखादी घटना किंवा प्रक्रिया पाहणे हे चलचित्रणामुळे शक्य झाले आहे. आपले आकलन त्यामुळे वाढते. आपल्याला ठराविक गतीनेच घटना पाहण्याची शक्ती आहे आणि सवय झालेली असते. संथ किंवा द्रुत गतीने चित्रपट्टिका पाहण्याचे तंत्र आल्यामुळे अनेक गोष्टी नव्याने लक्षात येतात. जे यंत्राच्या साहाय्याने करतो ते मनाच्या मदतीने करता येते का? आपण वर्तानकाळात जगत असतो. बहुतेकांचा वर्तानकाळ एक दिवसाचा असतो. कालचे काल झाले. उद्याचे उद्या पाहू. असे त्यांचे असते. पण कालचे, परवाचे आणि आणखी भूतकाळातले प्रसंग आजच्या दिवसावर काहीतरी परिणाम करत असतात. त्याचप्रमाणे उद्या काय घडावे, परवा काय घडावे, त्यानंतर पुढे भविष्यकाळात काय घडावे अशी जी आपली इच्छा असते त्या इच्छेचाही काहीतरी परिणाम आपल्या आजच्या दिवसावर होत असतो. आपला आजचा दिवस चांगला जाण्यासाठी भूतकाळातल्या घटनांचा चांगला परिणाम लागतो आणि भविष्यकाळातल्या चांगल्या इच्छाही लागतात. आपल्या मनातल्या आठवणी आणि स्वप्ने आपला आजचा दिवस घडवीत असतात.

काहीजणांच्या आजला फक्त कालच्या आठवणी आणि उद्याची स्वप्ने अशा मागच्या पुढच्या एकेका दिवसाची जोड असते. आठवडा, महिना, वर्षभर पुढे-मागे जाऊ शकणारे काही लोक असतात. आपल्या आजच्या कामावर इतिहासाच्या जाणिवेने जेवढा परिणाम होतो तेवढे आपल्याला इतिहासाचे भान आहे, असे म्हणता येईल. पुढे काय झाले पाहिजे या जाणिवेतून आज आपण जेवढे काम करतो तेवढे आपल्याला भविष्याचे भान आहे, असे म्हणता येईल. इतिहास-भविष्याचे आपले भान जेवढे वाढेल तेवढा आपला वर्तानकाळ आजच्या दिवसाच्या दोन्ही बाजूला पसरेल. तो तो दिवस म्हणजे वर्तानकाळ असे न म्हणता त्या त्या दिवसाच्या पुढची मागची काही वर्षे मिळून आपला वर्तानकाळ होतो असे वाटायला लागेल

इतिहास-भविष्याचे आपले भान जेवढे वाढेल तेवढा आपला वर्तानकाळ आजच्या दिवसाच्या दोन्ही बाजूला पसरेल.

ज्यांचा वर्तानकाळ जेवढा व्यापक तेवढा त्यांचा पुढचा काळ आजच्याशी जोडलेला दिसायला लागेल. पुढचा विचार करणे म्हणजे आजचाच विचार करणे असे वाटायला लागेल. असा व्यापक वर्तानकाळ असलेल्यांना भविष्यवेध घेणे सोपे आहे. कारण भविष्यवेध घेताना ते आजचाच विचार करत असतात. एखादी प्रक्रिया द्रुतगतीने पाहण्यासारखे हे आहे. वर्तमानकाळ व्यापक करणे हे विचाराच्या दृष्टीने द्रुत गतीने चित्र पाहण्यासारखे आहे. तर वर्तानकाळ छोटा करणे हे कृतीच्या दृष्टीने संथ गतीने चित्र पाहण्यासारखे आहे.

‌‘आज करे सो अब‌’ म्हणजे वर्तानकाळ एका दिवसाहून लहान करून एका तासाइतका, एका मिनिटाइतका लहान करण्यासारखे आहे. काम चांगले होण्यासाठी एकाग्रता लागते. ती एकाग्रता त्या त्या क्षणाला मागचा-पुढचा क्षण विसरून जाण्याने मिळते. हातातल्या कामामध्ये स्वत:ला पूर्ण हरवून जाणे म्हणजे तो तो क्षणच वर्तानकाळ आहे असे मानून काम करणे. काम करणाऱ्याला एकेक क्षण म्हणजे जणू सर्वस्व असते. तो वर्तानकाळाची व्याख्या करताना महाकंजूष बनतो. प्रत्येक क्षणाला जाणीवपूर्वक वर्तानात राहणारे कामाचे पर्वत उभे करू शकतात. विचार करणाऱ्याला वर्तमानकाळची व्याख्या करताना उदार व्हावे लागते. पुढची मागची पाच-पाच वर्षे, दहा-दहा वर्षे म्हणजे वर्तानकाळ असे म्हणावे लागते. काम करणारेच जेव्हा काम ठरवणारे असतात तेव्हा त्यांना आपला वर्तानकाळ लवचिक करावा लागतो. काम करताना क्षणाएवढा लहान केलेला वर्तानकाळ काम ठरवताना काही वर्षांएवढा मोठा करावा लागतो. भविष्यवेध घेणे म्हणजे आपल्या मनातील व्यापक वर्तानकाळाचा ‌‘आँखों देखा हाल‌’ वर्णन करून सांगणे आहे.

काम करताना क्षणाएवढा लहान केलेला वर्तमानकाळ काम ठरवताना काही वर्षांएवढा मोठा करावा लागतो.