संघटनेचे पर्यावरण – ५. गटाचे सार्वभौमत्व

व्यक्तिगत निर्णय घ्यायला व्यक्ती जशी सार्वभौम असते, तसे गटाचे निर्णय घ्यायला गट सार्वभौम असला पाहिजे.

निर्णयकर्ता कोण?

एका गटातील अनेक सदस्यांनी सुट्टीमध्ये अभ्यास करायचा ठरवला. प्रामाणिकपणे मन:पूर्वक अभ्यास करायची त्यांची इच्छा होती. परंतु ज्या काळात अभ्यास करायचा ठरवले होते तेव्हाच नेमके वार्षिक परीक्षांचे निर्णय लागले. सर्वांचे निर्णय चांगले लागले. परंतु बाहेरील वातावरणामुळे बहुतेकांना आपल्याला पुढील अभ्यासक्रमांमध्ये कुठे प्रवेश मिळेल याची चिंता लागली होती. चिंता करू नये हे खरे. पण चिंताग्रस्त मनाने अभ्यासही नीट होत नाही. त्यामुळे सुट्टीत योजलेला अभ्यास स्थगित करावा, असे अनेकांना वाटत होते. आपण स्वत: योजून जाहीर केलेला कार्यक्रम आता रद्द कसा करायचा? यापूर्वीही घाईघाईने जाहीर केलेल्या काही योजना नंतर ऐनवेळी बदलाव्या लागल्या होत्या. त्या त्या वेळी या गटाला इतरांची बोलणी, टोमणे, चेष्टा ऐकून घ्यावी लागली होती. शेवटी आमच्या गटाचा आम्हीच ठरवलेला कार्यक्रम करायचा की नाही हे आम्हीच ठरवणार अशी हिंमत करून या गटाने अभ्यासाची योजना स्थगित केली. या ठिकाणी निर्णयप्रक्रिया आणि शिकण्याची प्रक्रिया दोन्ही स्वतंत्रपणे बघितल्या पाहिजेत. व्यक्तिगत निर्णय घ्यायला व्यक्ती जशी सार्वभौम असते, तसे गटाचे निर्णय घ्यायला गट सार्वभौम असला पाहिजे.

गटाचे निर्णय कसे घ्यायचे?

प्रत्येकाला स्वत:च्या म्हणण्याला कधी, कशी व किती मुरड घालायची हेसुद्धा शिकावे लागते.

गटामध्ये एखादी व्यक्ती वयाने किंवा अनुभवाने किंवा कर्तृत्वाने किंवा अधिकाराने मोठी असेल तर बऱ्याच वेळा निर्णय घेण्याची जबाबदारी ओघाने त्या व्यक्तीकडे येते. विचारी लोक जाणीवपूर्वक एकत्र येतात तेव्हा सहमतीने-सर्वसंमतीने निर्णय घेता येऊ शकतो. आणीबाणीची परिस्थिती नसेल तेव्हा सहमती होईपर्यंत परस्परांची मते समजून घेण्यासाठी किंवा आपापली मते पटवून देण्यासाठी लागेल तेवढा वेळ घेता येतो. परंतु पुरेसा वेळ नसेल तर मग कोणाला तरी पुढाकार घेऊन निर्णय घ्यावा लागतो. काही वेळा विषय महत्त्वाचा नसेल तर सर्वांनी विचार करत बसण्यापेक्षा ज्याला त्या विषयात रस आहे, अनुभव आहे त्याने निर्णय घेतलेला चालतो. गटातील सर्वांच्या सहमतीने निर्णय होणे ही आदर्श स्थिती. निर्णयाची तातडी, विषयाचे महत्त्व, गटातील सदस्यांचा कमी-जास्त अनुभव यामुळे सहमतीने निर्णय होण्याऐवजी गटातील एखादी व्यक्ती निर्णय घेते, ही वस्तुस्थिती आहे. या परिस्थितीत गटातील सदस्यांचा एकमेकांवर वेिशास असणे आवश्यक असते. एकाने निर्णय घेण्यापेक्षा सर्वसंमतीने निर्णय होण्याकडच्या प्रवासामधला टप्पा म्हणजे सहविचारात्मक नेतृत्वपद्धती.

गटामध्ये काय शिकायचे असते?

आपण ठरवलेली गोष्ट पार पाडलीच पाहिजे हा प्रत्येक व्यक्तीने व गटाने शिकण्याचा पहिला धडा आहे. यातून आत्मवेिशास वाढत जातो. एकट्याने शिकण्यापेक्षा गटाने शिकण्याचा आणखी एक पैलू आहे. गटाचा निर्णय व काम चांगले व लवकर व्हावे यासाठी प्रत्येकाला स्वत:च्या म्हणण्याला कधी, कशी व किती मुरड घालायची हेसुद्धा शिकावे लागते. एखादी व्यक्ती स्वत: ठरवलेल्या अनेक गोष्टी पार पाडू शकते. पण कोणत्या तरी क्षणाला इतर लोकांनी ठरवलेल्या गोष्टी जास्त प्रभावी ठरतात. तिथे त्या व्यक्तीला इतरांनी ठरवलेल्या गोष्टींशी जुळवून घ्यावे लागते. त्यातून एखादा गट तयार होतो. हा गटही स्वत: ठरवलेली अनेक मोठमोठी कामे करून दाखवतो. त्या गटाला मग आणखी मोठ्या गटाशी किंवा इतर गटांशी जुळवून घ्यावे लागते. त्यातून नवा मोठा गट तयार होतो. आपण केलेला संकल्प पूर्ण करायला शिकणे व इतरांच्यासाठी आपल्या म्हणण्याला मुरड घालायला शिकणे या दोन्ही गोष्टी व्यक्ती आणि गटाला, गटामध्ये काम करतच शिकाव्या लागतात.

अनेक स्तरांवर अनेक लोकांना नेतृत्वकौशल्ये शिकवायला लागणार आहेत. त्यांच्यामध्ये नेतृत्वाची वृत्ती निर्माण करायला लागणार आहे.

संघटन प्रभागाचा भविष्यवेध

व्यक्ती सार्वभौम असते. तसाच गट पण सार्वभौम असतो. परंतु कोणाच्याही सार्वभौमत्वाला मर्यादा असते. कारण सार्वभौमत्व सापेक्ष असते. या तथ्यांचा विचार करून संघटन प्रभागाचा भविष्यवेध घ्यायला पाहिजे. प्रबोधिनीच्या सध्याच्या भवितव्य लेखात संघटन-प्रभागाचा वेगळा उल्लेख नाही. तथापि, नेतृत्वविकसन व राष्ट्रीय एकात्मता या भवितव्य लेखातील दिशा संघटन प्रभागाच्या वाढीच्याच दिशा आहेत.

सर्वसंमतीने निर्णय होणे ही आदर्श स्थिती असल्यामुळे प्रत्यक्ष व्यवहारात गटातील कोणाला तरी निर्णय घ्यावे लागतात. अनेक वेळा आधी निर्णय घेऊन मग सर्वांना सहमत करून घ्यावे लागते. प्रसंगी सहमती झाली नाही तरी असहमती असणाऱ्यांनासुद्धा स्नेहाच्या, मैत्रीच्या शक्तीने बरोबर न्यावे लागते. छोट्या गटांपासून प्रारंभ झाला तरी काही प्रसंगी संपूर्ण देशच एक गट म्हणून मानावा लागतो. त्यामुळे अनेक स्तरांवर अनेक लोकांना नेतृत्वकौशल्ये शिकवायला लागणार आहेत. त्यांच्यामध्ये नेतृत्वाची वृत्ती निर्माण करायला लागणार आहे. नेतृत्वविकसन ही संघटन प्रभागाच्या कामाची महत्त्वाची दिशा आहे.

गटाला निर्णयाला व त्यानुसार कामाला प्रवृत्त करण्यासाठी नेतृत्वविकसनाची गरज आहे. तर ‌‘आपल्या विशिष्ट मताला‌’ म्हणजे ‌‘इतरांपेक्षा आपल्यामधील वेगळेपणाला‌’ मुरड घालून इतरांच्या मताबरोबर जाण्यासाठी त्यांच्याबरोबर एकात्मतेचा अनुभव वाढवण्याची गरज आहे. राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्वविकसनाची गरज आहे तशीच राष्ट्रीय स्तरावरील एकात्मतेची गरज आहे. प्रबोधिनीचे एक स्नेही डॉ. जगन्नाथ वाणी एकदा म्हणाले होते की,‌ ‘कॅनडामधून दहा हजार किलोमीटरवरून पाहिल्यावर कुठली संस्था कुठल्या विचारसरणीची आहे याचा विसर पडून ती भारतीय आहे एवढेच लक्षात राहते‌’. हा अनुभव आपापल्या गावात राहूनच येणे – देशभराच्या संस्थांच्या आणि व्यक्तींच्या बाबतीत – म्हणजे राष्ट्रीय एकात्मता. मतैक्याचे मुद्दे शोधून त्या आधारे कामाला सुरुवात करणे म्हणजे एकात्मता वाढविण्यासाठी काम करणे.

इतरांच्या मताबरोबर जाण्यासाठी त्यांच्या बरोबर एकात्मतेचा अनुभव वाढवण्याची गरज आहे.

संघटनांचे भवितव्य

व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना विस्तारत जात असताना लहान गटापासून पूर्ण देश संघटित करण्याची भाषा किती कालोचित आहे? या प्रश्नाचे उत्तर ‌‘सार्वभौत्व सापेक्ष आहे‌’ या सूत्रात आहे. म्हणजेच कामानुसार- काळानुसार एकत्र येऊन काम संपवून अंतर्धान पावणारे लहान मोठे लोकसंघ हवेत आणि साऱ्या जगापेक्षा वेगळा विचार मांडून तो प्रत्यक्षात आणण्याचे धाडस करणाऱ्या
व्यक्तीही तेवढ्याच हव्याहव्याशा आहेत. व्यक्तीला असे धैर्य देणाऱ्या आणि हजारोंना-लाखोंना सामूहिक कृतीची सवय शिकवणाऱ्या ज्या ज्या व्यवस्था असतील त्या व्यवस्था आणि त्यामध्ये सहभागी असलेले सदस्य मिळून संघटना तयार होते. पुढच्या काळामध्ये अशी संघटना पारदर्शक, समाजाला आणि आपल्या सदस्यांना उत्तरदायी, नवीन व्यक्ती आणि विचारांच्या बाबतीत स्वीकारशील, संघटनेचा वेग सहन न करू शकणाऱ्यांच्या बाबतीत क्षमाशील आणि संघटनेचा वेग व्यक्तीच वाढवू शकतील यावर वेिशास असणारी अशी असायला लागेल. व्यवस्था औपचारिक किंवा उत्स्फूर्त कशीही असली तरी या लक्षणांनी युक्त पुरुषार्थी संघटनाच पुढच्या काळात व्यक्तींना धैर्य देण्याचे व सामूहिक कृतीची सवय लावण्याचे आपले काम करू शकतील.

पुढच्या काळामध्ये अशी संघटना पारदर्शक, उत्तरदायी, स्वीकारशील क्षमाशील असायला लागेल.