विद्यार्थिदशा ओलांडलेल्या प्रौढ सदस्यांच्या, घडणीसाठी जे प्रयत्न होतात त्यांना आपण गुणवत्तावाढ म्हणतो.
दोन दिवस सोलापूरला गेलो होतो. दोन दिवसांत तीन वेगवेगळ्या गटांध्ये एकूण तेवीस शिक्षकांशी बोललो. विषय अगदी साधा होता. जूनमध्ये अध्यापक शिबिरात दोन पूर्ण दिवस प्रकल्पासंबंधी मार्गदर्शनाची सत्रे झाली होती. त्यानंतर प्रत्येक अध्यापकाने प्रकल्प करावा असे ठरले होते. त्यानंतरच्या पाच महिन्यांत प्रकल्पाचे जे काही काम झाले होते त्याची निवेदने आणि लेखी प्रकल्प वृत्त माझ्या सोलापूरच्या भेटीत प्रत्येक अध्यापकाने सादर केले. एखादे नवीन तंत्र शिकताना जी काही धडपड करावी लागते त्याचे प्रतिबब त्यांच्या निवेदनामध्ये जाणवत होते. प्रकल्प पूर्ण केल्याचा आनंद आणि त्याच वेळी हे नवीन तंत्र आपल्याला जमले आहे की नाही याबद्दलची धास्ती या दोन्ही भावनांचे मिश्रणही त्यांच्या निवेदनामध्ये डोकावत होते. एवढा आग्रह धरून सर्वांना प्रकल्प करायला लावण्याचे काय कारण होते? प्रबोधिनीच्या वेगवेगळ्या विभागांध्ये वेगवेगळी उद्दिष्टे ठेवून काम चालू असते. उद्दिष्टे वेगवेगळी असली तरी हेतू एकच आहे. राष्ट्रघडणीसाठी मनुष्यघडणीचे शिक्षण देणारी संघटना बांधणे हा आपल्या सर्व प्रयत्नांचा हेतू आहे. शालेय वयातील सदस्यांच्या घडणीसाठी जे सर्व प्रयत्न चालतात त्यांना आपण शिक्षण म्हणतो. विद्यार्थिदशा ओलांडलेल्या सदस्यांच्या घडणीसाठी जे प्रयत्न होतात त्यांना आपण गुणवत्तावाढ म्हणतो. सोलापूरच्या अध्यापकांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प करायला सांगण्याआधी स्वत: प्रकल्प करणे हा गुणवत्तावाढीचा प्रयत्न होता.
याच महिन्यात उद्वाहक विभागात एका सदस्याने तारतंत्रीची परीक्षा उत्तीर्ण केली. उद्वाहक विभाग जेव्हा सुरू झाला तेव्हा तिथे प्रमाणपत्र धारण करणारे कुणीच नव्हते. आज या विभागामध्ये विद्युत पर्यवेक्षकाचा परवाना असलेले विभागप्रमुख आणि तारतंत्री म्हणून काम करण्याचा परवाना असलेले दोन सदस्य आहेत. या परीक्षा उत्तीर्ण होऊन परवाना मिळविण्याची धडपड प्रत्येकाला स्वत:लाच करावी लागली. अशा कौशल्यांच्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमधून त्यांची व्यावसायिक गुणवत्तावाढ झाली. परंतु त्यांनी गुणवत्ता- वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून विभागाचे काम अधिक स्थिर झाले. व्यक्तिगत गुणवत्तावाढीमुळे अनेक वेळा आपल्या विभागाचीही गुणवत्ता वाढते.
व्यक्तिगत गुणवत्तावाढीमुळे अनेक वेळा आपल्या विभागाचीही गुणवत्ता वाढते.
आपल्या व्यवस्थापन महाविद्यालयाने प्रबोधिनीतील सदस्यांनी संगणक वापरायला शिकावे यासाठी 3-4 वेळा वर्ग योजले. यापूर्वीच्या सर्व वर्गांना बेताचा प्रतिसाद मिळाला. या महिन्यातल्या वर्गाला मात्र चांगला प्रतिसाद मिळाला. एखाद्या विषयाचे महत्त्व आणि उपयुक्तता कळायलाही वेगवेगळ्या लोकांना कमीजास्त वेळ लागतो. वर्ग न योजताही प्रशालेच्या भूतपूर्व प्राचार्यांनी संगणक वापराचे ज्ञान स्वप्रयत्नाने हस्तगत केले. तर नवनगर विद्यालयाचे संपूर्ण कार्यालयच विनाकागदाचे कार्यालय होण्याच्या मार्गावर आहे. या निमित्ताने तेथील कार्यालयातील सदस्यांचीही गुणवत्तावाढच होत आहे. गुणवत्तावाढीसाठी स्वत:ची प्रेरणा खूपच महत्त्वाची असते.
संशोधकांना आपल्या गुणवत्तावाढीसाठी वेगवेगळ्या विषयांवरील परिसंवाद किंवा चर्चासत्रांना उपस्थित राहावे लागते. अध्यापकांनाही स्वत:च्या गुणवत्तावाढीसाठी निबंधलेखन, निबंधवाचन, कृतिसत्रातील सहभाग असे प्रयत्न करावे लागतात. तंत्रज्ञ किंवा व्यवस्थापकांना प्रदर्शनांना भेटी, कृतिसत्रे, अभ्यासवर्ग याकरिता वेळ काढण गुणवत्तावाढीसाठी आवश्यक असते. एखादे कौशल्य शिकल्यावर त्याचा परिणाम कामामध्ये लगेच दिसतो. अध्यापक, संशोधक किंवा व्यवस्थापक यांच्यासाठी सुचविलेले पर्याय मात्र तसे नाहीत. अभ्यासवर्ग किंवा चर्चासत्र झाल्यावर त्यात समजलेला आशय दैनंदिन कामामध्ये कृतीत उतरवावा लागतो. नवीन कृती अंगवळणी पडल्यावरच गुणवत्तावाढ झाली असे म्हणता येते.
स्वत:चा आत्मविश्वास आणि प्रेरणा वाढल्याचा अनुभव ज्या ज्या कामांतून येईल ते सगळे गुणवत्तावाढीसाठीच केलेले प्रयत्न आहेत.
स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी सप्ताहात निगडीला आणि गणेशोत्सवाच्या काळात पुण्याला त्या त्या ठिकाणच्या अध्यापकांनी वर्गातील अध्यापनापेक्षा वेगळी कामे केली. मुद्दाम ठरवून वेगळे अनुभव घेणे यातून गुणवत्तावाढ होते. वापरत असलेल्या कौशल्याचा किंवा तंत्राचा पुढचा टप्पा हस्तगत करण्याने गुणवत्तावाढ होते. स्वत:चा आत्मविश्वास आणि प्रेरणा वाढल्याचा अनुभव ज्या ज्या कामांतून येईल ते सगळे गुणवत्तावाढीसाठीच केलेले प्रयत्न आहेत.
नुकताच मान्यवर कार्यवाहांच्या पुढाकाराने संगीत परिचयाचा एक वर्ग योजण्यात आला. काही विभागप्रमुखही त्या वर्गात सहभागी झाले. वरवर पाहता नित्यकामाशी काहीही संबंध नसलेले असे उपक्रमही वातावरणातील बदलामुळे उत्साहवर्धक ठरू शकतात. परंतु मी याकडे आणखी थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहातो. प्रबोधिनीत आपण प्रतिभा विकसनाला आणि नाविन्याला खूप महत्त्व देतो. कुठलीही गोष्ट वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी वेगळ्या क्षेत्रातले अनुभव, वेगळ्या क्षेत्रातली तंत्रे आणि वेगळ्या क्षेत्रातली भाषा माहीत असेल तर जुन्या गोष्टींकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहाता येते. यातून नवीन सुचते. त्यामुळे संगीत परिचय वर्गाला स्वत:च्या पायांनी चालत जाणे हा गुणवत्तावाढीचाच प्रयत्न आहे.
संघटन प्रभागामध्ये चालणारे सर्वच उपक्रमआपल्यावर इतरांनी गुणवत्तावाढीसाठी चालू असतात. दैनंदिन दलांपासून साप्ताहिक बैठकी, सहली, शिबिरे आणि दौरे या सर्वांतूनच सहभागी विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि उपक्रम योजणाऱ्या मार्गदर्शक व प्रतोदांची गुणवत्तावाढ होत असते.
आपल्यावर इतरांनी सोपवलेली कामे जबाबदारी घेऊन स्वतंत्रणे करता येणे गुणवत्तावाढीमुळेच शक्य होते.
चार-पाच महिने पूर्वतयारी चालू असलेला कार्यकर्ता प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याचा वर्ग दोन आठवड्यांपूर्वी साळुंब्रे येथे पार पडला. काही वेळा गुणवत्तावाढीसाठी असे योजनापूर्वक प्रयत्न करावे लागतात. दोन टप्प्यांमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग यापुढेही चालू राहणार आहेत. साळुंब्रे येथे नुकत्याच झालेल्या वर्गात तेथील विभागप्रमुख पूर्ण वेळ सहभागी झाले होते. वर्गाच्या सर्व तांत्रिक व्यवस्था त्यांनी सहकारी अध्यापकांवर सोपवल्या होत्या. इतरांवर विश्वासाने कामे सोपवता येणे व आपल्यावर इतरांनी सोपविलेली कामे जबाबदारी घेऊन स्वतंत्रपणे करता येणे हे दोन्हीही गुणवत्तावाढीमुळेच शक्य होते.
प्रबोधिनीच्या सर्व विभागांसाठी समान असलेला गुणवत्तावाढीचा प्रयत्न म्हणजे त्या त्या विभागात चालणारी सामूहिक उपासना. कौशल्य शिकण्याचा परिणाम काही दिवसांतच दिसू शकतो, तर सामूहिक उपासनेचा परिणाम काही वर्षांनंतर अनुभवता येतो. गुणवत्तावाढीच्या सर्व प्रयत्नांमध्ये या प्रयत्नांचा आपल्या विभागाला आणि संघटनेला उपयोग होतो आहे ना याकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे असते.