जे काम आपले मानले ते दर वेळी नव्या उत्साहाने, अधिक ताकदीने करणे म्हणजे तपाचे व्यसन लागले.
एका कारखान्यातील कामगार संघटनेने योजलेल्या बक्षीस समारंभाला अध्यक्ष म्हणून गेलो होतो. कामगारांच्या मुलांपैकी जे दहावी, बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांचा सत्कार होता. त्याच वेळी गेल्या वर्षभरात सेवानिवृत्त झालेल्यांचाही सत्कार झाला आणि एका कामगाराचा, त्याच्या पत्नीसह, आदर्श पालक म्हणून सत्कार झाला. जे सेवानिवृत्त झाले त्यांचा वयोवृद्ध म्हणून सत्कार करणे उचितच आहे. ज्यांचा आदर्श पालक म्हणून सत्कार झाला, त्यांंना मी तपोवृद्ध म्हटले. गरीब मुस्लिम घरातून आलेला कामगार, अठराव्या वर्षी कारखान्यात कामाला सुरुवात केली. त्याला पाच अपत्ये. तीन मुली व दोन मुले. सत्कारापूर्वी त्याचा परिचय करून देताना एकेका मुलाचे शिक्षण किती झाले हे निवेदक सांगत होता. पहिल्या मुलीचे दहावीपर्यंत. दुसऱ्या मुलीचे पदवीपर्यंत. तिसरी मुलगी द्विपदवीधर होऊन मुख्याध्यापिका म्हणून काम करत असलेली. पहिला मुलगा डिप्लोमा झालेला. दुसरा इंजिनिअरिंगची शेवटची परीक्षा दिलेला. सर्वांचे शिक्षण उत्तम पार पाडले म्हणून त्याचा सत्कार. हेच त्याचे तप. सत्कारानंतर मी म्हटले की पहिल्यापेक्षा पुढच्या मुलीचे अधिक शिक्षण झाले पाहिजे असे व्यसनच जणू त्याला लागलेले दिसते. साध्या आयुष्यातही आलेली जबाबदारी सर्व शक्तिनिशी झोकून देऊन त्याने पार पाडली. हे तपच झाले. ‘तपविता तपविता तपवावे’ म्हणजे अधिकाधिक तप करत जाणे. जे काम आपले मानले ते दर वेळी नव्या उत्साहाने, अधिक ताकदीने करणे म्हणजे तपाचे व्यसन लागले. जे काम आपले मानले
चाकोरी बनल्यावर यश बेचव होते. त्याचे महत्त्व जाणवेनासे होते आणि यशस्वी होऊनही कण्हणे- कुंथणे चालू होते.
गेल्या महिन्यात निगडी व सोलापूर येथे तिथल्या विद्यार्थ्यांचा शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल कौतुक- समारंभ झाला. दोन्ही ठिकाणी मी तिथल्या अध्यापकांना म्हटले की एकदा निर्णय शंभर टक्के लागायला लागला, विद्यार्थी गुणवत्ता यादीत यायला लागले की त्यानंतर आणखी काय करायचे? आहे ते यश टिकवायचे? की आणखी मिळवायचे? समजा, एखाद्या वर्षी सर्वजण गुणवत्ता यादीत आले. पुढेकाय? समजा, पुण्याच्या प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी सर्व विषयांत ‘अ-1’ श्रेणी मिळवली. पुढे काय? आहे ते यश टिकविण्यासाठी काम करायचे? की ‘तपविता तपविता तपवावे’ म्हणत आणखी काम करायचे? शिक्षकांना तपाचे व्यसन लागले तर असे शिक्षक काय करतील?
आपल्यापैकी प्रत्येकाच्या कामाचा एक ठराविक साचा बनू शकतो. चाकोरी बनू शकते. रक्षणाचे काम असो, परिरक्षणाचे (मेंटेनन्स्चे) काम असो; लेखनाचे, हिशेब ठेवण्याचे, धारिण्या सांभाळण्याचे काम असो; प्रकल्प प्रस्ताव करण्याचे, प्रकल्प राबवण्याचे काम असो, अभिनव उपक्रम करण्याचे काम असो; नवीन विषय शिकवण्याचे, नवीन विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम असो; विविध कौशल्यांचे प्रशिक्षण करण्याचे, औषधे देण्याचे, संशोधन करण्याचे काम असो; प्रत्येक कामाची चाकोरी बनू शकते.
चाकोरी बनल्यावर यश बेचव होते. त्याचे महत्त्व जाणवेनासे होते. आणि यशस्वी होऊनही कण्हणे-कुंथणे चालू होते. चाकोरी बनल्यावर अपयशाची टोचणी जाते आणि अपयशातही ‘आजचा आणखी एक दिवस कसा यशस्वीपणे ढकलला?’ अशी ‘अखेर मीच जकली’ वृत्ती बनते. चाकोरीतून जात राहणे म्हणजे मनुष्याचा दगड बनणे.
चाकोरीतून जात राहणे म्हणजे मनुष्याचा दगड बनणे. चाकोरी मोडणे म्हणजे मनुष्याचे मनुष्यपण टिकून राहाणे.
चाकोरी मोडणे म्हणजे मनुष्याचे मनुष्यपण टिकून राहाणे. एक साचा मोडून दुसरा साचा बनवणे, नवनवीन साचे करत राहाणे म्हणजे आपला प्रवास उत्तमोत्तम मनुष्यपणाकडे चालू राहिला. ‘तपविता तपविता तपवावे’ असे आपले काम चालू असेल तर आपले शरीर तपपुनीत झाल्याचे आपण अनुभवतो का? आपले आरोग्य, आपला उत्साह, आपली कार्यशक्ती वाढते आहे का? तर शरीर तपपुनीत झाले. आपल्याला नवीन सुचते का? बारीकसा जरी नवीन बदल सुचत असेल तरी त्यातून आपल्या प्रतिभेला तपामुळे उजाळा मिळतो आहे हे कळते. आपल्या सहकाऱ्यांसह काम करून आपण अधिक मोठी जबाबदारी स्वीकारतो आहोत का? तर आपले तप चालू आहे. आपण तपाच्या गुणाने ‘मन मना मिळवत’ आहोत. असे तप सर्वांना रोज आपापले काम करतही करता येते