वर्ष लिहिताना फक्त दोनच आकडे लिहायची सवय मुरलेली असल्यामुळे तीस-पस्तीस वर्षांनी या सवयीमुळे अडचण येईल हे कोणाच्या लक्षातही आले नाही.
अमेरिकेत स्थायिक झालेल्या आपल्या एक कार्यकर्त्या अमेरिकेत एका संगणक कंपनीमध्ये ‘वाय टू के’ नावाच्या प्रकल्पात काम करत आहेत. वाय म्हणजे इअर, टू के म्हणजे टू थाउजंड ‘वाय टू के’ म्हणजे इसवी सन दोन हजार. या प्रकल्पाचे स्वरूप गमतीदार आहे. संगणकावर कोणतेही काम सुरू करताना त्या दिवसाची तारीख येते. १९९७ अशी चार आकडी संख्या लिहायच्या ऐवजी आपण फक्त ‘९७’ ही संख्या लिहितो. सर्व संगणकांमध्ये वर्षासाठी दोन आकडी संख्या लिहिण्यासाठी दोन जागा राखून ठेवलेल्या असतात. १९९९ नंतर जेव्हा २००० हे वर्ष सुरू होईल तेव्हा ‘९९’ ऐवजी काय लिहायचे? काहीच लिहिले नाही तर संगणक पुढचे कामच करणार नाहीत. ‘००’ लिहिले तर ते निरर्थक होईल. आणि जो काही बदल करायचा तो आपोआप होणार नाही. सुमारे तीन वर्षांपूर्वी ही अडचण अनेकांच्या लक्षात आली. आता वाढत्या वेगाने या प्रश्नावर उत्तर शोधणे चालू आहे. बदल तर ३१ डिसेंबर १९९९ ला मध्यरात्रीच करावा लागणार आहे. पण त्याची पूर्वतयारी मात्र अनेकांना अनेक वर्षे करावी लागणार आहे.
एवढी साधीशी गोष्ट, पण मोठे संकट होऊन बसू शकते. जेव्हा संगणकाचा वापर सुरू झाला तेव्हाच वर्षाच्या चार अंकी संख्येसाठी चार जागा सोडल्या असत्या तर हा प्रश्नच समोर आला नसता. परंतु वर्ष लिहिताना फक्त दोनच आकडे लिहायची सवय मुरलेली असल्यामुळे तीस-पस्तीस वर्षांनी या सवयीमुळे अडचण येईल हे कोणाच्या लक्षातही आले नाही. आपलीच सवय आणि आपलीच चूक. आपलेच दात आणि आपलेच ओठ. फार गवगवा न करता ही चूक सुधारण्याचे काम शेकडो-हजारो संगणक तज्ज्ञ करत आहेत. रोजच्या व्यवहारातली बारीकशी चूक नंतर इतकी महाग पडू शकते. आज कोट्यवधी डॉलर्स या दोन आकडी वर्षाचे चार आकडी वर्षांमध्ये रूपांतर करण्यासाठी खर्च होत आहेत. आणीबाणी निर्माण झाल्याप्रमाणे अनेक गट या विषयात काम करत आहेत.
व्यवहारात महाग म्हणजे जास्त पैसे एवढेच असते.व्यवहाराऐवजी -अस्मितेचा प्रश्न येतो तिथे महाग म्हणजे स्वतःचे स्वत्वच हळूहळू नाहीसे होणे.
व्यवहारात महाग म्हणजे जास्त पैसे एवढेच असते. पण व्यवहाराऐवजी अस्मितेचा प्रश्न येतो तिथे महाग म्हणजे स्वतःचे स्वत्वच हळूहळू नाहीसे होणे. अशी एक चूक सध्या हळूहळू वाढताना दिसत आहे. भारतीय पद्धतीने हजाराच्यापुढे दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज अशा पद्धतीने आपण संख्या मोजतो. पाश्चात्य पद्धतीप्रमाणे हजारानंतर दशसहस्त्र, शतसहस्त्र, मिलियन, दहा मिलियन, शंभर मिलियन, बिलियन अशा पद्धतीने संख्या मोजतात. भारतीयांच्या इंग्रजी लिहिण्या-बोलण्यात लक्ष, कोटी, अब्जऐवजी प्रथम मिलियन, बिलियनचा प्रवेश झाला. मग आधी इंग्रजीत लिहिलेले मराठी किंवा अन्य भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करताना मिलियन, बिलियन हे शब्द मराठी-हिंदीत आले. आज माझ्या अनेक मित्रांना ‘संगणकात तसेच असते’, ‘वर्तमानपत्रात तसेच येते’, असे म्हणून मिलियन-बिलियन वापरणे सोयीचे वाटू लागले आहे. मग हळूच पन्नास मिलियन म्हणजेच पाच कोटी हे लक्षात येत नाही. ‘त्यापेक्षा पन्नास मिलियनच म्हणायला काय हरकत आहे?’ असा युक्तिवाद सुरू होतो. इतरांची सोय पाहाता पाहाता इतरांचेच सोयीचे वाटणे व आपले गैरसोयीचे वाटायला लागणे म्हणजे संस्कृती कुरतडली जायला सुरुवात झाली हे समजावे.
कुरतडले जाण्याच्या प्रत्येक ठिकाणी संस्कृति-रक्षणाची बचावाची लढाई खेळायची का? या कुरतडण्याकडे दुर्लक्ष करून संस्कृति-वर्धनाची आक्रमक चढाई करायची का?
दूरध्वनी निर्देशिका इंग्रजीत बरी कारण अल्फाबेटिकली शोधता येते. वर्णानुक्रमे आणि बाराखडीनुसार शोधणे किती गैरसोयीचे?’ असे हजारोंना वाटले म्हणून देवनागरीतली निर्देशिका एक वर्ष छापल्यावर नंतर छापलीच गेली नाही. म्हणजे इथेही संस्कृती कुरतडली गेली. प्रबोधिनीतसुद्धा प्रेषण-सूची (मेलिंग लिस्ट) देवनागरीत करण्यापेक्षा रोमन लिपीत करू या हा एका पिढीने संगणकावरची व्यावहारिक सोय म्हणून घेतलेला निर्णय पुढच्या पिढीच्या दृष्टीने आपल्या संस्कृतीपासून दुरावा निर्माण करणारा होऊ शकतो.
भविष्यवेध घेताना बदलांचा मागोवा घ्यावा लागतो. तसेच येऊ घातलेल्या बदलांचा कानोसा घ्यावा लागतो. आपली संस्कृती अशीच अनेक ठिकाणांहून कुरतडली गेली तर ती दिसेनाशी होऊन जाईल. कुरतडले जाण्याच्या प्रत्येक ठिकाणी संस्कृति-रक्षणाची बचावाची लढाई खेळायची का? या कुरतडण्याकडे दुर्लक्ष करून संस्कृति-वर्धनाची आक्रमक चढाई करायची का? आजचे कोणते बदल आपल्याला चालतात, सहन करता येतात हे प्रत्येकाने बघितले पाहिजे. तसेच कोणते सहन करता येणार नाहीत हे देखील निश्चित केले पाहिजे. याही पुढे जाऊन जगाला आपल्या संस्कृतीतले काय स्वीकारावेसे वाटेल हे शोधण्याचा प्रयत्न व ते स्वीकारण्याचा आग्रह आपण करत राहायला पाहिजे.