रामदास, दयानंद, विवेकानंद, अरविंद हे प्रबोधिनीसमोरचे आदर्श राष्ट्रपुरुष. मनात राष्ट्रपुरुषांचे विचार आणि समोर ही परिस्थिती, दोन्हीची सांगड कशी घालायची?
सज्जनगडावर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसमवेत असताना समर्थ रामदासांच्या विचारांची उजळणी मनात झाली. संक्रांतीला युवती विभागाचा एक गट आर्य समाजाच्या शोभायात्रेमध्ये बरच्यांचा खेळ करायला गेला होता. या गटाच्या प्रमुखांना ‘या मिरवणुकीत सहभागी का व्हायचे?’ हे सांगण्याच्या निमित्ताने महर्षी दयानंदांच्या विचारांची उजळणी झाली. साधू वासवानी मिशनच्या सेंट मीराज् कॉलेजमध्ये विवेकानंद जयंतीनिमित्त दीड हजार विद्यार्थिनींना विवेकानंद चरित्र-प्रसंग सांगण्याच्या निमित्ताने विवेकानंद विचारांची उजळणी झाली. रामदास, दयानंद, विवेकानंद, अरविंद हे प्रबोधिनीसमोरचे आदर्श राष्ट्रपुरुष. चौघांपैकी तिघांचे स्मरण वेगवेगळ्या निमित्ताने झाले.
त्यांच्या विचारांची उजळणी चालू असतानाच व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे रिमांड होममधील विद्यार्थ्यांसाठी चालवलेल्या संगणक वर्गाच्या प्रमाणपत्र वितरणासाठी जाण्याचा योग आला. मांगदरी येथे नेत्रतंत्रज्ञ वर्गातर्फे नेत्र शिबिराच्या उद्घाटनासाठी गेलो होतो. उद्घाटनानंतर परिसरातील गावांमध्ये वृद्ध गावकरी मिळेल त्या वाहनाने, नाहीतर कोणाच्यातरी सोबतीने काठी टेकत, नेत्रशिबिराच्या ठिकाणी चाललेले पाहात होतो. सोलापूरला साखरशाळेला भेट दिली तेव्हा कार्यक्रमानंतर वाटल्या जाणाऱ्या तिळगुळाच्या आशेने थांबून राहिलेली मुले आणि त्यांच्या आया पाहिल्या. मनात राष्ट्रपुरुषांचे विचार आणि समोर ही परिस्थिती, दोन्हीची सांगड कशी घालायची?
खरे तर क्षुधाजागृती आणि क्षुधाशांती वेगळी करावी लागत नाही. कामाने क्षुधाजागृती होते व त्यानंतर पोटभर जेवल्याने क्षुधाशांती होते. वेगळे औपचारिक पदार्थ लागत नाहीत.
योगायोगाने निगडीला दीक्षाग्रहण उपासनेनंतर झालेल्या सभेत या पेचाची किल्ली याच महिन्यात हाताला लागली. अलीकडे स्वतःच हाताने वाढून घेण्याच्या इच्छाभोजनाचे प्रसंग वाढले आहेत. सोय म्हणून किंवा अनुकरण म्हणून अशा इच्छाभोजनाच्या वेळी बऱ्याच ठिकाणी आधी क्षुधा जागृतीसाठी काही पेय (appetizer) असते. जेवणाच्या शेवटी क्षुधाशांतीचा उपचार म्हणून काही गोड पदार्थ (dessert) असतो. भरपूर अंगमेहनत करून जेवल्यावर खरे तर क्षुधाजागृती आणि क्षुधाशांती वेगळी करावी लागत नाही. कामाने क्षुधाजागृती होते व त्यानंतर पोटभर जेवल्याने क्षुधाशांती होते. वेगळे औपचारिक पदार्थ लागत नाहीत. पण समारंभात या वेगळ्या पदार्थांची रूढी पडत चालली आहे.
निगडीला दीक्षाग्रहण कार्यक्रमानंतर लगेचच्या सभेत जेवणातल्या दुसऱ्या एका रूढीसंबंधी ऐकायला मिळाले. जेवणापूर्वी पळीभर पाणी हातावर घेऊन ‘अमृतोपस्तरणमसि’ असे म्हणून प्यायचे. अर्थ असा की या अमृताचे अस्तर खाली पसरतो. जेवण झाल्यावर पुन्हा पळीभर पाणी हातात घेऊन ‘अमृतापिधानमसि’ असे म्हणून ते प्यायचे. अर्थ असा की मी अमृताचे झाकण वर घालतो. खाली अमृत, वर अमृत, मधल्या जेवणाचे अमृत व्हावे ही कल्पना. appetizer आणि dessert काय किंवा अमृताचे अस्तर आणि झाकण काय दोन्ही कल्पनाच.
शरीरश्रम करून भूक जागृत करा. मिळेल त्या साध्या आणि पौष्टिक अन्नाने भूक भागवा. हे खरे तर सगळ्यांसाठीचे व्यावहारिक उत्तर. त्याला कल्पना जोडायचीच झाली तर कृत्रिमरीत्या क्षुधाजागृती करतो आहोत व क्षुधाशांती करतो आहोत असे म्हणण्यापेक्षा जेवणाचे अमृत करतो आहोत ही कल्पना निश्चितच मनुष्यत्वाला अधिक उंचावर नेणारी. सर्व राष्ट्रसंतांचा विचार असाच मनुष्यत्वाला उंचावर नेणारा आहे. ‘प्रत्येकाने मंत्रद्रष्टा ऋषी झाले पाहिजे’ हा विचार प्रबोधिनीसमोरचे आदर्श राष्ट्रपुरुष सांगतात. व्यावहारिक प्रश्न भौतिक ज्ञानाने सोडवा, पण तिथेच थांबू नका. मंत्रद्रष्टा ऋषी होणे हा श्रेष्ठ मनुष्यत्वाचा भारतीय आदर्श आहे. व्यावहारिक कामे करताना आम्ही तो आदर्श इतरांना सांगू शकत नसलो तर ती आमची मर्यादा आहे. आपल्या मर्यादेमुळे आदर्श खाली खेचू नये. शिक्षण, आरोग्य, रोजगाराचे प्रश्न सोडवत असलो तरी माणूसपण उंचावर नेण्याचाच आपला आदर्श आहे.
जेवणाचे अमृत करतो आहोत ही कल्पना निश्चितच मनुष्यत्वाला अधिक उंचावर नेणारी. सर्व राष्ट्रसंतांचा विचार असाच मनुष्यत्वाला उंचावर नेणारा आहे.