वरवर जाणे हा वाफेचा गुणधर्म आहे. खाली वाहात जाणे हा पाण्याचा गुणधर्म आहे. आहे तिथेच स्थिर राहणे हा बर्फाचा गुणधर्म आहे.
एक ग्लास पाण्याचे निमित्त
उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा एक दृश्य बघायला मिळते. थंडगार सावली असलेल्या खोलीमध्ये टेबलावर एक स्टीलचा ग्लास ठेवलेला आहे. ग्लास काठोकाठ बर्फाच्या खड्यांनी भरलेला आहे. हळूहळू बर्फ वितळून त्याचे थोडे पाणीही झाले आहे. त्या पाण्यावरती उरलेला बर्फ तरंगतो आहे. बर्फाचे पाणी होते आहे तसेच बाहेरून स्वच्छ कोरडा असलेला स्टीलचा ग्लास धुरकट दिसू लागला आहे. त्यावर मग पाण्याचे छोटे छोटे थेंब दिसायला लागले आहेत. आणखी बारकाईने ग्लासकडे पाहिल्यावर थंड ग्लासच्या बाजूने आणि लगेच वरती पाण्याच्या वाफेच्या रेषाही दिसतात. रेषा वरती वरती चढत असतात. ग्लासच्या बाहेरून साठलेले काही काही थेंब खाली ओघळू लागतात आणि बर्फ मात्र तसाच तरंगत राहतो. वरवर जाणे हा वाफेचा गुणधर्म आहे. खाली वाहात जाणे हा पाण्याचा गुणधर्म आहे. आहे तिथेच स्थिर राहणे हा बर्फाचा गुणधर्म आहे. ग्लासमध्ये बर्फ ठेवल्यामुळेच स्टीलच्या ग्लासभोवती पाणी आणि वरती जाणारी वाफ दिसायला लागते. वेगवेगळ्या स्थितीमध्ये पाण्याचे वेगवेगळे गुणधर्म दिसतात. पाणी तेच पण कधी जागेवर थांबते. कधी खाली वाहात जाते तर कधी वर जाते. एकाच वेळी या तिन्ही स्थिती आणि त्यांचे गुणधर्म बघायला मिळतात.
कला क्षेत्रातील एक वाद
कलाकारांची चरित्रे व आत्मचरित्रे आणि कलाकृतींची व कलाकारांच्या आयुष्याची समीक्षा यामध्ये गेली शे-दोनशे वर्षे तरी एक वाद चाललेला दिसतो. एखादी कलाकृती केवळ कलाकाराच्या आनंदासाठी कलेसाठी कला म्हणून निर्माण झाली की त्या कलाकृतीचा समाजाला काही उपयोग आहे? असा तो वाद असतो. कलेचा उपयोग देवभक्तीसाठी. देशभक्तीसाठी किंवा समाज प्रबोधनासाठी करायचा की निव्वळ कलेसाठी कला असते? एखाद्याने या कशाचाही विचार न करता केवळ उपजीविकेसाठी आपल्या कलेचा उपयोग केला तर? वादग्रस्त चित्रकार एम्. एफ्. हुसेन यांच्या आयुष्यात सुरुवातीच्या काळात पोट भरण्यासाठी कलेचा उपयोग आणि नंतर केवळ कलेसाठी कला असे टप्पे दिसतात. समाजाच्या उपयोगाचे नाही तर नाही पण समाजाला दुखवणाऱ्या काही कलाकृती त्यांनी केल्या म्हणून तर त्यांच्याविरुद्ध एक वादळ मध्यंतरी उठले. पाणी जसे वेगवेगळ्या स्थितीमध्ये वेगवेगळे गुणधर्म दाखवते तसेच कलेच्या बाबतीत शक्य असेल का? कलेसाठी कला म्हणणारे पाण्याच्या वाफेसारखे वर जाणारे. तर समाजाच्या उपयोगासाठी कला म्हणणारे पाण्याप्रमाणे खाली जाणारे. जिथे अभाव असेल त्याची पूर्तता करणारे आणि उपजीविकेसाठी कला म्हणजे बर्फासारखे जागेवर थांबून राहाणारे.
कलेसाठी कला म्हणणारे पाण्याच्या वाफेसारखे वर जाणारे. तर समाजाच्या उपयोगासाठी कला म्हणणारे पाण्याप्रमाणे खाली जाणारे.
विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रत्यक्ष अनुभव
कला क्षेत्रातील वाद मी केवळ ऐकला, वाचला आहे. अधिक अधिकाराने मी संशोधन क्षेत्राबद्दल बोलू शकेन. मूलभूत विज्ञानातले बरेचसे शोध त्यांचा उपयोग काय होईल याची काहीही कल्पना नसताना लागत असतात. संशोधकांची जिज्ञासा, कुतूहल, उत्सुकता शमविण्यासाठी, त्यांनी केलेल्या विचारातून आणि प्रयोगातून नवे शोध लागत असतात. ते केवळ संशोधनासाठी संशोधन आहे. वाफेप्रमाणे वर जाणारे. विद्युत जनित्राचा (जनरेटर) आणि विद्युत-चलित्राचा (मोटर) शोध विजेच्या गुणधर्माविषयीच्या जिज्ञासेतून लागला. त्या संशोधनाचा समाजाला लगेच उपयोग नव्हता. समाजाला उपयोग होण्यासाठी, गरजा ओळखून गरजांची पूर्ती करण्यासाठी, पाण्याप्रमाणे उताराकडे धाव घेणारे संशोधन हवे. विजेच्या दिव्याचा शोध लावणाऱ्या एडिसनसारख्यांचे संशोधन अशा प्रकारचे आहे. आज विजेच्या उपकरणांच्या कारखान्यांमध्ये काम करणारे अनेक तंत्रज्ञ उपजीविकेसाठी संशोधन करत असतात. ते बर्फासारखे स्थिती टिकवून असतात.
संशोधनाचे हे तिन्ही प्रकार एकमेकांवर अवलंबून आहेत. एकाशिवाय बाकीचे दोन्ही टिकायचे नाहीत. सोयीसाठी एकेका प्रकारावर भर देता येतो. आपापल्या स्वभावानुसार शास्त्रज्ञ-संशोधक एकेका प्रकारची निवड करत असतात. काहीजण एकाच प्रकारचे संशोधन करण्यात यशस्वी होतात. तर काहीजण सर्व प्रकारचे संशोधन करतात. फक्त वाफ, फक्त पाणी, फक्त बर्फ यांची कल्पना करता येत नाही. तसेच एकाच प्रकारच्या संशोधनाची कल्पना शक्य नाही.
फक्त वाफ, फक्त पाणी, फक्त बर्फ यांची कल्पना करता येत नाही. तसेच एकाच प्रकारच्या संशोधनाची कल्पना शक्य नाही.
प्रबोधिनीचे काम पाण्यासारखे आहे
‘वाढता वाढता वाढे’ अशा पद्धतीचा उद्योग करावा, असा व्यापार करावा, असा व्यासंग करावा, असे विकासाचे प्रकल्प करावेत, अशी इच्छा आणि क्षमता अनेकांची असते. या सर्व प्रकारच्या कामांचा लगेच दिसला नाही तरी कालांतराने उपयोग होतोच होतो. परंतु प्रबोधिनीमध्ये मात्र अशा लोकांना वृळवण्यासाठी ‘ततः किम्?’ असा प्रश्न आपण विचारत असतो. ‘आधी चालू जीवनमानाप्रमाणे जगता येईल अशी व्यवस्था करू’ आधी आपली व आपल्या कुटुंबियांची थोडीशी भविष्याची तरतूद करून ठेवू.’ असे म्हणणारेही अनेक कर्तबगार स्त्री-पुरुष सापडतील. अशांना वळवण्यासाठीही ‘ततः किम् ?’ हा प्रश्न आपण विचारत असतो. सगळ्या वाफेचे पाणी होत नाही. सगळा बर्फ पाणी होत नाही. पण अभावाचे खड्डे भरून काढण्यासाठी जास्तीतजास्त पाणी तर हवे आहे. ‘कर्तृत्वासाठी कर्तृत्व’ म्हणणाऱ्यांना म्हटले पाहिजे, ‘जरा स्वतःचा स्वभाव काय आहे तो निरखून पहा. पाणी म्हणून जगता येणार असेल तर वाफ बनून राहू नका’. ‘उपजीविकेसाठी कर्तृत्व’ म्हणणाऱ्यांनाही म्हटले पाहिजे ‘तुम्हीही स्वतःचा शोध घ्या. वाहाण्याची भीती वाटत नसेल तर कुटुंबाच्या चौकटीत कर्तृत्व गोठवून टाकू नका’ जगायचेही आहे. कर्तृत्वही दाखवायचे आहे. पण ‘दो तीरांना फुलवित फळवित’ वाहात जाता आले तर तसे जगा हेच ‘ततः किम् ?’ प्रश्न विचारून सुचवायचे आहे. आपला स्वभाव आणि समाजाची गरज यातून आपला स्वधर्म ठरत असतो. आपला स्वभाव पाण्याचा असेल आणि चुकून बर्फात अडकलो असलो किंवा वाफेबरोबर ढगात सापडलो असलो तर मोकळे होऊन समाजातील प्रश्नांना स्वार्थनिरपेक्ष भिडणे हा स्वधर्म आहे. स्वभावाला थोडी मुरड घालता येत असेल तर समाजाची गरज म्हणून वाफेने आणि बर्फाने पाणी बनणे हा स्वधर्म आहे. भारतीय तत्त्वज्ञान सांगते की स्वधर्माप्रमाणे जगण्यात उत्तमता आहे. वाफेशी आणि बर्फाशी भांडण न करता आपल्या सहवासाने त्यांनाही पाणी बनवून वाहाते करता येईल या विश्वासाने प्रबोधिनीचे काम करायचे आहे.
स्वभावाला थोडी मुरड घालता येत असेल तर समाजाची गरज म्हणून वाफेने आणि बर्फाने पाणी बनणे हा स्वधर्म आहे.