बांधिलकीच्या फुलाचा क्रम-विकास

जगात अनेक गोष्टी, वस्तू, ठिकाणे, माणसे आहेत किंवा नाहीत याचे आपल्याला भानही नसते. आपल्याला भूतकाळाची आणि पृथ्वीवरील जितक्या जागांची जी काही जाणीव असते, ती काही वस्तू, प्रसंग, घटना, व्यक्ती यांच्यामुळे, असते. अनेकांचा ओझरता उल्लेख ऐकलेला किंवा पाहिलेला असतो. ते आपल्याला आठवतेच असे नाही. दूरदर्शनवर वेगवेगळ्या वाहिन्यांच्या कार्यक्रमात चांदीची नाणी वाटायचा एक कार्यक्रम असतो. सूत्रधार गावोगाव भटकत लोकांना साधे-साधे प्रश्न विचारत असतो. तीन बरोबर उत्तरे दिली की चांदीचे नाणे बक्षीस. पण सुशिक्षित, प्रशिक्षित, अशिक्षित यांपैकी कोणालाच पटकन उत्तरे देता येत नाहीत. पुन्हा पाहिल्यावर किंवा ऐकल्यावर पूर्वी पाहिल्याचे, ऐकल्याचे आठवते त्याला म्हणायचे जाणीव. बाकी सर्व नेणीव.

जे आपल्या जाणिवेत आहे, ते कोणी मदत न करता, पाहिजे तेव्हा आठवले तर, ती जाणीव जिवंत आहे असे म्हणतात. जे ऐकले-पाहिले -अनुभवले त्याचा स्पष्ट ठसा जाणिवेत उमटला व इतरांशी त्याची सांगड घातली की जाणिवेचे स्मृतीत रूपांतर झाले. खूप लहानपणच्या स्मृती म्हातारपणी जाग्या होतात. उलट तारुण्यात आणि कार्यक्षम प्रौढ आयुष्यात, त्या त्या वेळी महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी, तत्पर स्मृतीत म्हणजे, सतत डोळ्यासमोर किंवा जिभेच्या टोकावर असतात.

परीक्षेच्या आधी अभ्यास पूर्ण झाल्यावर सर्व अभ्यासक्रम डोळ्यांसमोर, जिभेच्या टोकावर आणि हाताच्या बोटावर असतो. बाजारभाव, क्रिकेट सामन्यांची आकडेवारी, चित्रपटातील गाणी गायक-चाली, खाद्यपदार्थ बनवण्याच्या पाक-कृती, गावोगावच्या मित्रमंडळींचे दूरभाष क्रमांक, गड-किल्ल्यांवरच्या पदभ्रमणाच्या मार्गावरील खाणा-खुणा, कोणी कोणत्या वेळी कोणते कपडे व दागिने घातले होते, वेगवेगळ्या मैफिलींमध्ये कोणी कोणते राग वाजवले वा गायले, असे अनेक विषय, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार, कामानुसार, रिकाम्या वेळेनुसार, त्यांच्या- त्यांच्या तत्पर स्मृतीत असतात.

ज्या वस्तूंशी, जागांशी, माणसांशी आपला काही संबंध निर्माण झालेला असतो, त्यांच्या आठवणी आपल्या जिवंत जाणिवेत असतात. पुन्हा पुन्हा त्या आठवणी वापरून, सांगून, मनात घोळवून त्यांचे मनातले ठसे पक्के होत जातात. आवडत्या गोष्टीचे पुन्हा पुन्हा स्मरण करण्याने, तिच्या बरोबरचे आपले नाते घट्ट होत जाते.

वस्तू, स्थळे, झाडे, पाळीव प्राणी यांच्याबरोबरचे नाते, त्यांच्या आठवणीने मनाला शांती, सुरक्षितता, समाधान देते. व्यक्तींबरोबरचे नाते हे सर्व तर देतेच, परंतु त्याबरोबर प्रेरणा, उत्साह, आनंदही देते. व्यक्तींबरोबरचे नाते वाढवण्यासाठी-फुलवण्यासाठी देवाण-घेवाण करावी लागते. सहवासाचे आणि सहकार्याचे क्षण वेचावे लागतात. केवळ आपण ते नाते मानतो म्हणून त्यांच्यासाठी आपण निरपेक्षपणे वेळ देतो, काम करतो. म्हणून त्या नात्याची मुळे आपल्या मनात आणखी खोल जातात. आपल्या निरपेक्ष काम करण्याने नाते फुलायला लागले, की त्याच नात्याला आपण ‘बांधिलकी’ म्हणायला लागतो.

कौटुंबिक नात्यांची बांधिलकी सगळ्यात आधी अनुभवायला येते. सगळ्यात आधी निर्माण होते आई-मूल, पती-पत्नी, बहीण-भाऊ, आजी-आजोबा आणि नातवंडे, सासू-सासरे आणि सून यांच्यातील बांधिलकी अलीकडच्या छोट्या कुटुंबांमुळे सासू-सासरे आणि जावई अशी सुद्धा बांधिलकी बघायला मिळते. मात्र रक्ताचे नाते किंवा विवाह-बंधनाचे नाते असले म्हणजे बांधिलकी निर्माण होतेच असे नाही. उत्स्फूर्तता, निरपेक्षता आणि काळ यातून बांधिलकी निर्माण होते. आपल्याला स्वस्थ बसता येत नाही, राहवत नाही, म्हणून आपण ज्यांच्याशी नाते आहे त्यांच्यासाठी काहीतरी करतो, तेव्हा ही बांधिलकी व्यक्त होते. कोणी पूर्वी किती व काय दिले किंवा केले हे लक्षात ठेवून आपण काय द्यायचे किंवा करायचे हे ठरविणे ही व्यावहारिक सोय आहे. त्यांना नातेवाईकांमधले व्यावहारिक संबंध म्हणता येईल. पण ती बांधिलकी नव्हे. नातेवाईकांच्या व्यावहारिक परस्पर प्रतिसादाने नाते-संबंधांमधले फक्त ताण कमी होतील. बांधिलकी मात्र उत्स्फूर्त, निरपेक्ष कृतीने सुरू होते, वाढते आणि टिकते.

नातेवाईकांप्रमाणेच मैत्रीच्या संबंधांमध्येही बांधिलकी निर्माण होते. व्यक्तींचीही आपल्याला माहिती असते, तोंड ओळख असते, नमस्कारापुरता परिचय असतो किंवा त्यांच्याबरोबर कामामध्ये सहकारी म्हणून आपण काम करत असतो. ओळखीच्या, शेजारच्या, बैठककीतल्या, मंडळातल्या, कामाच्या ठिकाणच्या, रोज एकत्र फिरायला जाणाऱ्या, एकत्र व्यायाम करणाऱ्या, एकत्र खेळणाऱ्या, छंदामुळे एकत्र आलेल्या अशा काहींशी मैत्रीचे धागे जुळतात. काहींशी स्नेह-संबंध टिकून राहतात, काहींना आपण हक्काने मदतीला बोलावतो. काहींनी हाक मारली नाही तरी आपण त्यांना मदतीला धावतो. ज्यांच्यासाठी आपण धावून जातो त्यांच्याशी आपली बांधिलकी आणि दुसऱ्या बाजूने केवळ स्नेहसंबंध अशी मैत्री असू शकते. दोन्ही बाजूंनी बांधिलकी असणाऱ्या मैत्रीची गोडी विशेषच असते.

एखाद्या गटामध्ये अनेकांची एकमेकांशी बांधिलकी निर्माण होते. गटातल्या सहभागी व्यक्ती कमी-जास्त होतात. अशी ये-जा चालू असली तरी ज्या गटाने मिळून एकत्र कार्यक्रम करतो आहोत त्या गटातील सर्वांशी – ते त्या गटाचे आहेत म्हणूनही बांधिलकी निर्माण होते. ‘मेन्सा’ नावाच्या एका आंतरराष्ट्रीय संघटनेशी संबंध आला होता. प्रत्येक देशात, आणि त्या-त्या देशातील ज्या गावात ‘मेन्सा’ची शाखा आहे तिथे ‘साइट कोऑर्डिनेटर’ म्हणून एक पद असते. कोणत्याही गावातला किंवा देशातला मेन्साचा सदस्य एखाद्या नवीन गावी गेला, तर त्या नवीन गावी त्याची राहण्याची व्यवस्था तिथला साइट कोऑर्डिनेटर कोणा तरी मेन्सा सदस्याच्या घरी करतो. येणारा पाहुणा केवळ मेन्साचा सदस्य आहे म्हणून ही सेवा. हीच गटाची बांधिलकी. इथे त्याचा औपचारिक अवतार बघायला मिळतो. ‘छात्र प्रबोधन’ मासिकाच्या तपपूर्ती मेळाव्यासाठी पुण्यात आलेल्या पंधराशे जणांची घरोघर राहाण्याची व्यवस्था झाली ती ते ‘छात्र प्रबोधन’ च्या कार्यक्रमाला आले म्हणून. ही देखील गटाशी असलेली बांधिलकीच, पण अनौपचारिक. साऱ्या भारतभर तीर्थयात्रा करणाऱ्यांना पूर्वी कोणत्याही गावात अतिथी म्हणून आश्रय मिळायचा तो ही ‘देश’ या मोठ्या गटाशी बांधिलकीचाच एक आविष्कार. त्याला आपण अतिथीधर्म म्हणतो.

बांधिलकीमध्ये आपणहून निरपेक्षपणे काम करणे येते. अशी अनेक कामे अनेक जण करत आले आहेत. त्या कामांचे प्रकारही वर्षानुवर्षे अनेकांच्या काम करण्याने निश्चित होत गेलेले आहेत. अशा कामांनाच आपण ‘कर्तव्य’ म्हणतो. आधी संबंध, मग नाते, मग बांधिलकी आणि त्यातून कर्तव्य आले तर कर्तव्य पार पाडत असताना आनंद वाटतो. नुसताच संबंध किंवा नाते म्हणून कर्तव्य पार पाडावे लागले आणि बांधिलकी नसेल तर ते कर्तव्य बोचायला लागते.

व्यक्तीशी आणि गटाशी जशी बांधिलकी असते तशीच आपली दिनक्रमातील अनेक क्रियांशी बांधिलकी निर्माण होते. सकाळचा चहा, दुपारची वामकुक्षी, रात्रीची शतपावली, उपवासाचे दिवस, सुट्टीच्या दिवसाचा कार्यक्रम, रोज ठराविक वेळी कुठेतरी भेटणे, देवपूजा, दूरदर्शनवरचा पाहायचा धारावाहिक कार्यक्रम; अशा अनेक कृतींशी आपली बांधिलकी निर्माण होते. या बांधिलकीला नेम, व्रत, सवय, नाद किंवा व्यसन म्हणतात. कोणत्या सवयींशी बांधिलकी निर्माण करायची आणि वाढवायची हे आपणच ठरवावे लागते.

व्यक्तिगत दिनक्रमात काही कार्यक्रम तयार होऊन आपण त्याला चिकटून किंवा पकडून राहतो. वेगवेगळ्या व्यक्तींबरोबरची नाती दृढ राहण्यासाठी त्यांच्याबरोबर करावयाच्या गोष्टींच्या कार्यक्रमांशी असलेली बांधिलकी साहाय्यक ठरते. रोज एकत्र वर्तमानपत्र वाचणे, एकदा तरी एकत्र चहा घेणे, घरातील सर्वांनी एकत्र जेवणे, आठवड्यातून एकदा घरी सर्वांनी आरतीला एकत्र जमणे, रविवारी एकत्र घर आवरणे, भाजी खरेदीला जाणे असे अनेक कार्यक्रम व्यक्तिगत नाती दृढ करतात. बांधिलकी वाढायला, बांधिलकीतून उमलणारी कर्तव्ये स्पष्ट व्हायला असे कार्यक्रम उपयोगी पडतात.

कुटुंब आणि नातेवाईकांप्रमाणेच स्थिर गटांचे अस्तित्व देखील अशा कार्यक्रमांवर अवलंबून असते. गटातील सदस्यांचे परस्परांशी आणि गटाशी संबंध दृढ व्हायला, त्यांनाही काही समान कार्यक्रम लागतो. माझ्या माहितीचा सहा जणांचा एक गट, गेली पस्तीस वर्षे, दर रविवारी एका कोपऱ्यावर जमून, तिथे पंधरा मिनिटे गप्पा मारून, मग दुसऱ्या कोपऱ्यावरच्या हॉटेलात, मिसळ खायला जातो. त्यांचा हा गट स्थिर आहे. सदस्य बदलत नाहीत, वाढतही नाहीत. त्यांना एकमेकांना आधार देणे व आनंद देणे एवढेच करायचे आहे. पण अनेक गटांना वाढायचे असते, काही परिवर्तन स्वतःच्या सदस्यांमध्ये करून दाखवायचे असते. काही परिवर्तन आजूबाजूच्या इतर लोकांमध्ये करायचे असते.

संगीत व नृत्याच्या बहुतेक वर्गांमधून वार्षिक गुरुपौर्णिमेचा उत्सव होतो. सर्व जुन्या तालमींमधून शनिवारी मारुतीची पूजा होते. रोटरी व लायन्स क्लबचे भेटण्याचे वार व वेळा ठरलेल्या असतात, व प्रत्येक बैठक कशी पार पाडायची, याची बारीक सारीक सूचनांसह आचार संहिता ठरलेली असते. कीर्तनात बुवांना हार कधी घालायचा व सर्वांना बुक्का कधी लावायचा हे ठरलेले असते. व्यक्तीला लागलेल्या सवयींप्रमाणेच समूहाच्या कार्यक्रमातील प्रथा- परंपरा गटाची ओळख तयार करत असतात. किंबहुना गटातील सदस्य व गटाच्या आचाराच्या निश्चित पद्धती हे दोन्ही मिळून ‘गट’ बनत असतो. गटाशी बांधिलकी म्हणजे सदस्यांशी व आचारसंहितेशी अशी दोन्हीशी बांधिलकी.

गट जेवढा मोठा तितकी गटातील सदस्यांची आवक जावक जास्त असते. त्यामुळे ‘सदस्यांशी बांधिलकी’ पेक्षा ‘आचारसंहितेशी बांधिलकी’ हीच व्यक्तीच्या बाबतीत जास्त टिकाऊ बनते. ती दीर्घकाळ टिकते. दीर्घकाळ टिकणाऱ्या आचारसंहितेच्या बांधिलकीलाच ‘आचारनिष्ठा’ म्हणतात. इंग्रज लोकांची बारीक सारीक परंपरा पाळण्याची पद्धत म्हणजेही ‘इंग्रज राष्ट्र’ ह्या गटाची आचारनिष्ठाच. गटामध्ये, मंडळामध्ये, संघटनेमध्ये किंवा राष्ट्रामध्ये आचारनिष्ठा ही व्यक्तीचे त्या समूहातील सदस्यत्व सांगणारी ओळख बनते. ही बांधिलकी उत्स्फूर्त असेल तर उपयुक्त. दडपणातून आली तर ती व्यक्तीचा विकास खुंटवते आणि गटाचे आयुष्य आणि उपयुक्तता यांना घातक ठरते.

आचारनिष्ठा म्हणजे कृतीशी बांधिलकी. यालाच कर्मकांड, कर्मठपणा, कट्टरता असे कमी अधिक तीव्रतेचे शब्द वापरतात. परंतु हे सर्व शब्द भूतकाळ सांभाळणारे व वर्तमानाला भूतकाळाशी जोडणारे आहेत. ह्यामुळे व्यक्ती चाकोरीतून जात राहते. अस्तित्व टिकवून ठेवणे हेच ज्या गटांचे उद्दिष्ट असते तिथे ते ठीक आहे. पण ज्या गटांना आपल्या सदस्यांमध्ये व समाजामध्ये बदल काही घडवायचे आहेत त्यांच्या सदस्यांची बांधिलकी-गटाचे सदस्य व गटाची आचारसंहिता याबरोबरच गटाच्या उद्दिष्टांशी असायला लागते. गटाचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी ज्या ज्या योजना, कल्पना आणि संकल्प पुढच्या काळात प्रत्यक्षात यायला पाहिजेत त्या सर्व प्रत्यक्षात येण्याशी बांधिलकी म्हणजे कार्यनिष्ठा.

आचारनिष्ठा ही भूतकाळाला वर्तमानाशी जोडते तर कार्यनिष्ठा वर्तमानातून अपेक्षित भविष्य घडवते. प्रतिकूल परिस्थिती आली, अडचणी आल्या तरी उद्दिष्टाशी इमान राखत काम पुढे रेटत नेणे म्हणजे कार्यनिष्ठा. सामना जिंकण्यासाठी संपेपर्यंत खेळणे ही ‘कार्यनिष्ठा’, एक सामना हरला तरी मालिका जिंकण्यासाठी पुढचे सामने खेळणे ही सुद्धा कार्यनिष्ठा. आणि निम्म्यापेक्षा जास्त सामने जिंकले तरी, शेवटच्या सामन्यापर्यंत जिंकण्यासाठीच खेळणे ही सुद्धा कार्यनिष्ठा. कारण खेळाच्या सर्व अंगामध्ये आपले निर्विवाद प्रभुत्व प्रस्थापित करणे, हे सामना मालिकेचे उद्दिष्ट ठरलेले आहे.

कार्यनिष्ठा ही एक मोठी शक्ती आहे. आपल्या कुटुंबाला घेऊन स्थलांतर करणारा कुटुंब प्रमुख, कुटुंब जगवायच्या उद्देशाने नव्या ठिकाणी नवा संसार मांडत असतो. त्या उद्दिष्टासाठी जे जे नवे काम करायला लागेल, ते तो करत असतो. ती त्याची कार्यनिष्ठाच असते. संबंध राष्ट्राच्या प्रपंचाचा विचार करणारी मंडळीही त्यांच्या कार्यनिष्ठेमुळेच आपले काम करत असतात.

काही गोष्टींची जाणीव, त्यांचे स्मरण, त्यांच्याशी संबंध, त्यातून नाती स्थापन होणं, त्यातून व्यक्ती, गट आणि आचाराशी बांधिलकी; त्यातून कार्यनिष्ठा, ही सगळी आपल्या मूळच्या जाणिवेचीच विकसित होत जाणारी रूपे आहेत. नव्हे-त्या एकामागून एक उमलत जाणाऱ्या पाकळ्या आहेत. आधीच्या सर्व पाकळ्या न गळता नवीन पाकळ्या उमलत जातात, व सर्व पाकळ्यांनी फूल बनते हे कायम लक्षात ठेवावे लागते.

भारताच्या सर्व पंचवार्षिक योजनांची उद्दिष्टे पाहिली की त्या उद्दिष्टांचीही एक सलग साखळी दिसते. नक्की यश मिळेल असेच उद्दिष्ट आपण ठरवतो. ते प्रयत्नसाध्य वाटत असल्यानेच आपण धडपड करून ते गाठतो. प्रत्येक उद्दिष्ट गाठल्यावर पुढे अनेक दिशांनी जाणे शक्य आहे असे वाटते. त्यातले कोणते उद्दिष्ट निवडायचे हे ठरते, ते आपल्याला कोणत्या दिशेने जायचे आहे यावर ! प्रत्येक दिशेचा जो क्षितिजावर दिसणारा बिंदू असतो त्याला ध्येय म्हणतात. व्यक्तीला, गटाला, मोठ्या संघटनेला आणि देशालाही ध्येय असते. काही जण फक्त पुढच्या उद्दिष्टांकडे बघतात. क्षिजिताकडे पाहात नाहीत. जे क्षिजिताकडे पाहतात आणि त्यांची त्या ध्येयाशीही बांधिलकी निर्माण होते. तिलाच ध्येयनिष्ठा असेही म्हणतात.

आपल्याबरोबरचे सगळे आपल्याबरोबर राहिले पाहिजेत ही व्यक्तीशी किंवा गटाशी बांधिलकी. मागच्या पावलाप्रमाणेच आपले पुढचे पाऊल पडले पाहिजे ही आचारनिष्ठा. पुढचा मुक्काम गाठायचा म्हणून पुढे जाणे ही कार्यनिष्ठा. क्षितिजावरील ध्येयापर्यंतच्या वाटेतल्या सगळ्या उद्दिष्टांची सतत मनात उजळणी करत राहणे ही ध्येयनिष्ठा.

प्रत्येक उद्दिष्ट गाठल्यावर क्षितिज पुढे सरकते. त्याबरोबर ध्येयबिंदूपर्यंतचे आणखी एक उद्दिष्ट दिसायला लागते. ध्येयाचा अर्थ आपल्या मनातच अधिक स्पष्ट होतो. ज्यांनी हा प्रवास शेवटापर्यंत नेटाने केला त्यांच्या लक्षात असे आले की आपल्या आत, जे आपल्या असण्याचे कारण ‘आपले मूलतत्त्व’ आहे, त्याचेच अस्पष्ट प्रतिबिंब आपल्याला क्षिजितावर दिसत असते. हे अनेकवार लक्षात आल्यावर टाचा उंचावून, मान वर करून, कपाळावर हात आडवा ठेवून क्षितिजाकडे बघायचे कारण राहात नाही. आपल्या अस्तित्वाचे जे कारण त्या तत्त्वाशी बांधिलकी म्हणजेच तत्त्वनिष्ठा. हीच आपल्या सगळ्या वागण्याला आकार देणारी बनते.

सत्यम्, शिवम्, सुंदरम् हे सर्व ध्येयांचे सार आहे असे ध्येयनिष्ठ लोक सांगातात. तत्त्वनिष्ठ लोक म्हणतात की ‘सत्यम्’ हे आपल्यातील सत्-तत्त्वाचे प्रतिबिंब आहे. ‘शिवम्’ हे आपल्यातील चित्-तत्त्वाचे प्रतिबिंब आहे. ‘सुंदरम्’ हे आपल्यातील आनंदतत्त्वाचे प्रतिबिंब आहे. काही जण तर असेही म्हणतात की आपल्याला सत्यम्, शिवम्, सुंदरम अशी ध्येयाची त्रिमूर्ती दिसते, ती आपल्या पाहण्याच्या शक्तीची मर्यादा आहे. खरे सत्-चित्-आनंद – स्वरूप असे एकच ‘सच्चिदानंद’ तत्त्व आहे. त्याचीच तीन प्रतिबिंबे आपल्याला सत्यम्, शिवम्, सुंदरम् अशी दिसतात. ही मला वाटते बांधिलकीची परमोच्च पातळी आहे. बांधिलकीच्या पूर्ण उमललेल्या फुलातील केसराचा दांडा आहे. सर्वांनाच बांधिलकीचे हे फूल पूर्ण उमलण्याचा स्वतःच्या बाबतीत अनुभव मिळो. स्वतःभोवतीच्या जगाची जाणीव व्यापक करायला सुरुवात झाली की या फुलाची पहिली पाकळी उमलते. किमान ही पहिली पाकळी उमलण्यासाठी इतरांना मदत करण्याची संधीही सर्वांना मिळो.