महाभारत काळात ‘आत्मार्थं पृथिवीं त्यजेत्’ म्हणजे स्वतःच्या हितासाठी सगळ्या जगाचा त्याग करावा, अशी घोषणा होती. पाच हजार वर्षांनी विवेकानंदांनी त्या घोषणेत सुधारणा केली. ‘आत्मनो मोक्षार्थं जगत् हिताय च’ अशी घोषणा त्यांनी केली. ‘स्वतः देवमाणूस बनण्यासाठी सगळ्या जगाचा त्याग करावा, या ऐवजी ‘स्वतः देवमाणूस बनावे आणि जगालाही देवमाणूस बनायला मदत करावी’, अशी नवीन घोषणा त्यांनी केली.
जेव्हा ‘आत्मार्थ पृथिवीं त्यजेत्’ ही घोषणा होती, तेव्हा भारतात चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. प्रत्येकाने आपआपल्या वर्णाचे काम करावे आणि स्वतःचे हित बघावे त्यातून समाजाचे हित आपोआप साधले जाईल, अशी तेव्हाची समजूत होती. तेव्हा ती पुरेशीही वाटत होती. पण विवेकानंदांनी मूळची घोषणा सुधारित केल्यावर सर्व समाजाची चारच गटांत विभागणी करण्याची कल्पनाही सोडून द्यावी लागेल. योगी अरबिंद हे सुद्धा विवेकानंदांसारखेच राष्ट्रद्रष्टे संत होते. म्हणजे राष्ट्राचा भविष्यकाळ पाहू शकणारे संत होते. भारताने सर्व जगाला देवमाणूस कसे बनायचे, हे स्वतःच्या उदाहरणाने दाखवून द्यायचे असेल, तर प्रत्येकाचा आयुष्यभर एकच वर्ण, ही कल्पना सोडून दिली पाहिजे असे योगी अरविंदांनी सांगितले.
श्रीकृष्ण लहानपणी गवळ्याचा पोर होता, गोपालन करायचा, म्हणजे तो वैश्य होता. त्याने अनेक दुष्टांचा संहार केला, म्हणून तो क्षत्रिय होता. त्याने भगवद्गीतेत ब्रह्मविद्या सांगितली म्हणून तो ब्राह्मण होता. कौरव-पांडवांच्या युद्धात त्याने अर्जुनाच्या रथाच्या घोड्यांना खरारा केला आणि युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञात जेवणाच्या पंगतीनंतरची आवराआवर केली म्हणून तो शूद्र होता. प्रत्येक व्यक्तीमध्ये चारही वर्णांची कामे करण्याची क्षमता कमी-अधिक प्रमाणांत असते. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या कालखंडात त्याला वेगवेगळ्या वर्णांची कामे करावी लागतात. त्यामुळे ‘आत्मनो मोक्षार्थं जगद्विताय च’ या नव्या घोषणेचा काळात समाजाची चार वर्णांतील विभागणी चालणार नाही.
भारताला विश्वगुरू व्हायचे असेल तर चातुर्वर्ष्याच्या चौकटीतून बाहेर पडावे लागेल. चातुर्वर्ण्यच नको म्हटल्यावर जातींची उतरंडही तत्त्वतः आपोआपच गेली. व्यवहारात चातुर्वर्ण्य आणि जातिभेद या दोन्हीचा जाच आणि बोच जाण्यासाठी आणखी काही पिढ्या मुद्दाम प्रयत्न करायला लागतील.